न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे मालकीचे इनोव्हा कंपनीचे वाहन क्र.एमएच 10-सीए-3030 असून त्याचा विमा वि.प. कंपनीकडे उतरविलेला होता. सदर विमा पॉलिसचा क्र. 15230231170300000909 असा असून कालावधी दि. 29/6/2017 ते 28/6/2018 असा आहे. तक्रारदार यांचा मुलगा प्रसाद बाबासाहेब पाटील हा तक्रारदारांचे मुलीकडे मुंबई वाशी येथे गेला असते तेथे दि. 07/08/2017 रोजी सकाळी 8.00 वा. विवेक सोसायटी, बी-17, प्लॉट नं.41, सेक्टर, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी त्यांचे बहिणीचे अपार्टमेंटचे बाजूस गाडी पार्क केली. सदर ठिकाणी तेथील इतर फ्लॅट धारकांच्या गाडया देखील पार्क केलेल्या होत्या. गाडी पार्क केल्यानंतर गाडीची किल्ली तक्रारदारांच्या बहिणीकडे ठेवली व परदेशात इथोपिया येथे त्यांचे कामानिमित्त ते गेले. तेथून परत आलेनंतर दि. 16/08/2017 रोजी सकाळी 7.15 चे सुमारास ते गाडी पार्क केलेल्या ठिकाणी गेले असता सदरचे वाहन पार्क केलेल्या ठिकाणी नाही असे तक्रारदाराचे मुलास दिसून आले. सबब, लागलीच आजुबाजूस शोधाशोध केली पण गाडी आढळून आली नाही. तदनंतर तक्रारदारांच्या मुलाचे याबाबतची माहिती वाशी पोलिस ठाणे, नवी मुंबई येथे दुपारी 2 चे सुमारास त्याच दिवशी दिली. तदनंतर याबाबतची माहिती तक्रारदाराने वि.प. कंपनीस कळविली. तदनंतर वि.प. यांचे मागणीनुसार तक्रारदारांनी आवश्यक ती कागदपत्रे वि.प. यांचेकडे जमा केली. परंतु वि.प यांनी दि. 16/10/2018 चे पत्राने सदरचे वाहन हे नो पार्कींग झोनमध्ये लावले होते, तेथे ते 9 दिवस होते, या कारणास्तव तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून वाहनाची किंमत रक्कम रु. 10,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याजाची रक्कम रु. 2,04,821/-, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.25,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 6 कडे अनुक्रमे विमा पॉलिसी, वाहन चोरीबाबतचे दोषारोपपत्र, घटनास्थळाचा पंचनामा, वि.प. यांनी पाठविलेले पत्र, वाहनखरेदीचा टॅक्स इन्व्हॉईस, डिलीव्हरी नोट, को-ऑप. सोसायटी यांनी दिलेले पत्र इ. वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत पॉलिसीची प्रत, क्लेम फॉर्म, क्लेम नाकारलेचे पत्र, इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट वगैरे कागदपत्रे तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) तक्रारदाराचे मुलाने त्याचे वाहन नो पार्कींग क्षेत्रात पार्क केले होते. तक्रारदाराने पार्कींग करताना ते सुरक्षित ठिकाणी पार्क करण्याची तसेच दि. 07/08/2017 ते 16/08/2017 या कालावधीत त्याची देखभाल करण्याची कोणतीही काळजी घेतलेली नव्हती. तक्रारदाराचे मुलाने त्यांचे वाहन सार्वजनिक रस्त्यावर जेथे वाहन पार्कींग करावयाचे नाही त्याठिकाणी पार्क करुन ते परदेशात गेले होते. यावरुन तक्रारदाराचा निष्काळजीपणा व बेदरकारपणा स्पष्टपणे दिसून येत असल्याने वि.प. यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे.
iv) वाहन चोरीस गेलेनंतर त्याची लेखी सूचना तक्रारदाराने वि.प विमा कंपनीला पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार त्वरित देणे आवश्यक होते. तक्रारदाराने विमा पॉलिसीचे अट क्र.4 चा भंग केल्याने तक्रारदाराचा क्लेम योग्य कारणे देवून कायदेशीररित्या वि.प. यांनी नाकारलेली आहे.
v) वि.प. च्या हक्कास कोणतीही बाधा न येता वि.प. यांचे असे कथन आहे की, जर वि.प. यांना कोणते देणे द्यावे लागल्यास ते पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार असेल. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी त्यांचे मालकीचे इनोव्हा कंपनीचे वाहन क्र.एमएच 10-सीए-3030 असून त्याचा विमा वि.प. कंपनीकडे उतरविलेला होता. सदर विमा पॉलिसचा क्र. 15230231170300000909 असा असून कालावधी दि. 29/6/2017 ते 28/6/2018 असा आहे. सदरची बाब वि.प. यांनी मान्य केली आहे व पॉलिसीची प्रत वि.प. यांनी याकामी दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, तक्रारदाराचे मुलाने त्याचे वाहन नो पार्कींग क्षेत्रात पार्क केले होते. तक्रारदाराने पार्कींग करताना ते सुरक्षित ठिकाणी पार्क करण्याची तसेच दि. 07/08/2017 ते 16/08/2017 या कालावधीत त्याची देखभाल करण्याची कोणतीही काळजी घेतलेली नव्हती. यावरुन तक्रारदाराचा निष्काळजीपणा व बेदरकारपणा स्पष्टपणे दिसून येत असल्याने वि.प. यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे असे कथन केले आहे. परंतु तक्रारदारांनी त्यांचे तक्रारअर्जात व पुराव्याचे शपथपत्रात, तक्रारदार यांचा मुलगा प्रसाद बाबासाहेब पाटील हा तक्रारदारांचे मुलीकडे मुंबई वाशी येथे गेला असता तेथे दि. 07/08/2017 रोजी सकाळी 8.00 वा. विवेक सोसायटी, बी-17, प्लॉट नं.41, सेक्टर, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी त्यांचे बहिणीचे अपार्टमेंटचे बाजूस गाडी पार्क केली. सदर ठिकाणी तेथील इतर फ्लॅट धारकांच्या गाडया देखील पार्क केलेल्या होत्या. गाडी पार्क केल्यानंतर गाडीची किल्ली तक्रारदारांच्या बहिणीकडे ठेवली व परदेशात इथोपिया येथे त्यांचे कामानिमित्त ते गेले असे शपथेवर कथन केले आहे. सदरचे कथन पाहता, तक्रारदारांचे मुलाने वादातील वाहन हे नो पार्कींग क्षेत्रात पार्क केले होते ही बाब शाबीत होत नाही. तक्रारदाराने याकामी त्यांचे वाहन ज्या अपार्टमेंटजवळ पार्क केले होते, त्या विवेक को-ऑप. हौसिंग सोसायटीचे दि. 2/03/2019 चे प्रमाणपत्र तक्रारदाराने दाखल केले आहे. त्याचे अवलोकन केले असता, तक्रारदाराने पार्कींग केलेल्या ठिकाणी गेले कित्येक वर्षांपासून अन्य गाडया या नेहमीप्रमाणे पार्क केल्या जात होत्या व त्यामुळे वाहतूकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा होत नाही असे नमूद केले आहे. सदरचे प्रमाणपत्रास छेद देणारा कोणताही पुरावा वि.प. यांनी याकामी दाखल केलेला नाही. तक्रारदाराचे मुलाने वाहन पार्क केलेले ठिकाण हे नो पार्कींगमध्ये येते हे शाबीत करणारा कोणताही पुरावा वि.प. यांनी याकामी दाखल केलेला नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारल्याची बाब याकामी स्पष्टपणे शाबीत झालेली आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचा न्याययोग्य विमाक्लेम नाकारुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. तक्रारदारांनी व वि.प. यांनी याकामी काही वरिष्ठ न्यायालयांचे निवाडे दाखल केले आहे. तसेच वि.प. यांनी याकामी दि. 21/07/2022 रोजी पुरसीस दाखल केली असून त्यासोबत खालील वरिष्ठ न्यायालयाचा निवाडा दाखल केला आहे.
2022 LiveLaw (SC) 154 – CA No. 1069/22 decided on 11/02/2022.
Jaina Construction Company Vs. The Oriental Insurance Co. Ltd.
सदरचे निवाडयामध्ये वाहनाच्या आय.डी.व्ही. रकमेच्या 75 टक्के रक्कम नॉन स्टँडर्ड बेसीसवर विमाधारक वि.प. कंपनीकडून मिळण्यास पात्र आहेत असा निवाडा दिला आहे. सदरचे निवाडयाचे अवलोकन करता सदर निवाडा प्रस्तुत प्रकरणास तंतोतंत लागू होतो. सबब, सदरचे निवाडयात घालून दिलेला दंडक विचारात घेता तक्रारदार हे नॉन स्टँडर्ड बेसीसवर वाहनाची आय.डी.व्ही. रक्कम रु. 10,00,000/- च्या 75 टक्के रक्कम म्हणजेच रक्कम रु.7,50,000/- इतकी रक्कम वि.प. यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 7,50,000/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.