न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे कलम 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदारांनी ऑईल केक मेकींग वूडन मशीन 15 कि.ग्रॅ. कपॅसिटी तेलाचा घाणा वि.प. यांचेकडून खरेदी केला आहे व त्या संदर्भात चेकने वि.प. यांना पैसे अदा केले आहेत. मात्र घाणा खरेदी केलेनंतर लगेचच म्हणजेच दि. 25/6/2019 रोजी पासून खराब असे काळे तेल येवू लागले व त्यांचे सांगण्यावरुन सुनिल इंडस्ट्रीज, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर येथे दुरुस्तीसाठी घाणा दिला. परंतु सदरचा घाणा दुरुस्त झाला नाही. सबब, तक्रारदार यांनी दि.14/6/2020 रोजी वि.प. कडे घाणा परत केला. मात्र घाण्यापोटी स्वीकारलेली रक्कम तक्रारदार यांनी वारंवार मागूनही सदरची रक्कम वि.प. यांनी परत केली नसल्याने तक्रारअर्ज दाखल करणे भाग पडले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प. यांची जाहीरात पाहिल्यानंतर तेलाचा घाणा खरेदीसाठी दि. 02/01/2019 रोजी वि.प. पैकी शाम दातार यांचे बरोबर सुरुर ता. वाई जि. सातारा येथील फॅक्टरी युनिटमध्ये मिटींग घेवून त्यानुसार दि. 17/2/2019 रोजी वि.प. यांनी दिले कोटेशननुसार व उभयतांमध्ये ठरलेप्रमाणे लाकडी घाण्याची किंमत रक्कम रु. 1,60,000/- तसेच जी.एस.टी. 18 टक्के प्रमाणे रु.30,060/- प्रमाणे किंमत ठरली व सर्व्हिस चार्जेसकरिता रक्कम रु.20,000/- तसेच 2.5 टन कच्चे शेंगदाणे किंमत रु. 1,75,000/- व इतर साहित्य अशी एकत्रित एकूण रक्कम रु.3,80,000/- तक्रारदार यांनी वि.प. यांना देणेचे ठरले व अॅडव्हान्स म्हणून तक्रारदाराने वि.प. यांना कॅनरा बँक, जयहिंद चौक, जयसिंगपूर या बँकेचा रक्कम रु. 1,60,000/- चा दि. 21/2/2019 चा धनादेश दिला व उर्वरीत रक्कम रु. 2,20,000/- इतकी रक्कम चेक क्र.811114 अन्वये दि. 18/4/2019 रोजी आर.टी.जी.एस. ने वि.प.चे बँक खातेवर जमा केली. मात्र सदरची सर्व रक्कम जमा करुनही वि.प. यांनी तेलाचा घाणा, 2.5 टन कच्चे शेंगदाणे व इतर साहित्य पाठविले नाही. तदनंतर सव्वा महिन्यानंतर म्हणजेच दि. 25/5/2019 रोजी एक घाणा मशिन व फक्त 1 टन कच्चे शेंगदाणे पाठवून दिले व उर्वरीत दीड टन शेंगदाणे हे नंतर पाठवतो असे सांगितले. वि.प.क्र.1 शाम दातार यांचे उपस्थितीत दि. 10/6/2019 रोजी सदरचे तक्रारदार यांच्या व्यवसायाचे उद्घाटन झाल्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे दि. 25/6/2019 रोजी खराब काळे तेल येणेचा दोष निर्माण झाला. याची कल्पना तक्रादार यांनी वि.प.क्र.1 शाम दातार, किरण चव्हाण (मिस्त्री), मानसिंग खोत (मॅनेजर) यांना दिली. तरीसुध्दा वि.प. यांनी 3 महिने मशिनचे दुरुस्तीसाठी व दोष दूर करण्यासाठी घेतले. याकरिता तक्रारदार यांनी वि.प. कडून वेळोवेळी तयार तेल चढया भावाने विकत घेतले. यासाठी तक्रारदार यांचे खूप मोठे व्यावसायिक नुकसान झाले. तदनंतर वारंवार दुरुस्तीसाठी मागणी केली होती. नंतर सदरचे मशिन घाणा दि. 1/11/2019 रोजी सुनिल इंडस्ट्रीज, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर यांचेकडे नेण्यासाठी वि.प. यांनी सांगितले. यावेळीही तक्रारदार यांना सर्व वाहतूक खर्च करावा लागला. मात्र वेळोवेळी दुरुस्तीबाबत चौकशी केल्यानंतर सदरचा घाणा वि.प. यांनी दुरुस्त केला तरीसुध्दा खराब काळे तेल सदरचे घाण्यातून येतच राहिल्याने दोष दूर झाला नाही. तदनंतर मशीन दुरुस्तीसाठी दिले असता 4 महिन्यांत सदरचा घाणा दुरुस्त झाला नाही व तक्रारदार यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. वि.प. यांनी जो कच्चा दीड टन शेंगदाणे माल द्यावयाचा होता, त्यापैकी तक्रारदार यांनी थोडा माल व पैसे व मशिन बिलाची मागणी केल्यानंतर 27 नोव्हेबर 2019 रोजी दिले. त्यापैकी काही तयार शेंगदाण्याचा माल दि. 22/12/2019 रोजी रक्कम रु.30,000/- व दि 27/12/2019 रोजी रक्कम रु. 26,700/- इतकी रक्कम तक्रारदार यांचे खात्यावर वि.प. यांनी जमा केली व मशिन दुरुस्तीसाठी परत द्यावे असे सांगितले व तक्रारदार यांना दुसरे मशिन देतो असे सांगितले. तक्रारदार यांनी दि. 14/6/2020 रोजी सदरचे मशिन दुरुस्तीसाठी वि.प. यांचेकडे परत दिले. दि. 5/07/2020 रोजी सदरचे मशिन स्वीकारलेची पोहोच तक्रारदार यांना दिली. मात्र तदनंतर, आम्ही तुमचा घाणाही देणार नाही व पैसेही देणार नाही, तुम्ही कोर्टात जा असे कथन करुन वि.प. यानी तक्रारदार यांना सदोष लाकडी घाणा देवून फसवणूक केली आहे. सबब, अशा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन वि.प. यांनी तक्रारदार यांची फसवणूक केली आहे. त्याकरिता वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून स्वीकारलेली रक्कम रु. 1,90,060/-, सर्व्हिस चार्जेस करिता स्वीकारलेली रक्कम रु. 20,000/- अशी एकत्रित रक्कम रु.2,10,060/- इतकी रक्कम परत करण्याकरिता सदरचा तक्रारअर्ज तक्रारदाराने दाखल केला आहे. तसेच अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 15,000/- व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- ची मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारअर्जासोबत कागदयादीने लाकडी घाणा दिलेले कोटेशन, वि.प. यांनी दिलेले बिल, वि.प. यांची जाहीरात, वि.प. यांनी लाकडी घाणा परत केलेची पावती, तक्रारदार यांचे बँकेचा खाते उतारा इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. वि.प.क्र.1 ते 6 यांनी आयोगाची नोटीस लागू होवूनही मुदतीत म्हणणे दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द “ नो से ” आदेश करण्यात आले. मात्र तदनंतर सदरचे “ म्हणणे नाही ” हा आदेश वि.प. यांचे दि. 25/11/21 चे आदेशाने रद्दबातल करुन वि.प. यांचे म्हणणे दाखल करुन घेतले. वि.प. यांचे कथनानुसार, सदरचा तक्रारदाराचा अर्ज खोटा व चुकीचा असून तो मान्य व कबूल नाही. तसेच वि.प. यांना दोघांमध्ये झालेल्या करारप्रमाणे तक्रारदार यांनी रक्कम दिलेनंतर 45 दिवसांचे आत मशीन व कच्चा माल देणे वि.प. यांचेवर बंधनकारक होते. त्याप्रमाणे सदरचे कराराचे अटी शर्तीनुसार दि. 25/5/2019 रोजी मशिन पोच केले आहे. सबब, वि.प. यांनी कराराचा कोणताही भंग केलेला नाही. व्यवसायाची सुरुवात करण्यापूर्वीच करारातील अटी नुसार वि.प. यांनी सदरचा घाणा कशा प्रकारे चालवावा यासाठीचे प्रशिक्षण घेण्याबाबत तक्रारदार यांना पूर्णपणे कल्पना दिलेली आहे व कंपनीमध्ये पूर्णपणे मोफत प्रशिक्षण देण्याची वि.प. यांची तयारी होती. मात्र तक्रारदाराने सदरचे प्रशिक्षण घेतलेले नाही व घाईगडबडीने व्यवसायास सुरुवात केल्याने व मशीन व्यवस्थित चालविता न आल्याने मशिनमध्ये दोष असल्याचे कारण तक्रारदारांनी वेळोवेळी पुढे केले आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना कोणताही सदोष लाकडी घाणा दिलेला नाही तसेच त्याऐवजी दुसरा घाणा देतो असेही कधीही सांगितलेले नाही. तक्रारदार व वि.प. यांचा पैशाच्या देवाणघेवाणीचा हिशोब तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून खरेदी केलेल्या मालाची रक्कम वजा करुन उर्वरीत राहिलेली रक्कम तक्रारदार यांना त्यांचे तक्रारअर्ज कलम 6 मध्ये नमूद केल्याप्रमाणे अदा करुन व्यवहार पूर्ण झालेला आहे. याउलट तक्रारदार यांचेवरही रक्कम रु. 1,02,900/- इतका खर्च सुनिल इंडस्ट्रीज यांचेकरिता वि.प. यांनी केलेला आहे. तक्रारदार यांचा अर्ज मुदतीत नाही. ज्या ज्या वेळी मशिनमध्ये बिघाड झालेला आहे, त्या त्या वेळी वि.प. यांनी तक्रारदार यांचे सदर मशिन स्वखर्चाने दुरुस्त करुन दिलेले आहे. मात्र प्रत्येक वेळी सातारा येथून कोल्हापूर येथे वि.प. यांनी मेकॅनिक व साहित्य पाठविणे अशक्य असलेने तक्रारदार यांचे नजीक असणा-या सुनिल इंडस्ट्रीज यांच्या करवी सदरचे लाकडी घाणा मशिनची संपूर्ण दुरुस्ती केलेली आहे. माहे जुलै 2019 मध्ये सांगली व कोल्हापूर भागात पर्जन्यवृष्टी झाल्याने पूर परिस्थिती ओढवल्याकारणाने लाकडी घाणा मशिन हे पाण्याखाली अडकले व वि.प. व तक्रारदार यांना त्यांचेमध्ये ठरल्याप्रमाणे व्यवसाय करता येणे अशक्य झाले. सबब, उभयतांनी झालेला सर्व हिशेब तपासून वि.प. यांचेकडे तक्रारदार यांची निघणारी संपूर्ण रक्कम रु. 30,000/- व रु.26,700/- ही तक्रारदार यांना दिलेली आहे. सबब, वि.प. यांची कोणतीही चूक नसताना त्यांना नाहक रक्कम रु. 1,02,900/- इतका आर्थिक भुर्दंड तक्रारदार यांचे चुकीमुळे झालेला आहे. सबब, तक्रारदार यांचा सदरचा अर्ज नामंजूर करण्यात यावा व कॉम्पेनसेटरी कॉस्ट म्हणून रक्कम रु. 25,000/- वि.प. यांनाच अदा करण्याचे आदेश व्हावेत असे वि.प. यांचे कथन आहे.
5. याबरोबरच वि.प. यांनी, दि. 25/11/2021 रोजी आपल्या म्हणण्यासोबत सदरचे आयोगास प्रस्तुत तक्रार चालविणेचे न्यायालयीन अधिकाक्षेत्र नसल्याबाबतचा मुद्दा काढणेत यावा असा अर्ज दिला होता. सदर अर्ज हा अंतिम युक्तिवादाचे वेळी निर्णीत करणेत येईल असा आदेश या आयोगाने केला आहे. सबब, आज रोजी प्रथमतः सदरचा अर्ज निर्णीत करणेत येतो. या अर्जावर तक्रारदार यांनी दि. 20/1/22 रोजी म्हणणे देवून तक्रार यांचा व्यवसाय हा या कोर्टाचे अधिकाक्षेत्रत येत असलेबाबतचे म्हणणे दाखल केले व वि.प. यांचा अधिकारक्षेत्राबाबतचा अर्ज नामंजूर करण्यात यावा असे कथन केले. वि.प. यांचा अर्ज तसेच तक्रारदार यांनी त्यावर दाखल केलेल्या म्हणण्याचा विचार करता तक्रारदार यांचे अर्जात नमूद व्यवसाय हा या कोर्टाचे अधिकारक्षेत्रात म्हणजेच कोल्हापूर येथे येतो व ग्राहक संरक्षण कायदा कलम 34(2) (ड) नुसार The complaint shall be instituted in a District Commission within local limit of whose jurisdiction, the complainant resides or personally works for gain असे स्पष्टपणे नमूद केले आहे. सबब, तक्रारदार हे या आयोगाचे अधिकारक्षेत्रात असल्याने व त्यांचा व्यवसायही याच अधिकारक्षेत्रात येत असल्यामुळे सदरचा तक्रारअर्ज या आयोगासमोर चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, आजरोजी सदरचा अधिकारक्षेत्राबाबतचा अर्ज हे आयोग निर्णीत करीत आहे व तदनंतर पुढील मुद्यांचा विचार करीत आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार यांनी वि.प. यांची जाहीरात पाहिलेनंतर वि.प. बरोबर तेलाचा घाणा खरेदीसाठी दि. 02/01/2019 रोजी वि.प. पैकी शाम दातार यांचेबरोबर मिटींग केली व तदनंतर दि. 17/2/2019 रोजी दिलेल्या कोटेशननुसार लाकडी घाणा रक्कम रु. 1,60,000/- तसेच जीएसटी रु. 30,060/- सर्व्हिस चार्जेस रक्कम रु. 20,000/- व 2.5 टन कच्चे शेंगदाणे किंमत रु.1,75,000/- इतर साहित्य अशी एकत्रित रक्कम रु. 3,80,000/- इतकी देण्याचे ठरले व तक्रारदार यांनी त्यानुसार वि.प. यांना रक्कम अदा केली. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी या संदर्भातील कागदपत्रे दाखल केलेली आहेत. यावरुन सदरचा घाणा हा तक्रारदार यांनी वि.प यांचेकडूनच घेतल्याने तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार वि.प. यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. तक्रारदार यांनी अर्जात नमूद केल्याप्रमाणे दि. 17/2/2019 चे दिले कोटेशनप्रमाणे वि.प. यांचेकडून घाणा खरेदी केला आहे व उभयतांमध्ये ठरल्याप्रमाणे लाकडी घाणा किंमत रक्कम रु. 3,80,000/- इतकी रक्कम वि.प. यांना देण्याचे ठरले हे उभयपक्षी मान्य आहे. तक्रारदाराने लगेचच म्हणजे दि. 25/6/2019 रोजी खराब काळे तेल होण्याचा दोष निर्माण झाल्याबाबत वर नमूद वि.प.क्र.1 शाम दातार तसेच अन्य काही लोकांना माहिती दिली. मात्र दरम्यानच्या काळात तक्रारदाराच्या व्यवसायाचे खूप मोठे नुकसान झाले. घाणा दुरुस्त करुनही सदरचा दोष हा कायम राहिला हे तक्रारदारतर्फे दाखल कागदपत्रांवरुन सिध्द होते. तसेच तक्रारदारने दि. 21/2/2019 रोजी रक्कम रु. 1,60,000/- व दि. 18/04/2019 रोजी रक्कम रु. 2,20,000/- दिल्याबाबतची कागदपत्रेही याकामी दाखल आहेत. वि.प. हे जरी तक्रारदार यांचे विरुध्द आपले म्हणण्यामध्ये काही आक्षेप नोंद करीत आहेत, जसे की, सदरचे घाणा दुरुस्तीसाठी वि.प. यांनी रक्कम रु.1,02,900/- इतका खर्च सुनिल इंडस्ट्रीज येथे मशिन दुरुस्तीसाठी आला व त्यांची रक्कम ही वि.प यांनीच दिलेली आहे. तथापि सदरचे मशिन हे केवळ मशीन व्यवसाय सुरु केल्यानंतर 15 दिवसांतच खराब घाणा तेल येवू लागल्याने तक्रारदार यांनी वि.प यांना याबाबतची माहिती लगेचच दिली आहे. सबब, वि.प. कथन करीत आहेत त्याप्रमाणे मशिन दुरुस्ती करुनही सदरचे मशिनमधील दोष हा दूर झालेला नाही अगर त्याचे निराकरण वि.प. यांना करता आलेले नाही ही बाब स्वयंस्पष्ट आहे. वारंवार सदरचे मशिन तक्रारदार यांना दुरुस्त करावे लागत असल्याने तशी मागणी तक्रारदार यांनी वारंवार वि.प. यांचेकडे केलेली आहे. याकामी सुनिल इंडस्ट्रीज यांचे बिलही वि.प. यांनीच दाखल केले आहे की, ज्या इंडस्ट्रीजमध्ये वि.प. यांनी मशिन दुरस्त करुन घेतले आहे. मात्र दाखल कागदपत्रांवरुन मशीन हे खरोखरच किती सदोष होते याची कल्पना या आयोगास येत आहे. त्यामुळे वि.प. हे जरी सदरचे मशिन दुरुस्त करुन दिले असे कथन करीत असले तरी जर सदरचे मशीन दुरुस्त झाले असते तर तक्रारदाराने ते वि.प. यांचेकडे सुपूर्त केले नसते. यावरुनही हे मशीन सदोष आहे व त्यातील दोषांचे निराकरण झाले नसल्याची बाब या आयोगासमोर आहे. वि.प. हे स्वतः मशीन उत्पादन करीत नाहीत. त्यामुळे सदरचे मशिनशी आमचा काहीही संबंध नाही असेही कथन केले आहे. मात्र वादाकरिता असे जरी असले तरी मशीन खरेदी केलेला टॅक्स इनव्हॉईस हा वि.प. यांचेच नावचा आहे. सबब, वि.प. यांनी घेतलेला आक्षेप हे आयोग फेटाळून लावत आहे. मशिन जर सदोष नसते तर तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज आयोगासमोर दाखल करण्याची आवश्यकताच नव्हती असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदार यांना वि.प यांनी दिलेल्या रु.30,000/- व रक्कम रु. 26,700/- या रकमा या हिशोब तपासून दिलेल्या आहेत असे कथन केले आहे. तथपि सदरच्या रकमा या काही तयार शेंगतेलाचा माल यासाठी तक्रारदार यांचे खात्यावर वर्ग केल्याचे स्पष्ट होते. तक्रारदार यांना जो कच्या दीड टन शेंगदाण्याचा माल द्यावयाचा होता. मात्र तो माल तक्रारदार यांना दिला गेला नाही. त्यासाठी सदरच्या रकमा वि.प. यांनी तक्रारदार यांच्या खात्यावर जमा केल्या आहेत हे तक्रारदार यांनी मान्य केले आहे. मात्र या कालावधीमध्ये तक्रारदार यांच्या व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले आहे ही बाब या आयोगास नाकारता येत नाही. वि.प. यांनी आपला व तक्रारदार यांचा हिशोब देवघेवीचा वाद हा पूर्ण झाला आहे असे कथन केले आहे. मात्र त्या संदर्भातील कोणताही पुरावा या आयोगासमोर वि.प. यांनी दाखल केलेला नाही. सबब, तक्रारदार यांना वि.प. यांनी दिलेल्या रकमा तसेच तक्रारदार यांनी सदरचा घाणाही वि.प. यांना परत केलेला आहे. या सर्व गोष्टींचे अवलोकन या आयोगाने केले आहे व वि.प यांनी तक्रारदार यांना सदोष घाणा देवून त्यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे. याकरिता वि.प. यांनी मागितलेली रक्कम रु.1,90,60/- तसेच त्यापोटी स्वीकारलेले सर्व्हिस चार्जेस रु. 20,000/- अशी एकत्रित रक्कम रु. 2,10,060/- ही तक्रारदार यांना वि.प. यांनी अदा करण्याचे निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. सदरची रक्कम ही तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदार यांचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने देण्याचे आदेश वि.प. यांना करण्यात येतात. तसेच मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- व अर्जाचा खर्च रु.15,000/- तक्रारदार यांनी मागितला असला तरी या आयोगास सदरची रक्कम संयुक्तिक वाटत नसल्याने मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु. 3,000/- देण्याचे निष्कर्षाप्रत हे अयेाग येत आहे. तक्रारदाराने वि.प. यांना घाणा परत दिला असल्याने याबाबत आदेश नाही. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प.क्र.1 ते 6 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना रक्कम रु.2,10,060/- देणेचे आदेश करणेत येतात. सदर रकमेवर वि.प. यांनी तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3. वि.प. क्र.1 ते 6 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.