:: निकालपत्र ::
(श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ), सदस्या यांचे आदेशान्वये)
(आदेश पारीत दि. 23/12/2021)
प्रस्तुत तक्रार तक्रारकतीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केली आहे. तक्रारीची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
- तक्रारकर्ती हीचे तीचे पती श्री. बालाजी रामचंद्र सुर्यवंशी हयांचा मृत्यु दि. 05/04/2016 रोजी गावातील विहीरीत पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून झाला. तक्रारकर्तीचा पती हा शेतकरीत असून त्यांच्या नावाने मौजा- मोखळा ता. सावली जि. चंद्रपूर येथे भूमापन क्र. 302 ही शेतजमिन असून सगळे कुटूंब शेतातील उत्पन्नावर तीचे पती त्यांचे पालनपोषन करायचा. तक्रारकर्तीच्या पतीचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याने व तीच्या पतीचा रू. 2,00,000/-, चा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा उतरविला असल्यामूळे तक्रारकर्ती ही लाभधारक असल्याने तीने सर्व दस्तऐवजासह विरूध्द पक्ष क्र 3 कडे दि. 18/06/2016 रोजी रितसर अर्ज केला व त्यानंतरही विरूध्द पक्ष क्र 3 हयांनी मागविलेले सर्व दस्तऐवजाची पूर्तता केली. पंरतु विरूध्द पक्ष हयांनी दि. 20/09/2018 रोजी तक्रारकर्तीला पत्र पाठवुन मृतकाच्या पागलपणामुळे -दावा ना मंजूर करीत आहे हे कारण दाखवुन दावा फेटाळला. तक्रारकर्ती पुढे नमूद करते की, विरूध्दपक्ष हयांनी तक्रारकर्तीचा दावा अकारण फेटाळून न्यूनता पूर्ण सेवा दिलेली असल्यामूळे व तिला मानसिक त्रास सहन करावा लागला असल्याने सदर तक्रार तिने विरूध्द पक्षाच्या विरूध्द दाखल केली आहे.
- तक्रारकर्तीने तक्रारीत मागणी केली की, मा. आयोगाने तिला नुकसान भरपाईची रक्कम रू. 2,00,000/-, तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी रू. 30,000/-, व तक्रारीचा खर्च रू. 20,000/-, देण्यात यावा.
- तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करून विरूध्द पक्ष क्र 1,2 व 3 हयांना नोटीस पाठविण्यात आले.
- विरूध्द पक्ष क्र 1 व 2 हयांनी तक्रारीत उपस्थित राहून तक्रारकर्तीचे तक्रारीतील मुद्दे खोडून काढून काढीत विशेष कथनात पुढे नमूद केले की, तक्रार ही खोटी, तथ्यहीन असल्यामुळे खारीज करण्यात यावी तसेच सदर तक्रारीत कुठेही ग्राहकवाद हा नाही, तसेच सदर आयोगाला तक्रारीचे अधिकारक्षेत्र नाही तसेच ग्राहक संरक्षण कायदयाच्या हया व्याख्येमधील कोणत्याही सेवेत न्युनतापूर्ण सेवा विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीला दिली नाही. उलट तक्रारकर्तीने विरूध्दपक्ष हयांनी मागीतलेले आवश्यक दस्तऐवजांची पूर्तता न केल्यामूळे विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीचा दावा फेटाळला. तक्रारकर्तीने दावा अर्ज विरूध्दपक्ष क्र 3 हयांचेकडे दस्तऐवजासह दाखल केला त्यात असे आढळून आले की, तिच्या पतीचा मृत्यु हा पागलपणामूळे झाला तसे शवविच्छेदन अहवालामध्ये ही डॉक्टरांनी मृत्युचे कारण Achpyria see to Drowning असे नमूद केले आहे. परंतू मनोरुग्ण व आत्महत्या चा प्रयत्न केल्यामुळे सदर मृत्यु हा ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत अपघात या व्याखेत येत नाही. त्यामुळे तक्रारकर्तीचा दावा अर्ज, योग्य कारण देऊन फेटाळला गेला असल्यामूळे सदर तक्रार अर्ज खारीज होण्यास पात्र आहे.
- विरूध्द पक्ष क्र 3 हयांना प्रकरणात नोटीस प्राप्त होऊन सुध्दा ते प्रकरणात हजर न झाल्यामूळे त्यांचे विरूध्द हि तक्रारीत दि. 23/10/2018 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आलाण
- तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र व दस्तऐवज व विरूध्दपक्ष हयांचे लेखीबयान,लेखीयुक्तिवाद या अनुषंगाने उभयपक्षाने केलेल्या युक्तीवादावरून आयोगाच्या निर्णयास्तव मुद्दे व निष्कर्ष व त्यावील कारणमीमांसा खालील प्रमाणे आहे.
कारणमिमांसा
7. तक्रारकर्तीने तक्रारीत नि.क्र. ४ वर दाखल केलेल्या दस्त क्र. ३, ७/१२ उतारा, गांव नमुना ८, फेरफार या दस्तावेजांवर तक्रारकर्तीचे पती मयत बालाजी यांचे नावाची नोंद आहे यावरून तक्रारकर्तीचे मयत पती शेतकरी होते व तक्रारकर्तीही मयत विमाधारक शेतक-याची पत्नी म्हणून सदर विम्याची लाभधारक असल्याने तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांची ग्राहक आहे, हे सिध्द होते.
8. तक्रारीत दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की तक्रारकर्तीचे मयत पती श्री.बालाजी रामचंद्र सूर्यवंशी यांच्या मालकीची मौजा- मोखळा ता. सावली जि. चंद्रपूर येथे भूमापन क्र. 302 ही शेतजमिन महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विरूध्द पक्ष क्रं. 3 मार्फत विरूध्द पक्ष क्रं. १ व २ कडून तक्रारकर्तीचे पतीचा रू. 2,00,000/- चा विमा उतरविण्यात आला होता. तक्रारकर्तीचे पतीचा दि. 5 /04/2016 रोजी विहिरीत पाय घसरून पाण्यात बुडून अपघाती मृत्यु झाला. तक्रारकर्तीने दि. 18.06.2016 रोजी विरूध्द पक्ष क्रं. 3 मार्फत विरुध्द पक्ष १ व २ विमा कंपनीकडे विम्याची रक्कम मिळण्याकरीता रीतसर अर्ज केला,परंतु विरुद्ध पक्ष १ व२ ह्यांनी तिचा दावा तिच्या पतीच्या पागलपणामुळे त्यांनी स्वतच आत्महत्या केल्याचे दिसून येत असल्यामुळे विमा करारात सदर बाब मोडत नसल्यामुळे तक्रारकर्तीचा दावा नामंजूर केला, परंतु या संदर्भात सदर प्रकरणात विरुद्ध पक्ष १ ने आयोगासमोर कोणतेही साक्षि पुरावा आणून हे सिध्द करु शकले नाही कि, तिच्या पती ने पागल पणाच्या भरात विहिरीत उडी मारली. तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेल्या मा.महाराष्ट्र राज्य आयोग,मुंबई यांच्या, एफए नं.ए/11/843 श्री संतोष संकल्प विरुध्द ओरीएंटल इंश्युरंस या प्रकरणात दिनांक 4/7/2013 रोजी दिलेल्या निवाडयात, मते Cr.pc कलम161च्या तरतुदी प्रमाणे व पुरावा अधिनियमाच्या कलम 25 अन्वये, पोलीस अधिकाऱ्या समोर दिलेले विधान हे कबुलीजवाब म्हणून ग्राह्य धरू शकत नाही. सबब तक्रारकर्तीच्या पतीने पागलपणाच्या भरात विहिरीत उडी मारल्यामूळे बडून मृत्यू झाला व असा मृत्यू विमा करार प्रमाणे अपघात या संज्ञेत मोडत नाही हे विरुद्ध पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरण्यासारखे नाही. तसेच तक्रार कर्तीने दाखल केलेल्या शवविच्छेदन अहवालावरून असे दिसून येते कि तिच्या पतीचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे श्वास गुदमरून झालेला असल्यामुळे व त्यात घातपाताची शक्यता विरुध्द पक्षाने सिध्द केलेली नसल्याने शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे तो अपघाती मृत्यू होतो. परिणामतः सदर प्रकरणात विरुद्ध पक्ष 1 व 2 ह्यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळून सेवेत न्यूनता दिलेली असल्यामुळे तक्रार कर्ती विरुद्ध पक्ष 1 व 2 ह्यांचेकडून विमा दावा रक्कम रुपय 2,00,000/- घेण्यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे.
9. तक्रारकर्ती ने तक्रारीत तिला विरुद्ध पक्ष 1 व 2 ने विमा दावा नाकारल्यामुळे झालेल्या शारिरीक व मानिसिक त्रास झाल्यामुळे आयोगाच्या मते तक्रारकर्तीला रुपय 5000/- व तक्रारीचा खर्च 5000/- मंजूर करणे न्यायोचित राहील.
10. विरुद्ध पक्ष ३ ह्यांनी तक्रारकर्तीचा विमा अर्ज विरुद्ध पक्ष १ कडे कोणतीही कसूर न करता पाठविला असल्यामुळे विरुद्ध पक्ष ३ विरुद्ध कोणताही आदेश नाही.
11. वरील विवेचन वरून आयोग खालील आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
१. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. विरुद्ध पक्ष क्र. 1 व 2 ह्यांनी शेतकरी अपघात विमा दावा रक्कम रुपये 2,00,000/-
तक्रारकर्तीस द्यावी.
३. विरुद्ध पक्ष क्र. 1 व 2 ह्यांनी तक्रारकर्ती ला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी
5000/- व तक्रारीचा खर्च रुपय 5000/- द्यावा.
4. विरुद्ध पक्ष क्र. 3 विरुद्ध कोणतेही आदेश नाहीत.
5. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ देण्यात यावी.
श्रीमती. कल्पना जांगडे (कुटे) श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ), श्री. अतुल डी. आळशी
सदस्या सदस्या अध्यक्ष
ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर.