Exh.No.43
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 34/2014
तक्रार दाखल झाल्याचा दि. 06/08/2014
तक्रार निकाल झाल्याचा दि. 29/01/2016
श्री रमेश सोमा चव्हाण
वय सुमारे 55 वर्षे, धंदा- उद्योजक,
रा.1481, अनुसया सदन, सांगिर्डेवाडी,
ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
पिन-416520 ... तक्रारदार
विरुध्द
1) नॅशनल इंश्युरंस कंपनी लिमिटेड,
2811, सुभाष रोड, पतीत पावन मंदिरासमोर,
रत्नागिरी, ता.जि. रत्नागिरी-415 612
2) व्यवस्थापक,
बिझनेस सेंटर,
नॅशनल इंश्युरंस कंपनी लिमिटेड,
कुडाळ, ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
3) एमडी इंडिया हेल्थ केअर सर्व्हिसेस (TPA) प्रा.लि.
पहिला मजला, कर्नावत टॉवर, मराळ हाईट्स,
पौड फाटा, दशभुजा गणपती मंदीरासमोर,
पुणे-411 038 ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्ष
2) श्री कमलाकांत ध. कुबल, सदस्य
3) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री अमोल सामंत
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्री एस.एन. भणगे.
निकालपत्र
(दि. 29/01/2016)
द्वारा : मा.अध्यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.
1) प्रस्तुतची तक्रार विरुध्द पक्षाचे विमा कंपनीने तक्रारदार यांस मेडीक्लेम नाकारल्याने सेवात्रुटी संबंधाने दाखल करणेत आलेली आहे.
2) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की, तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचेत जीवन विमा करार झालेला असून त्यानुसार तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या रत्नागिरी येथील शाखेत स्वतःचे व त्यांची पत्नी सौ. रश्मी रमेश चव्हाण यांचे नावे “संपूर्ण सुरक्षा विमा” ही नवीन विमा पॉलिसी दि.29/12/2006 रोजी चालू केली. तेव्हापासून सदर पॉलिसी दरवर्षी नुतनीकरण करुन तिच्या हप्त्यांची रक्कम तक्रारदार हे अखंडपणे भरीत आलेले आहेत. सदर पॉलिसीचा क्रमांक 270803/48/ 06/ 3500001025 असा आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे सन 2007 पासून स्वतःकरीता व पत्नीकरिता संयुक्तरित्या मेडिक्लेम पॉलिसी सुरु केलेली असून तेव्हापासून दरवर्षी नुतनीकरण करुन वेळोवेळी हप्ते भरीत आहे.
3) तक्रारदार यांचे कथन असे आहे की, तक्रारदाराने दि.20/12/2010 ते 19/12/2011 या कालावधीकरीता मेडिक्लेम पॉलिसी क्र. 270803/48/10/ 3500003410 मध्ये स्वतःच्या नावे रु.2,50,000/- व पत्नीच्या नावे रु.2,00,000/- मिळून एकूण रु.4,50,000/- एवढया रक्कमेची मेडिक्लेम पॉलिसी विरुध्द पक्ष यांच्याकडे काढली होती. सदर पॉलिसीच्या कालावधीत म्हणजेच माहे सप्टेंबर सन 2011 मध्ये तक्रारदाराच्या छातीत दुखू लागल्याने ते प्रथम डॉ.विवेक पाटणकर, कुडाळ यांचेकडे दाखल झाले. त्यानंतर दि.10/09/2011 रोजी डॉ.रमेश परब, कुडाळ यांचेकडे आणि त्यांचे सल्ल्यानुसार दि.11/09/2011 रोजी अपोलो हॉस्पीटल, मडगाव – गोवा येथे उपचारासाठी दाखल झाले. त्याच हॉस्पीटलमध्ये तक्रारदार यांच्या हृदयावर बायपास शस्त्रक्रिया झाली. सदर शस्त्रक्रियेसाठी व शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने त्यावर कराव्या लागलेल्या औषधोपचारासाठी प्रचंड खर्च केला व अजुनही चालूच आहे. तक्रारदारास झालेला सदर खर्च हा 20/12/2010 ते दि.19/12/2011 या मेडिक्लेम पॉलिसीच्या कालावधीत झालेला असल्याने मेडिक्लेम पॉलिसी क्र. 270803/48/10/3500003410 नुसार झालेला सर्व खर्च विरुध्द पक्ष यांचेकडून तक्रारदारास मिळणे क्रमप्राप्त आहे. तक्रारदार यांनी त्यास झालेल्या शस्त्रक्रिया व अनुषंगिक वैदयकीय खर्चाची रक्कम रु.2,77,488.25 एवढया रक्कमेचा क्लेम विरुध्द पक्षाकडे सादर केला. विरुध्द पक्ष 1 यांनी त्यास विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकडून प्राप्त झालेल्या दि.14/3/2012 रोजीच्या पत्राचा संदर्भ देऊन तक्रारदार यांस मेडिक्लेम नाकारला गेल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदारास फार मोठया आर्थिक संकटात सामोरे जावे लागले. विरुध्द पक्ष यांनी विमा सेवा करारातील अटींचे उल्लंघन केल्यामुळे तक्रारदारास शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.50,000/-, तक्रार खर्च रु.15,000/- क्लेमची रक्कम व त्यावर दि. दि.5/9/2011 पासून तक्रार अर्ज दाखल करेपर्यंत व्याज रु.38732.70 तसेच संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत 15% व्याज अशी मागणी केली आहे.
4) तक्रार अर्जासोबत तक्रारदाराने नि.5 वर विलंब माफीचा अर्ज क्रमांक 01/2014 दाखल केला होता. तो रु.300/- कॉस्ट विरुध्द पक्ष यांना देऊन मंजूर करणेत आला. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत विमा पॉलिसीच्या झेरॉक्स प्रती, वैदयकीय बिलांच्या पावत्या, विरुध्द पक्षाकडे दि.25/10/2011 रोजी पाठविलेले पत्र, मेडिक्लेम, इतर पत्रव्यवहार यांच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत.
5) तक्रार अर्जाचे कामी विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी दिलेले लेखी म्हणणे नि.क्र.14 वर दाखल आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे अर्जातील मजकूर परिच्छेदनिहाय नाकारला असून तक्रार अर्ज खर्चासह रद्द करावा असे म्हणणे मांडले. विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणतीही पॉलिसी ही विमा पॉलिसीधारक व विमा कंपनी यांच्यातील करार असतो. त्या करारातील अटी व शर्ती उभय पक्षांवर बंधनकारक असतात. तक्रारदार यांनी दि.20/12/2010 ते 19/12/2011 या कालावधीसाठी मेडिक्लेमची पॉलिसी काढली. त्यातील शर्थ क्र.4.1 नुसार पॉलिसीधारकाने त्यास अस्तित्वात असलेले आजार उघड करणे त्याच्यावर बंधनकारक असते. एखादया विमाधारकाने 4 वर्षे मुदतीपर्यंत पॉलिसीचे नुतनीकरण केल्यास पाचव्या वर्षी pre-existing आजाराबाबत विमा पॉलिसीची रक्कम मिळू शकते. म्हणजेच पॉलिसीधारकाने एकतर आपणांस असलेला आजार विमा कंपनीस उघड करणे आवश्यक आहे किंवा तसा उघड न केल्यास ज्या वर्षी विमा पॉलिसी काढली तेव्हापासून सतत /विनाखंडीत 4 वर्षे पॉलिसीचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे.
6) विरुध्द पक्ष यांचे पुढे असे म्हणणे आहे की, तक्रारदाराने सन 2006-2007 मध्ये उतरविलेली पॉलिसी ही मेडिक्लेमची पॉलिसी नव्हती. सन 2008-2009 व सन 2009-2010 या कालावधीसाठी तिचे नुतनीकरण केलेले नसल्यामुळे सदरची पॉलिसी खंडीत झालेली होती. त्यामुळे सन 2010 -2011 या पॉलिसीचे आधारे गेली 15-20 वर्षे मधुमेह असलेल्या व्यक्तीस त्या आजारामुळे उद्भवलेल्या हृदय विकाराच्या दुखण्याबाबत सदर पॉलिसीचे आधारे नुकसान भरपाई कायदयाने मागता येणारी नाही. अर्जदार यांना त्यांनी दिलेल्या वैदयकीय प्रमाणपत्रानुसार त्यांना गेली 15-20 वर्षे मधुमेह आहे हे स्पष्ट होणारे आहे. हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी डॉ.पाटणकर यांच्याकडून प्रमाणपत्र घेऊन ते चुकीने दिल्याचे सांगून त्यांना फक्त 1 ते 1 ½ वर्ष मधुमेह आहे असे खोडसाळपणे कथन केले. त्यामुळे तक्रार अर्ज खोटा असल्याने खर्चासह रद्द करावा असे म्हणणे मांडले.
7) तक्रारदार यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.क्र.15 वर दाखल केले असून नि.क्र.17 वर अर्ज दाखल करुन विमा पॉलिसीचेवेळी केलेल्या वैदयकीय तपासणीचा अहवाल विरुध्द पक्ष यांनी दाखल करणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली. सदरचा अर्ज दि.25/6/2015 रोजी मंजूर करणेत आला. नि.क्र.20 सोबत तक्रारदाराने विरुध्द पक्ष विमा कंपनीचे मेडिकल इंश्युरंस पॉलिसी प्रॉस्पेक्टस हजर केले आहे. त्यामध्ये नियम क्र.7 रंगीत केलेला आहे. तर विरुध्द पक्ष यांनी नि.21 वर म्हणणे मांडून तक्रारदार यांने पॉलिसी काढणेपूर्वी त्याची वैदयकीय तपासणी केलेली नसल्यामुळे तसे कागद हजर करता येत नाहीत असे म्हटले आहे. विरुध्द पक्ष यांनी नि.22 सोबत तक्रारदाराचे सन 2010-2011 वर्षीच्या पॉलिसीचा प्रपोझल फॉर्म हजर केला आहे. तक्रारदार यांनी नि.क्र.23 वर अतिरिक्त पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. विरुध्द पक्ष तक्रारदारास विचारलेली लेखी प्रश्नावली नि.क्र.26 वर असून त्याची लेखी उत्तरावली नि.क्र.27 वर आहे. विरुध्द पक्ष यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.क्र.28 वर आहे. त्यावर लेखी प्रश्नावली नि.क्र.30 आणि त्याची उत्तरावली नि.क.33 वर आहे. तक्रारदारतर्फे लेखी युक्तीवाद नि.क्र.38 वर तर विरुध्द पक्षातर्फे लेखी युक्तीवाद नि.क्र.40 वर आहे.
8) तक्रारीचा आशय, दोन्ही बाजूंचा पुरावा, युक्तीवाद यांचे अवलोकन करता या मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यावरील विवेचन खालीलप्रमाणे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार विरुध्द पक्षाचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदारांना ग्राहक म्हणून सदोष सेवा किंवा सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
3 | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
9) मुद्दा क्रमांक 1- या मंचासमोर दाखल केलेला कागदोपत्री पुरावा पाहता तक्रारदाराने स्वतः व त्यांची पत्नी यांचे नावे सुरुवातीला संपूर्ण सुरक्षा विमा ही विमा पॉलिसी 19/12/2006 रोजी चालू केली होती. त्यांनतर मेडिक्लेम पॉलिसी सुरु केलेली होती. त्यानंतर 20/12/2010 ते 19/12/2011 या कालावधीकरीता मेडिक्लेम पॉलिसी क्र. 270803/48/10/3500003410 घेतलेली होती. सदर पॉलिसीनुसार स्वतःच्या नावे रु.2,50,000/- व पत्नीच्या नावे 2,00,000/-अशी एकूण 4,50,000/- या रक्कमेची मेडिक्लेम पॉलिसी वि.प. यांचेकडे काढलेली होती. सदरची पॉलिसी या मंचासमोर नि.4/3 सोबत दाखल केलेली आहे. सदरची बाब विरुध्द पक्षाने नाकारलेली नाही. सबब तक्रारदाराने वि.प. यांचेकडून मेडिक्लेम पॉलिसी घेतल्याचे सिध्द होते. सबब तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीचे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (1) (डी) नुसार ग्राहक आहेत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा नं.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
10) मुद्दा क्रमांक 2 – तक्रारदाराने वि.प. यांचेकडून घेतलेली मेडिक्लेम पॉलिसी 20/12/2010 ते 19/12/2011 या कालावधीकरीता आहे. सदर पॉलिसीचा वार्षिक हप्ता 7789/- तक्रारदारांनी विरुध्द पक्षाकडे जमा केलेबाबतची पावती तक्रारदाराने नि.4/4 कडे दाखल केलेली आहे. त्यामुळे सदरची पॉलिसी वैध होती असे म्हणावे लागेल. तक्रारदारांचा प्रस्तुतचा अर्ज त्यांनी 10/9/2011 पासून उपचाराकरीता दाखल होऊन अपोलो हॉस्पीटल मडगाव येथे उपचार घेऊन बायपास शस्त्रक्रिया करणेत आली त्याबाबतच्या कराव्या लागणा-या औषधोपचाराचा खर्च पॉलिसीच्या आधारे वसूल होऊन मिळावा म्हणून दाखल केलेला आहे. तक्रारदाराने रु.2,77,488.25 एवढया रक्कमेचा क्लेम वि.प. यांचेकडे केलेला आहे.
11) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारांचा क्लेम ता.14/3/2012 च्या पत्राने नाकारलेला आहे. सदरचा क्लेम नाकारणेसाठी वि.प. यांनी तक्रारदारांचा आजार हा डायबेटीस मेलिटस कॉम्प्लीकेशन्समुळे तसेच त्यांना 15/20 वर्षापपासून डायबेटीस असल्यामुळे तसेच प्रि एक्झीटींग डिसिज प्रस्तुत पॉलिसीनुसार कव्हर होत नसल्याने तक्रारदारांची मागणी अमान्य करण्यात येत आहे असे कळविण्यात आलेले आहे.
12) विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी हजर केलेल्या डिस्चार्ज समरीमध्ये तक्रारदारांना गेले 15/20 वर्षापासून डायबेटीस आहे असे नमूद केलेले आहे. त्यामुळे तक्रारदारांनी पॉलिसीच्या शर्ती व अटींचा भंग केलेला असल्यामुळे क्लेम नाकारला आहे. तथापि विरुध्द पक्षानी तक्रारदारांना 15/20 वर्षापासून डायबेटीस असल्याबाबत इतर कोणताही पुरावा किंवा त्यांच्या पॅनेलवरील वैदयकीय अधिका-यांचा दाखला या कामी हजर केलेला नाही. तसेच तक्रारदारांनी क्लेम फॉर्म भरुन देतांना वैदयकीय दाखला हजर केला असल्यास तो या मंचासमोर दाखल करण्याबाबत आदेश होऊन देखील असा वैदयकीय दाखला या मंचासमोर दाखल केलेला नाही. विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार असा दाखला तक्रारदारांनी दाखल केलेला नसल्यामुळे हजर करु शकत नाहीत. तथापि मंचाचा आदेश होऊन देखील असा कोणताही पुरावा विरुध्द पक्षांनी दाखल न केल्याने विरुध्द पक्ष यांचेविरुध्द विरुध्द अनुमान (adverse inference) काढावे लागेल. याउलट तक्रारदारांनी त्यांना दीड वर्षापासून ऑपरेशनपुर्वी डायबेटीस असल्याबाबत डॉ.खानोलकर यांचा ता.16/11/2011 चा दाखला डिस्चार्ज समरीसोबत या मंचासमोर नि.4/26 सोबत दाखल केलेला आहे. सदर दाखल्यानुसार डॉ.खानोलकर यांनी हिस्ट्री शीटमध्ये तक्रारदार हे 20 वर्षापासून डायबेटीसग्रस्त आहेत असे चुकीने नमूद केलेले आहे. तक्रारदारांच्या फॅमिली डॉक्टरांच्या referral note नुसार तक्रारदार गेले दीड वर्षापासून डायबेटीसने आजारी आहेत असे नमूद केलेले आहे. त्यामुळे तक्रारदारांना 20 वर्षापासून डायबेटीस हा आजार होता हे शाबीत करणेस विरुध्द पक्षांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.
13) विमाधारकाने त्यांच्या पूर्व आजारपणाची माहिती लपविली असल्यास सिध्द करण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष यांचेवर येते. तसेच pre existing decease करीता तक्रारदाराने पूर्वी औषधोपचार घेतले असले पाहिजेत व असे औषधोपचार दीर्घकाळ असले पाहिजेत. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांचेकडून 2006 पासून 2012 पर्यंत 3 हेल्थ पॉलिसी घेतल्याचे सिध्द होते. तसेच तक्रारदार हे 50 वर्षापेक्षा जास्त वयाचे असल्यामुळे त्यांना पॉलिसी देतांना विमा कंपनीच्या नियमानुसार त्यांची वैदयकीय तपासणी विमा कंपनीच्या पॅनेलवरील वैदयकीय अधिका-यांकडून करुन घेणे आवश्यक होते. अशी वैदयकीय तपासणी केल्याबाबतचा कोणताही पुरावा विरुध्द पक्षांनी या मंचासमोर दाखल केलेला नाही. या सर्व बाबींचा विचार करता विरुध्द पक्ष यांनी क्लेम नामंजूर करतांना दिलेले कारण pre existing decease हे कशाचे आधारे दिले याबाबत संदीग्धता आहे. सबब विरुध्द पक्षांनी तक्रारदार हे ऑपरेशनपुर्वी 20 वर्षापासून डायबेटीसने आजारी होते व सदरचा आजार त्यांनी क्लेम फॉर्ममध्ये न दाखविता लपवून ठेवला ही बाब वि.प. यांनी पुराव्यानिशी सिध्द केलेली नाही. सबब वि.प. यांनी तक्रारदारांचा क्लेम कोणत्याही पुराव्याशिवाय नाकारल्याचे दिसून येते. याउलट तक्रारदाराने दाखल केलेला पुरावा त्यांचा क्लेम शाबीत करणेस पुरेसा आहे. सबब तक्रारदारांचा विमा दावा योग्य व सबळ कारणाने वि.प. यांनी नाकारला नसल्याने तक्रारदारांना विमा दाव्यासंदर्भात सदोष सेवा किंवा सेवेतील त्रुटी ठेऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
14) मुद्दा क्रमांक 3 – तक्रारदारांनी प्रस्तुतचा अर्ज दि.5/9/2011 ते 4/10/2011 पर्यंतचा खर्च रु.2,77,588.25 विरुध्द पक्षाकडून मिळावा याकरीता दाखल केलेला आहे. तथापि वि.प. कंपनीने दिेलेली विमा पॉलिसी पाहता मेडिक्लेमची रक्कम तक्रारदारांच्या पुरती रु.2,50,000/- पर्यंत मर्यादीत असल्याचे तक्रारदारांनी दाखल केलेल्या नि.4/4 वरील मेडिक्लेम पॉलिसी क्र.270803/48/10/3500003410 या कागदपत्रांवरुन सिध्द होते. सबब तक्रारदार हे मेडिक्लेम पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार रक्कम रु.2,50,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रक्कम देणेस वि.प. यांनी टाळाटाळ केल्याने सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 9% दराने व्याज दि.14/03/2012 पासून म्हणजेच क्लेम नाकारल्यापासून मिळणेस पात्र आहेत. तक्रारदारांना झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे.
परिणामतः हे मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारांनी त्यांच्या ऑपरेशन व औषधोपचार याबाबत केलेल्या खर्चाची प्रतीपुर्ती म्हणून रक्कम रु.2,50,000/- (रुपये दोन लाख पन्नास हजार मात्र) दयावेत. तसेच सदर रक्कमेवर दि.14/3/2012 पासून रक्कम फिटेपर्यंत 9% व्याज अदा करावे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारांना झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु.20,000/- (रुपये वीस हजार मात्र) व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) अदा करावा.
- सदर आदेशाची पुर्तता विरुध्द पक्ष यांनी आदेश प्राप्तीच्या दिनांकापासून 45 दिवसांत करावी अन्यथा तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दंडात्मक कारवाई करणेची मुभा राहील.
- मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/ परिपत्रक/2014/3752 दि.05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.14/03/2016 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 29/01/2016
सही/- सही/- सही/-
(वफा ज. खान) (अपर्णा वा. पळसुले) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, अध्यक्ष, सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.