:: निकालपत्र ::
(श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ), सदस्या यांचे आदेशान्वये)
(आदेश पारीत दि. 15/12/2021)
1.. प्रस्तुत तक्रार तक्रारकतीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये विरूध्दपक्षा विरूध्द विमा दाव्यासंबधी सेवेतील त्रृटीबद्दल दाखल केली आहे. तक्रारीची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
2. तक्रारकर्तीच्या कथनानुसार तीचे पती श्री. लहू झीगुजी जीवतोडे हयांचा मृत्यु दि. 25/09/2006 रोजी विषारी सापाने चावल्याने विषबाधा होऊन झाला. तिच्य पतीचा शेतीचा व्यवसाय होता व त्याच्या नावाने मौजा- नवेगाव येथे भूमापन क्र. 156 ही शेतजमिन होती. तक्रारकर्तीच्या पतीचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढलेला असल्याने तीने विरूध्दपक्ष क्र 3 हयांचेकडे रितसर अर्ज केला व वेळोवेळी जे दस्तऐवजाची मागणी केली त्याची पूर्तता केली. पंरतु तक्रारकर्तीच्या पतीच्या दाव्याबाबत बारा वर्षे उलटून गेले तरी मंजूर अथवा नामंजूर न कळविल्याने तीने दि. 31/01/2018 रोजी वकीलामार्फत कायदेशीर नोटीस विरूध्द पक्ष क्र 1 व 2 हयांना पाठविला. पंरतू विरूध्द पक्ष क्र 1 व 2 हयांनी काहीही उत्तर दिले नाही. दावा अर्ज करूनही अद्यापही तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्क्म न मिळाल्यामूळे सदर तक्रार दाखल करून शेतकरी अपघात विमा येाजनेअंतर्गत रू. 1,00,000/-, ची मागणी तसेच मानसिक, शारिरिक त्रासापोटी रू. 30,000/-, व तक्रारीच्या खर्चाची मागणी केली आहे.
3. आयोगाने तक्रार स्विकृत करून विरूध्द पक्ष क्र 1,2 व 3 हयांना नोटीस
पाठविण्यात आले.
4. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 हयांनी तक्रारीत उपस्थित राहून तक्रारकर्तीचे तक्रारीतील कथन खोडून काढून विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्तीला सदर तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडले नाही तसेच तीने ग्राहक संरक्षण कायदयाचे निर्धारित आवश्यक कालावधीमध्ये तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे सदर अर्ज खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्तीची सदर तक्रार खोडसळपणे वाईट हेतून प्रेरीत होऊन दाखल केली असल्यामूळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी.
5. विरूध्द पक्ष क्र 3 हयांना प्रकरणातील नोटीस प्राप्त होऊन सुध्दा प्रकरणात उपस्थित न झाल्यामूळे त्यांचे विरूध्द दिनाक 1/10/2018 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
6. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र व दस्तऐवज व विरूध्दपक्ष हयांचे लेखीबयान या अनुषंगाने उभयपक्षाने केलेल्या युक्तीवादावरून आयोगाच्या निर्णयास्तव मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
कारणमिमांसा
7 . तक्रारकर्ती ही राहणार वायगांव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील रहीवासी असून तीचे पती श्री. लहूजी झीत्रुजी-जीवतोड यांच्या मालकीची मौजा- नवेगांव ता. चिमुर, जि. चंद्रपूर येथे भूमापन क्र 156 ही शेतजमिन आहे व सदर शेतजमिनीवर ते कुटूंबाचे पालनपोषण करित असून महाराष्ट्र शासनाच्या शेतकरीत अपघात विमा योजनेअंतर्गत विरूध्द पक्ष क्र 1 व 2 कडून तक्रारकर्तीच्य पतीचा विमा उतरविला होता. तक्रारकर्तीने सदर शेतीचा 7/12 व गाव नमूना ‘8’ व इतर दस्तऐवज तक्रारीत दाखल केलेले आहे. त्यावरून मय्यत लहूजी जीवतोडे हे शेतकरी होते हे सिध्द होते व तक्रारकर्ती ही त्यांची पत्नी असल्यामुळे लाभार्थी असल्यामुळे विरूध्द पक्ष क्र 1 व 2 हयांची ‘ग्राहक’ आहे.
8. प्रस्तुत प्रकरणातील दस्तऐवजाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, विमाधारकाचा मृत्यु दि. 25/09/2006 रोजी झालेला असल्यामूळे तक्रारीला कारण दि. 25/09/2006 रोजी घडले. मात्र त्यानंतर एकदम 12-13 वर्ष तक्रारकर्तीने विमा दाव्याबाबत कोणताही पाठपुरावा केला गेल्याचे कागदोपत्री पुराव्यावरून दिसून येत नाही. तक्रारकर्तीने विरूध्दपक्ष क्र 1 व 2 हयांना दि. 31/01/2018 रोजी कायदेशीर नोटीस पाठवली असली तरी त्यामूळे तक्रारीला नविन कारण उपलब्ध होत नाही..तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दि. 25/09/2006 रोजी झाला तेव्हा पासून म्हणजे घटनेचे कारणापासून मार्च 2018 रोजी प्रकरण विलंबाचे कोणतेही सयुक्तिक कारण न देता दाखल करणे न्यायोचित नाही असे आयोगाचे मत आहे. सबब, वरिल विवेचनावरून आयोग खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्तीची तक्रार क्रमांक 43/2018 खारीज करण्यात येते.
- उभयपक्षांनी आपआपला तक्रारखर्च सोसावा.
- उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
- प्रकरणाच्या “ब” व “क” फाईल्स तक्रारकर्तीला परत करण्यांत याव्यात.