आदेश पारित द्वारा मा. सदस्या कु. सरिता बी. रायपुरे
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा देवरी, ता. देवरी, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून गोंदीया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक, शाखा देवरी येथे Daily Collection Agent (दैनिक वसुली अभिकर्ता) आहे. तक्रारकर्ता हा नियमित आयकर विवरण भरत असून त्याचा आयकर पासबुक क्रमांक ATCPS6232K असा आहे. तक्रारकर्त्याने नियमितपणे विरूध्द पक्ष क्रमांक 1 यांचेकडे वर्ष 2008-2009, 2009-2010, 2010-2011, 2011-2012 या वर्षांचे आयकर विवरण पत्र दाखल केलेले आहे. त्याचप्रमाणे तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष क्रमांक 1 i.e. Income Tax Practitioner चा नियमित पक्षकार आहे.
3. तक्रारकर्त्याला माहे एप्रिल महिन्याचे आयकर विवरण भरावयाचे असल्यामुळे त्याने नेहमीप्रमाणे विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे संपर्क साधला आणि विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडून 2010-2011 चे आयकर भरण्यासबंधी सल्ला घेतला. त्यानुसार 2010-2011 ह्या वर्षी तक्रारकर्त्याचे एकूण उत्पन्न रू.1,31,409/- असून TDS रू.13,590/- कपात करण्यांत येईल आणि तक्रारकर्त्याचे उत्पन्न हे आयकर मर्यादेच्या आंत असल्यामुळे त्याचे उत्पन्न हे Taxable नसल्यामुळे तक्रारकर्त्याला रू.13,590/- इतकी रक्कम परतावायोग्य राहील असे तक्रारकर्त्याला सांगण्यांत आले. त्यानुसार विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने तक्रारकर्त्याच्या नावाने 2010-2011 चे Income Tax Return दाखल केले. त्याचा Acknowledgement No. 0802003672 दिनांक 31/07/2010 असा आहे.
4. तक्रारकर्त्याने कर आकारणी वर्ष 2009-2010 ह्या वर्षात Acknowledgement No. 0802000317 दिनांक 05/06/2009 ला कराचा भरणा केला. त्यानुसार तक्रारकर्त्याला रू.13,070/- धनादेश क्रमांक 759412, दिनांक 19/05/2010 अन्वये TDS परत भेटले. त्यानंतर तक्रारकर्त्याने 2011-2012 या कर आकारणी वर्षामध्ये कराचा भरणा केला आणि त्यानुसार तक्रारकर्त्याला रू.29,660/- धनादेश क्रमांक 028806, दिनांक 02/01/2013 अन्वये TDS परत भेटले. त्याचप्रमाणे 2012-2013 या कर आकारणी वर्षामध्ये तक्रारकर्त्याने आयकर विवरणपत्र भरले आणि त्यानुसार TDS रू.30,480/- धनादेश क्रमांक 416484, दिनांक 12/03/2013 अन्वये परत मिळाले. वर निर्देशित करण्यांत आलेले/भरण्यांत आलेले संपूर्ण आयकर विवरण हे विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडून भरण्यांत आलेले आहे. कारण तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष क्रमांक 1 चा नियमित पक्षकार होता.
5. तक्रारकर्त्याने 2010-2011 ह्या कर आकारणी वर्षामध्ये आयकर विवरण भरले. त्यानुसार एकूण वार्षिक उत्पन्न रू.1,31,409/- इतके होते आणि त्यावर रू.13,590/- Deduction होते व ही रक्कम Refundable होती. अशा प्रकारे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्रमांक 1 ह्या Income Tax Practitioner कडून 2010-2011 चे आयकर विवरण भरले असून त्याचा Acknowledgement No. 0802003672 दिनांक 31/07/2010 असा आहे. परंतु बराच अवधी होऊनही तक्रारकर्त्याला 2010-2011 ह्या कर आकारणी वर्षातील TDR रू.13,590/- परत मिळाले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्रमांक 1 च्या ऑफीसमध्ये जाऊन TDS बद्दल विचारणा केली. तेव्हा विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने TDS Amount परत येईल असे तक्रारकर्त्याला आश्वासन दिले. काही दिवसानंतर तक्रारकर्त्याने पुन्हा विरूध्द पक्ष क्रमांक 1 ची भेट घेतली असता विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने आयकराबाबतचे सुधारित रिटर्न दाखल केल्याचे तक्रारकर्त्याला सांगितले. परंतु TDS बद्दल कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने टाळाटाळ केली. विरूध्द पक्ष क्रमांक 1 च्या टाळाटाळीमुळे तक्रारकर्त्याने स्वतः विरूध्द पक्ष क्रमांक 2 Income Tax Office येथे भेट देऊन 2010-2011 ह्या कर आकारणी वर्षातील TDS विषयी विचारणा केली. तेव्हा विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्याला लेखी अर्ज केल्यावरच रेकॉर्डची पाहणी करून योग्य ती माहिती पुरविण्यांत येईल असे तक्रारकर्त्याला सांगितले. त्यानुसार तक्रारकर्त्याने दिनांक 31/12/2012 रोजी विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. परंतु विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने कुठलीही माहिती दिली नाही. तक्रारकर्त्याने पुन्हा दिनांक 12/04/2013 ला TDS बद्दलची माहिती मिळण्यासाठी विरूध्द पक्ष क्रमांक 2 कडे लेखी अर्ज सादर केला. तक्रारकर्त्याच्या विनंती अर्जानुसार विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांनी माहे फेब्रुवारी 2015 मध्ये विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने त्यांच्या कार्यालयामध्ये Income Tax परत मिळण्यासाठी जे कागदपत्र दाखल केले होते ते तक्रारकर्त्याला दिले. तक्रारकर्त्याने सदर कागदपत्रांची प्रत्यक्ष पाहणी केली असता तक्रारकर्त्याला असे दिसून आहे की, विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने कर आकारणी वर्ष 2010-2011 ऐवजी 2009-2010 हे वर्ष त्यात नमूद केले होते. ते पाहून तक्रारकर्त्याला एकदम मानसिक धक्का बसला आणि ही विरूध्द पक्ष क्रमांक 1 ची चूक असल्याचे तक्रारकर्त्याच्या निदर्शनास आले. अशा प्रकारे विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने Professional Misconduct (धंद्यातील गैरवर्तणूक) केले आहे.
6. तक्रारकर्त्याने अनेकदा विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला TDS रू.13,590/- वसूल करण्यासंबंधी विनंती केली. परंतु विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने सदैव टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 22/07/2015 रोजी विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना अधिवक्ता श्री. एम. एस. सहारे यांचेमार्फत नोटीस पाठविली. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने नोटीस स्विकारली मात्र सदर नोटीसला कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही अथवा TDS रू.13,590/- परत केले नाही किंवा TDS परत मिळण्याकरिता कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांनी दिनांक 12/08/2015 रोजी तक्रारकर्त्याच्या नोटीसला उत्तर देऊन कर वसुली विवरण हे 2009-2010 या समान वर्षाचे दाखल करण्यांत आल्याचे नमूद केले. अशाप्रकारे दोन्ही विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी TDS रक्कम रू.13,590/- परत दिली नाही.
7. तक्रारकर्त्याचे म्हणणे असे आहे की, विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने Income Tax Return (आयकर विवरण) 2010-2011 या वर्षाचे दाखल केले. परंतु आयकर विवरण दाखल करते वेळी 2010-2011 ऐवजी 2009-2010 असे कर आकारणी वर्ष चुकीने दाखल केले. त्यामुळे विरूध्द पक्ष क्रमांक 1 ची फार मोठी चूक आहे आणि ही चूक धंद्यातील गैरवर्तणूक (Professional Misconduct) आणि अनुचित व्यापार पध्दती आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा TDS रक्कम रू.13,590/- मिळण्यापासून वंचित राहिला. तक्रारकर्ता हा TDS चा कायदेशीर हक्कदार होता व त्याला Income Tax Return (आयकर विवरण) विषयी काय पध्दत व नियम आहेत याबाबतची माहिती नसल्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्रमांक 1 च्या म्हणण्यावर विश्वास ठेऊन फॉर्मवर सह्या केल्या. विरूध्द पक्ष क्रमांक 1 च्या चूकीमुळे तक्रारकर्त्याला नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल केली असून विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करून सेवेत त्रुटी दिल्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
अ) विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला TDS रक्कम रू.13,590/- द. सा. द. शे. 24% व्याजासह दिनांक 22/07/2015 पासून द्यावे.
ब) विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ने तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी रू.20,000/- नुकसान भरपाई म्हणून द्यावे.
8. तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याने 2009-2010 या वर्षाचे आयकर विवरण, फॉर्म नंबर 16-A, 2009-2010 चे Acknowledgement, विनंती अर्ज, आयकर प्रतिदाय सूचना, इन्कम टॅक्स व्हेरिफिकेशन, रिटर्न ऍडव्हाईस, इन्टीमेशन लेटर, नोटीसचे उत्तर इत्यादी दस्तावेज दाखल केलेले आहेत.
9. सदर तक्रारीची नोटीस विरूध्द पक्ष क्रमांक 1 वर बजावण्यात आली विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला नोटीस मिळूनही गैरहजर असल्यामुळे त्यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक 17/12/2016 रोजी पारित करण्यांत आला.
10. विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने तक्रारकर्त्याच्या नोटीसला उत्तर देऊन सदर उत्तर हाच त्यांचा लेखी जबाब समजण्यांत यावा असे सांगितले.
11. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार व त्यासोबत दाखल केलेले दस्तावेज यावरून खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरुध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा -
12. मुद्दा क्र. 1 बाबत – तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्रमांक 2 ला पाठविलेल्या नोटीसचे उत्तर विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने दिनांक 12/08/2015 रोजी दिलेले असून ते दस्तावेज क्रमांक 15 वर आहे. सदर उत्तरामध्ये विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने असे स्पष्ट केले आहे की, तक्रारकर्त्याने 2010-2011 या कर आकारणी वर्षासाठी Acknowledgement No. 0802003672 दिनांक 31/07/2010 अन्वये Income Tax Return भरले आणि TDS रू.13,590/- परत मिळण्यासाठी अर्ज केला. परंतु तक्रारकर्त्याने त्यांच्या ऑफीस रेकॉर्डनुसार 2009-2010 या वर्षासाठी Acknowledgement No. 0802000317 दिनांक 05/06/2009 अन्वये इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केले होते आणि त्यांच्या ऑफीसने रू.13,070/- धनादेश क्रमांक 759412, दिनांक 19/05/2010 रोजी तक्रारकर्त्याला परत केले. तक्रारकर्त्याने आयकर रिटर्न फॉर्म दाखल केला त्यामध्ये स्वतः फॉर्म भरतेवेळी सत्यापन दिले आहे. तक्रारकर्त्याच्या माहितीप्रमाणे भरलेली रक्कम खरी आहे. त्यामुळे 2010-2011 ह्या कर आकारणी वर्षात TDS परत देण्याविषयी जो वाद निर्माण झाला त्यासाठी विरूध्द पक्ष क्रमांक 2 जबाबदार नसून त्यांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित व्यापार किंवा सेवेतील त्रुटी केल्याचे दिसून येत नाही. करिता विरूध्द पक्ष क्रमांक 2 विरूध्द कोणत्याही प्रकारचा आदेश मंचाद्वारे पारित करता येत नाही. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने त्याचा लेखी जबाब दाखल न केल्यामुळे त्याचेविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारित करण्यांत आला. त्यामुळे तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीत केलेले कथन अबाधित राहील असे या मंचाचे मत आहे.
वरील कारणामुळे मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
13. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला तक्रारकर्त्याने 2010-2011 ह्या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरण भरण्यास सांगितले. त्यानुसार विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने 2010-2011 या कर आकारणी वर्षाकरिता एकूण उत्पन्न रू.1,31,409/- आणि Deduction रू.13,590/- एवढे काढले जे की, Refundable होते. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने 2010-2011 चे रिटर्न तयार केले, परंतु चुकीने 2010-2011 हे वर्ष लिहिण्याच्या ऐवजी 2009-2010 लिहिले. तसेच त्याने तक्रारकर्त्याचे सत्यापन (Verification) केले आणि त्यावर तक्रारकर्त्याची सही घेतली. त्यामुळे एकंदरीत चूक ही विरूध्द पक्ष क्रमांक 1 ची आहे. कारण विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला वरील रिटर्न भरण्यात झालेली चूक लक्षात आली असतांना त्याने नवीन सुधारित आयकर विवरण पत्र भरावयास पाहिजे होते. परंतु त्याने नवीन सुधारित रिटर्न फॉर्म भरला नाही आणि स्वतः रिटर्न भररण्याविषयी तक्रारकर्त्याला सल्ला देखील दिला नाही. त्यामुळे वरील विवेचनावरून मंचाच्या असे निदर्शनास येते की, विरूध्द पक्ष क्रमांक 1 च्या चुकीमुळे तक्रारकर्त्याला TDS रू.13,590/- इतक्या रकमेचे नुकसान सहन करावे लागले. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ची सदरची कृती ही सेवेतील त्रुटी असून Professional Misconduct देखील आहे. त्यामुळे विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने तक्रारकर्त्याला 2010-2011 ह्या कर आकारणी वर्षासाठी TDS रू.13,590/- द्यावे आणि त्यावर द. सा. द. शे. 9% व्याज दिनांक 11/09/2015 पासून ते रक्कम अदा होईपर्यंत द्यावे असे मंचाचे मत आहे.
वरील कारणामुळे मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-अंतिम आदेश-
1) तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 खालील तक्रार विरूध्द पक्ष क्रमांक 1 विरुध्द खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला आदेश देण्यांत येतो की, त्याने तक्रारकर्त्याला 2010-2011 ह्या कर आकारणी वर्षासाठी TDS रू.13,590/- द्यावे आणि त्यावर द. सा. द. शे. 9% व्याज दिनांक 11/09/2015 पासून ते रक्कम अदा होईपर्यंत द्यावे
3) विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला आदेश देण्यांत येतो की, त्याने उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे अन्यथा द. सा. द. शे. 12% व्याज मिळण्यास तक्रारकर्ता पात्र राहील.
4) विरूध्द पक्ष क्रमांक 2 विरूध्द कोणताही आदेश नाही.
5) तक्रारीची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.
6) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.