जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 245/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-15/02/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 25/06/2013.
जगतराव वामनराव पवार,
उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
रा.पातोंडा, ता.अंमळनेर,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
उप कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, अंमळनेर,
ता.अंमळनेर,जि.जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.नरेंद्र केदार ब्रम्हे वकील.
विरुध्द पक्ष तर्फे श्री.जे.एस.बागुल वकील.
निकालपत्र
श्री.विश्वास दौ.ढवळे,अध्यक्षः तक्रारदार यास विरुध्द पक्षाने अवाजवी व अवास्तव विज देयक दिल्याबाबत तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार हे मे,2009 पासुन पातोंडा,ता.अंमळनेर येथे श्रीमती रत्नाबाई विनायक पाटील यांचे घरात भाडेकरु म्हणुन वास्तव्यास आहेत. घरमालक रत्नाबाई विनायक पाटील यांचा विज ग्राहक क्र.129533019890 असा असुन जुना ग्राहक क्र.962 आहे. तक्रारदार हे लाभार्थी म्हणुन घरमालकाच्या विद्युत मिटरची बिले नियमित भरत असुन विजेचा उपभोग घेत आहेत. तक्रारदार हे घरी एकटेच राहत असल्याने विज वापर हा केवळ एक बल्ब व एक झिरो असा अत्यल्प आहे. विरुध्द पक्षाने तक्रारदारास दि.5/1/2010 चे देयक क्र.376 नुसार रु.300/- चे दिले. सदर बिलात विज शुल्क, इंधन समायोजन आकार, इतर आकार इ बेकायदेशीर रक्कमा आकारल्या तसेच विज मिटरचा फोटो नाही. सदरचे देयक हे मनमानी पध्दतीने बेकायदेशीरपणे दिलेले आहे. याबाबत तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे तक्रार केली असता त्यांनी केवळ आश्वासने दिली व त्यानंतर दि.3/2/2010 रोजी देयक क्र.378 चे रक्कम रु.610/- चे देऊन सदर बिलात देखील विज शुल्क, इंधन समायोजन आकार, इतर आकार इ बेकायदेशीर रक्कमा आकारल्या तसेच विज मिटरचा फोटो नाही. सदरचे देयक भरण्यास अवधी असतांना तडकाफडकी तक्रारदाराचा विज पुरवठा खंडीत करुन तक्रारदारास सदोष सेवा दिलेली आहे. सबब दि.5/1/2010 चे व दि.3/2/2010 चे अनुक्रमे रक्कम रु.300/- व 610/- चे देयक रद्य करण्यात यावे, तक्रार अर्जाचा निकाल लागेपावेतो विज पुरवठा पुर्ववत सुरु करुन मिळावा तसेच मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या.
4. विरुध्द पक्ष यांनी याकामी हजर होऊन तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदारास दिलेले विज बिल देयक क्र.376 रक्कम रु.300/- चे तक्रारदार यांनी न भरल्यामुळे तक्रारदारास सदरचे बिल पुढील देयकात म्हणजे दि.3/2/2010 रोजीचे देयक क्र.378 रक्कम रु.600/- चे डिसेंबर,2009 व जानेवारी,2010 असे एकत्रीतरित्या देण्यात आले तथापी सदरचे देयक तक्रारदाराने विद्युत कंपनीचे नियमानुसार एक महीन्याचे देयक थकीत झाल्याने तक्रारदाराचा विज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत करण्यात आला त्यामुळे तक्रारदार हा त्याचे चुकांचा गैरफायदा घेऊ पाहत आहे. तक्रारदारास नोव्हेंबर,2009 या महीन्याचे दिलेल्या देयकात मागील रिडींग 3984 व चालु रिडींग 3987 असे आढळुन आले असुन संगणकात असलेल्या कार्यप्रणालीमुळे सदर विज बिलावर फॉल्टी असा शेरा आलेला असुन तक्रारदारास त्याचे सरासरी वापराप्रमाणेच विज देयक देण्यात आलेले आहे ते यथायोग्य व कायदेशीर असुन विरुध्द पक्ष कंपनीचे देयक देणे टाळता यावे या हेतुने तक्रारदाराने प्रस्तुतचा खोटा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह रद्य करण्यात यावा व तक्रार अर्जाचा संपुर्ण खर्च तक्रारदाराकडुन मिळावा अशी विनंती विरुध्द पक्षाने केलेली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, सोबत दाखल कागदपत्रे, विरुध्द पक्षाचे लेखी म्हणणे याचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? नाही.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
6. मुद्या क्र.1 व 2 - तक्रारदारास दि.5/1/2010 चे देयक क्र.376 नुसार रु.300/- चे दिले तसेच दि. दि.3/2/2010 रोजी देयक क्र.378 चे रक्कम रु.610/- चे देऊन दोघा बिलात विज शुल्क, इंधन समायोजन आकार, इतर आकार इ बेकायदेशीर रक्कमा आकारल्या तसेच विज मिटरचा फोटो नाही व सदरचे देयक तक्रारदाराने भरणा न केल्याने तक्रारदाराचा विज पुरवठा विरुध्द पक्षाने खंडीत केला त्यामुळे प्रस्तुत तक्रार या मंचासमोर दाखल केल्याचे तक्रारदाराचे तक्रारीवरुन दिसुन येते., याकामी विरुध्द पक्षाचे वकीलांनी या मंचासमोर हजर होऊन तक्रारदाराने दि.5/1/2010 रोजीचे देयक भरणा न केल्याने दि.3/2/2010 रोजीचे देयकात मागील थकबाकी नमुद करुन एकुण रक्कम रु.610/- चे देयक दिलेले असुन ते योग्य व कायदेशीर असल्याचे प्रतिपादन या मंचासमोरील युक्तीवादात केले. तक्रारदाराचे वकील युक्तीवादाचे वेळेस गैरहजर होते.
7. तक्रारीसोबत दाखल बिलांचे अवलोकन करता तक्रारदारास रक्कम रु.290/- ते रु.490/-च्या सरासरीने देयके दिले असल्याचे दिसुन येते. तसेच तक्रारदारास दिलेले 5/1/2010 रोजीचे देयक रक्कम रु.300/- चा भरणा तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे न केल्याने पुढील महीन्यात म्हणजेच दि.3/2/2010 रोजीचे देयकात मागील थकबाकी रक्कम रु.300/- नमुद करुन एकुण रक्कम रु.610/- चे देयक दिल्याचे स्पष्ट होते. तक्रारदाराने तक्रार अर्जातुन विज शुल्क, इंधन समायोजन आकार, इतर आकार इ बेकायदेशीर रक्कमा आकारल्या असे कथन केलेले आहे तथापी त्याबाबतचा योग्य तो समर्पक खुलासा दाखल केलेला नाही तसेच दिलेले देयक हे बेकायदेशीर कसे हे देखील या मंचासमोर योग्य त्या पुराव्यानिशी शाबीत केलेले नाही. याउलट विरुध्द पक्षाने त्यांचे लेखी म्हणण्यातुन तक्रारदाराने मागील महीन्याचे देयक भरणा न केल्याने पुढील महीन्याच्या देयकात थकबाकी समाविष्ठ करुन त्यास कायदेशीररित्या योग्य देयक दिल्याचे प्रतिपादन केलेले असुन विरुध्द पक्षाने तक्रारदारास प्रदान केलेल्या सेवेत कोणतीही सेवा त्रृटी केल्याचे तक्रारदाराने शाबीत केलेले नसल्याने मुद्या क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज फेटाळण्यात येतो.
( ब ) खर्चाबाबत आदेश नाहीत.
ज ळ गा व
दिनांकः- 25/06/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.