न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून तक्रारदारांनी दि. 20/02/2015 रोजी रक्कम रु.30,000/- या किंमतीस म्हैस खरेदी केली. सदर म्हैस खरेदीकरिता तक्रारदारांनी दि कमर्शिअल को.ऑप. बँक लि. कोल्हापूर यांचेकडून आर्थिक सहाय्य घेतलेले आहे. सदर म्हैशीचा विमा तक्रारदारानी वि.प. यांचेकडे उतरविला असून पॉलिसी क्र. 270807/47/15/9400000371 असा आहे व कालावधी दि. 28/3/2016 ते 27/3/2017 आहे. तसेच टॅग नंबर NIC-270800/96516 असा आहे. सदर म्हैशीपासून तक्रारदारांना 7 ते 8 लिटर दूध उत्पादन मिळत असे. तक्रारदार यांची सदर म्हैस उंचावरुन खाली पडल्यामुळे तिच्या उजव्या खुब्याला दुखापत होवून फ्रॅक्चर झालेने अंतर्गत शरीरात रक्तस्त्राव होवून तिला जागेवरुन उठणे अशक्य झाले. अशा परिस्थितीत म्हैशीवर उपचार करुन देखील सदर म्हैस दि. 4/2/2017 रोजी मयत झाली. तदनंतर तिचे पोर्स्टमार्टेम करण्यात आले. तसेच तिचे डेथ सर्टिफिकेट देखील दि. 18/2/2017 रोजी संबंधीत डॉक्टरांनी दिलेले आहे. तदनंतर तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे क्लेम सादर करुन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता दि. 21/2/2017 रोजी केली आहे. असे असताना वि.प. यांनी तक्रारदारांना विमा रक्कम दिलेली नाही. म्हणून तक्रारदारांनी दि. 8/2/2018 रोजी वि.प. यांना कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीसीस वि.प. यांनी खोटया आशयाचे उत्तर पाठविले आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु.30,000/-, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व नोटीस फी खर्च रु.3,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा तसेच सदर संपूर्ण रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज मिळावे अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 16 कडे अनुक्रमे विमा पॉलिसी, म्हैस खरेदीची पावती, म्हैस उपचाराचे प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू दाखला, म्हैशीचा मूल्यांकन रिपोर्ट, पंचनामा, तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे सादर केलेली कागदपत्रे, पशुविमादावा पत्र, नगरसेवकाचा दाखला, दूध संस्थेचा दाखला, वि.प. यांना तक्रारदारांनी पाठविलेली नोटीस, सदर नोटीसची पोस्टाची पावती व पोहोचपावती, वि.प. कंपनीचे नोटीस उत्तर वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, पुरावा शपथपत्र, कागदयादीसोबत इनव्हेस्टीगेटर यांचा रिपोर्ट, श्री विश्वास पाटील यांचा जबाब, तक्रारदार यांचा जबाब, विमाकृत म्हैस व मयत झालेली म्हैस यांचे फोटो वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) वि.प. कंपनीने श्री सुभाष मा. काकडे, इनव्हेस्टीगेटर यांना या क्लेमच्या चौकशीसाठी नेमले. त्याप्रमाणे श्री काकडे हे दि. 4/2/2017 रोजी घटनास्थळी गेले असता तेथे प्रत्यक्षात वस्तुस्थिती दुसरीच दिसून आली. त्याप्रमाणे श्री काकडे यांनी तक्रारदार यांचा दि. 1/4/2017 रोजी साक्षीदाराचे साक्षीने जबाब लिहून दिला आहे. त्यात त्यांनी आपल्या जबाबात स्पष्टपणे उल्लेख केला आहे की, ती म्हैस मी माझ्या घरगुती कारणामुळे विकली आहे. माझ्याकडे दुसरी एक म्हैस आहे, ती म्हैस दि. 4/2/2017 रोजी सकाळी मयत झाली होती. परंतु सदर म्हैशीचा विमा केला नव्हता. मी विमा केलेल्या म्हैशीचा फोटो विमा ऑफिसमध्ये दिला आहे. विमा ऑफिसमध्ये दिलेला फोटो व मयत म्हैशीचा फोटो वेगवेगळे आहेत. त्यामुळे सदरचा विमा क्लेम रद्द करण्यात यावा, त्यास माझी कोणतीही हरकत अथवा तक्रार नाही. वरील सर्व माहिती खरी आहे, सदरच्या जबाबावर तक्रारदारांनी सही असून त्यास साक्षीदाराने सुध्दा आपली साक्ष घातली आहे.
iv) तक्रारदार यांचे सख्खे बंधू श्री विश्वास आनंदराव पाटील यांनी सुध्दा सदरच्या अर्जदार यांच्या जबाबास समर्पक दि. 16/7/2016 रोजीचा जबाब नोंदविला असून त्यानेही सदरचे घटनेस दुजोरा दिला आहे. त्यांचे जबाबात ते म्हणतात की, माझ्या घरामध्ये चौघेजण रहात आहेत. तसेच माझ्या घरामध्ये सात म्हैशी आहेत. त्यापैकी तीन म्हैशी मी बँकेतून कर्ज प्रकरण करुन खरेदी केल्या होत्या त्यापैकी एक म्हैस तीन महिन्यापूर्वी विकली आहे. सदरच्या दोन म्हैशी मी स्वतः चरावयास घेवून गेलो असता शालीनी पॅलेज शेजारी ओढया कडेला चरत असताना पाण्याच्या प्रवाहात दोन्ही म्हैशी वाहून गेल्या. सदर म्हैशींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सदरच्या म्हैशी आढळल्या नाहीत. सदर म्हैशींपैकी एक म्हैस काळी होती, तिची शिंगे पाटकोच्यरी होती, शेपूट गोंडा काळा, दूसरी म्हैस भो-या रंगाची होती, शिंगे पाटकोच्यरी होती, शेपूट गोंडा भो-या रंगाचा होता. वरील सात म्हैशींपैकी आता गोटयामध्ये पाच म्हैशी आहेत. सदरच्या अॅफिडेव्हीटवर तक्रारदार यांचे बंधू याची सही आहे. अशा प्रकारे चौकशीअंती प्रत्यक्षात निष्पन्न झाल्यामुळे वि.प. यांनी तक्रारदाराचा क्लेम मंजूर केलेला नाही.
v) वास्तविक, तक्रारदार यांनी विमा उतरविलेली म्हैस पूर्वीच विकली असल्यामुळे तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट तक्रारदार हे खोटा दावा दाखल करुन दुस-यांदा पैसे उकळू पहात आहेत. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण शेतीला जोडधंदा म्हणून तक्रारदारांनी दि. 20/02/2015 रोजी रक्कम रु.30,000/- या किंमतीस म्हैस खरेदी केली. सदर म्हैशीचा विमा तक्रारदारानी वि.प. यांचेकडे उतरविला असून पॉलिसी क्र. 270807/47/15/9400000371 असा आहे व कालावधी दि. 28/3/2016 ते 27/3/2017 आहे. तसेच टॅग नंबर NIC-270800/96516 असा आहे. सदरची विमा पॉलिसी तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, वि.प. कंपनीने श्री सुभाष मा. काकडे, इनव्हेस्टीगेटर यांना या क्लेमच्या चौकशीसाठी नेमले. त्याप्रमाणे श्री काकडे हे दि. 4/2/2017 रोजी घटनास्थळी गेले असता तेथे प्रत्यक्षात वस्तुस्थिती दुसरीच दिसून आली. त्याप्रमाणे श्री काकडे यांनी तक्रारदार यांचा दि. 1/4/2017 रोजी साक्षीदाराचे साक्षीने जबाब लिहून दिला आहे. त्यात त्यांनी आपल्या जबाबात स्पष्टपणे उल्लेख केला आहे की, ती म्हैस मी माझ्या घरगुती कारणामुळे विकली आहे. माझ्याकडे दुसरी एक म्हैस आहे, ती म्हैस दि. 4/2/2017 रोजी सकाळी मयत झाली होती. परंतु सदर म्हैशीचा विमा केला नव्हता. मी विमा केलेल्या म्हैशीचा फोटो विमा ऑफिसमध्ये दिला आहे. विमा ऑफिसमध्ये दिलेला फोटो व मयत म्हैशीचा फोटो वेगवेगळे आहेत. त्यामुळे सदरचा विमा क्लेम रद्द करण्यात यावा, त्यास माझी कोणतीही हरकत अथवा तक्रार नाही. वरील सर्व माहिती खरी आहे, सदरच्या जबाबावर तक्रारदारांनी सही असून त्यास साक्षीदाराने सुध्दा आपली साक्ष घातली आहे, असे वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये कथन केले आहे. तसेच वि.प. यांचे कथनानुसार तक्रारदार यांचे सख्खे बंधू श्री विश्वास आनंदराव पाटील यांनी सुध्दा सदरच्या अर्जदार यांच्या जबाबास समर्पक दि. 16/7/2016 रोजीचा जबाब नोंदविला असून त्यानेही सदरचे घटनेस दुजोरा दिला आहे. परंतु सदर तक्रारदाराने दिलेल्या जबाबावर साक्षीदार म्हणून श्री अनिश पाटील यांची सही आहे. परंतु सदरचे तक्रारदाराचे जबाबाचे पुष्ठयर्थ साक्षीदार यांचे अॅफिडेव्हीट याकामी वि.प. यांनी दाखल केलेले नाही. तसेच तक्रारदार व त्यांचे भाऊ यांचे जबाब खरा व बरोबर असलेचे तक्रारदाराने व त्याचाभाऊ विश्वास पाटील यांची शपथपत्रे याकामी वि.प. किंवा इन्व्हेस्टीगेटर यांनी दाखल केलेली नाही. सदर इन्व्हेस्टीगर यांनी सदर तक्रारदार व त्यांचे बंधूचे अॅफिडेव्हीट घ्यायला काही अडचण होती का ? याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. तक्रारदाराने त्याचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये, वि.प. यांनी वर नमूद तक्रारदाराचा कथित जबाब व म्हैशीचे फोटो हे क्लेम नाकारणेसाठी तयार केलेचे कथन केले आहे. वि.प. ने दाखल केलेले तक्रारदार व त्यांचे बंधूंचा जबाब यावरुन विमाकृत म्हैशीचे फोटो हे तक्रारदाराच्या म्हैशीचे आहेत ही बाब वि.प. यांनी सिध्द केलेली नाही. सदरचे म्हैशीचे फोटो हे केवळ तक्रारदारसोबत आहेत म्हणून ती म्हैस तक्रारदाराची होती हे गृहीत धरता येत नाही. याबाबत वि.प. यांनी फोटोग्राफरचे बिल व शपथपत्रही याकामी दाखल केलेले नाही. सबब, मयत म्हैस ही विमाकृत म्हैस नव्हती ही बाब वि.प. यांनी शाबीत केलेली नाही असे या आयोगाचे मत आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचा न्याययोग्य विमाक्लेम नाकारुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. तक्रारदार यांनी याकामी म्हैस खरेदीची पावती दाखल केली आहे. सदरचे पावतीवरुन म्हैशीची खरेदी किंमत ही रु.30,000/- असल्याचे दिसून येते. सबब, तक्रारदार हे विमाक्लेमपोटी रक्कम रु.30,000/- इतकी रक्कम वि.प. यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.3,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना म्हैशीचे विमाक्लेमपोटी रक्कम रु. 30,000/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.