तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : प्रतिनिधी मार्फत हजर.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*--
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही संगणक प्रशिक्षण व इतर प्रशिक्षण देणारी संस्था आहे. तक्रारदारांनी सा.वाले संस्थेमध्ये अॅनीमेशन कोर्स, ग्राफीक डिझायनिंग, व वेब डिझायनिंग, इग्लीश स्पीकिंग कोर्स इत्यादीकामी प्रवेश घेतला. व सा.वाले यांनी तक्रारदारांना 100 टक्के नोकरीची हमी दिली होती. त्यावर विसंबून तक्रारदारांनी प्रशिक्षण शुल्काबद्दल सा.वाले यांना रु.16,151/- दोन धनादेशाव्दारे अदा केले.
2. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, तक्रारदारांनी वरील प्रशिक्षणाकरीता प्रवेश घेतल्यानंतर सा.वाले यांनी तक्रारदारांना कुठलेली प्रशिक्षण दिले नाही व अचानक एक पत्र देऊन तक्रारदारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असे तक्रारदारांना कळविले. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना कुठल्याही स्वरुपाचे प्रशिक्षण दिले नाही, तक्रारदारांची फसवणूक केली व तक्रारदारांना नोकरी मिळू शकली नाही. या प्रकारे सा.वाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारांना नुकसान पोहचविले व सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली असा आरोप केला.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, जानेवारी, 2008 मध्ये तक्रारदारांनी चार वेगवेगळया प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. व प्रशिक्षण वर्ग दिनांक 15.1.2008 पासून सुरु झाले. व तक्रारदारांनी त्यापैकी एका प्रशिक्षण वर्गास हजेरी लावण्यास सुरुवात केली. तक्रारदारांचे इंग्रजी कच्चे असल्याने तक्रारदारांनी इंग्रजी भाषा विषयक प्रशिक्षण प्रथम पूर्ण करावयाचे ठरविले. परंतु त्या प्रशिक्षण वर्गास देखील तक्रारदार नियमितपणे हजर राहीले नाहीत व काही दिवसानंतर त्यांनी प्रशिक्षण वर्गास येणे बंद केले. सा.वाले यांनी तक्रारदारांना चार प्रशिक्षण वर्गा संबंधीचे साहीत्य पुरविले होते. परंतु तक्रारदार गैरहजर राहीले असल्याने व त्यात तक्रारदारांनी रुची न दाखविल्याने सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 1.7.2008 रोजी पत्र दिले व प्रशिक्षण कालावधी दिनांक 31.3.2009 रोजी संपणार आहे असे कळविले. त्याप्रमाणे प्रशिक्षण कालावधी संपविण्यात आला. परंतु तक्रारदारांनी प्रशिक्षणास रुची न दाखविल्याने ते प्रशिक्षणाचा फायदा घेवू शकले नाही. या प्रकारे प्रशिक्षणाचे संदर्भात तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर झाली या आरोपांस सा.वाले यांनी नकार दिला.
4. दोन्ही बाजुंनी आपले पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्र, व लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. सा.वाले यांचे प्रतिनिधींनी असे निवेदन केले की, त्यांचा तोंडी युक्तीवाद हा लेखी युक्तीवादाप्रमाणेच आहे.
5. प्रस्तुत मंचाचे तक्रार, कैफीयत, शपथपत्र, व कागदपत्रे यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना संगणक प्रशिक्षण वर्ग व इतर प्रशिक्षण वर्गाचे संदर्भात प्रशिक्षण देण्यास कसुर केली व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली हा आरोप तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3. | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी कथनाचे पृष्टयर्थ तक्रारी सोबत काही कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यावरुन तक्रारदारांनी सा.वाले यांना दोन धनादेशाव्दारे प्रशिक्षण शुल्काकामी रु.16,152/- अदा केले होते ही बाब सिध्द होते. तक्रारदारांच्या वडीलांनी सा.वाले यांच्याकडे अशी तक्रार केली होती की, सा.वाले यांचेकडे असलेला शिक्षकवर्ग हा तक्रारदारांना वेगवेगळी आश्वासने देत असून त्यांनी त्या आश्वासनाची पुर्तता केली नाही व तक्रारदारांना कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले नाही.
7. सा.वाले आपल्या कैफीयतीचे परीच्छेद क्र.6 मध्ये असे कथन करतात की, तक्रारदारांनी ज्या प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता त्याची नांवे व तपशिल कैफीयतीचे पृष्ट क्र.6 वर नमुद केलेली आहेत. त्यावरुन असे दिसते की, तक्रारदारांनी इग्लीश स्पीकिंग व्यतिरिक्त इतर तिन प्रवेश वर्गांना म्हणजे एकूण चार प्रशिक्षण वर्गांना प्रवेश घेतला होता. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीचे शपथपत्रात असे कथन केलेले आहे की, तक्रारदारांनी इग्लीश स्पिकींगचा प्रथम पूर्ण करायचे ठरविले व त्याप्रमाणे ते त्या प्रशिक्षणास हजर रहात होते. मार्च, 2008 नंतर काही दिवस प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहील्यानंतर तक्रारदारांनी प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहणे थांबविले व त्यामुळे तक्रारदार कुठलेही प्रशिक्षण पूर्ण करु शकले नाहीत.
8. वरील कथनाचे पृष्टयर्थ सा.वाले यांनी त्यांच्या अभिलेखातील काही प्रशिक्षण वर्गाचे हजेरी पटाचे उतारे हजर केलेले आहेत. त्यावरील नोंदी वरुन असे दिसते की, सा.वाले यांनी तक्रारदारांना सर्व प्रशिक्षण साहीत्य पुरविले होते. हजेरी पुस्तकातील नोंदी असे दर्शवितात की, एप्रिल, 2008 पासून तक्रारदारांनी प्रशिक्षण वर्गास नियमितपणे हजरी लावण्याचे बंद केले. तक्रारदारांच्या नांवाचे समक्ष गैर हजेरीबद्दल नोंद करण्यात आली आहे. अशा नोंदी मे,2008 पासून सतत दिसून येतात. या प्रकारच्या नोंदी सा.वाले यांच्या कथनास पुष्टी देतात की, तक्रारदारांना प्रशिक्षण वर्गास रुची नसल्याने त्यांनी प्रशिक्षण वर्गास नियमित हजेरी लावण्याचे टाळले. व सा.वाले तक्रारदारांना आवश्यक ते प्रशिक्षण देवू शकले नाही. प्रशिक्षण कालावधी एका वर्षाचा असल्याने मार्च, 2009 मध्ये प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आला. यावरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना प्रशिक्षणाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे दिसून येत नाही.
9. तक्रारदारांनी असेही कथन केले आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांना 100 टक्के नोकरीची हमी दिली होती. परंतू त्या प्रकारचा लेखी पूरावा उपलब्ध नाही. त्या प्रकारची हमी दिली गेली असल्यास ती हमी योग्य प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण केलें तरच लागू होते. अन्यथा त्या प्रकारची हमी विवचारात घेतली जावू शकत नाही.
10. एकंदरीत उपलब्ध पुराव्यावरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना प्रशिक्षणाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली हे आरोप तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत.
11. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 392/2009 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.