जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 613/2010.
तक्रार दाखल दिनांक : 01/11/2010.
तक्रार आदेश दिनांक : 08/07/2013. निकाल कालावधी: 02 वर्षे 08 महिने 07 दिवस
महादेव नामदेव डांगे, वय 60 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. मु.पो. पिंपळनेर, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं., मु.पो. करमाळा रोड,
टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर. (समन्स / नोटीस
उप-कार्यकारी अभियंता यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. दिनेश रा. महाजन, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एस.एच. अजगर
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : एस.एस. कालेकर
आदेश
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, ते व्यवसायाने शेतकरी असून विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत. दि.4/8/2010 रोजी ते श्री. विठ्ठल वसंत आवारे यांच्या गट नं.543/1 शेतजमिनीत बैलगाडीमध्ये खत पोती घेऊन जात असताना सदर क्षेत्रालगत संजय मारुती आवारे यांच्या शेतजमिनीमध्ये विद्युतवाहिनीची तार तुटून पडलेली होती आणि गवतामुळे तार न दिसल्यामुळे बैलगाडी त्यावरुन गेली असता बैलास विद्युत धक्का बसल्यामुळे जागीच मृत्यू पावले. सदर घटनेबाबत पोलीस पंचनामा करण्यात येऊन पोस्टमार्टेम करण्यात आले. त्यानंतर तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना नुकसान भरपाई देण्याची विनंती केली असता, त्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे रु.60,000/- व त्यावर 12 टक्के व्याजासह मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नसल्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. तक्रारदार यांनी घटना संजय मारुती अवारे यांच्या शेतामध्ये घडल्याने नमूद केले आहे. शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अन्वये तक्रारदार हे
'ग्राहक' या संज्ञेत येतात काय ? नाही.
2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
4. मुद्दा क्र. 1 व 2 :- प्रामुख्याने, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या विद्युत वाहिनीच्या तुटलेल्या तारेमुळे विद्युत धक्का बसून त्यांचे बैल मृत्यू पावल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल करुन तक्रारदार हे त्यांचे ‘ग्राहक’ नसल्याचे नमूद केले आणि त्यांचे अभियोक्यांनी त्याबाबत तीव्र हरकत नोंदविली आहे.
5. त्या अनुषंगाने सर्वप्रथम तोच मुद्दा निर्णयीत होणे अत्यावश्यक आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2 (1) (डी) प्रमाणे ‘ग्राहक’ शब्दाची व्याख्या स्पष्ट केलेली आहे. त्या संज्ञेप्रमाणे तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून ‘सेवा’ घेतल्याचे सिध्द होणे अत्यावश्यक आहे. प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थिती पाहता, ज्या ठिकाणी विद्युत दुर्घटना घडली त्या ठिकाणी तक्रारदार यांचे नांवे विद्युत पुरवठा घेण्यात आलेला नव्हता. त्याप्रमाणे तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडून वीज पुरवठा घेत असल्याबाबत वीज देयक किंवा इतर तत्सम पुरावा दाखल केलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारदार व विरुध्द पक्ष यांच्यामध्ये ‘ग्राहक’ व ‘सेवा पुरवठादार’ असे नाते निर्माण होऊ शकलेले नाही. वरील विवेचनावरुन तक्रारदार हे विद्युत वितरण कंपनीचे ग्राहक होऊ शकत नसल्यामुळे तक्रारीत उपस्थित केलेला विवाद व इतर मुद्यांना स्पर्श न करता तक्रारदार यांची तक्रार ‘ग्राहक’ नसल्याच्या कारणामुळे रद्द करणे न्यायोचित ठरते.
6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते.
2. तक्रारदार व विरुदध पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. दिनेश रा. महाजन÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/8713)