आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता डॉ. गणेश उध्दवराव गुंड यांनी वैयक्तिक वापरासाठी विरूध्द पक्ष ओडिसी कॉम्प्युटर्स, गोंदीया यांचेकडून दिनांक 12/09/2015 रोजी डेल कंपनीचा DELL VASTRO 15/4GB/1TB/15.6/2GB/DOS या वर्णनाचा लॅपटॉप रू.40,500/- मध्ये बिल क्रमांक 2432 अन्वये विकत घेतला. सदर लॅपटॉपची विरूध्द पक्षाने 1 वर्षाची वॉरन्टी दिली होती.
3. लॅपटॉप खरेदीनंतर एक महिन्यातच त्यांत बिघाड निर्माण होऊन त्याचा स्पीकर खराब झाला. त्याबाबतची तक्रार तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडे केली व लॅपटॉप दुरूस्त करून देण्याची विनंती केली. मात्र विरूध्द पक्षाने सदर लॅपटॉप दुरूस्तीसाठी सर्व्हीसिंग सेंटरकडे पाठवून दुरूस्त करून दिला नाही किंवा सदोष लॅपटॉप ऐवजी दुसरा लॅपटॉप बदलून दिला नाही.
4. तक्रारकर्त्याने लॅपटॉप निर्मात्या ‘डेल’ कंपनीशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून लॅपटॉप मधील बिघाडाबाबत वस्तुस्थिती सांगितली असता त्यांनी लॅपटॉप वॉरन्टी कालावधीबाहेर असल्याने त्यासंबंधी तक्रार घेऊ शकत नसल्याचे तक्रारकर्त्याला सांगितले. दिनांक 17/02/2016 रोजी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला रजिस्टर्ड पोष्टाने नोटीस पाठवून सदोष लॅपटॉप बदलवून देण्याबाबत कळविले. मात्र विरूध्द पक्षाने नोटीसची दखल घेतली नाही. यावरून वॉरन्टी असल्याचे तक्रारकर्त्यास सांगून वॉरन्टी नसलेला लॅपटॉप विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास विकला व त्याने दिलेल्या वॉरन्टी कालावधीत लॅपटॉप मध्ये झालेला बिघाड विरूध्द पक्षाने दूर करून दिला नाही किंवा त्याऐवजी नवीन लॅपटॉप दिला नाही आणि सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे. म्हणून तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहेः-
1. जुना सदोष लॅपटॉप बदलून त्याच कंपनीचा नवीन लॅपटॉप सुधारित वॉरन्टीसह देण्याचा विरूध्द पक्षाला आदेश व्हावा.
किंवा
लॅपटॉप बदलून देणे शक्य नसेल तर विरूध्द पक्षाने घेतलेली लॅपटॉपची किंमती रू.40,500/- व्याजासह तक्रारकर्त्यास परत करण्याचा विरूध्द पक्षाला आदेश व्हावा.
2. शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.20,000/- मिळावी.
3. तक्रारीचा खर्च रू.10,000/- मिळावा.
5. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत विरूध्द पक्ष यांनी दिलेले लॅपटॉप विक्रीबाबतचे इन्व्हॉईस बिल, तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षास पाठविलेली नोटीस, रजिस्टर्ड पोष्टाची पावती इत्यादी दस्तावेज दाखल केलेले आहेत.
6. विरूध्द पक्षाने लेखी जबाबाद्वारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडून तक्रारीत वर्णन केलेला लॅपटॉप रू.40,500/- मध्ये विकत घेतला व त्यास विरूध्द पक्षाने 1 वर्षाची वॉरन्टी दिली होती हे विरूध्द पक्षाने कबूल केले आहे. मात्र सदर लॅपटॉप खरेदी केल्यापासून केवळ 1 महिना चालला आणि त्यानंतर त्याच्या स्पीकरमध्ये दोष निर्माण झाल्याचे माहितीअभावी नाकबूल केले आहे. परंतु तक्रारकर्त्यास लॅपटॉप वापरण्यांत काही अडचणी असल्याने (As he could not understood some of the functions of laptop) त्याने विरूध्द पक्षाची भेट घेतली होती असे म्हटले आहे. विशेषतः स्पीकरमध्ये दोष असल्याची तक्रार घेऊन तक्रारकर्ता 3-4 वेळा विरूध्द पक्षाकडे आल्याचे आणि विरूध्द पक्षाने त्याच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे नाकबूल केले आहे. तसेच लॅपटॉप सर्व्हीस सेंटरला पाठविण्यास नकार देऊन सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केल्याचे नाकबूल केले आहे.
तक्रारकर्त्याने लॅपटॉप मधील तक्रारीसंबंधाने ‘डेल’ कंपनीशी संपर्क केल्याचे माहितीअभावी नाकबूल केले आहे. मात्र लॅपटॉप विकतांना त्याची 1 वर्षाची वॉरन्टी दिल्याचे आणि त्यानंतर विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास विकलेल्या लॅपटॉपची वॉरन्टी दिनांक 24/04/2017 पर्यंत वाढवून दिल्याचे म्हटले आहे.
विरूध्द पक्षाचे म्हणणे असे की, तक्रारकर्त्याच्या लॅपटॉपमध्ये स्पीकरबाबत दोष निर्माण झाल्याचे सांगून तक्रारकर्ता संपूर्ण लॅपटॉप बदली करून द्यावा अशा मागणीवर अडून बसला होता. विरूध्द पक्षाने त्यास सांगितले की, वॉरन्टीप्रमाणे स्पीकर दुरूस्त करून देता येतो. लॅपटॉप वॉरन्टीमध्ये असल्याने आणि बिलामध्ये नमूद केल्याप्रमाणे लॅपटॉपची वॉरन्टी निर्मात्या कंपनीने दिली असल्याने वॉरन्टीमध्ये स्पीकरचा दोष विनामूल्य दुरूस्त करून घेण्यासाठी तक्रारकर्त्यास ‘डेल’ कंपनीच्या सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यांत आला. तक्रारकर्त्याच्या लॅपटॉप सर्व्हीस टॅग नंबर DBCD12 शी संबंधित दस्तावेज वेबसाईट वरून डाऊनलोड करून विरूध्द पक्षाने लेखी जबाबासोबत दाखल केले आहेत.
तक्रारकर्त्याने लॅपटॉप मधील दोष दुरूस्तीसाठी कंपनीच्या अधिकृत सेवा केंद्राशी संपर्क न साधता आणि सेवा केंद्राला हेतूपुरस्सर तक्रारीत विरूध्द पक्ष म्हणून न जोडता सदरची खोटी तक्रार दाखल केली असून ती Non-Joinder च्या तत्वाने बाधीत असल्याने खारीज होण्यास पात्र आहे.
7. तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरुध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | तक्रार अंशतः मंजूर |
-// कारणमिमांसा //-
8. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदर प्रकरणात तक्रारकर्ता डॉ. गणेश उध्दवराव गुंड यांनी विरूध्द पक्ष ओडिसी कॉम्प्युटर्स, गोंदीया यांचेकडून तक्रारीत नमूद केलेला ‘डेल’ कंपनीचा लॅपटॉप DELL VASTRO 15/4GB/1TB/15.6/2GB/DOS रू.40,500/- मध्ये विकत घेतल्याबाबत इनव्हॉईस क्रमांक 2432 दिनांक 12/09/2015 दस्त क्रमांक 1 वर दाखल केला असून सदर व्यवहार विरूध्द पक्षाने आपल्या लेखी जबाबात कबूल केला आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केले आहे की, विरूध्द पक्षाने सदर लॅपटॉपची 1 वर्षाची वॉरन्टी दिली होती आणि ही बाब देखील विरूध्द पक्षाने लेखी जबाबात मान्य केली आहे.
तक्रारकर्त्याचे पुढे म्हणणे असे की, लॅपटॉप खरेदी केल्यानंतर त्यात 1 महिन्यानंतर बिघाड निर्माण होऊन स्पीकर खराब झाला त्यामुळे त्याने विरूध्द पक्षाकडे जाऊन लॅपटॉप दुरूस्त करून देण्याची विनंती केली. परंतु लॅपटॉप वॉरन्टी कालावधीत असूनही विरूध्द पक्षाने सदर सदोष लॅपटॉप दुरूस्तीकरिता अधिकृत सेवा केंद्राकडे पाठविला नाही किंवा सदोष लॅपटॉप बदलूनही दिला नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीत पुढे असेही नमूद केलेआहे की, लॅपटॉप मधील बिघाडाबाबत त्याने ‘डेल’ कंपनीकडे भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास विकलेला लॅपटॉप वॉरन्टी कालावधीबाहेरचा असल्याचे सांगून तक्रार स्विकारू शकत नाही असे कंपनीने तक्रारकर्त्याला सांगितले. विरूध्द पक्षाने लॅपटॉप वॉरन्टी कालावधीत असल्याचे सांगून तक्रारकर्त्यास लॅपटॉप विकलेला आहे, मात्र लॅपटॉप निर्मात्या ‘डेल’ कंपनीच्या म्हणण्यानुसार तो वॉरन्टी कालावधीत नाही. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा बिघडलेला लॅपटॉप दुरूस्त देखील करून दिलेला नाही किंवा बदलूनही दिलेला नाही. सदरची बाब सेवेतील न्यूनता या सदरात मोडणारी आहे.
याउलट विरूध्द पक्षाने आपल्या लेखी जबाबात लॅपटॉपमध्ये स्पीकर बाबत समस्या निर्माण झाल्याने तक्रारकर्ता विरूध्द पक्षाकडे आला होता, मात्र सदर समस्येकरिता लॅपटॉप बदलून मागत होता आणि वॉरन्टीच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारकर्त्याची सदर मागणी मान्य करता येत नसल्याबाबत त्यास सांगितले होते, तसेच लॅपटॉप वॉरन्टी कालावधीत असल्याने दुरूस्तीकरिता तो ‘डेल’ कंपनीच्या अधिकृत सेवा केंद्राकडे नेण्यास देखील सूचित केले होते असे म्हटले आहे. विरूध्द पक्ष यांची जबाबदारी केवळ लॅपटॉप विक्रीची असून लॅपटॉप निर्मात्या ‘डेल’ कंपनीने वॉरन्टी दिली असल्यामुळे वॉरन्टी कालावधीत लॅपटॉप मध्ये कोणताही दोष निर्माण झाल्यास त्याचे निवारण करण्याची जबाबदारी ‘डेल’ कंपनीच्या सेवा केंद्राची आहे. मात्र तक्रारकर्त्याने कंपनीच्या सेवा केंद्राकडे लॅपटॉप दुरूस्तीकरिता न नेता सदरची खोटी तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडे लॅपटॉप दुरूस्तीकरिता आणला परंतु विरूध्द पक्षाने दुरूस्ती करण्यास नकार दिला हे तक्रारकर्त्याचे म्हणणे निराधार व खोटे असल्यामुळे सदर प्रकरणात विरूध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे.
सदर प्रकरणात तक्रारकर्त्याच्या लॅपटॉपचा स्पीकर वॉरन्टी कालावधीत बिघडल्यामुळे जर त्याबाबतची तक्रार त्याने विरूध्द पक्षाकडे केली असेल तर सदरचा लॅपटॉप दुरूस्तीकरिता ‘डेल’ कंपनीकडे पाठवून तो दुरूस्त करून देण्याची जबाबदारी निश्चितच विक्रेता असलेल्या विरूध्द पक्षाची होती. परंतु सदर प्रकरणात विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा लॅपटॉप दुरूस्त करून देण्यासाठी ‘डेल’ कंपनीकडे पाठविलेला नाही. सदरची बाब ही निश्चितच विक्रेत्याने ग्राहक असलेल्या तक्रारकर्त्याप्रती आचरलेली सेवेतील न्यूनता आहे.
विरूध्द पक्षाचे म्हणणे असे की, सदर लॅपटॉप ला 1 वर्षाची वॉरन्टी दिली होती व त्यानंतर त्यांनी सदर वॉरन्टी दिनांक 24/04/2017 पर्यंत वाढवून दिलेली आहे. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षास दिनांक 17/02/2016 रोजी नोटीस पाठवून त्याने विकत घेतलेल्या लॅपटॉपचा स्पीकर खराब झाला म्हणून 3-4 वेळा विरूध्द पक्षाची भेट घेतली, परंतु त्यांनी स्पीकर दुरूस्त करून दिला नाही असे नमूद केले आहे. तसेच तक्रारकर्त्याने ‘डेल’ कंपनीत कॉल केल्यानंतर त्यांच्याकडून ‘तुमचा लॅपटॉप वॉरन्टी कालावधीबाहेर असल्याने तुमची तक्रार स्विकारता येत नाही’ असे कळविल्याचे देखील नमूद केले आहे आणि म्हणून नादुरूस्त लॅपटॉप बदलून द्यावा अशी तक्रारकर्त्याने नोटीसमध्ये मागणी केली आहे. सदर नोटीसची प्रत दस्त क्रमांक 2 वर आणि रजिस्टर्ड पोष्टाने नोटीस पाठविल्याबाबत रजिस्टर्ड पोष्टाची पावती दस्त क्रमांक 3 वर दाखल केली आहे. सदर नोटीस मिळूनही विरूध्द पक्षाने त्या नोटीसबाबत आपले म्हणणे सादर केले नाही किंवा तक्रारकर्त्याचा स्पीकर खराब झालेला लॅपटॉप दुरूस्त करून दिला नाही. आपल्या लेखी जबाबात विरूध्द पक्षाने जरी सदरच्या लॅपटॉपला ‘डेल’ कंपनी कडून 1 वर्षाची वॉरन्टी आहे व त्याबाबत वेबसाईटवरून डाऊनलोड केलेले सर्व्हीस टॅग नंबर DBCDC 12 लेखी जबाबासोबत दाखल करीत असल्याचे नमूद केले आहे तरी प्रत्यक्षात तक्रारकर्त्यास विकलेल्या लॅपटॉपला ‘डेल’ कंपनीकडून 1 वर्षाची वॉरन्टी असल्याबाबत कोणताही दस्तावेज दाखल केलेला नाही. यावरून तक्रारकर्त्याने ‘डेल’ कंपनीला भ्रमणध्वनीद्वारे लॅपटॉपबाबत तक्रार केल्यावर त्यांनी सदर लॅपटॉप वॉरन्टी कालावधी बाहेर असल्याचे तक्रारकर्त्यास सांगितले हे तक्रारकर्त्याचे नोटीस मधील आणि तक्रारीमधील कथन खोटे समजण्यास कोणतेही कारण नाही.
एकंदरीत उपलब्ध पुराव्यावरून आणि दस्तावेजांवरून हे स्पष्ट होते की, तक्रारीत नमूद केलेला लॅपटॉप विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास 1 वर्षाच्या वॉरन्टीसह विकलेला आहे. मात्र सदर एक वर्षाच्या कालावधीत लॅपटॉपचा स्पीकर खराब झाला असतांना व त्याबाबत तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडे दुरूस्तीची मागणी केली असतांना विरूध्द पक्षाने तो दुरूस्त करून दिला नाही किंवा वॉरन्टीप्रमाणे ‘डेल’ कंपनीकडे दुरूस्तीकरिता पाठवून लॅपटॉपमधील दोषाचे निवारण करून दिले नाही ही बाब निश्चितच ग्राहकाप्रती सेवेतील न्यूनता आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
9. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास 1 वर्षाची वॉरन्टी देऊन विकलेला लॅपटॉप वॉरन्टी कालावधीत खराब झाल्याने व त्याचा स्पीकर बंद पडल्याने तो दुरूस्त करून देण्याची जबाबदारी विक्रेता असलेल्या विरूध्द पक्षावर आहे आणि विरूध्द पक्षाने दिलेल्या वॉरन्टीप्रमाणे तो विनामूल्य दुरूस्त करण्याचा तक्रारकर्त्याला हक्क आहे. म्हणून विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला विकलेल्या लॅपटॉपमधील स्पीकरचा बिघाड विनामूल्य दुरूस्त करून द्यावा आणि तक्रारकर्त्याचा लॅपटॉप योग्य प्रकारे कार्य करीत असल्याची खात्री झाल्यानंतर तो तक्रारकर्त्यास परत करावा. जर सदर दोष संपूर्णपणे दुरूस्त होऊ शकत नसेल तर विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास ‘डेल’ कंपनीचा त्याच किंमतीचा नवीन लॅपटॉप 1 वर्षाच्या सुधारित वॉरन्टीसह तक्रारकर्त्यास द्यावा किंवा विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून घेतलेली लॅपटॉपची किंमत रू.40,500/- दिनांक 12/09/2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह तक्रारकर्त्यास परत करावी. याशिवाय विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.3,000/- आणि तक्रारखर्च रू.2,000/- द्यावा असा आदेश होणे न्यायोचित होईल. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- अंतिम आदेश –
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल करण्यांत आलेली तक्रार खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1. विरूध्द पक्षास आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला विकलेल्या लॅपटॉपमधील स्पीकरचा बिघाड विनामूल्य दुरूस्त करून द्यावा आणि लॅपटॉप योग्य प्रकारे कार्य करीत असल्याची तक्रारकर्त्याची खात्री झाल्यानंतर तो तक्रारकर्त्यास परत करावा.
किंवा
जर सदर दोष संपूर्णपणे दुरूस्त होऊ शकत नसेल तर विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास ‘डेल’ कंपनीचा त्याच किंमतीचा नवीन लॅपटॉप 1 वर्षाच्या सुधारित वॉरन्टीसह तक्रारकर्त्यास द्यावा
किंवा
विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून घेतलेली लॅपटॉपची किंमत रू.40,500/- दिनांक 12/09/2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह तक्रारकर्त्यास परत करावी.
2. विरूध्द पक्षास आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.3,000/- आणि तक्रारखर्च रू.2,000/- द्यावा.
3. विरूध्द पक्षास आदेश देण्यांत येतो की, त्यांनी आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
4. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
5. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्यास परत करावी.