आदेश- एस.एस.म्हात्रे, मा.अध्यक्षा
तक्रारदाखलते कामी आदेश:-
प्रस्तुत तक्रार, तक्रारदार म्हणून श्री.राजेंद्र मनहरलाल दोशी यांनी सामनेवाले क्र.1 व 2 विरुध्द दाखल केली असून, तक्रारदार यांनी नमुद केल्याप्रमाणे त्यांनी सामनेवाले क्र.1 यांनी उत्पादित केलेले 4 एअर कंडिशनर्स सामनेवाले क्र.2 यांचेकडून रु.1,20,000/- या किंमतीस दि.०१/०५/२०१८ रोजी खरेदी केले. परंतु सदर 4 एअर कंडिशनर्स हे त्यांच्या वॉरंटी कालावधीत सदोष असल्याचे तक्रारदारांना लक्षात आले. तक्रारदारांनी त्याबाबत सामनेवाले यांचेकडे संपर्क केला परंतु सामनेवाले यांनी सदर एअरकंडिशनर्स तक्रारदारांना दुरुस्त करुन अथवा बदलून न दिल्याने तक्रारदारांनी सामनेवाले यांना कायदेशीर नोटीस बजावली त्यानंतर देखील सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतेही सहकार्य केले नाही त्यामुळे तक्रारदारांना त्यांच्या हॉटेलच्या व्यवसायात आर्थिक नुकसान सोसावे लागले, तसेच मानसिक त्रास झाला असे नमुद करुन सामनेवालेविरुध्द तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार, तक्रारीत नमुद मागण्यांबाबत दाखल केली आहे.
तक्रारदाराच्या वकीलांचा तक्रार दाखल करणे कामी युक्तीवाद ऐकला, तसेच तक्रारदारांनी अभीलेखावर दाखल केलेल्या आवश्यक कागदपत्रांचे अवलोकन केले असता, सामनेवाले क्र.1 यांनी उत्पादीत केलेले, सामनेवाले क्र.2 विरानी इलेक्ट्रॉनिक्स यांचेकडून दि.01/05/2018 रोजी प्रत्येकी रु.30,000/- प्रमाणे 4 एअर कंडिशनर्स खरेदी करण्यात आले असून त्याबाबतच्या टॅक्स इन्व्हॉईस/रिसीप्टवर “मनहर गेस्ट हाऊस” असे नाव नमुद आहे त्यावर तक्रारदाराचे नाव नमुद नाही तसेच तक्रारीच्या परिच्छेद क्र.10 मध्ये सदर 4 एअर कंडिशनर्स तक्रारदाराच्या हॉटेलच्या व्यवसायासाठी खरेदी करण्यात आल्याचे व हॉटेलच्या रुममध्ये सदर एअर कंडिशनर्स व्यवस्थीत चालले असते तर तक्रारदारांना त्यापासून प्रतिमहिना रु.2,00,000/- ते रु.2,80,000/- पर्यंत आर्थीक लाभ झाला असता असे नमुद केल्याचे दिसून येते. तसेच सामनेवाले यांना पाठविलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये देखील सदर एअर कंडिशनर्स हॉटेलच्या व्यवसायाकरिता खरेदी केल्याचे व ते सदोष असल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे नमुद आहे परंतु सदर कायदेशीर नोटीस श्री.जिगर राजेंद्र दोशी यांनी सामनेवाले यांना दिल्याचे दिसून येते व प्रस्तुत तक्रार श्री.राजेंद्र दोशी यांनी तक्रारदार म्हणून दाखल केलेली आहे व टॅक्स इन्व्हॉईसवर खरेदीदार म्हणून मनहर गेस्ट हाऊस यांचेकडून रक्कम रु.1,20,000/-4 एअर कंडिशनर्सच्या खरेदीकरिता सामनेवाले क्र.2 यांना प्राप्त झाले असे नमुद आहे. यावरुन तक्रारीत तक्रारदार यांचे नावाबाबत तांत्रिक त्रुटी आढळते तसेच तक्रारीत नमुद 4 एअर कंडिशनर्स मनहर गेस्ट हाऊस या हॉटेलमधील रुम्स मध्ये लावण्याकरिता व सदर रुम्स हॉटेल व्यवसायाकरिता वापरुन त्यापासून नफा कमाविण्याकरिता खरेदी केले असल्याने त्यामध्ये व्यापारी हेतू दिसून येतो व तसा उल्लेख तक्रारदारांनी तक्रारीत केला आहे, तक्रारीत कोठेही ते हॉटेल व्यवसाय स्वत:च्या चरितार्थासाठी करतात असा उल्लेख दिसून येत नाही. तक्रारीत व्यापारी हेतू दिसून येत असल्याने तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयाच्या ग्राहक या व्याख्येत येत नाहीत, सबब प्रस्तुत तक्रार दाखल टप्यावर असतांना तक्रारदारांना तक्रारीत नमुद मागण्यांसाठी योग्य त्या न्यायालयात नविन तक्रार दाखल करण्याची मुभा देऊन, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयाच्या ग्राहक या व्याख्येत बसत नसल्याने, प्रस्तुत तक्रार कार्यक्षेत्राअभावी ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 36(2) नुसार दाखल टप्यावर असतांना दाखल करुन घेण्यास नाकारण्यात येते. प्रकरण निकाली काढण्यात येते. खर्चाबाबत आदेश नाही.