तक्रारकर्तीतर्फे वकील ः- श्री. एल. एन. चवरे
विरूध्द पक्ष क्र. 1 तर्फे वकील ः- श्री. एम.के.गुप्ता
विरूध्द पक्ष क्र. 2 तर्फे वकील ः- श्री. जयेश बुच
विरूध्द पक्ष क्र. 3 तर्फे ः- तालुका कृषी अधिकारी
निकालपत्रः- श्री. भास्कर बी. योगी अध्यक्ष, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 29/03/2019 रोजी घोषीत )
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि इतर विरुध्द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे पतीचे मृत्यू संबधात विमा दावा फेटाळल्या संबधाने दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून तिचा मृतक पती श्री. लक्ष्मीप्रसाद भोजराज लिल्हारे हा व्यवसायाने शेतकरी होता व त्याचे मालकीची मौजा महालगांव, ता. जि. गोंदिया येथे भूमापन क्रं-883/2 ही शेत जमीन असून त्यावर त्याचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्दपक्ष क्रं-1) नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि क्रं-2) इंन्शुरंन्स ब्रोकींग लि. कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीच्या पतीचा हे दि. 03/07/2016 ला नेहमीप्रमाणे खोवा विकण्यासाठी बजाज बॉक्सर गाडी क्र. MH-35V2498 ने घरून निघाले असता, त्यांचा खुन (Murder) तिरोडा ते खैरलांजी या रोडवर बघोली गावाच्या पेट्रोलपंपाजवळ झाला आणि दवनीवाडा पोलीसांनी आरोपी विरूध्द कलम 302, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. तक्रारकर्तीचे पती आकस्मिक निधनाने तक्रारकर्तीच्या कुटूंबाला व तक्रारकर्तीला मानसिक धक्का बसला. शासन तर्फे तक्रारकर्तीच्या पतीचा शासनाने रू. 2,00,000/-,साठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा काढला आला असल्याने ‘बायको’ असून ती कायदेशीर “लाभार्थी” आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, सदर दाव्यासाठी विरूध्द पक्ष क्र 3 द्वारे विरूध्द पक्ष क्र 1 व 2 कडे रितसर अर्ज केला व वेळोवेळी जे कागदपत्रे विरूध्द पक्षाने मागीतले त्याची पूर्तता केली. रितसर अर्ज दिल्यानंतर व सर्व दस्तऐवज दिल्यानतर विरूध्द पक्ष क्र 1 ने तक्रारकर्तीला पत्र पाठवून सदर दाव्याचे कागदपत्रे पॉलीसी सपंल्यानंतर 90 दिवसाचे आत न दिल्यामूळे, विरूध्द पक्षांनी करारानूसार विमा दावा फेटाळला. सदर कंपनीचे पत्र तक्रारकर्तीकडून गहाळ झालेले आहे.
सदर शेतकरी विम्याचा करार हा महाराष्ट्र शासन व विरूध्द पक्ष क्र 1 व 2 मध्ये झाला व त्याचा शर्ती व अटीची माहिती तक्रारकर्तीला पुरविण्यात आली नव्हती. सदर तक्रारकर्ती व तिचे कुटूंब अपघातात घरातील मुख्य व्यक्तीचा आकस्मिक अपघाती मृत्युने शोकमग्न होते व सदर योजनेची माहिती मिळाल्यानंतर तक्रारकर्तीला सदर दाव्यासाठी लागणारे कागदपत्रे जारी करणारे अधिकारी जागेवर सापडत नव्हते व कसे तरी सदर कागदपत्रे तक्रारकर्तीने जमवाजमव करून दावा दाखल केला आहे.
सदर सामाजिक कल्याण योजना शेतकरी कुटूंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. म्हणून महाराष्ट्र शासनाने हि योजना राबविली आहे. विरूध्द पक्ष क्र 1 सदर योजनेला विविध तांत्रीक बाबी समोर करून फेटाळत आहे व त्याच्या सेवेमध्ये त्रृटी दिसून येत आहे. तसेच सदर विपक्षीत करारात तक्रारकर्तीने प्रत्यक्ष भाग घेतला नसल्याने तिला अटी व शर्तीची माहिती नसतांना दावा फेटाळून अनुचित व्यापार पध्दत अवलंबिली आहे.
शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा असल्याने तक्रारकर्तीने आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-3यांचे कार्यालयात दिनांक-07/03/2017 रोजी विमा दावा प्रस्ताव दाखल केला आणि विरुध्दपक्षांचे मागणी नुसार वेळोवेळी दस्तऐवजांची पुर्तता केली. रितसर अर्ज केल्यानंतर व आवश्यक दस्ताऐवज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष क्र 1 यांनी तक्रारकर्तीला “ Rejected Due to Late Intimation” कळविले आहे. म्हणून तक्रारकर्तीने सदरची तक्रार या मंचात योग्य न्याय मिळण्याकरीता दाखल केली.
03. विरूध्द पक्ष क्र 1, 2 व 3 यांच्याविरूध्द मंचातर्फे नोटीसेस बजावण्यात आल्या. नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्यांचा लेखीजबाब या मंचात दाखल केला आहे.
विरूध्द पक्ष क्र 1 यांनी आपल्या लेखीजबाबात असे कथन केले की, सदरची तक्रार हि मुदतबाहय असल्यामूळे ती खारीज करण्यात यावी. तसेच त्यांचा तक्रारकर्तीसोबत कोणताही संबध नाही आणि तक्रारकर्तीने कृषी आयुक्ताला पक्षकार म्हणून सम्मीलीत करावयाचे होते. परंतू त्यांनी कृषी आयुक्ताला पक्षकार न केल्यामूळे सदरची तक्रार खारीज करण्यात यावी. तक्रारकर्ती हि विमा दाव्याची ‘लाभार्थी’ नसून ती या मंचापुढे स्वच्छ हाताने आलेली नाही. तसेच तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु शेतीचा काम करतांना झालेला नाही. तसेच या तक्रारीत कोणताही ‘ग्राहक वाद’ नाही. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा खुन झाल्यामूळे झालेला असून उलटतपासणी, फेरतपासणी करण्याची गरज असल्याने हि तक्रार या मंचापुढे चालु शकत नाही. तक्रारकर्तीने आपला विमा दावा मिळण्याकरीता मा. दिवाणी न्यायालयात दाखल करायला पाहिजे होती. म्हणून या सर्व कारणाने सदरची तक्रार या मंचाने खर्चासह खरीज करावी अशी मागणी केली आहे.
विरूध्द पक्ष क्र. 2) ब्रोकरेज कंपनी असून त्यांचा काम फक्त तक्रारकर्तीचे दस्ताऐवज घेऊन, विरूध्दपक्ष क्र 1 कडे पाठवायचे तसेच विमा दावा स्विकारणे किंवा नाकारणे हे विरूध्द पक्ष क्र 1 इंन्शुरंन्स कंपनीचे योग्य अयोग्य ठरविण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. तसेच तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारला नाही अथवा मंजूर केला नाही अशी सदरची तक्रार हि वेळेपूर्वी दाखल केलेली असून त्यावर सुनावणी करणे योग्य होणार नाही. तक्रारकर्ती ही त्ंयाची ‘ग्राहक’ नाही आणि विरूध्द पक्ष क्र 1 सोबत त्यांचा संबध हा “Principal To Principal basis” या तत्वावर असून विम्याचा दावा देण्याचा अधिकार फक्त विरूध्द पक्ष क्र 1 कडे असल्याने त्यांची कोणतीही चुक नाही. हे सर्व माहित असून सुध्दा तक्रारकर्तीने त्यांना पक्षकार केले यामूळे मिस जॉईंडर ऑफ पार्टीज या तत्वानूसार खारीज करण्यात यावी.
विरूध्द पक्ष क्र. 3 यांनी सुध्दा आपली लेखीकैफियत या मंचात सादर करून, तक्रारकर्तीने विमा दाव्याचे अर्ज त्यांचे कार्यालयात दि. 07/03/2017 रोजी सादर केले असून, त्यांनी मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे त्याच दिवशी पाठविले. विरूध्द पक्ष क्र 1 यांनी तक्रारकर्तीला “ Rejected Due to Late Intimation” कळविले आहे.
04. तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्ठर्थ दस्ताऐवज यादी पृष्ट क्रं- 9-10 नुसार एकूण-20 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये पोलीस स्टेशन गोंदिया शहर, गोंदिया येथे दाखल झालेली प्रथम खबरी अहवाल (FIR), विमा दावा प्रस्ताव, शेतीचे कागदपत्रे, आधार कार्ड, वारसान प्रमाणपत्र, के.टी.एस रूग्णालय गोंदिया, यांचे शवविच्छेदन अहवाल व इतर दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. तसेच आपले शपथपत्र दाखल केले असून, त्यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
05. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर तसेच त्यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. विरूद पक्ष क्र 1 ते 3 यांनी लेखीयुक्तीवाद सादर केलेले नाही.
06. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र, विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर व शपथपत्र तसेच तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचा तर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्तीतर्फे विद्वान वकील श्री. एल.एन.चवरे आणि विरुध्दपक्ष क्र. 1 विमा कंपनी तर्फे विद्वान वकील श्री. एम.के.गुप्ता यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
07. तक्रारकर्तीचे मयत पती हे शेतकरी होते. त्याचा शेतकरी अपघात विमा योजने मध्ये समावेश होता या बाबी उभय पक्षांमध्ये विवादास्पद नाहीत. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्तीने दाखल केलेल्या विमा दाव्याबद्दल लेखी स्वरूपात त्यांचा निर्णय तक्रारकर्तीला कळवून दावा नामंजूर केलेला आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेली सदरच्या तक्रारीत तक्रारकर्तीचे पती हे दि. 03/07/2016 ला नेहमीप्रमाणे खोवा विकण्यासाठी बजाज बॉक्सर गाडी क्र. MH-35V2498 ने घरून निघाले असता, त्यांचा खुन तिरोडा ते खैरलांजी या रोडवर बघोली गावाच्या पेट्रोलपंपाजवळ झाला आणि दवनीवाडा पोलीसांनी आरोपी विरूध्द कलम 302, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. या तक्रारीमध्ये विवाद अत्यंत संक्षिप्त स्वरुपाचा आहे. तक्रारकर्तीचे पतीचा खुन झालेला असून त्याचा विमा दावा तक्रारकर्तीला मिळू शकतो का ? विरूध्द पक्ष क्र 1 यांनी “पॉलीसी कालावधीच्या 90 दिवसानंतर क्लेम पेपर्स सादर केल्यामूळे दावा “नामंजूर” असा शेरा मारून विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळला आहे.
08. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तरात म्हणण्यानुसार सदरची तक्रार हि मुदतबाहय असल्यामूळे ती खारीज करण्यात यावी. तसेच त्यांचा तक्रारकर्तीसोबत कोणताही संबध नाही आणि तक्रारकर्तीने कृषी आयुक्ताला पक्षकार म्हणून सम्मीलीत करावयाचे होते. परंतू त्यांनी कृषी आयुक्ताला पक्षकार न केल्यामूळे सदरची तक्रार खारीज करण्यात यावी. तक्रारकर्ती हि विमा दाव्याची ‘लाभार्थी’ नसून ती या मंचापुढे स्वच्छ हाताने आलेली नाही. तसेच तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु शेतीचा काम करतांना झालेला नाही. तसेच या तक्रारीत कोणताही ‘ग्राहक वाद’ नाही. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा खुन झाल्यामूळे झालेला असून उलटतपासणी, फेरतपासणी करण्याची गरज असल्याने हि तक्रार या मंचापुढे चालु शकत नाही. तक्रारकर्तीने आपला विमा दावा मिळण्याकरीता मा. दिवाणी न्यायालयात दाखल करायला पाहिजे होती. के.टी.एस सार्वजनक रुग्णालय गोंदिया यांच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण हे “Cause of death is due to head injury” असे नमुद केलेले आहे.
09. या संदर्भात ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी अपघात योजनेची प्रस्तावनामध्ये असे नमूद आहे की-
“शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच, अन्य कोणत्याही कारणांमूळे होणारे अपघात”.
(Emphasis supplied)
शवविच्छेदन अहवालानूसार मृत्यूचे कारण हे “Cause of death is due to head injury” असे नमुद केलेले आहे. विरूध्द पक्ष यांनी या विमा पॉलीसीचे संपूर्ण अटी व शर्ती या मंचात दाखल केलेले नाही. परंतू याउलट विरूध्द पक्ष यांनी आपल्या लेखीउत्तरात असे नमूद केले आहे की, “The death of Laxmiprasad Lilhare was accidental and he was not murder as alleged.....” यावरून हे स्पष्ट आहे की, विरूध्द पक्ष क्र 1 हे सुध्दा मान्य करतात की, तक्रारकर्तीचा पतीचा मृत्यु अपघात आहे म्हणून फक्त तांत्रीक कारण दाखवून तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम न देऊन, विरूध्द पक्ष क्र 1 यांनी सेवेत त्रृटी केली आहे हे सिध्द होत आहे. तसेच, शासन निर्णय ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी अपघात योजनेची प्रस्तावनामध्ये स्पष्ट नमूद आहे की, अन्य कोणत्याही कारणामूळे होणारे अपघाताचा विमा दावा नाकारू शकत नाही.
इकडे एक महत्वाची बाब म्हणजे विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा 90 दिवसाच्या आत कागदपत्रे सादर न केल्यामूळे, नामंजूर केला आहे. या कारणावरून विरूध्द पक्षाने त्यांच्या लेखीजबाबात घेतलेले इतर आक्षेप चुकीचे व न्यायसंगत नसल्यामूळे फेटाळण्यात येत आहे. परंतू त्यांनी मान्य केले आहे की, हा अपघात आहे आणि जर ते मान्य करत आहेत की हा अपघात आहे तर कोणताही प्रश्नच राहिला नाही आणि विरूध्द पक्ष क्र 1 यांनी लगेच तक्रारकर्तीला विम्याची रक्कम देणे कायदेशीर बंधन आहे.
येथे आणखी एक बाब स्पष्ट करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने राबविलेली ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी अपघात योजनाचा परिच्छेद क्र 5 मध्ये असे स्पष्ट नमूद आहे की, -
5. विमा प्रस्ताव विहीत कागदपत्रासह योजनेच्या कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी, योजनेच्या चालु वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर 90 दिवसापर्यत, तालुका कृषी अधिका-यांकडे प्राप्त झालेला प्रस्ताव स्विकारणे विमा कंपनीवर बंधकाराक राहील. शिवाय समर्थनीय कारणास्तव 90 दिवसानंतर प्राप्त होणारे विमा प्रस्ताव सुध्दा स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहिल. प्रस्ताव विहित मुदतीत सादर केले नाहीत, या कारणास्तव विमा कंपनीला विमा प्रस्ताव नाकारता येणार नाही.
म्हणून विरूध्द पक्ष यांनी लेखीकैफियतीमध्ये घेतलेले 90 दिवसानंतर सादर केलेला विमा दाव्याचा आक्षेप फेटाळण्यात येत आहे. तसेच ग्रा.सं.कायदा कलम ‘3’ च्या नूसार जरी लवादाची अट असली तरी सुध्दा ग्राहक मंचाला ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी अपघात योजनाच्या खाली दाखल झालेली तक्रार ऐकण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच तक्रारकर्ती ही पतीच्या मृत्युनंतर वारसदार असून तसेच ग्रा.सं कायदा कलम 2 (ड) नूसार सुध्दा लाभार्थी म्हणून ‘ग्राहक’ आहे. या सर्व कारणाने विरूध्द पक्षाने घेतलेले आक्षेप फेटाळण्यात येत आहे.
तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केल्याने विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते म्हणून तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
10. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्तीच्या पतीचा अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/-,विमा दावा नामंजूर केल्याच्या दिनांक-04/09/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) ती विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
विरूध्द पक्ष क्र 2 व 3 यांचा कार्य फक्त विमा दाव्याचे दस्ताऐवज स्विकारणे व विरूध्द पक्ष क्र 1 कडे पाठविणे तसेच विमा दावा मंजूर किंवा नामंजूर करण्याची जबाबदारी फक्त विरूध्द पक्ष क्र 1 कडे असल्याने विरूध्द पक्ष क्र 2 व 3 च्या विरूध्द तक्रार खारीज करणे योग्य होईल असे या मंचाचे मत आहे.
11. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीला आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीच्या पतीचा अपघात संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) विमा दावा नामंजूर केल्याच्या दिनांक-04/09/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्तीला द्यावी.
(03) विरुध्दपक्ष क्र 1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष –(2) व (3) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. वरील आदेश क्र 2 व 3 ची 30 दिवसांत पालन केल्यास द.सा.द.शे 12 टक्के व्याज देय राहिल.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.