Exh.No.23
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 13/2014
तक्रार दाखल झाल्याचा दि. 02/04/2014
तक्रार निकाल झाल्याचा दि.28/11/2014
- सौ. फिना बेल्ला फर्नांडीस
वय 56 वर्षे, धंदा- गृहीणी,
रा.घर नं.167, इब्रामपूर, हेदुवाडो,
पेडणे, गोवा
2) श्री शंकर चंद्रकांत नाईक
वय 29 वर्षे, धंदा- ड्रायव्हर,
रा.कुमयाची वळ, तोरसे,
पेडणे, गोवा ... तक्रारदार
विरुध्द
नॅशनल इंशुरंस कंपनी लिमिटेड,
तर्फे शाखाधिकारी,
3316, (22) डी’7, मेहनिल प्लाझा,
वालावल – नेरुर रोड, कुडाळ, ता.कुडाळ,
जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्ष
2) श्री कमलाकांत ध. कुबल, सदस्य
3) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री जी.टी. पडते.
विरुद्धपक्षातर्फे विधिज्ञ – श्री एस. एन. भणगे.
निकालपत्र
(दि. 28/11/2014)
द्वारा : मा.अध्यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.
- प्रस्तुतची तक्रार विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदारांच्या वाहन विम्याबाबत दिलेल्या सदोष सेवा किंवा सेवेतील त्रुटी या संदर्भात दाखल केलेली आहे. तक्रारीचा थोडक्यात तपशील खालीलप्रमाणे –
- तक्रारदार नं.1 हे मारुती ओमनी रजिस्टर नं.जीए-01- आर- 8350 चे मालक होते. सदर वाहनाचा विमा विरुध्द पक्ष यांचेकडे उतरविलेला होता. तक्रारदार नं.1 यांनी सदर वाहन तक्रारदार नं.2 यांना विक्री केले व सदरचे वाहन तक्रारदार नं.2 यांचे नावावर 11/07/2013 रोजी नोंदवणेत आले तशा नोंदी वाहनाच्या रजिस्टेशन बुकवर सहायक परिवहन संचालक, उत्तर गोवा यांनी केलेले आहे. सबब तक्रारदार नं.2 हे सदर गाडीचे अधिकृतरित्या मालक झालेले आहेत.
- ता.14/10/2013 रोजी श्री अरुण राजाराम नाईक हे त्यांच्या गाडीतून कुटूंबासोबत सासोली, ता.दोडामार्ग येथे जात असतांना चांदेल या गावानजीक सदर गाडीचा अपघात झाला. त्यामुळे सदर गाडीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले तसेच गाडीची डावी बाजू पूर्णतः चेपून गेली व नाईक यांच्या कुटूंबातील सदस्यांना दुखापती झाल्या सदर अपघाताची माहिती अरुण नाईक यांनी तक्रारदार नं.2 यांना तसेच पेडणे पोलीस स्टेशन यांना कळविली. त्यानंतर अपघातग्रस्त गाडीचा पंचनामा करणेत आला. तसेच सदरची गाडी साई क्रेन सर्व्हीस यांच्या क्रेनने ‘असीद गॅरेज’ म्हापसा, गोवा या ठिकाणी नेणेत आली. विरुध्द पक्ष यांनी त्यांचे अधिकत सर्व्हेअर श्री आजगावकर यांना त्या ठिकाणी पाठवून सदर गाडीचा सर्व्हे केला. ता.21/10/2013 रोजी तक्रारदार 1 यांनी नुकसान भरपाई मिळणेसाठी दावा प्रपत्र लिहून दिले. तक्रारदार सदर दाव्याबाबत नेहमी चौकशी करीत असत. तथापि विरुध्द पक्ष यांचेकडून समाधानकारक उत्तर देणेत आले नाही.
- त्यानंतर ता.6/1/2014 रोजी विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार नं.1 यांना पत्र पाठवून नुकसान भरपाईचा दावा नाकारत आहे असे कळवले. सदर पत्रामध्ये तक्रारदार नं.1 यांनी तक्रारदार नं.2 यांना गाडी विकल्यानंतर विमा पॉलिसी त्यांचे नावे करण्याबाबत नियमानुसार वेळेवर विरुध्द पक्ष यांना कळवले नाही तसेच अपघातादिवशी सदरची गाडी तक्रारदार नं.1 यांचे नावावर नसल्याने त्यांचा विम्याबाबतचा हक्क संपूष्टात आल्याने सदरचा विमा दावा नामंजूर केलेबाबत कळवले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार ता.5/12/2013 रोजी विरुध्द पक्ष यांनी पत्र पाठवून खुलासा मागवला होता व त्यास उत्तर देण्यात आले नाही, असे विरुध्द पक्ष यांचे म्हणणे आहे. तथापि अशा प्रकारचे पत्र तक्रारदार यांना केव्हाही प्राप्त झालेले नव्हते. सबब विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारांचा विमा दावा खोटे कारण नमूद करुन नाकारलेला आहे अशा प्रकारे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारांना सेवा देण्यास कसुर केली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला म्हणून सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- तक्रारदाराने गाडी दुरुस्तीसाठी येणारा खर्च रु.75,000/-, गाडी दुरुस्तीचा खर्च रु.5,000/- तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- असे असे एकूण रु. 90,000/- विरुध्द पक्ष यांचेकडून देवविण्यात यावेत अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्ष यांनी नि.11 कडे म्हणणे देऊन तक्रार अर्जातील सर्व मजकूर परिच्छेदनिहाय नाकारलेला आहे. तथापि सदर मारुती ओमनी जीए-01 आर 8350 ही तक्रारदार यांच्या मालकीची असून त्या वाहनाचा विमा विरुध्द पक्ष यांचेकडे उतरविला होता हे मान्य केले आहे. तसेच सदरची गाडी तक्रारदार नं.2 यांना विक्री केली व ती 11/7/2013 रोजी तक्रारदार नं.2 यांचे नावे रजिस्टर्ड झाली हे मान्य केले आहे.
- विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार वाहन कायदा कलम 50 व नियम 55 यांचा भंग तक्रारदाराने केलेला आहे. विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार गाडी विक्री केल्यानंतर 14 दिवसांचे आत योग्य त्या नमुन्यात विमा कंपनीस कळवणे मूळ मालकावर बंधनकारक आहे. तसेच मूळ मालकाच्या नावे असलेले विमा प्रमाणपत्र योग्य ती नजराणा फी भरुन नवीन मालकाच्या नावे विमा प्रमाणपत्र नोंदवून घेणे आवश्यक असते. तक्रारदार नं.1 यांनी अशी कोणतीही कार्यवाही केली नसल्यामुळे तक्रारदार यांना नुकसान भरपाई मागता येणार नाही. तसेच ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी तक्रारदार नं.2 हे गाडीचे मालक असले तरी त्यांचे नावे विमा पत्र तबदील करण्यात आलेले नव्हते तसेच तक्रारदार नं.1 अपघात झाला त्या दिवशी अपघातग्रस्त वाहनाच्या मालक नव्हत्या. सबब तक्रारदाराने केलेली विनंती कायदयास धरुन नाही तसेच तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. विरुध्द पक्ष यांनी वाहन विम्याबाबत सेवेत त्रुटी किेंवा सेवा देण्यास त्रुटी केली नाही तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करावा, अशी विनंती केलेली आहे.
- तक्रारदाराने या कामी तक्रारीसोबत नि.4 सोबत एकूण 8 कागद दाखल केलेले आहेत. त्यामध्ये विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराला पाठविलेले 6/1/2014 चे पत्र, तक्रारदाराने विरुध्द पक्षाला दि.21/10/2013 चे दिलेले क्लेम इंटिमेशन, असीद गॅरेज, म्हापसा- गोवा यांनी दि.21/10/2013 रोजी दिलेले दुरुस्ती खर्चाचे अंदाजपत्रक, सदर मारुती ओमनीचे रजिस्टेशन सर्टीफिकेट, दि.14/10/2013 रोजी अरुण नाईक यांनी दिलेली फिर्याद, 13/10/2013 रोजीचा अपघातग्रस्त गाडीचा पंचनामा, साई क्रेन सर्व्हीस यांनी दिलेली दि.19/10/2013 ची पावती, मारुती ओमनीचा विमा दाखला तसेच तक्रारदार नं.1 यांनी विमा हप्ता भरल्याची पावती तसेच नि.13 कडे शंकर चंद्रकांत नाईक तक्रारदार नं.2 यांचे प्रतिज्ञापत्र, सदर प्रतिज्ञापत्रावलीस प्रश्नावली नि.15 कडे, तसेच उत्तरावली नि.17 कडे दाखल केलेली आहे. तसेच नि.18 कडे पुरावा संपल्याची पुरसीस दाखल केली आहे.
- याउलट विरुध्द पक्ष कंपनीने नि.19 कडे इसहाक उस्मान पठाण यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलले आहे. तक्रारदारांनी प्रश्नावली नि.20 कडे व विरुध्द पक्ष यांनी उत्तरावली नि.21 कडे दाखल केली आहे. विरुध्द पक्ष यांनी नि.22 कडे पुरावा संपल्याची पुरसीस दाखल केलेली आहे. त्यानंतर तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचे युक्तीवाद ऐकले.
- तक्रारीचा आशय, विरुध्द पक्षाचे म्हणणे, मंचासमोरील पुरावा, युक्तीवाद तक्रारीचा आशय, विरुध्द पक्षाचे म्हणणे, दोन्ही बाजूंचा पुरावा, युक्तिवाद यांचा विचार करता या मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत का ? | होय |
2 | ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत वि.प. कंपनीने त्रुटी केली आहे का ? | होय |
3 | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
11) मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदार नं.1 यांनी त्यांच्या मालकीच्या मारुती ओमनी रजिस्टर नं.जीए-01 आर 8350 या गाडीचा विमा विरुध्द पक्ष यांचेकडे उतरविलेला होता ही बाब विरुध्द पक्ष यांनी नाकारलेली नाही तसेच विमा दाखला व प्रिमीयम भरल्याची पावती नि.4 सोबत दाखल केलेली आहे. त्याचे अवलोकन करता सदरचे वाहन विरुध्द पक्ष यांचेकडे विमित केले होते ही बाब सिध्द होते. सदर विमा पॉलिसीचा नंबर 27080331126165007286 घेणे असून विम्याची मुदत 22/12/2012 ते 21/12/2013 असल्याचे दिसून येते. तसेच तक्रारदार नं.2 यांचे नावे तक्रारदार 1 यांनी ता.11/7/2013 रोजी सदरची गाडी तबदील केल्याचे दिसून येते. सबब गाडीच्या मालकी हक्काबरोबर गाडीबाबतचे सर्व हक्क (विमा क्लेमसह) वाहन खरेदी घेणा-याचे नावे तबदील होतात. सबब तक्रारदार 1 व 2 हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत, या निर्णयाप्रत हे मंच येत आहे.
12) मुद्दा क्रमांक 2 – प्रस्तुतची तक्रार वाहनाचे मूळ मालक व मूळ मालकापासून वाहन खरेदी केल्याचे खरेदीदार या दोघांनी मिळून दाखल केलेली आहे. मोटर वाहन कायदा कलम 157 (1) अनुसार ज्या वेळी एखादे वाहन एकाकडून दुस-याकडे तबदील केले जाते त्यावेळी विमा पॉलिसीचा कायदा हा नवीन मालकाकडे आपोआप ट्रान्सफर होतो, असे कायदयाचे तत्व आहे. तथापि विरुध्द पक्षाने तक्रारदार नं.1 यांनी केलेला विमा दावा ता.6/1/2014 रेाजीच्या पत्राने नाकारलेला आहे. सदरचा दावा नाकारतांना विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार क्र.1 हे 11/7/2013 पासून सदर वाहनाचे मालक नाहीत तसेच त्या तारखेपासून तक्रारदार नं.1 यांचा विम्याबाबतचा हक्क (insurable interest) रद्द झाल्याने त्यांचा दावा नाकारणेत आला. तसेच मोटर वाहन कायदा कलम 50 व नियम 55 अनुसार तक्रारदार 1 यांनी गाडी विक्री केल्याचे तारखेपासून 14 दिवसाचे आत विमा कंपनीला कळवून योग्य ती नियमानुसार कारवाई करुन विमा पॉलिसी तक्रारदार नं.2 यांचे नावे करुन देणे जरुरीचे होते. तक्रारदाराने विमा कंपनीला गाडी विक्रीबाबत काहीही कळवले नाही. तसेच तक्रारदाराने विमा दावा नाकारण्यापूर्वी 5/12/2013 रोजी पत्र पाठवले होते असे विरुध्द पक्ष यांचे म्हणणे आहे. तथापि एकंदरीत पुरावा पहता अशा प्रकारचे पत्र पाठवल्याचा कोणताही पुरावा या मंचासमोर विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेला नाही. सबब या कारणावरुन विमा दावा नाकारण्याची विरुध्द पक्ष यांची कृती ही सदोष सेवा किंवा सेवेतील त्रुटी या सदराखाली येते, असे या मंचाचे मत आहे. तक्रारदाराच्या वकीलांनी युक्तीवाद करतांना खालील न्यायनिवाडयाचा आधार घेतलेला आहे.
2014(3) Civil LJ 431) Supreme Court Mallamma (dead) through LRs. V/s National Insurance Company Ltd. And others सदर निवाडयाचे अवलोकन या मंचाने केले आहे. सदर निवाडयातील तत्व या प्रकरणास लागू होते. सबब विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारांचा विमा दावा नाकारतांना दिलेले कारण योग्य व कायदेशीर वाटत नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार 1 व 2 यांना नोटीस देऊन पॉलिसी तबदील करणेबाबत योग्य ती कार्यवाही करणेस सांगणे जरुर होते. तक्रारदार नं.1 यांनी ता.21/10/2013 रोजी योग्य ती पुर्तता करुन विमा दावा केलेला होता. तसेच अपघात झालेबाबतचे तसेच पोलीस पंचनाम्याबाबतचे कागदपत्र विरुध्द पक्ष यांनी नाकारलेले नाहीत. तसेच अपघातादिवशी सदर वाहनाची विमा पॉलिसी अस्तित्वात होती ही गोष्ट पुराव्यावरुन स्पष्ट होते. केवळ तक्रारदार नं.1 यांनी नं.2 यांचे नावे गाडी विक्री केल्यानंतर विमा कंपनीला कळवले नाही या कारणावरुन तक्रारदारांचा विमा दावा विरुध्द पक्ष यांनी नाकारलेला आहे. विरुध्द पक्ष यांनी दिलेले सदरचे कारण हे विमा कंपनीची जबाबदारी टाळणेस योग्य वाटत नाही. सबब विमा पॉलिसी अस्तित्वात असतांनादेखील विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारांचा विमा नाकारुन तक्रारदारांना सदोष सेवा दिली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा नं.2 चे उत्तर होकारार्थी देणेत येते.
13) मुद्दा नं.3 – तक्रारदारांनी दाखल केलेल्या विमा पॉलिसीवरुन विम्याची रक्क्म रु.80,000/- तक्रारदाराने ‘असीद गॅरेज’ यांचेकडील दाखल केलेले 21/10/2013 चे दुरुस्तीचे अंदाजपत्रक दाखल केले आहे. सदरच्या अंदाजपत्रकानुसार तक्रारदाराने रकक्म रु.75,000/- तसेच दुरुस्तीसाठी देणेत आलेला खर्च रु.2,500/- ची (पावती) दाखल केलेली आहे. सबब तक्रारदार हे एकूण रु.77,500/- नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारदारांना झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापेाटी रु.5,,000/- व तक्रार खर्च रु.2,000/- मिळणेस तक्रारदार क्र. 1 व 2 पात्र आहेत. तथापि तक्रारदार नं.1 हे मूळ मालक असले तरी देखील सदरचे वाहन तक्रारदार नं.2 यांचे नावे तबदील झाले असल्याने विमा हक्कदेखील तक्रारदार नं.2 यांचे नावे आपोआप तबदील होतो. तक्रारदार नं.1 यांनी तक्रारदार नं.2 यांचे नावे विमा पॉलिसी तबदील करणेबाबत कायदयानुसार लागणारी पुर्तता विमा कंपनीकडे करावी. त्यानंतर तक्रारदार नं.2 हे वरील रक्कम वसूल करुन घेणेस पात्र आहेत. परिणामतः खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येतात.
आदेश
- तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार नं.2 यांना विमा दाव्याबाबत रक्क्म रु. रु.77,500/- व त्यावरील व्याज द.सा.द.शे.9% दराने दि.21/10/2013 (claim intimation)पासून पूर्ण रक्कम फिटेपर्यंत दयावे. तक्रारदार नं.1 यांनी तक्रारदार नं.2 यांचे नावे विमा पॉलिसी तबदील करणेबाबत कायदयानुसार आवश्यक ती पूर्तता लवकरात लवकर करावी.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार नं.2 यांना मानसिक शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार खर्च रु.2,000/- अदा करावेत.
- विरुध्द पक्ष यांनी वरील आदेशाची पुर्तता 45 दिवसांच्या आत न केलेस तक्रारदार विरुध्द पक्ष यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये कार्यवाही करु शकतील.
- मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/ परिपत्रक/2014/3752 दि..05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.16/01/2014 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 28/11/2014
(वफा ज. खान) (अपर्णा वा. पळसुले) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, अध्यक्ष, सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.