- नि का ल प त्र -
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
वि.प.क्र.1 हे विविध कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीचा व्यवसाय करतात. वि.प.क्र.3 ही टी.व्ही. चे उत्पादन करणारी कंपनी आहे. वि.प.क्र.2 हे विक्री पश्चात सेवा देणारे सेंटर आहे. तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांचेकडून सोनी के.एल.व्ही. 32 आर 412 सी.बी.एल.ई.डी. या मॉडेलचा टी.व्ही. सिरियल नं. 4753389 दि. 3/3/17 रोजी रु.25,000/- या किंमतीस वि.प.क्र.1 यांचेकडून खरेदी केला आहे. सदर टी.व्ही. साठी वि.प. यांनी एक वर्षाची वॉरंटी दिली होती. सदरचा टी.व्ही. वापरण्यास सुरुवात केल्यानंतर वॉरंटी कालावधीत सदर टी.व्ही. वर अचानक सदोष पांढरे ठिपके दिसू लागले. म्हणून तक्रारदारांनी दि. 11/3/17 रोजी वि.प.क्र.2 यांचेकडे तक्रार नोंद केली. तदनंतर वि.प.क्र.2 तर्फे इसम यांनी टी.व्ही.ची वरवर पाहणी करुन सदरचा दोष Physical damage झालेचे कथन करुन सदरचा टी.व्ही. स्वखर्चाने दुरुस्त करुन घ्यावा लागेल असे तक्रारदारास सांगितले. वास्तविक, सदरचा दोष हा वॉरंटी कालावधीत असूनही वि.प. यांनी त्याची दखल घेतली नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी त्यांचे कर्तव्यात हयगय व कसूर करुन तक्रारदार यांना दूषित सेवा दिलेली आहे. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून सदोष टी.व्ही. बदलून त्याच मॉडेलचा दुसरा टी.व्ही. बदलून मिळावा, तसे करणे शक्य नसेल तर टी.व्ही. ची किंमत रु. 25,000/-, सदरचे रकमेवरील व्याज रु. 3,500/-, टी.व्ही न वापरता आल्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी रु. 10,000/-, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु. 10,000/- वि.प. यांचेकडून मिळावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वि.प. यांनी दिलेली पावती. वॉरंटी कार्ड, तक्रारदाराने वि.प. यांना दिलेली तक्रार, वि.प. यांनी दिलेले उत्तर इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व पुरावा शपथपत्र हाच लेखी युक्तिवाद समजणेत यावे अशी पुरसीस तक्रारदाराने दाखल केली आहे.
4. वि.प. क्र.1, 2 व 3 यांना प्रस्तुत प्रकरणाची नोटीस लागू होऊनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, प्रस्तुत प्रकरण वि.प. क्र.1 ते 3 यांचेविरुध्द एकतर्फा चालविणेचा आदेश नि.1 वर करण्यात आला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून सदोष टी.व्ही. बदलून मिळणेस अथवा सदर टी.व्ही. ची खरेदी किंमत परत मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर |
कारणमिमांसा–
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे हे मंच होकारार्थी देत आहे कारण तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांचेकडून वि.प.क्र.3 यांनी उत्पादित केलेला सोनी के.एल.व्ही. 32 आर 412 सी.बी.एल.ई.डी. या मॉडेलचा टी.व्ही. सिरियल नं. 4753389 दि. 3/3/17 रोजी रु.25,000/- या किंमतीस वि.प.क्र.1 यांचेकडून खरेदी केला आहे. वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.3 यांचे विक्री पश्चात सेवा देणारे सर्व्हिस सेंटर आहे. तक्रारदार यांनी सदर टी.व्ही. खरेदी केल्याबाबतचे टॅक्स इन्व्हॉईस दाखल केले आहे. सबब, सदर बाबीचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत हे स्पष्टपणे शाबीत होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
7. तक्रारदारांचे कथनानुसार, सदर टी.व्ही. साठी वि.प. यांनी एक वर्षाची वॉरंटी दिली होती. परंतु तक्रारदाराने सदरचा टी.व्ही. वापरण्यास सुरुवात केल्यानंतर वॉरंटी कालावधीत सदर टी.व्ही. वर अचानक सदोष पांढरे ठिपके दिसू लागले. म्हणून तक्रारदारांनी दि. 11/3/17 रोजी वि.प.क्र.2 यांचेकडे तक्रार नोंद केली. तदनंतर वि.प.क्र.2 तर्फे इसम यांनी टी.व्ही.ची वरवर पाहणी करुन सदरचा दोष Physical damage झालेचे कथन करुन सदरचा टी.व्ही. स्वखर्चाने दुरुस्त करुन घ्यावा लागेल असे तक्रारदारास सांगितले. वास्तविक, सदरचा दोष हा वॉरंटी कालावधीत असूनही वि.प. यांनी त्याची दखल घेतली नाही असे तक्रारदाराचे कथन आहे. सदर कथनाचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने वॉरंटी कार्डची प्रत दाखल केली आहे. तसेच तक्रारदारांनी टी.व्ही.मध्ये दोष निर्माण झालेबाबत वि.प. यांना कळविलेचे पत्र दाखल केले आहे तसेच सदर पत्रास वि.प. यांनी दिलेल्या उत्तराची प्रत दाखल केली आहे. तक्रारदाराने तक्रारअर्जात केलेली कथने व त्याअनुषंगाने दाखल केलेला पुरावा या सर्व बाबी वि.प. यांनी याकामी हजर होवून नाकारलेल्या नाहीत. वि.प.क्र.1 ते 3 यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्दा ते याकामी मंचात हजर झाले नाहीत. सबब, वि.प.क्र.1 ते 3 यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. वि.प. यांनी तक्रारदारांचे टी.व्ही.मध्ये वॉरंटी कालावधीत निर्माण झालेला दोष विनाशुल्क दुरुस्त करुन देणे हे वि.प. यांचेवर बंधनकारक होते. परंतु वि.प. यांनी वादातील टी.व्ही. दुरुस्त करुन दिलेला नाही ही बाब तक्रारदाराने दाखल केलेल्या पुराव्याचे शपथपत्रावरुन शाबीत होते. वरील सर्व बाबी विचारात घेता वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे ही बाब स्पष्ट व सिध्द झाली आहे. सबब, तक्रारदाराने आपली तक्रार पूर्णतया शाबीत केलेली असून वि.प. क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
8. सबब, तक्रारदार हे वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडून सदोष टी.व्ही. परत देवून त्याऐवजी त्याच कंपनीचा व मॉडेलचा नवीन टी.व्ही. बदलून मिळणेस पात्र आहेत. जर काही तांत्रिक कारणांमुळे वि.प. यांना टी.व्ही. बदलून देणे शक्य झाले नाही तर तक्रारदार हे वि.प. क्र.1 ते 3 यांचेकडून वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या टी.व्ही. खरेदीची किंमत रु.25,000/- परत मिळण्यास पात्र आहेत तसेच सदर रकमेवर टी.व्ही. खरेदी केले तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व अर्जाचा खर्च रु.2,000/- वि.प. क्र.1 ते 3 यांचेकडून वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या वसूल होवून मिळणेस पात्र आहेत असा या मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे. सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब, आदेश.
आ दे श 1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 2) वि.प.क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना वादातील सदोष टी.व्ही. परत घेवून त्याच कंपनीचा व मॉडेलचा नवीन टी.व्ही. बदलून द्यावा. 3) जर काही तांत्रिक कारणामुळे वि.प. यांना तक्रारदारांचा सदोष टी.व्ही. बदलून देणे शक्य नसेल तर वि.प. क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या वादातील सदोष टी.व्ही. तक्रारदाराकडून परत घेवून तक्रारदारास टी.व्ही. खरेदीची किंमत रु.25,000/- परत करावी व सदर रकमेवर टी.व्ही. खरेदी केले तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे. 4) वि.प. क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- अदा करावी. 5) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. क्र.1 ते 3 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी. 6) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते. 7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात. |
|
| | |
|