तक्रारकर्ता तर्फे वकील ः- श्री. एल.एन. चवरे
विरूध्द पक्ष तर्फे वकील ः- श्री. एम.के.गुप्ता
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः- कुमारी. सरिता ब. रायपुरे सदस्या, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 29/03/2019 रोजी घोषीत )
1. तक्रारकर्ता यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा विमा दावा विरूध्द पक्षांनी फेटाळल्यामूळे तक्रारकर्त्याने ही तक्रार या मंचात दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून तक्रारकर्त्याचे वडिल श्री. डुकरू बुधा पटले, हे व्यवसायाने शेतकरी असून, त्यांच्या मालकीची मौजा हिरडामाली ता. गोरेगाव. जि. गोंदिया येथे भूमापन क्र. 753/1, शेतजमिन असून त्यावर त्याचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्दपक्ष ही विमा कंपनी आहे. महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील शेतक-यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत असून, जर राज्यातील शेतक-यांना अपघातात मृत्यु रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा काढण्यात आला असल्याने तो मुलगा या नात्याने कायदेशीर वारसदार म्हणून “लाभार्थी” आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याचे वडिलाचा मृत्यु दिनांक-16/08/2016 रोजी लोहमार्गावर अपघातात झाला आहे. घटनास्थळ पंचनाम्यानूसार सदर अपघात हिरडामाली ते गोंदिया लोहमार्गावर इलेक्ट्रीक पोल क्र. 1014/05 जवळ झालेला आहे. या अपघातात त्यांचा घटनास्थळावरच मृत्यु झाला आहे. तक्रारकर्त्याच्या वडिलांचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा असल्याने त्याने आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्षाकडे रितसर अर्ज दाखल केला. त्यानंतर विरूध्द पक्षाने दि. 12/06/2017 रोजी तक्रारकर्त्याला पत्र पाठवून योजनेचा कालावधी संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत सादर न केल्यामूळे, दावा नामंजूर करण्यात येत आहे असे कळविले.
तक्रारकर्त्याच्या कथनानूसार विरूध्द पक्षाने अनावश्यकरित्या विमा दावा अर्ज फेटाळला आहे. तक्रारकर्त्याने 90 दिवसाच्या आत सादर न केल्यामूळे विमा दावा नामंजूर करता येणार नाही. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा दावा कारण नसतांना फेटाळला. त्यामुळे तक्रारकर्त्याला भरपूर मानसिक धक्का बसला. ज्या उद्देशाने शासनाने मृतक शेतक-यांच्या पत्नी व मुलासाठी हि योजना सुरू केली आहे त्या उद्देशाने विरूध्द पक्ष तडा देत आहे. त्यामुळे सदर विरूध्द पक्षाच्या सेवेमध्ये त्रृटी दिसून येत आहे. तसेच दावा फेटाळून विरूध्द पक्ष यांनी अनुचित व्यापार पध्दत अवलंबिली आहे. म्हणून त्याने या तक्रारीव्दारे विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- त्यांचेकडे विमा दावा दाखल केल्यापासून म्हणजेच दि. 03/05/2017 पासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह मागितली असून त्याला झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी म्हणून रुपये-20,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- मागितले आहे.
03. विरुध्दपक्षाने विमा कंपनी तर्फे मंचा समक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्त्याचा विमा दावा 90 दिवसानंतर दाखल केल्यामूळे कालबाहय आहे. तसेच तक्रारकर्त्याचा मयत वडिल हे कुटूंबाचे मुख्य सदस्य होते आणि त्यांच्या मृत्युमूळे कुटूंबाला कोणताही आर्थिक नुकसान झाला नसल्यामूळे तक्रारकर्त्याला विमा पॉलीसीचा लाभ घेता येणार नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्ताऐवज म्हणजे शवविच्छेदन अहवाल अनुसार मृत्युचे कारण दारू प्राशन केल्यामूळे झाला आहे हे सिध्द झाले असून तक्रारकर्त्याला विम्याचा लाभ घेता येणार नाही व इतर परिच्छेद निहाय कथन अमान्य केले आहे. आपले विशेष कथनात असे नमुद केले की, तक्रारकर्त्याला कृषी आयुक्ताला पक्षकार करणे गरजचे असून या तक्रारीत त्यांना पक्षकार म्हणून सम्मीलीत न केल्यामूळे, या एकच कारणावर हि तक्रार खारीज करण्यात यावी. तसेच विमा पॉलीसीनूसार तक्रारकर्त्याने लवाद कायदयानूसार त्यांनी आर्बीट्रेटर/लवाद पुढे तक्रार दाखल करायला पाहिजे हेाती. तक्रारकर्त्याने सर्व दस्ताऐवज विरूध्द पक्षाला दिल्याबाबतचा कोणतेही स्वाक्षरी नसल्यामूळे दस्ताऐवज पुरविला आहे असे ग्राहय धरता येणार नाही तसेच दस्ताऐवजाच्या अभावी त्यांचे कथन मान्य करता येणार नाही. सदरहु घटना अपघात नसून आत्महत्या केली असल्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने नियम व अटीचे आधिन राहून विमा दावा नामंजूर केला, यात त्यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्याचे नमुद करुन त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याने तक्रारीचे पृष्ठर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं- 10-11 नुसार एकूण-25 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये शेतीचे कागदपत्रे, दावा नामंजूर पत्र, क्लेम फॉर्म, तक्रारकर्त्याच्या वडिलाचे मृत्यू बाबत पोलीस दस्तऐवज, शवविच्छेदन अहवाल, मृत्यूचे प्रमाणपत्र, संमती पत्र, जन्म दाखला इत्यादी. दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. तसेच आपले शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केले आहे.
05. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे गोंदिया येथील वरिष्ठ शाखा प्रबंधकांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. विरूध्द पक्षातर्फे लेखी उत्तर दाखल करण्यात आलेले आहे.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र, विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर व शपथपत्र तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचा तर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्यातर्फे वकील श्री. एल.एन चवरे आणि विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्री. एम.के.गुप्ता यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
07. तक्रारकर्त्याचे वडिल हे शेतकरी होते, त्याचा शेतकरी अपघात विमा योजने मध्ये समावेश होता या बाबी उभय पक्षांमध्ये विवादास्पद नाहीत. या मधील विवाद अत्यंत संक्षिप्त स्वरुपाचा आहे. तक्रारकर्त्याचा वडिलांचा दिनांक-16/08/2016 रोजी हिरडामाली ते गोंदिया लोहमार्गावर इलेक्ट्रीक पोल क्र. 1014/05 च्या जवळ मृत्यु झाला. या अपघातात त्यांचा घटनास्थळावर मृत्यु झाला. हे दाखविण्यासाठी घटनास्थळ पंचानाम्यानूसार सदर अपघात हा हिरडामाली ते गोंदिया लोहमार्गावर इलेक्ट्रीक पोल क्र. 1014/05चे उत्तरेस 50 फुट अंतरावरील रेल्वे लाईनचे मध्यभागी मृतक चित्त अवस्थेत पडलेला दिसत आहे. यावरून हे सिध्द होते की, सदर अपघात हा लोहमार्गावर झालेला अपघात आहे. कारण पूर्व बाजुला शेती व हिरडामाली गांव पश्चिमेस शेती असून उत्तरेस गोंदियाकडे जाणारी रेल्वे लाईन व दक्षिणेस गोरेगांवकडे जाणारी रेल्वे लाईन आहे. तसेच तक्रारकर्त्याच्या वडिलांचा विमा दावा कालावधीच्या 90 दिवसानंतर सादर केला. हे कारण दाखवून दावा नामंजूर करणे म्हणजेच सेवेतील त्रृटी आहे. कारण दावा उशिरा सादर केला या कारणाने दावा नाकारता येत नाही. असे शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद केले असल्यामूळे तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यात येते.
08. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याच्या वडिलांचा मृत्यु हा दारू प्राशन केल्यामुळेच मृत्यु झालेला आहे व सदरहु घटना अपघात नसून स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या दुखापतीमूळे मृत्यु झाला आहे. कारण शवविच्छेदन अहवालानूसार तक्रारकर्त्याच्या वडिलाने दारू प्राशन केले होते कारण दारूचा वास येत होता असे विरूध्द पक्षाचे म्हणणे आहे. परंतू शवविच्छेदन अहवालानूसार मृत्युचे कारण हे “Injury To Vital organ (Brain) Due to Head Injury” असे नमुद आहे. तसेच मृत्युचे कारण हे दारू प्राशन करून मृत्यु झाला असे शवविच्छेदन अहवालामध्ये कुठेही नमूद केलेले नाही. तसेच विरूध्द पक्षाने मृत्युचे कारण सिध्द करण्यासाठी कुठलाही पुरावा सादर केला नाही. कारण सिध्द करण्याचा भार विरूध्द पक्षावर आहे.
9. या संदर्भात तक्रारकर्त्याचे वकीलांनी पुढील मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयांवर आपली भिस्त ठेवली. मंचा तर्फे त्या निकालपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले व त्यातील संक्षीप्त निरिक्षणे नोंदविण्यात आलीत, ती निरिक्षणेखालील प्रमाणे आहेत-
- IV (2011) CPJ 243 (NC)- “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Venkatesh Babu”
सदर प्रकरणात मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, पोलीसानीं नोंदविलेला एफआयआर आणि जबाब हा पुराव्याचे कायद्दा नुसार भक्कम पुरावा आहे असे म्हणता येणार नसल्याने पोलीसांचे दस्तऐवजाचा विरुध्दपक्ष विमा कंपनीला फायदा घेता येणार नसल्याचे मत नोंदविले.
*****
- 2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka”
सदर प्रकरणात मा.राज्य ग्राहक आयोग, मुंबई यांनी असे नमुद केले की, पोलीसानीं गुन्हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचा तर्फे जबाब देणा-याची साक्ष घेतल्या जात नाही असे मत नोंदविले.
*****
- I (2018) CPJ 541 (NC) “Anilkumar V/s National Insurance Co. Ltd”
सदर प्रकरणात मा. राष्ट्रीय आयोग, दिल्ली यांनी असे नमूद केले की, भरभक्कम पुराव्याच्या अभावी जरी मृतक यांचेवर दारूचा प्रभाव केस हिस्ट्री अनुसार दिसला असेल तरी सुध्दा स्वतंत्र साक्ष पुरावा अभावी मृतक दारूच्या प्रभावामध्ये होता हे ठरविणे चुकीचे आहे.
*****
- III (2015)CPJ 104 (NC) “M. Sujatha V/s Bajaj Allinaze Genral Insurance Co. Ltd”.
सदर प्रकरणात मा. राष्ट्रीय आयोगाने असे नमुद केले की, शवविचछेदन अहवाला नूसार जरी दारूचा वास किंवा ethyl alcohol शरीर घटक धातुमध्ये सापडला असेल तरी सुध्दा दारू किती प्रमाणात शरीरामध्ये आहे असे सविस्तर अहवालाच्या अभावी विमा दावा खारीज करणे न्यायोचित नाही असे मत नोंदविले आहे.
*****
- 2015 (2) CPR 316 (NC) “Executive Engineer V/s Shisma Devi”
सदर प्रकरणात मा. राष्ट्रीय आयोगाने असे नमुद केले की, मरणाण्वेषण/मृत्युसमिक्षा याच्यामध्ये कोणतेही आधार नसतांना मृतक दारूच्या प्रभावात होता हे ग्राहय धरता येत नाही. तसेच विरूध्द पक्ष यांनी मृतक अपघातच्या वेळी दारूच्या प्रभावात होता असे सिध्द करण्यासाठी स्वतंत्र साक्ष तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच कुणीही हे सिध्द करू शकले नाही की, मृतक यांनी त्याच्या समक्ष दारूचे प्राशन केले होते. म्हणून विमा दावा फक्त केवळ कथनाच्या आधारे फेटाळू शकत नाही.
*****
- 2015 (2) CPR 345 (NC) “New India Assurance Co. Ltd V/s Ashminder”
सदर प्रकरणात मा. राष्ट्रीय आयोगाने असे नमुद केले की, दारूचे प्राशन हा विमा पॉलीसी अंतर्गत वगळण्याचे कलमानूसार एकमेव कसोटी नाही. विमा पॉलीसी वगळण्याच्या कलमानूसार दारूचे प्राशनाच्या व्यतिरीक्त आणखी काही पुरावे/कसोटी दाखवावी लागते.
*****
- III (2011) CPJ 232 (NC) “Life Insurance Co Ltd V/s Ranjit Kaur”
सदर प्रकरणात मा. राष्ट्रीय आयोगाने असे नमुद केले की, मृतकाच्या काही मात्राने जरी दारू मृतकाच्या शरीरात आढळली असली तरी दारूचा किती वेळा आणि किती प्रमाणात प्राशन केले आहे याच्या अभावी मृतक उन्मादावस्थामध्ये होता याचा निर्णायक पुरावा नाही. म्हणून सदरच्या तक्रारीत मृत्युचे कारण यात दारूचा प्राशन आणि विजेच्या झटक्यामध्ये कोणताही संबध नसल्याने विमा दावा फेटाळणे चुकीचे आहे.
*****
10. या संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, उपरोक्त नमुद मा.वरिष्ठ न्यायालयानीं दिलेले निवाडे, त्यामधील वस्तुस्थिती आणि दिलेले तत्व (Ratio) पाहता सदर न्यायनिवाडे हे हातातील तक्रारीशी तंतोतंत जुळतात, विशेषतः मा.राष्ट्रीय आयोग न्यू. दिल्ली III(2011) CPJ 232 (NC) “Life Insurance Co. Ltd V/s Ranjit Kaur”
सदर प्रकरणात मा. राष्ट्रीय आयोगानी असे नमूद केले की, मृतकाच्या काही मात्राने जरी दारू मृतकाच्या शरीरात आढळली असली तरी दारूचा किती वेळा आणि किती प्रमाणात प्राशन केले आहे याच्या अभावी मृतक उन्मादावस्था मध्ये होता याचा निर्णायक पुरावा नाही. म्हणून सदरच्या तक्रारीत मृत्युचे कारण यात दारूचा प्राशन आणि विजेच्या झटक्यामध्ये कोणताही संबध नसल्याने विमा दावा फेटाळणे चुकीचे आहे. सदरहु घटना अपघात नसून दारूच्या प्रभावात अपघात घडलेला आहे असे जे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणणे आहे व त्या कारणास्तव त्यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला, त्या संबधात त्यांनी कोणताही भरभक्कम पुरावा (Substantial & Cogent evidence) मंचा समक्ष दाखल केलेला नसल्याने केवळ पोलीस दस्तऐवजाचे आधारे मृतकाने दारूच्या प्रभावात अपघात घडलेला आहे असा निष्कर्ष काढला, जो उपरोक्त मा.वरिष्ठ न्यायालयांचे निवाडयांवरुन चुकीचा असल्याचे दिसून येते. त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्यांचे जवळ कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीपुरावा (Eye witness) नसताना मृतकाने दारूच्या प्रभावात अपघात घडलेला आहे असा निष्कर्ष काढून विनाकारण तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केल्याने त्यांनी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
11. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्त्याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- तक्रार दाखल दिनांक-15/07/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) ती विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्ताला त्यांच्या वडिलांचे अपघाती मृत्यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) तक्रार दाखल दिनांक-15/07/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्त्याला द्यावी.
(03) विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला द्यावेत.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. वरील आदेश क्र 2 व 3 चे 30 दिवसांत पालन न केल्यास, द.सा.द.शे 12 टक्के व्याज देय राहिल.
(05) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(06) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.
npk/-