आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्त्यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती क्रमांक 1 श्रीमती रिना ही मयत अजय सदाराम शिवणकर यांची विधवा आहे. तक्रारकर्ती क्रमांक 2 कु. श्रावणी व तक्रारकर्ती क्रमांक 3 कु. कर्तिकी ह्या मयत अजय शिवणकर यांच्या मुली असून तक्रारकर्ती क्रमांक 1 श्रीमती रिना त्यांची अज्ञान पालनकर्ती आहे.
3. मयत अजय शिवणकर याने विरूध्द पक्ष क्रमांक 1 बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, शाखा गोंदीया यांचेकडून खालीलप्रमाणे पॉलीसी विकत घेतल्या होत्या.
पॉलीसी नंबर दिनांक
1) 003738511 28/12/2009
2) 004955129 29/06/2011
3) 004955151 30/06/2011
वरील पॉलीसी विकत घेतेवेळी अजय शिवणकर याचे स्वास्थ्य उत्तम होते व त्यास टी. बी. किंवा अन्य कोणताही आजार नव्हता. अजय यास प्रथमतः दिनांक 19/05/2012 रोजी शासकीय रूग्णालय, गोंदीया येथील तपासणीत टी. बी. झाल्याचे माहीत झाले. त्यानंतर त्याने सदर आजारासाठी उपचार घेतले. परंतु दिनांक 08/01/2013 रोजी त्याचा मृत्यू झाला. तक्रारकर्तीने अजयच्या मृत्यूबाबत विरूध्द पक्षाला दिनांक 19/02/2013 रोजी कळविले आणि मृत्यू दाव्याची विमा रक्कम रू. 16,00,000/- ची मागणी केली. परंतु पॉलीसी विकत घेण्यापूर्वीपासून अजय टी. बी. ने ग्रस्त होता, परंतु त्याने सदर आजाराची माहिती पॉलीसी प्रस्तावात लपवून ठेवली आणि पॉलीसी खरेदी केल्याचे खोटे कारण देऊन विमा दावा दिनांक 12/04/2013 रोजी नामंजूर केला आणि मृत्यू दाव्याची रक्कम रू. 9,628.09 चा धनादेश तक्रारकर्तीस पाठविला. प्रत्यक्षात खरेदी केलेल्या पॉलीसीप्रमाणे मृत्यू दाव्यापोटी देय रक्कम खालीलप्रमाणे येते.
पॉलीसी नंबर दिनांक विमा जोखीम रक्कम
1) 003738511 28/12/2009 रू. 10,00,000/-
2) 004955129 29/06/2011 रू. 01,00,000/-
3) 004955151 30/06/2011 रू. 05,00,000/-
एकूण रू. 16,00,000/-
4. तक्रारकर्तीने मागणी करूनही वरीलप्रमाणे देय असलेली विमा दाव्याची रक्कम दिलेली नाही. वरील रकमेशिवाय पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारकर्ती तिच्या पतीच्या आकस्मिक मृत्यूमुळे अपघाती मृत्यूबाबतची अतिरिक्त रक्कम देखील मिळण्यास पात्र आहे. म्हणून तक्रारकर्तीने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1. अदा न केलेली विमा रक्कम रू. 16,00,000/- तक्रारीचा निकाल लागेपर्यंत द. सा. द. शे. 18% व्याजासह देण्याचा विरूध्द पक्षाला आदेश व्हावा.
2. विरूध्द पक्षाच्या कृतीमुळे तक्रारकर्तीला जाण्या-येण्याच्या खर्चापोटी कराव्या लागलेल्या खर्चाबाबत रू. 10,000/- देण्याचा विरूध्द पक्षाला आदेश व्हावा.
3. शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई रू.40,000/- आणि तक्रार खर्च रू.10,000/- देण्याचा विरूध्द पक्षाला आदेश व्हावा.
4. सेवेतील न्यूनतेबाबत रू. 20,000/- देण्याचा विरूध्द पक्षाला आदेश व्हावा.
5. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्तीने रूग्णाचे ओळखपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विरूध्द पक्षाचे दिनांक 31/03/2013 रोजीचे पत्र, दिनांक 12/04/2013 रोजीचा रू. 9,628.09 चा धनादेश, तक्रारकर्तीने वकिलामार्फत पाठविलेली कायदेशीर नोटीस, त्यावर विरूध्द पक्षाने दिलेले उत्तर इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
6. विरूध्द पक्ष क्रमांक 4 यांनी लेखी जबाब दाखल करून तक्रारीतील म्हणणे मान्य केले आहे आणि तक्रारकर्तीचे पती अजय शिवणकर यांनी पॉलीसी घेतल्या तेव्हा त्यांना टी.बी. चा आजार नसल्याने त्यांनी प्रस्ताव अर्जात आजाराबाबत कोणतीही माहिती लपवून ठेवली नसल्याचे म्हटले आहे.
विरूध्द पक्ष क्रमांक 1, 2, 3 व 5 यांनी संयुक्त लेखी जबाबाद्वारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे.
त्यांचे म्हणणे असे की, मयत अजय सदाराम शिवणकर तक्रारीत नमूद पॉलीसीज घेण्यापूर्वी 2009 पासून टी. बी. ने ग्रस्त होता व राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण रूग्णालय, देवरी येथून टी. बी. चे औषध घेत होता. अजय यांस क्षयरोग असल्याची व त्यासाठी उपचार घेत असल्याची पूर्ण माहिती असतांना देखील तक्रारीत नमूद पॉलीसी खरेदी करतांना पॉलीसी प्रस्तावामध्ये टी. बी. च्या आजाराबाबतची माहिती लपवून ठेवली आणि विरूध्द पक्षाकडून धोकेबाजीने वरील पॉलीसीज मिळविल्या आहेत. पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे आजाराबाबतची माहिती लपवून खोट्या प्रतिज्ञेवर मिळविलेल्या पॉलीसी Void-ab-initio (मुळातच रद्द) असल्याने तक्रारकर्ती सदर पॉलीसीप्रमाणे पॉलीसीधारकाच्या मृत्यूबद्दल कोणताही विमा लाभ मिळण्यास पात्र नाही.
आपल्या कथनाचे पुष्ठ्यर्थ विरूध्द पक्ष क्रमांक 1, 2, 3, व 5 ने खालील दस्तावेज दाखल केले आहेत.
1) आवेदन पत्र,
2) विरूध्द पक्ष विमा कंपनीने विमाधारकास दिलेले क्लेम स्टेटमेंट,
3) मृत्यू प्रमाणपत्र,
4) औषधोपचार कार्ड
7. तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
8. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदर प्रकरणात तक्रारकर्तीचे पती मृतक अजय शिवणकर यांनी तक्रारीत नमूद अनुक्रमे 1 ते 3 पॉलीसी विरूध्द पक्ष क्रमांक 3 कडून खरेदी केल्याबद्दल उभय पक्षात वाद नाही. तक्रारकर्तीचे पती अजय शिवणकर हे दिनांक 08/01/2013 रोजी मरण पावल्याबाबत मृत्यू प्रमाणपत्र तक्रारकर्तीने दस्तावेज यादीसोबत दस्त क्रमांक 2 वर दाखल केले आहे. पॉलीसीधारकाची वारस म्हणून तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे वरील तीनही पॉलीसीप्रमाणे विमा रक्कम मिळावी म्हणून विमा दावे दाखल केले होते. तक्रारकर्तीचे सदर विमा दावे नामंजूर केल्याबाबत दिनांक 31/03/2013 रोजी पाठविलेल्या पत्राच्या प्रती तक्रारकर्तीने दस्तावेज क्रमांक 3 वर दाखल केल्या आहेत. त्यांत म्हटले आहे की, विमाधारक पॉलीसी काढण्याच्या आधीपासून टी. बी. (Tuberculosis) ने ग्रस्त होता व विमा प्रस्तावाच्या दिनांकापूर्वीपासून त्यासाठी उपचार घेत होता. विमा प्रस्तावात विमा धारकाने आरोग्य विषयक प्रश्नांना खोटी उत्तरे दिली आणि त्याच्या आजारपणाची बाब हेतूपुरस्सर लपवून ठेवली त्यामुळे पॉलीसी अर्जात दिलेले घोषणापत्र तसेच पॉलीसी कराराप्रमाणे विमा कंपनी पॉलीसीअंतर्गत कोणतेही विमा लाभ देण्यास जबाबदार नाही. म्हणून विमा दावे नामंजूर करण्यात आले आहेत. पॉलीसी क्रमांक 003738511 संबंधाने पॉलीसी सरेंडर मूल्य रू. 9,628.08 चा धनादेश सोबत पाठविला आहे. विरूध्द पक्षाने विमा दावे नामंजुरीची दिलेली कारणे कोणत्याही कायदेशीर पुराव्याद्वारे सिध्द केली नसून ते पूर्णतः खोटे असल्याने सदर निर्णयाबाबत विचार करावा म्हणून तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्रमांक 2 ला दिनांक 16/05/2013 रोजी अधिवक्ता श्री. पी. टी. रोकडे यांचेमार्फत पाठविलेल्या नोटीसची प्रत आणि विरूध्द पक्षाकडून प्राप्त परंतु परत केलेल्या धनादेशाची प्रत दस्त क्रमांक 5 वर दाखल केली आहे. सदर नोटीसला विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने दिलेल्या उत्तराची प्रत दस्त क्रमांक 6 वर आहे.
तक्रारकर्तीच्या अधिवक्त्यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, तक्रारकर्तीचे पती अजय शिवणकर यांना दिनांक 28/12/2009 रोजी पहिली पॉलीसी काढली तेव्हा आणि त्यानंतर दिनांक 29/06/2011 व 30/06/2011 रोजी अनुक्रमे दुसरी व तिसरी पॉलीसी काढली तेव्हा टी. बी. किंवा कोणताही आजार नव्हता व त्यासाठी त्यांनी ग्रामीण रूग्णालय, देवरी किंवा अन्य कोणत्याही रूग्णालयात कधीही उपचार घेतले नव्हते.
पॉलीसीधारक दिनांक 19/05/2012 रोजी ग्रामीण रूग्णालय, देवरी येथे उपचारासाठी गेला तेव्हा प्रथमच त्याला टी. बी. चा आजार झाल्याने डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले आणि टी. बी. रूग्ण क्रमांक 96/12 अन्वये त्याची पुढील उपचारासाठी नोंदणी करून घेतली आणि उपचार सुरू केले. त्याबाबत सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत रूग्णाचे ओळखपत्र दिले ते तक्रारकर्तीने दस्त क्रमांक 1 वर दाखल केले आहे. त्यांत
1) टी. बी. नंबर - 96/12
2) क्षयरोगाचे वर्गीकरण – फुफ्फुसाचा क्षयरोग
3) उपचार सुरू केल्याची तारीख – 19/05/2012
4) रूग्ण प्रकार – नवीन
5) औषधोपचार पध्दती – कॅटेगरी-1
असे नमूद केले आहे. जर अजय शिवणकर याचा टी.बी. नंबर 96/09 असता व त्याने त्याच रूग्णालयात टी. बी. साठी दिनांक 18/05/2009 पासून उपचार घेतले असते तर 2012 मध्ये पुन्हा त्याच रोगासाठी उपचार घेतांना सदर ओळखपत्रात रूग्ण प्रकार नवीन न लिहिता त्याऐवजी
1) रिलॅप्स – रोगाचा पुररूद्भाव झालेला
2) डिफॉल्टर – अर्धवट औषधोपचार घेतलेला
3) फेल्युअर – औषधांना दाद न देणारा
4) ट्रान्सफर होऊन आलेला
असे नमूद असते तसेच कॅटेगरी देखील 2 किंवा 3 अशी नमूद असती. तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजुरीस खोटे कारण निर्माण करण्यासाठी Annexure R-4 प्रमाणे खोटे औषधोपचार कार्ड दाखल केले आहे. त्यांत रूग्णाचा टी.बी. नंबर 96/09 आणि प्रथम औषधोपचाराचा दिनांक 18/05/2009 दर्शविला आहे. तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या औषधोपचार कार्ड मधील माहिती परस्पर विरोधी असल्यामुळे ग्रामीण रूग्णालयाकडून त्याची शहानिशा व्हावी म्हणून तक्रारकर्तीने दिलेल्या अर्जावरून मंचाच्या आदेशाप्रमाणे मेडिकल सुपरिन्टेन्डेन्ट, ग्रामीण रूग्णालय, देवरी यांनी दिनांक 20/05/2015 रोजी खालील माहिती सादर केली आहे.
1) दिनांक 10/05/2012 – ओ.पी.डी. मधील नोंद
2) दिनांक 18/05/2012 – ओ.पी.डी. मधील नोंद
3) दिनांक 10/05/2012 – ग्रामीण रूग्णालय देवरी येथून रेफर केल्याची नोंद.
4) दिनांक 10/05/2012 – ऍम्बुलन्स सुविधा प्रदान केल्याची नोंद
5) दिनांक 19/05/2012 – ग्रामीण रूग्णालय देवरी येथे ऍडमिट नसल्याचे दर्शविणारी IPD नोंदवहीची सत्यप्रत.
6) दिनांक 19/05/2012 – ग्रामीण रूग्णालय देवरी येथे Sputum Examination करण्यांत आल्याबाबत प्रयोगशाळा नोंदवहीची नक्कल.
विरूध्द पक्षाने अजय शिवणकर यांनी 2009 मध्ये टी.बी. क्रमांक 96/09 प्रमाणे ग्रामीण रूग्णालय, देवरी येथे टी. बी. चे उपचार घेतल्यबाबत औषधोपचार कार्ड दाखल केले आहे मात्र प्रत्यक्षात टी. बी. क्रमांक 96/09 हा अजय शिवणकर यांचा नसून पुरूषोत्तम दादाजी राऊत, मु. पो. निंबा, ता. सालेकसा, जिल्हा गोंदीया यांचा होता व त्यांनी दिनांक 09/06/2009 ते 10/01/2010 पर्यंत टी.बी. साठी उपचार घेतल्याची माहिती तक्रारकर्तीला माहितीच्या अधिकारात वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रूग्णालय, देवरी यांनी दिनांक 27/04/2015 रोजी पुरविली असून ते पत्र तक्रारकर्तीने दिनांक 30/09/2015 च्या यादीसोबत दस्त क्रमांक 1 वर दाखल केले आहे. तसेच टी.बी. क्रमांक 96/09 ची सत्यप्रत देखील दाखल केली आहे. सदर नोंद पुरूषोत्तम दादाजी राऊत यांच्या नावाची आहे आणि तो पूर्णपणे बरा झाल्याची नोंद दिनांक 10/01/2010 रोजीची आहे तर नोंद क्रमांक 96/12 ही अजय सदाराम शिवणकर यांच्या नावाची आहे. तसेच सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम औषधोपचार कार्डची प्रत दाखल केली आहे त्यांत टी.बी. नंबर 96/12 प्रथम गृहभेट देणारा कर्मचारी एस. जी. भागवतकर दिनांक 18/05/2012 अशी नोंद आहे. तक्रारकर्तीने माहितीचे अधिकारात प्राप्त करून दाखल केलेले वरील दस्तावेज खोटे आहेत हे सिध्द करणारा कोणताही पुरावा विरूध्द पक्षाने दाखल केलेला नाही. मेडिकल सुपरिन्टेन्डेन्ट, ग्रामीण रूग्णालय, देवरी यांनी दिनांक 27/11/2014 रोजी दिलेले प्रमाणपत्र तक्रारकर्तीने दिनांक 22/12/2014 च्या यादीसोबत दाखल केले आहे. त्यांत अजय सदाराम शिवणकर यांना दिनांक 18/05/2012 रोजी तपासणीनंतर क्षयरोग झाल्याचे निष्पन्न झाले, त्यापूर्वी ते ग्रामीण रूग्णालय, देवरी येथे उपचारासाठी आले नव्हते आणि त्यांना क्षयरोगाचे औषधोपचार कार्ड व रूग्णाचे ओळखपत्र दिले नव्हते असे नमूद आहे. यावरून तक्रारकर्तीचा वाजवी विमा दावा खोटे कारण देऊन नामंजूर करण्यासाठी विरूध्द पक्षाने खोटे दस्तावेज तयार केले आणि त्याचा आधार घेऊन विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्षाची कृती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे.
याउलट विरूध्द पक्षाचा बचाव असा की, विमा करार हा परस्पर विश्वासावर अवलंबून असून विमाधारकाने विमा प्रस्तावात त्याच्या आरोग्याबद्दल विचारलेल्या व इतर सर्वर प्रश्नांची खरी उत्तरे देणे व कोणतीही असत्य व चुकीची माहिती न देण्याचे पॅलीसीच्या अटीप्रमाणे बंधनकारक आहे. प्रस्तावात पॉलीसीधारकाने घोषणापत्र लिहून दिले आहे की, त्याने प्रस्तावातील त्याच्या आरोग्यविषयक व इतर प्रश्नांना दिलेली उत्तरे त्याच्या माहितीप्रमाणे खरी असून कोणतीही माहिती लपवून ठेवलेली नाही. प्रस्ताव अर्जात दिलेली माहिती विमा कराराचा पाया आहे आणि सदर माहिती खोटी व चुकीची आढळल्यास विमा पॉलीसी रद्द करण्याची तरतूद आहे.
विमा प्रस्तावात प्रश्न क्रमांक 11 व 14 प्रमाणे आरोग्याबाबत व्यक्तिगत इतिहास जाणून घेण्यासाठी खालील प्रश्न विचारले होते व त्याची उत्तरे पॉलीसी प्रस्तावात पुढीलप्रमाणे दिली होती.
Clause 11 - Insurability declaration for the life to be Assured
E. Have you ever been diagnosed with or treated/consulted for diabetes or sugar in urine, high or low blood pressure, chest pain, heart attack, or any other heart disease, stroke, paralysis, kidney or bladder disorder, reproductive organ or prostate disorder, mental disorder………..asthma or tumour of any type, endocrine or thyroid disorder? | NO |
14. Medical & Personal history of the life assured
ii Have you ever sought any advice or suffered from any of the following b. Asthma, chronic cough, pneumonia, shortness of breath, TB or other respiratory or lung disorder | NO |
वरील प्रस्ताव अर्जाच्या प्रती विरूध्द पक्षाने दस्त क्रमांक 1 वर दाखल केलेल्या आहेत.
विमाधारक अजय शिवणकर यांचा मृत्यू दिनांक 08/01/2013 रोजी झाल्यावर तक्रारकर्तीने तीनही पॉलीसीसंबंधाने विमा दावे सादर केल्यावर विरूध्द पक्षाने त्याबाबत सखोल चौकशी केली असता असे आढळून आले की, अजय शिवणकर हा दिनांक 30/12/2009 रोजी प्रथम विमा प्रस्ताव सादर करण्यापूर्वीपासून Tuberculosis (टी.बी.) या व्याधीने ग्रस्त होता व त्यासाठी ग्रामीण रूग्णालय, देवरी येथून दिनांक 18/05/2009 पासून टी. बी. नंबर 96/09 अन्वये उपचार घेत होता. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत औषधोपचार कार्डाची प्रत विरूध्द पक्षाने दस्त क्रमांक 4 वर दाखल केली आहे. सोबत रूग्णाचे ओळखपत्र असून त्यावर उपचार सुरू केल्याची तारीख 19/05/2009 आहे आणि अजय यांस फुफ्फुसाचा क्षयरोग झाला असल्याचे त्यांत नमूद आहे. अजय यांस फुफ्फुसाचा क्षयरोग झाल्याची माहिती असतांना देखील त्याने ती हेतूपुरस्सर लपवून ठेवली आणि प्रस्ताव अर्जात आरोग्याबाबत खोटी माहिती दिली व खोटे घोषणापत्र देऊन विरूध्द पक्ष विमा कंपनीची दिशाभूल करून विमा पॉलीसी मिळविल्या असल्याने तीनही पॉलीसी रद्द ठरल्या. म्हणून तक्रारकर्ती सदर पॉलीसीअंतर्गत विमा लाभ मिळण्यास पात्र नाही.
तक्रारकर्तीच्या अधिवक्त्यांनी दिनांक 30/09/2015 रोजी लेखी युक्तिवाद सादर केला. मात्र तेव्हापासून अनेक संधी देऊनही विरूध्द पक्षाने लेखी किंवा तोंडी युक्तिवाद सादर केला नाही. तक्रारकर्तीने माहितीचे अधिकारात प्राप्त केलेल्या दस्तावेजांवरून हे सिध्द होते की, टी.बी. क्रमांक 96/09 प्रमाणे टी.बी. उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल झालेला रूग्ण तक्रारकर्तीचा पती अजय शिवणकर नव्हता तर तो पुरूषोत्तम दादाजी राऊत, राह. निंबा हा होता व दिनांक 10/01/2010 पर्यंत उपचार घेऊन तो पूर्णपणे बरा झाला होता. अजय शिवणकर यांस प्रथमच दिनांक 18/05/2012 रोजीच्या ग्रामीण रूग्णालय, देवरी येथील तपासणीत टी.बी. झाल्याचे निष्पन्न झाल्याने टी.बी. क्रमांक 96/12 अन्वये त्याच्यावर टी.बी. चे औषधोपचार करण्यात आले. तसेच मेडिकल सुपरिन्टेन्डेट यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावरूनही हे स्पष्ट आहे की, अजय शिवणकर याने त्यापूर्वी कधीही सदर रूग्णालयात टी.बी. चे उपचार घेतले नव्हते. यावरून हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे की, अजय यांस दिनांक 18/05/2012 पूर्वी तो टी.बी. ने ग्रस्त असल्याची माहिती नव्हती व त्यासाठी त्याने पूर्वी कधीही उपचार घेतले नव्हते. म्हणून पॉलीसी प्रस्तावात त्याला श्वसनासंबंधी आजार किंवा टी.बी.आहे काय आणि त्यासाठी त्याने कधीही उपचार घेतले आहेत काय? या प्रश्नाचे उत्तर ‘NO’ असे देऊन त्याला ज्ञात असलेल्या आजाराची माहिती लपविली हा विरूध्द पक्षाचा आरोप खोटा आणि निराधार सिध्द होतो. असे उपचार 2009 पासून 2011 पर्यंत पॉलीसी विकत घेण्यापूर्वी घेतले असल्याचा कोणताही वैध पुरावा विरूध्द पक्षाने दाखल न करता टी.बी. क्रमांक 96/09 प्रमाणे अजय याने टी.बी. चे औषधोपचार घेतल्याबाबत खोटे दस्तावेज तयार करून तक्रारकर्तीचा तिच्या पतीच्या मृत्यूबाबतचा विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्षाची कृती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब ठरते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
9. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- तक्रारकर्तीने तक्रारीत नमूद केलेल्या एकूण रू. 16,00,000/- च्या पॉलीसीज अजय शिवणकर याने काढल्या नव्हत्या किंवा सदर पॉलीसीचे हप्ते थकित होते असे विरूध्द पक्षाचे म्हणणे नाही. मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्षाप्रमाणे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजुरीचे दिलेले कारण विरूध्द पक्ष सिध्द करू शकले नाही म्हणून तक्रारकर्ती तक्रारीत नमूद 3 पॉलीसीची रक्कम रू. 16,00,000/- विमा दावा नामंजुरीच्या तारखेपासून म्हणजे दिनांक 31/03/2013 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय विरूध्द पक्षाने खोटे दस्तावेज निर्माण करून तक्रारकर्तीचा वाजवी विमा दावा नामंजूर करून तिला शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रास दिल्याने त्याबाबत नुकसानभरपाई रू. 25,000/- आणि तक्रारीचा खर्च रू. 10,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील तक्रार खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्ष क्र. 1, 2, 3 व 5 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तक्रारीत नमूद 3 पॉलीसीची रक्कम रू. 16,00,000/- विमा दावा नामंजुरीच्या तारखेपासून म्हणजे दिनांक 31/03/2013 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह द्यावी.
3. विरुध्द पक्ष क्र. 1, 2, 3 व 5 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू. 25,000/- आणि तक्रारीचा खर्च रू. 10,000/- द्यावा.
4. विरूध्द पक्ष क्र. 1, 2, 3 व 5 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाची पूर्तता संयुक्तिकरित्या किंवा वैयक्तिकरित्या करावी.
5. विरूध्द पक्ष क्र. 1, 2, 3 व 5 यांना आदेश देण्यांत येतो की, यांनी उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी.
6. विरूध्द पक्ष 4 यांचेविरूध्द कोणताही आदेश नाही.
7. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
8. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्तीस परत करावी.