तक्रार दाखल तारीख – दि.12/04/2016
तक्रार निकाली तारीख – दि.28/08/2017
न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1) तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
यातील तक्रारदार हे नाळे कॉलनी कोल्हापूर येथील रहिवासी असून वि.प. हे ‘शुभंकरोती सांस्कृतिक भवन’ या मंगल कार्यालयाचे प्रोप्रायटर असून सदर तक्रारदार यांनी दि.4/1/2016 रोजी होणा-या लग्नकार्यासाठी दि.15/5/2015 रोजी सदरचे कार्यालयाचे बुकींग केले होते. तक्रारदार यांनी वि.प. यांना एकूण रक्कम रु.1,35,000/- सदर मंगल कार्यालयाच्या बुकींगसाठी अदा केले होते. तथापि काही अपरिहार्य कारणामुळे दि.4/1/2016 रोजीचे विवाहकार्य रद्द झाले. त्याची पूर्वकल्पना तक्रारदाराने वि.प. यांना दि.20/11/2015 रोजी प्रत्यक्ष दिली असता सदर वेळी वि.प. यांनी 25 टक्के रक्कम वजा करुन उर्वरीत रक्कम परत करणेची हमी तक्रारदार यांना दिलेली होती. तथापि वि.प. यांनी दि.3/12/2015 अखेर सदर वि.प. मंगल कार्यालयात दि. 4/1/2016 रोजीचे बुकींग झाले नाही/भाडे मिळाले नाही अशी सबब सांगून तक्रारदार यांची रक्कम रु.1,35,000/- परत करणेस टाळाटाळ केली व प्रस्तुतची रक्कम तक्रारदाराला परत न करुन वि.प. यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवात्रुटी दिली आहे. सबब, प्रस्तुत तक्रारदाराने सदर कार्यालयाचे बुकींगसाठी वि.प. कडे जमा केलेली रक्कम रु.1,35,000/- सव्याज परत मिळणेसाठी सदरचा तक्रारअर्ज या मे.मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत वि.प. कडील बुकींग पावती, रक्कम पोहोचलेबाबत वि.प. ने दिलेल्या पावत्या, तक्रारदाराने वकीलामार्फत वि.प. यांना दिलेली नोटीस, सदर नोटीस वि.प. यांना मिळालेची पोहोचपावती, वि.प. यांनी वकीलांचेमार्फत दिलेले उत्तर, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस, तसेच मे. वरिष्ठ न्यायालयांचे पुढील न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
1) (2012) 1 CPR 38 Chhattisgarh State Consumer Disputes Redressal Commission, Raipur
Manager Abhinandan Palace Vs. Ramesh Dahiwale
2) 2012 STPL (CL) 649 CG
Manager Abhinandan Palace Vs. Ramesh Dahiwale
3) 2013 STPL (CL) 2009 (NC)
Contour Holiday Resorts Pvt.Ltd. Vs. K.N. Bhuvandeanath Kamat
3. तक्रादाराने प्रस्तुत कामी वि.प. यांचेकडून तक्रारदाराने विवाह कार्यालय बुकींगसाठी वि.प. यांचेकडे जमा केलेली रक्कम रु.1,25,000/- तसेच इव्हेंटच्या अॅडव्हान्सपोटी स्वीकारलेली रक्कम रु.10,000/- अशी सर्व रक्कम 15 टक्के व्याजासह वि.प. कडून वसूल होवून मिळावी, सदर कार्यालयाचे वि.प. ने दि.4/1/2016 रोजी जाणुनबुजून बुकींग न दिलेले झालेले नुकसान रु.25,000/-, देसाई सर व अजित पाटील यांचा जाबदारने केलेल्या अपमानाबाबत रु.25,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/-, बुकींग रकमेवरील व्याजापोटी रु.25000/-, अर्जाचा खर्च रु.10,000/-, अशी एकूण रक्कम रु. 2,45,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळावी अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
4. वि.प. यांनी प्रस्तुत कामी म्हणणे/कैफियत, प्राथमिक मुद्दे काढणेसाठीचा अर्ज, वि.प. चे पुरावा शपथपत्र, साक्षीदार अशोक आदिनाथ राजमाने यांचे अॅफिडेव्हीट, तसेच लेखी युक्तिवाद व
(i) 2015 0 AIR (SC) 2006
(ii) 2005 0 AIR (SC) 752
(iii) (1994) 3 CPJ (NC) 54
(iv) F.A. No.317/2010 before the State Commission, Chennai
(v) (1996) I CPR 46 / (1996) 1 CLT 539 / (1995) 3 CPJ 243
वगैरे मे. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे वि.प. यांनी याकामी दाखल केलेले आहेत. त्याचप्रमाणे वि.प. यांनी कागदयादीसोबत अ.क्र.1 ते 13 कडे अनुक्रमे नियम व अटींचा करार, सर्व्हिस टॅक्स बिल, बुकींग पावती, नियम व अटी कार्डचा फोटो, लेजर बुक, 2015-16 चे पावती पुस्तक व बिल पुस्तक, लाईट बिल, पाणी बिल घरफळा, कॉसमॉस बँक कर्ज खाते उतारा, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स कर्ज खाते उतारा, तिमाही सर्व्हिस टॅक्स चलन, असोसिएशनचा ठराव, वगैरे कागदपत्रे वि.प. यांनी याकामी दाखल केली आहेत.
वि.प. यांनी त्यांचे म्हणणे/कैफियतीत तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील प्रमाणे आक्षेप घेतले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व यातील मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) तक्रारदार हे वि.प. चे ग्राहक नाहीत.
iii) तक्रारदाराने वि.प. मंगल कार्यालयाचे बुकींग केलेनंतर तक्रारदाराने स्वतः त्यांच्या वैयक्तिक व खाजगी कारणासाठी स्वतःहून वकीलांतर्फे बुकींग रद्द केले आहे, वि.प. यांचेकडून त्यांचे लग्न कार्य करण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा नव्हता. त्यामुळे सदर प्रकरणात कोणतीही सेवात्रुटी वि.प. ने तक्रारदाराला दिलेली नाही.
iv) बुकींगसाठी जमा केलेली रक्कम परत देणसे नकार देणे हे अनुचित व्यापारी प्रथेमध्ये येत नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार या मे. मंचात चालणेस पात्र नाही. ती या कोर्टाच्या अधिकारकक्षेबाहेरील आहे.
v) प्रस्तुत कार्यालयाचे बुकींग श्री संजय देसाई यांनी दिपक भोसले यांचे नावावर केलेले आहे. बुकींग पावतीवर श्री संजय देसाई यांची सही आहे. परंतु तक्रारअर्ज दिपक भोसले यांनी दाखल केला आहे. त्यामुळे तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. तक्रारदाराने वि.प. हॉलचे बुकींगबाबतचे सर्व नियम समजावून घेतले आहेत. हॉल बुकींग पूर्वी तक्रारदाराला पूर्ण नियमांची कल्पना दिलेली आहे.
vi) कार्यालयाचे बुकींग कोणत्याही कारणास्तव रद्द केल्यास कार्यालयाचे भाडे परत केले जाणार नाही, जर रद्द केले तारखेदिवशी दुस-या पार्टीने बुकींग केले तरच बुकींग/भाडयाच्या रकमेतून 25 टक्के रक्कम वजा करुन उर्वरीत रक्कम कार्याच्या तारखेनंतर परत केली जाईल या व इतर 34 नियमांची पूर्ण कल्पना तक्रारदार यांना देण्यात आली होती. सदरचे नियम व अटी वाचून त्या मान्य असून, त्या तक्रारदारावर बंधनकारक असून त्याप्रमाणे वर्तन करण्यास कटीबध्द आहोत असे नमूद असलेले नियम मान्य करुन वि.प. बरोबर करार करुन त्याखाली सही करुन तक्रारदाराने नियम व अटी मान्य केल्या आहेत.
vi) प्रस्तुतचे दि.4/1/2016 रोजीचे बुकींग तक्रारदाराने केलेनंतर सदर रोजीचे हॉल बुकींगसाठी अनेक व्यक्तींनी चौकशी केली परंतु हॉल तक्रारदाराचे नावावर बुकींग असलेने इतर लोकांना बुकींग दिलेले नाही. परंतु तक्रारदाराने वकीलामार्फत बुकींग रद्द केलेनंतर इतर कोणीही सदर दिवशीचे/तारखेचे हॉल बुकींग केलेले नाही. त्यामुळे वि.प. चा हॉल बुकींगविना रिकामा राहिला. अशा परिस्थितीत वि.प. चे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
viii) वि.प. चे हॉलचे बुकींग तक्रारदाराने रद्द केलेनंतर तक्रारदाराकडील बुकींगच्या पावत्यावंर बुकींग रद्द केले आहे असे नमूद करुन पावत्या वि.प. कडे देणे आवश्यक असतानाही तक्रारदाराने पावत्या परत दिल्या नाहीत. तसेच कार्यालय अन्य इसमास भाडयाने देणेस हरकत नाही असे लेखी स्वरुपात दिलेले नाही.
ix) तक्रारदाराने वि.प. यांचेकडे रक्कम रु.3,62,500/- निरनिराळया कारणासाठी देण्याचे मान्य करुन त्यापोटी रु.1,35,000/- वि.प. कडे जमा केले व रु. 2,27,500/- नजीकच्या काळात देणेचे तक्रारदाराने मान्य केले होते, मात्र दिले नाहीत. जर सदर तारखेस कार्यक्रम झाला असता तर वि.प. यांना रु.2,27,500/- मिळाले असते परंतु कार्यक्रम तक्रारदाराने रद्द केलेने वि.प.चे सदरचे नुकसान झाले आहे. प्रस्तुत रक्कम तक्रारदाराकडून वसूल होवून मिळावी.
x) वि.प. ने तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही. त्यामुळे कोणताही मानसिक त्रास तक्रारदाराला दिलेला नाही व कोणतीही रक्कम वि.प. तक्रारदाराला देणे लागत नाहीत. याउलट तक्रारदाराने कराराचा भंग केलेने व बुकींग रद्द केलेने त्यादिवशी जेवण, डेकोरेशन, भटजी, बॅण्ड, सनई, फोटोग्राफर, केटरर यांच्यामार्फत होणारे सर्व कार्यक्रम रद्द झालेने वि.प. चे रु.4 ते 5 लाखचे नुकसान झाले आहे. तक्रारदार हेच या सर्व नुकसानीस जबाबदार आहेत.
सबब, तक्रारदाराचा तक्रारअर्ज हा चालणेस पात्र नसलेमुळे तो खर्चासह फेटाळणेत यावा व तक्रारदारानेच वि.प. यांना रु.10,000/- कॉस्ट देण्याचे आदेश व्हावेत. अशा स्वरुपाचे म्हणणे वि.प. यांनी दाखल करुन आक्षेप नोंदवले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवात्रुटी दिली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार वि.प. यांचेकडून हॉल बुकींगची रक्कम परत मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने दि.4/1/2016 रोजी होणा-या लग्न कार्यासाठी वि.प. मंगल कार्यालयाचे बुकींग श्री संजय देसाई यांचेमार्फत केले होते. तसेच प्रस्तुत बुकींगसाठी तक्रारदाराने वि.प. यांना दि.15/5/15 रोजी रु.10,000/-, दि.19/5/2015 रोजी रु.15,000/- व दि.1/6/2015 रोजी रु.1,00,000/- तसेच इव्हेंटचे रु.10,000/- अशी एकूण रक्कम रु.1,35,000/- वि.प. कडे जमा केली आहे. त्याबाबतच्या रक्कम रु.1,25,000/- च्या पावत्या याकामी तक्रारदाराने दाखल केल्या आहेत. तसेच बुकींगची पावती दाखल केली आहे. वि.प. ने या बाबी मान्य केल्या आहेत. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण वर मुद्दा क्र.1 मध्ये नमूद केलेप्रमाणे तक्रारदाराने वि.प. मंगल कार्यालयाचे बुकींग दि.4/01/2016 रोजी होणा-या लग्नकार्यासाठी केले होते. त्यासाठीची वर नमूद रक्कम रु.1,35,000/- वि.प. कडे जमा केली होती परंतु काही अपरिहार्य कारणामुळे दि.4/01/2016 रोजीचे विवाह कार्य रद्द झाले. त्याबाबत तक्रारदाराने स्वतः व श्री संजय देसाई व श्री अजित पाटील यांनी दि.20/11/2015 रोजी वि.प. कार्यालयात जाऊन तशी कल्पना दिली. त्यावेळी वि.प. यांनी 25 टक्के रक्कम कपात करुन उर्वरीत रक्कम परत करणेची तक्रारदाराला हमी दिली होती. तथापि वि.प. ने सदर कार्यालय दि.3/12/2015 अखेर भाडे आलेले नाही, अशी सबब सांगून तक्रारदाराची रक्कम परत करणेस टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदाराने अॅड विजय पाटील यांचेमार्फत दि.9/12/2015 रोजी वि.प. यांना नोटीस देवून दि.4/1/2016 रोजीचे बुकींग रद्द करावे व त्यापोटी तक्रारदाराकडून स्वीकारलेली रक्कम तक्रारदाराला परत करावी अशी नोटीस वि.प. ला दिली. प्रस्तुत नोटीस कागदयादीसोबत तक्रारदाराने दाखल केली आहे. प्रस्तुत नोटीसला वि.प. यांनी अॅड इंगळे यांचेमार्फत उत्तर दिले व रक्कम परत देणेचे टाळलेले आहे. सदर नोटीस याकामी दाखल आहे. तसेच वि.प. यांनी दि.4/1/2016 रोजी सदर कार्यालयास बुकींग मिळाले नाही (भाडे मिळाले नाही) असे कारण सांगून तक्रारदाराची रक्कम परत करणेस नकार दिला व त्यासाठी वि.प. ने याकामी दाखल केले लेजर बुक हे वि.प. ने स्वतःच तयार केलेचे स्पष्ट होते. तसेच वि.प. ने दाखल केले अटी व शर्ती किंवा नियमावली यावर तक्रारदाराने सही केली आहे असे वि.प. ने कथन केले असून सदर नियमावली याकामी दाखल केली आहे. परंतु प्रस्तुत हॉल बुकींग हे श्री संजय देसाई यांनी दि.15/5/2015 रोजी तक्रारदारासाठी म्हणून केले आहे. त्यादिवशी तक्रारदार उपस्थित असते तर बुकींग पावतीवर तक्रारदाराने सही केली असती. तक्रारदार उपस्थित नव्हते तर श्री संजय देसाई यांनी तक्रारदाराकरिता बुकींग केले होते. त्यामुळे वि.प. ने, नियम व अटी शर्तीवर तक्रारदाराने त्यांची सही दि.15/5/2015 रोजी केली असे कथन केले आहे. परंतु तक्रारदारांनी प्रस्तुत कामी सही बोगस असलेचे युक्तिवादावेळी कथन केले आहे. तसेच तक्रारदार दिपक भोसले हे नमूद तारखेस दि.15/5/2015 रोजी बुकींग झाले तेव्हा उपस्थित नव्हते तर श्री संजय देसाई यांनी तक्रारदाराकरिता बुकींग केले होते. बुकींग पावतीवर श्री संजय देसाई यांची सही दिसते. परंतु अटी शर्तींवर तक्रारदारांनी सही केली असे वि.प. चे कथन व नमूद अटी शर्तीवरील सही ही तक्रारदाराचीच आहे ही बाब वि.प. यांनी सिध्द केलेली नाही. त्यामुळे याबाबत विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित होणार नाही. तसेच सदरच्या प्रिंटेड अटी व शर्ती नियमावली कार्यालयाकरिता शासनमान्यता प्राप्त नाही. त्यामुळे सदरचे नियम व अटी या तक्रारदारावर बंधनकारक नाहीत. याबाबत मे. वरिष्ठ न्यायालयांनी त्यांचे न्यायनिवडयात ऊहापोह केलेला आहे.
8. सदर कामी आम्ही तक्रारदाराने दाखल केले पुढील न्यायनिवाडे व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
(i) (2012) 1 CPR 38 Chhatisgarh State Consumer Disputes Redressal Commission Raipur
Manager, Abhinandan Palace Vs. Ramesh Dahiwale
Headnote – Consumer Protection Act, 1986 – Sec.2(1)(g), 2(1)(o) 15 & 17 – community service – marriage Hall – non-refund of booking amount - Appellant directed to refund Rs.30,000/-, Rs.2,000 as compensation and Rs.700/- as cost – on account of some reasons, complainant could not arrange marriage ceremony of his son on date of booking – In whole of document, complainant/respondent had not signed anywhere – His signatures were not obtained in token of his agreement with terms mentioned in the receipt of deposit of Rs.30,000/- - No material to show that terms of booking of marriage hall were explained to complainant/Respondent and after agreeing with terms, he booked marriage hall – Appellant cannot be permitted to have amount deposited by respondent/complainant without providing any services - It amounts to unfair trade practice which must be curbed – Appeal dismissed.
Important Point :- No one can usurp money of others without providing any service
9. प्रस्तुत कामी वि.प.ने दाखल केलेले मे.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे लागू होत नाहीत.
10. वर नमूद तक्रारदार व वि.प. ने दाखल केले सर्व कागदपत्रे तसेच मे. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे यांचा ऊहापोह करता प्रस्तुत कामी तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मंगल कार्यालय बुकींग व तदनुषंगिक जमा केलेली रक्कम रु.1,35,000/- वसूल होवून मिळणेस तसेच प्रस्तुत रकमेवर बुकींग तारीख 15/5/2015 पासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज वि.प. कडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- अर्जाचा खर्च रु. 5,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. यांनी तक्रारदार यांना हॉल बुकींगची व तदनुषंगिक रक्कम रु.135,000/- (रक्कम रुपये एक लाख पस्तीस हजार फक्त) अदा करावी.
3) प्रस्तुत वर नमूद रकमेवर बुकींग तारखेपासून (दि.15/05/2015 पासून) रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने होणारी व्याजाची रक्कम वि.प. यांनी तक्रारदाराला अदा करावी.
4) वि.प. यांनी तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रक्कम रु.दहा हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5000/- (रक्कम रु.पाच हजार मात्र) अदा करावेत.
5) वरील सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेश प्राप्त तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) विहीत मुदतीत वि.प. यांनी आदेशीची पूर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.