तक्रारदार : स्वत हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री. स. व. कलाल , सदस्य, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. तक्रारदार यांच्या तक्रारीतील कागदपत्रानुसार सा.वाले 1 हे सा.वाले क्र 2 यांचे मोबाईल दुरुस्तीची सेवा पुरविणारे अधिकृत प्रतिनिधी आहेत. त्यांचे कार्यालय ड्रीम मॉल, भांडूप (पश्चिम), मुंबई 400 078 येथे आहे व सा.वाले क्र. 2 हे मोबाईल कंपनीचे मुळ उत्पादक असून त्यांचे कार्यालय नोएडा, उत्तर प्रदेश येथे आहे.
2. तक्रारदार हे व्यवसायाने डॉक्टर असून ते साईनाथ हौंसिंग सोसायटी, टिळक नगर, भांडूप (पश्चिम) मुंबई 400 078 येथे राहातात. तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 1 व 2 यांचे विरुध्द त्यांच्या मोबाईल दुरुस्ती बाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या सबबीखाली ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत या मंचासमोर तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांची तक्रार अशी की, तक्रारदारांनी दिनांक 26.1.2014 रोजी मे.मोबाईल गॅलरी, मुलुंड (पश्चिम) यांचेकडून XOLO Q2000 911337800025854 या प्रकारचा मोबाईल रु.14,390/- येवढया किंमतीस खरेदी केला. सदरचा मोबाईल ऑक्टोबर,2014 मध्ये नादुरुस्त झाल्यामुळे तक्रारदारांनी तो सा.वाले क्र. 1 यांचेकडे दुरुस्तीसाठी दिला. परंतु सदर मोबाईल दुरुतीसाठी 20 दिवसाचा कालावधी लागेल असे सा.वाले क्र.1 यांनी सांगून देखील तक्रारदारास जवळपास एक ते दिड महीना उशिराने मोबाईल दुरुस्त होऊ न शकल्यामुळे तो सा.वाले क्र. 2 यांचेकडे पाठविण्यात आला व सा.वाले क्र. 2 हे मोबाईलचे मुळे उत्पादक असुन देखील त्यांचे कडूनही सदरहू मोबाईल दुरुस्त होऊ न शकल्यामुळे सा.वाले क्र. 2 यांनी तक्रारदाराचा मोबाईल वॉरंटी कालावधीत असल्यामुळे नविन मोबाईल बदलून दिला. सदरचा मोबाईल हा XOLO Q2500 911356700222866 या प्रकारचा होता. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सदरचा मोबाईल हा तक्रारदारांनी खरेदी केलेल्या मुळ मोबाईलपक्षा वेगळा व कमी दर्जाचा होता. त्यामुळे तक्रारदारांनी सा.वाले क्र. 1 यांचे कडून नविन बदलून दिलेला मोबाईल स्विकृत केला नाही. त्यानतर सा.वाले क्र. 2 यांनी दिनांक 26.12.2014 रोजी तक्रारदारास मोबाईलव्दारे संपर्क करुन तक्रारदारांना मोबाईल दुरुस्त होऊ शकत नसल्यामुळे व तक्रारदारांचा मोबाईल वॉरंटी कालावधीत असल्यामुळे तक्रारदारास नविन मोबाईल दिला असल्याचे सांगीतले. सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारास दूरध्वनीवरुन कळविल्याप्रमाणे तक्रारदाराच्या मुळ मोबाईलची किंमत प्राप्त परिस्थितीत केवळ रु.2,000/- ते रु.3000/- इतकी आहे. जर तक्रारदारास नविन मोबाईल घ्यावयाचा असल्यास त्यांनी रु.10,000/- इतकी रक्कम भरावी, म्हणजे तक्रारदारास नविन मोबाईल घेता येईल. सा.वाले क्र. 2 यांच्या सांगण्याप्रमाणे तक्रारदार हे व्यथीत झाले. म्हणून त्यांनी सा.वाले क्र. 1 व 2 यांचे विरुध्द मोबाईल दुरुस्ती संबंधी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर म्हणून तक्रार दाखल करुन तक्रारदाराने मोबाईल खरेदीची किंमत रु.14,390/- ही रक्कम सा.वाले यांचे कडून 18 टक्के व्याजासह परत करण्याची मागणी केली आहे. तसेच तक्रारदाराकडे जवळपास एक ते दिड महीना मोबाईल नसल्यामुळे त्यांचे व्यवसायाचे झालेले नुकसान रु.25,000/-, मानसिक व शाररीक त्रासापोटी रु.3,000/-, इतकी नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- ची मागणी केलेली आहे.
3. सा.वाले यांना नोटीसची बजावणी होऊन देखील ते मंचासमोर गैरहजर राहील्यामुळे सा.वाले यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारी सोबत दाखल केलेले पुरावा शपथपत्र, व त्यासोबत मोबाईल खरेदीचे बिल क्र. 253 दिनांक 26.1.2014, तसेच सा.वाले क्र. 1 यांनी तक्रारदार यांना दिलेली मोबाईल दुरुस्ती संबंधीची जॉबशिट दिनांक 10.10.2014 व दिनांक 8.12.2014, तसेच तक्रारदाराने सा.वाले क्र. 1 व 2 यांचे सोबत ई-मेलव्दारे केलेला पत्र व्यवहार दिनांक 21.12.2014 व 22.12.2014 च्या प्रती, सोबत जोडल्या आहेत. मंचाने सदरहू कागदपत्रांचे अवलोकन केले.
4. सा.वाले यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत झाल्यामुळे तक्रारदारांच्या तक्रारीतील व पुरावा शपथपत्रातील कथने, म्हणणे व मागणे अबाधित राहातात.
5. तक्रारदारांनी तक्रारी सोबत जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसते की, तक्रारदारांनी सा.वाले क्र. 1 यांचेकडे दिनांक 10.10.2014 रोजी मोबाईल दुरुस्तीसाठी दिला होता असे सा.वाले क्र. 1 यांचे दिनांक 10.10.2014 च्या जॉबसिट वरुन दिसून येते. त्यानंतर तक्रारदाराने सा.वाले क्र. 1 यांनी नविन बदलून दिलेला मोबाईल XOLO Q2500 911356700222866 स्विकृत केला नाही. हे सा.वाले क्र. 1 यांचे दिनांक 6.12.2014 च्या जॉबसिट वरुन दिसून येते. तक्रारदाराने दिनांक 26.1.2014 रेाजी मोबाईल गॅलरी, मुंलुंड पश्चिम, यांचे कडून नविन मोबईल खरेदी केला होता. सदर मोबाईल खरेदीच्या बिलानुसार मोबाईलचा वॉरंटी कालावधी एक वर्षाचा असल्याने तो दिनांक 25.1.2015 पर्यत होता. तक्रारदारांचा मोबाईल वॉरंट कालावधीत नादुरुस्त झालेला असल्यामुळै सा.वाले क्र. 1 व 2 हे सदर मोबाईलचे मुळ उत्पादक व दुरुस्ती सेवा पुरवठादार असल्याने त्यांनी तो वॉरंटी कालावधीत विनामुल्य दुरुस्ती करुन देणे अथवा त्याच प्रकारचा नवीन मोबाईल तक्रारदारांना देणे क्रमप्राप्त ठरते असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणी सा.वाले क्र. 1 व 2 हे तक्रारदाराचा मोबाईल दुरुस्त करण्यास असमर्थ ठरले अशा परिस्थितीत त्यांनी तक्रारदाररास बददून दिलेला मोबाईल हा मुळ मोबाईलपेक्षा वेगळा व कमी दर्जाचा असल्याचे तक्रारदारांनी तो स्विकृत केला नाही. अशा परिस्थितीत सा.वाले यांनी तक्रारदारास मोबाईल खरेदीची किंमत परत करणे संयुक्तीक राहील असे मंचाचे मत आहे. वास्तविक सा.वाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना त्यांच्या मुळ मोबाईल प्रमाणे व तेवढयाच किंमतीचा दुसरा नविन मोबाईल देणे अपेक्षित आहे. परंतु खरेदी किंमतीवर 18 टक्के दराने व्याजासह रक्कमेची मागणी करणे संयुक्तीक वाटत नाही. कारण तक्रारदाराने जवळपास 7 ते 8 महीने मोबाईल वापरलेला आहे.
6. तक्रारदाराने मोबाईल दुरुस्तीसाठी सा.वाले क्र. 1 व 2 यांचेकडे दिल्यामुळे दुरुस्तीचा कालावधीत मोबाईल अभावी त्यांचे व्यवसायाचे जवळपास रु.25,000/- इतक्या रक्कमेचे नुकसान झाले. परंतु या बाबत तक्रारदाराने नुकसानीचा तपशिल दिलेला नाही. तसेच केवळ मोबाईल हँडसेटच्या अभावी व्यवसायाचे नुकसान झाले हे म्हणणे संयुक्तीक वाटत नाही. त्यामुळे तक्रारदारांची सदरची मागणी मान्य करता येणार नाही.
7. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराचा मोबाईल वॉरंटी कालावधीत असल्यामुळे तो बदलून दिला नाही. अथवा मोबाईल खरेदीची रक्कमसुध्दा तक्रारदारास परत केली नाही. सदर बाब ही सा.वाले क्र. 1 व 2 यांची सेवेतील त्रृटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब या सदरात मोडते. म्हणून तक्रारदार हे सा.वाले यांचे कडून मोबाईल खरेदीची रक्कम परत मिळण्यास व शाररिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहेत. म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 2/2015 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सा.वाले यांनी तक्रारदार यांना वॉरंटी कालावधीत मोबाईल दुरुस्ती संबंधी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे जाहीर करण्यात येते.
3. सा.वाले 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना मोबाईल खरेदी रक्कम रक्कम रु.14,390/- परत करावी अथवा त्याच प्रकारचा व त्याच किंमतीचा नविन मोबार्इल तक्रारदारांना देण्यात यावा असा आदेश मंच पारीत करीत आहे. सदरहू आदेशाची सा.वाले यांनी 30 दिवसाचे आत पुर्तता न केल्यास रु.14,390/- ही रक्कम वसुल होईपावेतो 9 टक्के व्याजासह रक्कम परत करावी असा आदेश मंच पारीत करीत आहे.
4. सा.वाले यांनी तक्रारदार यांना मानसिक व शाररिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- अदा करावेत असे आदेश मंच पारीत करीत आहे.
5. सा.वाले यांनी सदर आदेशाची पुर्तता/नापुर्तता करणेबाबत शपथपत्र दाखल करणेकामी नेमण्यात येते दिनांक 30.09.2015
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 14/08/2015