तक्रार दाखल तारीख - 15/10/15
तक्रार निकाली तारीख – 24/01/18
न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1) तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार जाबदार यांचेविरुध्द ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केली आहे. प्रस्तुतची तक्रार दाखल होवून जाबदार यांना नोटीसीचे आदेश झाले. मात्र नोटीस लागू होवूनही जाबदार क्र.1 व 8 हे या मंचासमोर हजरही नाहीत व त्यांनी आपले म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब, त्यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत करणेत आले. तक्रारदाराने “ई” वॉर्ड, कोल्हापूर मधील सि.स.नं. 689/1 ते 7 ही शाहुपूरीतील मिळकत जाबदार क्र.1 ते 6 यांचे मालकीची असून ती एकत्रितपणे बांधणेत आली व जाबदार यांनी तक्रारदार यांना सदर अपार्टमेंट (एके कॉम्प्लेक्स) मधील पहिल्या मजल्यावरील ऑफिस युनिट नं.23 याचे कारपेट क्षेत्र 202.50 चौ.फूट ही मिळकत रक्कम रु.91,212/- च्या मोबदल्यात विक्री करणेचे मान्य करुन दि.25/2/92 रोजी करारपत्र करुन दिले. तथापि, वारंवार करारपत्राप्रमाणे खरेदीपत्र व विद्युत मीटरची जोडणी करणेची मागणी करुन देखील जाबदार यांनी आजपर्यंत ती पूर्ण न केलेने तक्रारदारास तक्रारअर्ज दाखल करणे भाग पडले.
2) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
शहर कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील “ई” वॉर्ड मधील सि.स.नं. 689/1 ते 7 ही शाहुपूरीतील मिळकत जाबदार क्र.1 ते 6 यांचे मालकीची असून ती एकत्रितपणे बांधणेत आली व त्यास एके कॉम्प्लेक्स असे नाव देण्यात आले. सदर इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील ऑफिस युनिट नं.23 याचे कारपेट क्षेत्र 202.50 चौ.फूट ही मिळकत रक्कम रु.91,212/- च्या मोबदल्यात विक्री करणेचे मान्य करुन दि.25/2/92 रोजी करारपत्र करुन दिले. करारातील अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदार यांनी जाबदार यांना संपूर्ण मोबदला दिला असून ऑफिस युनिटचा ताबा जाबदार यांनी तक्रारदार यांना दिला आहे. वर नमूद कराराअन्वये सदर युनिटसाठी स्वतंत्र मिटरची जोडणी करुन अंतर्गत वायरिंग करुन देणेची जबाबदारी जाबदारांनी स्वीकारली होती व त्यासाठी जादा रक्कम तक्रारदारांकडून स्वीकारली होती. तथापि अंतर्गत वायरिंग करुन दिले असले तरी स्वतंत्र मीटरची जोडणी करुन दिली नाही. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे वेळोवेळी करारपत्राप्रमाणे खरेदीपत्र करुन देण्याबाबत व स्वतंत्र विद्युत मीटर बसविण्याबाबत विनंती केली असता जाबदार यांनी याबाबत चालढकल केली. म्हणून तक्रारदार यांनी जाबदार यांना दि.30/7/14 रोजी नोटीस पाठविली परंतु तरीही जाबदार यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. सबब, सदर ऑफिस युनिटचे खरेदीपत्र करुन मिळावे, तसेच सदर मिळकतीस स्वतंत्र मीटरची जोडणी करुन मिळावी, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत अशा मागण्या तक्रारदाराने केल्या आहेत.
3) तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफिडेव्हीट व कागदयादीसोबत जाबदार यांना पाठविलेली नोटीस, त्याची पोहोचपावती व नोटीस परत आल्याचा लखोटा अशी एकूण 4 कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवादही दाखल केला आहे.
4) जाबदार क्र.1 व 8 यांना प्रस्तुत तक्रारीची नोटीस लागू होवूनही ते या मंचासमोर हजर नाहीत व त्यांनी आपले म्हणणेही दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द नि.1 वर “एकतर्फा” आदेश पारीत करण्यात आला.
5) जाबदार क्र.2 ते 7 यांनी याकामी हजर होवून म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथने नाकारली आहेत. जाबदार क्र.2 ते 7 यांचे कथनानुसार कायद्यातील तरतुदीप्रमाणे तक्रारअर्ज चालणेस पात्र नाही. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक नाहीत. तक्रारदाराचा वाद हा ऑफिस युनिटबाबतचा दिसून येतो. त्यामुळे ऑफिस युनिट हे कमर्शिअल हया व्याख्येमध्ये समाविष्ट होत असल्याने तक्रारदार यांना सदरचा तक्रारअर्ज या मंचात दाखल करता येणार नाही. तक्रारदारांनी करारापत्रानंतर 23 वर्षांनी दाद मागण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यास मुदतीच्या कायद्याची बाधा येते. तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये करारपत्र झालेचा मजकूर जाबदारांनी नाकारला आहे. सदरचे करारपत्र झालेलेच नसल्याने कराराप्रमाणे रक्कम स्वीकारण्याचा ताबा देण्याचा अगर खरेदीपत्र पूर्ण करुन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सदर मिळकतीबाबत दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, कोल्हापूर या कोर्टात वाद सुरु आहे. जाबदार क्र.1 यांनी करुन घेतलेले वटमुखत्यारपत्र हे अन्य जाबदारांनी रद्द करुन घेतले आहे. जाबदार क्र.1 यांनी ब-याच चुकीच्या व बोगस गोष्टी केल्या आहेत, त्याबाबत वाद सुरु आहेत. सबब, तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी मागणी जाबदारांनी केली आहे.
6) तक्रारदार यांची तक्रार, जाबदारांचे लेखी म्हणणे, दाखल पुरावे व युक्तिवाद यावरुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो काय ? | होय |
2 | जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
3 | आदेश | खालीलप्रमाणे |
वि वे च न –
मुद्दा क्र. 1 –
7) कोल्हापूर शहर महानगरपालिका हद्दीतील “ई” वॉर्ड मधील सि.स.नं. 689/1 ते 7 या शाहुपूरी येथील जाबदार क्र.1 ते 6 यांचे मालकीच्या मिळकतीवर एकत्रितपणे अपार्टमेंट टाईप “एके” कॉम्प्लेक्स या नावाने इमारत बांधलेली होती व आहे व सदरचे मिळकतीतील पहिल्या मजल्यावरील ऑफिस युनिट नं.23 याचे कारपेट क्षेत्र 202.50 चौ.फूट ही मिळकत रक्कम रु.91,212/- या मोबदल्यात जाबदार यांनी दि.25/2/92 चे रजिस्टर्ड करारपत्राने विक्री करण्याचे मान्य व कबूल केले होते व आहे व तशी करारपत्राची झेरॉक्स प्रतही तक्रारदाराने आपले तक्रारअर्जासोबत दाखल केली आहे. सबब, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक व सेवा देणार हे नाते प्रस्थापित झालेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) खाली जाबदार यांचा ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.2 व 3 एकत्रितपणे -
8) तक्रारदाराने वर नमूद ऑफिस युनिट नं.23, एके कॉम्प्लेक्स, शाहुपुरी कोल्हापूर ही मिळकत दि.25/2/1992 चे कराराने रु.91,212/- इतक्या किंमतीस विकत घेणेचे ठरविले व त्यानुसार तक्रारदाराने रक्कमही दिली व सदर ऑफिसचा ताबाही जाबदार यांनी दिला. मात्र वर नमूद करारपत्रान्वये सदर ऑफिस युनिटसाठी स्वतंत्र मीटरची जोडणी करुन अंतर्गत वायरिंग करुन देणेची जबाबदारी जाबदार यांनी स्वीकारली होती व आहे व त्याकरिता वर नमूद केले मोबदल्याखेरीज जादा रक्कम जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून स्वीकारलेली आहे. तथापि, अंतर्गत वायरिंग करुन दिले असले तरीसुध्दा स्वतंत्र मीटरची जोडणी करुन दिलेली नाही व करारपत्राप्रमाणे खरेदीपत्रही पूर्ण करुन दिलेले नाही असे तक्रारदार यांचे कथन आहे.
9) जाबदार क्र.2अ, ब व 3 ते 7 यांचे कथनानुसार, सदरचा वाद हा कमर्शिअल या व्याख्येमध्ये समाविष्ट होत असलेने मे. कोर्टात दाखल करता येणार नाही. प्रस्तुत जाबदार व तक्रारदार यांचेमध्ये कोणताही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे ग्राहक व मालक हे नाते होत नाही व सदरचा वाद हा 23 वर्षानंतर उपस्थित केलेला आहे. त्यामुळे तक्रारीस मुदतीच्या कायद्याचा बाध येतो. तसेच सि.स.नं. 689/1 ते 7 या मिळकतीवर मे. दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, कोल्हापूर यांचे कोर्टात वाद सुरु आहे व तो अद्यापी न्यायप्रविष्ट आहे, सबब, अर्ज नामंजूर करावा.
10) तथापि, वर नमूद तक्रारदार व जाबदार यांचे कथनांचा विचार करता जाबदारने सदर सि.स.नं. 689/1 ते 7 ही मिळकत स्वतःचे मालकीची असून ती विकसीत करुन त्यावर एके कॉम्प्लेक्स या नावाने अपार्टमेंटचे बांधकाम केले आहे ही बाब जाबदार यांना मान्य आहे. वादाचा मुद्दा इतकाच की, त्यांना सदरचा व्यवहार झाला ही बाब मान्य नाही. तथापि, तक्रारदाराचे व्यवहाराचे संदर्भातील झालेले करारपत्र तक्रारअर्जासोबत दाखल केले आहे. यावरुन तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सदरचे जागेचा व्यवहार झालेची बाब शाबीत होते. सबब, तक्रारदारांनी घेतेलेला व्यवहारच न झालेचा आक्षेप हे मंच फेटाळून लावत आहे. तसेच जाबदार यांनी Commercial purpose चा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र तसा कोणताही कागदोपत्री पुरावा या मंचासमोर नसलेने तोही मुद्दा हे मंच फेटाळत आहे. तक्रारदारांना जाबदार यांनी सदर जागेचा ताबा हा 1992 रोजीच दिलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. सबब, खरेदीपत्र पूर्ण करुन न दिलेने तक्रारीस सातत्याने कारण (Continuing cause of action) घडत आहे. सबब, जाबदारने घेतलेला, या मंचासमोर ही तक्रार चालणेस पात्र नाही हाही आक्षेप, हे मंच फेटाळून लावत आहे. जाबदारने या संदर्भात मे.दिवाणी न्यायालयात सदरचा वाद सुरु आहे असे कथन केले आहे. मात्र जाबदार यांचे कथनाखेरीज तसा कोणताच स्वतंत्र पुरावा या मंचासमोर दाखल नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून करारपत्राप्रमाणे रक्कम स्वीकारली असलेने खरेदीपत्र पूर्ण करुन देणे निश्चितच बंधनकारक आहे. मात्र सदरचे खरेदीपत्र पूर्ण न करुन निश्चितच जाबदार यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब, तक्रारदाराने मागणी केलेप्रमाणे तक्रारअर्जात नमूद जागेचे खरेदीपत्र तसेच विद्युत मीटर जोडणीही करुन देणेबाबतचे आदेश जाबदार यांना करणेत येतात. सदरचे बांधकाम जाबदार क्र.1 ते 6 जरी जागामालक असले तरी सर्व जाबदार यांनी बांधकाम एकत्रित केले असलेने याकामी हे मंच सर्व जाबदार यांना जबाबदार धरीत आहे. तक्रारदाराने मानसिक व शारिरिक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.10,000/- मागितला असला तरी तो मंचास संयुक्तिक वाटत नसलेने मानसिक व शारिरिक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रु.5,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु. 3,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब, हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) जाबदार क्र.1 ते 8 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदार यांना तक्रारअर्जात नमूद केलेल्या एके कॉम्प्लेक्समधील पहिल्या मजल्यावरील ऑफिस युनिट नं.23 याचे खरेदीपत्र करुन देणेचे आदेश करण्यात येतात.
3) जाबदार क्र.1 ते 8 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या सदर मिळकतीत स्वतंत्र मीटर जोडणी करणेबाबत आदेश करणेत येतात.
4) जाबदार क्र.1 ते 8 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार) अदा करावेत.
5) जाबदार क्र.1 ते 8 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदार यांना तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रक्कम रुपये पाच हजार) अदा करावेत.
6) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता जाबदार क्र.1 ते 8 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
7) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे जाबदार विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
8) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.