श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
* निकालपत्र*
दिनांक 31/10/2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार 44/4 ससून रोड, पुणे येथील रहिवासी असून त्या जागेचा मालक आहे. तक्रारदारांच्या वडिलांच्या मृत्यू झाल्यानंतर तसे जाबदेणार यांना कळवूनही जाबदेणार यांनी तक्रारदारांना त्यांच्या वडिलांच्या नावानेच वीज देयके पाठवित होते. तक्रारदार जाबदेणार यांचे वीज ग्राहक असून त्यांच्याकडे तळमजल्यावर थ्री फेज वीज पुरवठा असून त्याचा मिटर नंबर 170011770544 व सिंगल फेज मिटर नंबर 170011770552 आहे. जाबदेणार यांनी सिंगल फेज मिटरला थ्री फेज प्रमाणे चार्ज केले, व तक्रारदारांना अधिकचे वीज देयक भरावे लागले. तक्रारदारांचे सरासरी दरमहा वीज देयक रुपये 400/- ते 500/- अचानक रुपये 6481/- पर्यन्त वाढले, दिनांक 23/2/2010 चे देयक रुपये 6481/- आले. तक्रारदार वेळोवेळी वीज देयक भरत होते, मागील बाकी काही नव्हती. जाबदेणार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर जाबदेणार यांचे प्रतिनिधी श्री. हेमंत पिंजन यांनी इन्व्हीस्टीगेशन करुन त्यांचा दिनांक 30/3/2010 चा अहवाल तयार केला, परंतू त्यात वीज मिटर क्रमांकांची अदलाबदली झाली होती. नंतरचे वीज देयक दिनांक 23/3/2010 चे रुपये 6970/- व दिनांक 22/4/2010 चे रुपये 7570/- आले. मे 2010 मध्ये तक्रारदारांना रुपये 34,680/- व दिनांक 21/6/2010 रोजी रुपये 37,080/- चे वीज देयक आले. जाबदेणार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करुनही वीज देयकात दुरुस्ती करण्यात आली नाही, अधिकचे वीज देयक आले, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रुपये 50,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी तक्रारीसोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द दिनांक 19/11/2010 रोजी मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. नगर भूमापन अधिकारी क्र.2, पुणे यांच्या नोंदीनुसार तक्रारदार यांची वारस म्हणून नोंद केल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी मागील भरलेल्या वीज देयकांच्या पावत्या रेकॉर्डवर दाखल केलेल्या असून त्या सरासरी 400/- ते 500/- पर्यन्त असल्याचे निदर्शनास येते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या फेब्रुवारी 2010 चे वीज देयक रुपये 6481/- व नंतरचे वीज देयक मार्च 2010 रुपये 6970/-, एप्रिल 2010 रुपये 7570/- चे अवलोकन केले असता वरील देयके थ्री फेज वीज मिटर क्र.170011770544 चे असल्याचे निदर्शनास येते. परत जाबदेणार यांनी तक्रारदारांना जून 2010 मध्ये थ्री फेज वीज मिटर क्र.170011770544 या क्रमांकाचेच देयक रुपये 35760/- व जूलै 2010 मध्ये रुपये 37080/- चे देयक पाठविल्याचे दाखल वीज देयकांवरुन स्पष्ट होते. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुनही जाबदेणार यांनी त्याची दखल घेतली नाही. जाबदेणार यांचे प्रतिनिधी श्री. हेमंत पिंजन यांनी इन्व्हीस्टीगेशन करुन त्यांचा दिनांक 30/3/2010 च्या सादर केलेल्या अहवालात वीज मिटर क्रमांकांची अदलाबदल झाल्याचे दिसून येते. यासर्वांवरुन जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी, निष्काळजीपणा दिसून येतो. तक्रारदारांनी मंचात तक्रार दाखल केल्यानंतर दिनांक 9/9/2010 रोजी जाबदेणार यांनी दोन्ही वीज मिटर क्रमांकांची अदलाबदल झाली होती हे मान्य केल्याचे दिसून येते. परत दिनांक 23/12/2010 रोजीच्या पत्रान्वये जाबदेणार यांनी चुकीच्या बिलांची दुरुस्ती करुन तक्रारदारांना सुधारित बिल देण्याचे मान्य केले व त्यानुसार तक्रारदारांनी रुपये 3931/- दिनांक 29/12/2010 रोजी भरल्याचे दाखल पावतीवरुन दिसून येते. यासर्वांवरुन जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी स्पष्ट होत असल्याने तक्रारदारांची तक्रार मान्य करण्यात येते. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असणार असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाईपोटी रुपये 5000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. तसेच जाबदेणार यांनी तक्रारदारांना यापुढील सर्व वीज देयके त्यांच्याच नावे पाठवावीत असे आदेश देण्यात येत आहेत.
वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येतो-
:- आदेश :-
1. तक्रार मान्य करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना यापुढील सर्व वीज देयके तक्रारदारांच्याच नावे पाठवावीत.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 5,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
4. जाबदेणार यांनी तक्रारदारांना तक्रार अर्ज खर्चापोटी रक्कम रुपये 1,000/- दयावेत.
5. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.