(घोषित दि. 24.11.2010 द्वारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तो सिंधी बाजार जालना येथील घर क्रमांक 1-13-186 येथे राहतो. सदर घरासाठी त्याने गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून ग्राहक क्रमांक 510030469753 द्वारे वीज जोडणी घेतलेली आहे. सदर वीज जोडणीबाबत वीज वितरण कंपनीने दिलेली सर्व देयके त्याने नियमित भरणा केलेली आहेत.तरी सुध्दा वीज वितरण कंपनीने त्यास कोणतीही सुचना न देता त्याचा वीज पुरवठा खंडीत करुन त्याचेकडील मीटर काढून घेतले. गैरअर्जदाराने बेकायदेशीररित्या वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे त्याने वीज वितरण कंपनीकडे वीज पुरवठा पूर्ववत चालु करण्याबाबत अर्ज दिला तसेच नोटीस देखील पाठविली. परंतू गैरअर्जदाराने वीज पुरवठा पूर्ववत सुरु केला नाही. अशा प्रकारे वीज वितरण कंपनीने त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्याचा वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्याबाबत गैरअर्जदारास आदेश देऊन त्यास रक्कम रुपये 50,000/- नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने वीज पुरवठयाबाबतच्या अटी व शर्तींचे पालन केले नाही. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर त्याचा वीज पुरवठा नियमानुसार खंडीत करण्यात आला. तक्रारदाराने काल्पनिक कारणावरुन ही तक्रार दाखल केलेली असुन त्याच्या विरुध्द केलेली कार्यवाही कायदेशीर व योग्य आहे. तक्रारदाराला चांगली सेवा देण्यात आलेली असुन त्याची नुकसान भरपाईची मागणी योग्य नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? होय 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून ग्राहक क्रमांक 510030469753 द्वारे घर क्रमांक 1-13-186 भाजी मंडी, सिंधी बाजार जालना येथे वीज जोडणी घेतलेली होती ही बाब तक्रारदाराला वीज वितरण कंपनीकडून देण्यात आलेले देयक नि.3/7 तसेच तक्रारदाराने देयकापोटी भरलेल्या रकमेच्या पावत्या नि.3/2 आणि नि.3/3 वरुन दिसुन येते. तक्रारदाराचा सदर वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने खंडीत केलेला आहे याविषयी वाद नाही. सदर वीज पुरवठा खंडीत करण्याचे कारण वीज वितरण कंपनीने स्पष्ट केलेले नाही. तक्रारदाराने वीज पुरवठयाबाबतच्या नियमांचे पालन केले नाही म्हणून त्याचा वीज पुरवठा खंडीत केला असे कारण वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या कार्यवाहीच्या समर्थनार्थ दिलेले आहे. परंतू तक्रारदाराने वीज पुरवठयाबाबतच्या कोणत्या अटी व शर्तीचे अथवा नियमाचे उल्लंघन केले याचा काहीही खुलासा वीज वितरण कंपनीने केलेला नाही. तक्रारदाराचा वीज पुरवठा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करुन आणि कायद्यातील तरतुदींना अनुसरुन खंडीत करण्यात आल्याबाबत वीज वितरण कंपनीने कोणताही पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराचे देयक थकीत असल्याचे देखील दिसत नाही. कारण दिनांक 09.06.2010 रोजी तक्रारदाराला देण्यात आलेले देयक नि. 3/7 रक्कम रुपये 500/- हे तक्रारदाराने दिनांक 14.06.2010 रोजी भरले होते, ही बाब पावती नि. 3/2 वरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारदाराचा वीज पुरवठा खंडीत करण्यासाठीचे कोणतेही सबळ कारण दिसुन येत नाही. सदर बाब निश्चितपणे चुकीची असून वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला निश्चितपणे त्रुटीची सेवा दिलेली आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचा (ग्राहक क्रमांक 510030469753) वीज पुरवठा आदेश कळाल्यापासून 8 दिवसांच्या आत पूर्ववत चालू करावा.
- गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने तक्रारदारास त्रुटीच्या सेवेबद्दल रुपये 500/-, मानसिक त्रासापोटी रुपये 500/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- असे एकूण रुपये 1,500/- निकाल कळाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावेत किंवा तक्रारदाराच्या पुढील देयकांमधे समायोजित करावेत.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| | HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |