नि का ल प त्र :- (व्दारा- मा. सदस्य, श्री. दिनेश एस. गवळी) (दि .06-06-2015)
(1) प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने नुकसान भरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केला आहे.
प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. नं. 1 व 2 यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे व वि.प. तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्तीवाद ऐकला. तक्रारदार तर्फे लेखी युक्तीवाद दाखल केला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
तक्रादार हे शेतकरी कुटूंबातील असून पारंपारिक शेती व्यवसायावर आपले कुटूंबाचे चरितार्थ करिता वि.प. नं. 2 उत्पादित “न्यू हॉलंड ” ट्रॅक्टर 55 एच.पी.टर्बो व हायड्रोलिक नांगर खरेदी घेणेसाठी म्हणून रक्कम रु. 1,00,100/- दि. 20-10-2011 रोजी वि.प. नं. 1 यांचेकडे रिसीट नं. 2366 ने ट्रॅक्टरचे बुकींग केले. त्यानंतर नियमाप्रमाणे रक्कम रु. 7,14,900/- ट्रॅक्टरकरिता भरले. तक्रारदारांनी वि.प.नं. 1 कडे एकूण रक्कम रु. 8,15,000/- दि. 21-10-2011 रोजी रिसीट नं. 303 ने तक्रारदारांनी वि.प. नं. 1 यांचेकडून वि.प. नं. 2 उत्पादित ट्रॅक्टर खरेदी केला. तक्रारदारांनी ट्रॅक्टर वाहनाची सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन दि. 24-10-2011 रोजी डिलिव्हरी घेतली. परंतु सदरचा ट्रॅक्टर हा सुरुवातीस योग्य त्या प्रमाणात नवीन ट्रॅक्टर लोड घेत नव्हता म्हणून वि.प. कडे तक्रार केली. त्यानंतर वि.प. कंपनीचे अधिकृत मॅकेनिकने तक्रारदाराचे ट्रॅक्टरची पाहणी करुन ट्रॅक्टरचे मशिनमध्ये तांत्रिक दोष असलेने दुरुस्त करुन देत असे सांगितले. तदनंतर यु.जी. गिअर बॉक्स देखील दोष व बिघाड असलेला ट्रॅक्टर परत घेवून नवीन ट्रॅक्टर तक्रारदारांना देतो असे सांगतिले. व दि. 24-10-2011 रोजी दिलेला ट्रॅक्टर तक्रारदाराकडून परत घेतला. त्यानंतर वि.प. यांचे अधिकृत मेकॅनिक यांनी कबुल केलेप्रमाणे वि.प. कंपनीने नोव्हेंबर 2011 मध्ये उत्पादित केलेला चेसीस नं. 2194229, इंजिन नं. 083249 डी.टी. हा दुसरा नवीन ट्रॅक्टर तक्रारदारांना दि. 6-12-2011 रोजी दिला. सदर ट्रॅक्टर तक्रारदारांनी घेतलेनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे दि. 15-02-2012 रोजी नोंद करुन ट्रॅक्टरला एम.एच.09 बी.पी. 4167 असा नंबर मिळाला. व दुस-या नवीन ट्रॅक्टरला दि. 6-12-2012 ते 6-12-2013 पर्यंत दोन वर्षाची वि.प. कंपनीने वॉरंटी दिली होती. वॉरंटी कालावधीमध्ये ट्रॅक्टरमध्ये काही बिघाड व दोष आढळल्यास ते कंपनी दुर करुन देईल अथवा काही उत्पादित दोष असलेस कोणताही मोबदला न घेता नवीन ट्रॅक्टर देणेत येईल असे सांगितले.
तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे नमूद करतात की, तक्रारदारांनी ट्रॅक्टरसाठी नातेवाईंकडून कडून रु. 1,00,000/-, रत्नाकर बँक लि यांचेकडून रु. 8,18,040/- कर्जाऊ रक्कम घेऊन वि. प. यांचेकडून ट्रॅक्टर खरेदी केला होता. परंतु वि.प. यांनी दिलेला दुसरा ट्रॅक्टरमध्ये उत्पादित दोष आणि बिघाड असलेचे निष्पन्न झालेने ट्रॅक्टर दोन वर्षाचे 670 दिवसांपैकी केवळ 225 दिवसांमध्ये सुमारे 1800 तास विना अॅव्हरेज चालला व 445 दिवस बंद अवस्थेत वि.प. कंपनीचे वर्कशॉपमध्ये पडून होता त्यामुळे तक्रारदारांचे नुकसान झाले. तक्रारदारांनी शेतीची कामे करणेकरिता रु. 1,95,000/- चे पंकज पाचट कटिंग मशिन तसेच रु. 1,12,500/- चे मयुर रोटर चॅम्पीयन मशिन आणि रु. 1,07,500/- साडेसहा फुट रोटर मशिन अशी विविध शेती अवजारे खरेदी केली होती. सदरची सर्व अवजारे या ट्रॅक्टरवर चालत होती. वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेला दुसरा ट्रॅक्टरही उत्पादित दोष बिघाड असलेमुळे शेतीची अवजारे एकाच जागेवर ठेवलेमुळे वातावरणामुळे गंजून खराब झाली आहेत. तक्रारदारांना दिलेला दोषी ट्रॅक्टरमुळे तक्रारदारांचे नुकसान झाले आहे. दुस-या ट्रॅक्टरचे इंजिनमध्ये उत्पादित दोष असलेची खात्री झाल्यानंतर ट्रॅक्टरचे इंजिन बॉश पंप व टर्बो किट काढून दिल्ली येथील वर्कशॉपमध्ये पाठविले. एक महिन्याच्या कालावधीनंतर नविन इंजिन दिले आहे असे तक्रारदारांना सांगून जुनेच दोष असलेले इंजिन ट्रॅक्टरला जोडून तक्रारदारांची वि.प. यांनी फसवणूक केली आहे. म्हणून तक्रारदारांनी दि. 23-10-2013 रोजी रितसर नोटीस पाठवून नुकसानभरपाईची मागणी केली आहे. वि.प. यांनी सदर नोटीसीस बेकायदेशीर उत्तर दिलेले आहे. परंतु उत्पादित दोष असलेल्या ट्रॅक्टरबाबतची वस्तुस्थिती वि.प. यांनी नाकारलेली नाही.
तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे असे कथन करतात की, तक्रारदार यांना दिलेल्या दुस-या ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टर शेतामध्ये नांगरट करताना अॅव्हरेज देत नाही, ट्रॅक्टरची वेळोवेळी ऑईल बदली केली तरी वि.प. चे मॅन्युएलप्रमाणे अॅव्हरेज देत नाही, वेळोवेळी दुरुस्तीकरिता ट्रॅक्टर बंद राहिलेमुळे तक्रारदारांचा खर्च होऊन मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास तक्रारदारांना झाला. उत्पादित दोष असलेल्या दुस-या ट्रॅक्टरचे इंजिन नविन म्हणून जुनेच इंजिन ट्रॅक्टरला जोडून तक्रारदारांची वि.प. यांनी फसवणूक केली आहे. ट्रॅक्टरमध्ये तांत्रिक दोष व बिघाड असलेला ट्रॅक्टर तक्रारदार यांना वि.प. यांनी दिलेमुळे सिझनमध्ये शेतीच्या नांगरटीची कामे तक्रारदारांना करता आली नाहीत. त्यामुळे तक्रारदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, ट्रॅक्टरला जादा ऑईल लागते. ट्रॅक्टर शेतातील मशागत करताना लोड व पिकअप घेत नाही. तक्रारदारांनी नातेवाईंकडून घेतलेली रक्कम रु. 1,00,000/-, रु. 8,18,040/- रत्नाकर बँक लि., यांचेकडून कर्जाऊ घेतलेली व्याजासह देय असलेली रक्कम, रु. 1,95,000/- दोषी ट्रॅक्टर पडून खराब झालेल्या पंकज पाचट कटिंग मशिनची भरपाई, रु. 1,12,500/- दोषी ट्रॅक्टर पडून खराब झालेल्या मयुर रोटर चॅम्पीयन मशिनची भरपाई, रु. 1,07,500/- दोषी ट्रॅक्टर पडून खराब झालेल्या साडेसहा फुटी रोटर मशिनची भरपाई, रु. 21,100/- ट्रॅक्टरमधील जास्त ऑईल बदलीची खर्चाची नुकसानी, रु. 36,600/- दोषी ट्रॅक्टरने अॅव्हरेज दिलेमुळे जादा डिझेलचा वापर झालेमुळे तक्रारदार यांचे खर्चाची भरपाईची रक्कम, रु. 3,42,362/- कर्जास रक्कमेचे व्याजापोटी खर्ची पडलेली रक्कम, रु. 1,20,000/- दोषी ट्रॅक्टरमुळे सन 2011 ते 2013 चे सिझनमध्ये शेतीचे नांगरटीची कामे न करता आलेमुळे तक्रारदार यांचे नुकसानीची रक्कम, रु. 55,000/- दोषी ट्रॅक्टरमुळे सन 2011 ते 2013 चे सिझनमध्ये शेतीचे नांगरटीची कामे न करता आलेमुळे तक्रारदार यांचे नुकसानीची रक्कम, रक्कम रु. 50,000/- तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटीची रक्कम, व रु. 22,000/- तक्रारीचा, नोटीसीचा, टायपिंग, झेरॉक्स, पोस्टेज, कोर्ट फी, वकील फी इत्यादीची खर्चाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून वि.प. कडून मिळावी अशी तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती केली आहे.
(3) तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्ठीप्रित्यर्थ एकूण 19 कागदपत्रे दाखल केली आहेत. अ.क्र. 1 कडे ट्रॅक्टर खरेदीचे वि.प. नं. 1 यांचेकडील कोटेशन, अ.क्र. 2 कडे वि.प.नं. 1 यांचेकडील अॅडव्हान्स रक्कमेची पावती रु. 1,10,000/-, अ. क्र.3 कडे वि.प. नं. 1 यांचेकडील रक्कम रु. 7,14,900/- ची पावती दि. 14-12-2011 , अ.क्र. 4 कडे पंकज पाचट मशीनचे कोटेशन, अ.क्र. 5 कडे पंकज इंजिनिअरींग पावती रु. 50,000/- दि. 14-12-2011, अ.क्र. 6 कडे पंकज इंजिनिअरींग पावती रु. 50,000/- दि. 14-12-2011, अ.क्र. 7 कडे पंकज इंजिनिअरींग पावती रु. 95,000/- दि. 14-12-2011, अ.क्र. 8 कडे साई स्टील वर्क्सची कोटेशन दि. 14-12-2011, अ.क्र. 9 कडे साई स्टील वर्क्सची पावती दि. 14-12-2011, अ.क्र. 10 कडे साई स्टील वर्क्सची पावती दि. 14-12-2011, अ.क्र. 11 कडे ट्रॅक्टरचे आर.सी.टी.सी. प्रत दि. 15-02-2012, अ.क्र. 12 कडे वि.प. नं. 1 चे पत्र, अ.क्र.13 कडे रत्नाकर बँकेकडील कर्ज खाते प्रत 7-12-2011, अ.क्र. 14 कडे तक्रारदार यांनी पाठविलेली नोटीस दि. 23-10-2013, अ.क्र.15 कडे वि.प. नं. 2 यांनी दिलेले नोटीसीचे उत्तर दि. 13-11-2013, अ.क्र. 16 कडे वि.प. नं. 2 यांचे नोटीसीस उत्तर दि. 12-11-2013, अ.क्र. 17 कडे वि.प. चे वॉरंटी प्रमाणपत्र , अ.क्र. 18 कडे साळोखे ट्रॅक्टर रिपेरींग सेंटर दाखला, अ.क्र. 19 श्री. हरीभाऊ शंकरराव साळोखे यांचे अॅफिडव्हेट दि. 5-12-2013 इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केलेले आहे.
(4) वि.प. नं. 1 यांनी तक्रार अर्जास म्हणणे दाखल केले असून त्यामध्ये तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. तक्रारदारांनी मागणी केलेली नुकसानीची रक्कम चुकीची व खोटी असून वि. प. कडून रक्कम उकळण्याचे हेतूने तक्रार केली आहे. तक्रार अर्जास काहीही कारण घडलेले नाही. तक्रारदार यांनी जी कारणे व आरोप नमूद केलेले आहेत ते खोटे व पश्चातबुध्दीचे आहेत. तक्रारदार हे मे. कोर्टासमोर स्वच्छ हातांनी आलेले नाहीत. प्रस्तुत कामी वि.प. यांनी कोणत्याही प्रकारची सेवेत न्यूनता ठेवलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही. तक्रारदारांनी मे. कोर्टापासून खरी वस्तुस्थिती लपवून ठेवून तक्रार दाखल केली त्यामध्ये तथ्य नाही. वि.प. यांनी तक्रारदार यांना त्यांचे मागणीप्रमाणे ट्रॅक्टरची विक्री केलेली असून विक्रीपश्चात नियमानुसार आवश्यक ती सर्व सेवा पुरविलेली आहे. त्यामुळे वि.प. यांना त्रास देऊन बेकायदेशीर आर्थिक लाभ घेणेचे दूषित हेतूने तक्रार दाखल केलेली आहे ती चालणेस पात्र नाही.
वि.प. नं. 1 त्यांचे म्हणणेत पुढे नमुद करतात की, तक्रारदार यांनी वि.प.नं. 2 यांनी उत्पादित केलेला ट्रॅक्टर “न्यू हॉलंड 5500 टी.टी. टर्बो ” हा 55 एच.पी. चेसीस नं. 2189368 इंजिन नं. 080182 डी. टी. हा टॅक्टर वि.प. नं. 1 यांचेकडून खरेदी केला. त्याची तक्रारदार यांना रितसर नियमानुसार दि. 24-10-2011 रोजी डिलीव्हरी दिली. तक्रारदार यांना नियमानुसार विक्रीपश्चात सेवा पुरविलेली आहे. व जॉबकार्डही मेनटेन केलेले आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना विक्रीबाबत व विक्रीपश्चात योग्य ती सेवा दिलेली असून सेवेमध्ये कोणतीही न्यूनता केलेली नाही. वि.प.नं. 2 हे ट्रॅक्टरचे उत्पादक नसून अधिकृत विक्रेता आहेत. कंपनीने उत्पादित केलेला टॅक्टर हे वि.प. नं. 2 चे डिलर्स अॅग्रीमेंटनुसार कंपनीकडून घेऊन विक्री करतात व त्याबाबत कंपनीचे वॉरंटी, टर्म्स, कंडीशननुसार वॉरंटी कालावधीमध्ये सेवा देतात. तक्रारदार यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेनंतर त्यांना वि.प. नं. 2 यांनी वेळोवेळी सेवा पुरविलेली आहे. तक्रारदार यांची तक्रार व त्यांच्या असमाधानकारक भूमिका व तक्रारीमुळे त्यांना विक्री केलेला व दि. 24-10-2011 रोजी डिलीव्हरी दिलेला ट्रॅक्टर बदलून इंजिन नं. 083249 डी.टी. हा त्याच मॉडेलचा 55 एच.पी. नवीन ट्रॅक्टर बदलून दिला आहे. तक्रारदार यांचे हट्टानुसार वि.प. यांनी एक वेळ संपूर्ण ट्रॅक्टर कंपनीकडून बदली करुन नवीन दिलेला आहे. व एकवेळ संपूर्ण इंजिन पॅक पेटी नवीन बदली करुन दिलेली आहे. वि.प. चे मॅकेनिक व कंपनीचे एक्सपर्ट तक्रारदारांकडे ट्रॅक्टर तपासणीसाठी गेले असता त्यांचा अपमान तक्रारदारांनी केलेला आहे. वि.प. नं. 2 ही ट्रॅक्टर्स उत्पादनातील नावाजलेली कंपनी असून तक्रारदारांना सेवा जास्त दिलेली आहे. तक्रारदारांची तक्रार अॅव्हरेजबाबत आहे. वि.प.यांनी तक्रारदारांना ट्रॅक्टर नियमानुसार अॅव्हरेज देत असलेबाबत खात्री करुन दिलेली आहे. तक्रारदारांनी मे. कोर्टापासून महत्वाची बाबी लपवून ठेवली आहे. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा. तक्रारदारांनी वि.प. विरुध्द खोटी तक्रार दाखल केलेमुळे कॉम्पेनसेटरी कॉस्ट म्हणून रक्कम रु. 50,000/- द्यावी अशी विनंती वि.प. यांनी केली आहे.
(5) वि.प. 1 यांनी दि. 11-11-2014 रोजी एकूण 15 कागदपत्रे दाखल केली आहेत. अ.क्र. 1 कडे तक्रारदार यांना चेसीस नं. 2189368 नुसारचा ट्रॅक्टर डिलीव्हरी चलन दि. 24-10-2011, अ.क्र. 2 तक्रारदार यांना सदर ट्रॅक्टर सोबत दिलेले अॅक्सेसरीज डिलीव्हरी चलन दि. 24-10-2011, अ.क्र. 3 कडे तक्रारदार यांना विक्रीपश्चात सेवा दिलेबाबत जॉब कार्ड दि. 2-11-2011, अ.क्र. 4 कडे तक्रारदार यांना विक्रीपश्चात सेवा दिलेबाबत जॉब कार्ड दि. 2-11-2011, अ.क्र. 5 कडे तक्रारदार यांना चेसीस नं. 2194229 नुसारचा नवीन ट्रॅक्टर बदलून दिलेबाबत डिलिव्हरी चलन दि. 06-12-2011, अ. क्र. 6 कडे तक्रारदार यांना विक्री पश्चात सेवा दिलेबाबत जॉब कार्ड दि. 02-03-2012, अ. क्र. 7 कडे तक्रारदार यांना विक्री पश्चात सेवा दिलेबाबत जॉब कार्ड दि. 26-04-2012, अ. क्र. 8 कडे तक्रारदार यांना विक्री पश्चात सेवा दिलेबाबत जॉब कार्ड दि. 24-04-2012, अ.क्र. 9 कडे तक्रारदार यांना नवीन पॅक पेटी इंजिन बदलून दिलेबाबत. जॉब कार्ड दि. 24-07-2012, अ.क्र. 10 कडे तक्रारदार यांना सेवा दिलेबाबत जॉब कार्ड दि. 28-09-2012, अ.क्र. 11 कडे तक्रारदार यांना सेवा दिलेबाबत जॉब कार्ड दि. 25-12-2012, अ.क्र. 12 कडे तक्रारदार यांना सेवा दिलेबाबत जॉब कार्ड दि. 29-01-2013, अ.क्र. 13 कडे तक्रारदार यांना सेवा दिलेबाबत जॉब कार्ड नं. 30-01-2013, अ.क्र. 14 कडे तक्रारदार यांना सेवा दिलेबाबत जॉब कार्ड दि. 26-05-2013, अ.क्र. 15 कडे तक्रारदार यांना सेवा दिलेबाबत जॉब कार्ड दि. 16-10-2013 इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच दि. 28-04-2015 रोजी वि.प. नं. 1 चे वि.प.नं. 2 कडील अकौंट स्टेटमेंट झालेबाबत वि.प.नं. 2 ने वि. प. नं. 1 ला दि. 13-04-2015 रोजी दिलेले पत्राची प्रत, व दि. 9-04-2015 रोजी एकूण 3 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अ.क्र. 1 कडे वि.प.नं. 1 चे खात्यावरुन डिलरशिप संपलेने वि.प. नं. 2 यांना पेमेंट केलेबाबतचे खाते उतारा दि. 23-03-2015, अ.क्र. 2 कडे वि.प. 1 कंपनीने वि.प. नं. 2 कंपनीस पाठविलेली नोटीसीची प्रत व रजि. ए.डी. पावती दि. 16-03-2015 व अ.क्र. 3 कडे वि.प. 1 कंपनीने वि.प. नं. 2 कंपनीस पाठविलेली नोटीसीची रजि.ए.डी. पोहच दि. 25-03-2015 इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
(6) वि.प. नं. 2 यांनी तक्रार अर्जास म्हणणे दाखल केले असून त्यामध्ये तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. तसेच तक्रार अर्जातील कलम 2 मधील झालेला व्यवहार हा परकीय असून तो त्यांना माहित नाही. वि.प.नं. 2 यांचे सदर व्यवहाराशी कोणताही संबंध नाही. वि.प. नं. 2 यांचे ऑफिस अथवा त्यांची शाखा सदर कोर्टाचे अधिकारक्षेत्रात नाही त्यामुळे मे. मंचास सदरची तक्रार चालविणेचा अधिकार नाही. तक्रारदाराने केलेल्या मागण्या योग्य नाहीत त्यामुळे त्या फेटाळण्यात याव्यात. वि.प. “न्यू हॉलंड ” या ब्रॅन्ड नावाने कंपनी ट्रॅक्टरची विक्री करते. वि.प. कंपनी ट्रॅक्टर्स डिलर्सला विकते त्यानंतर डिलर्स ते ग्राहकांना विकतात त्यामुळे कंपनी आणि डिलर्स यांचेमधील नाते प्रिन्सीपल-टू-प्रिन्सीपल असे असून त्याचेमध्ये प्रिन्सीपल आणि एजंट असे नाते नाही. हायड्रोलिंक plough हा वि.प. न्यू हॉलंड Fiat कंपनी उत्पादीत करीत नाही त्यामुळे त्यांचेशी या वि.प. चा कोणताही संबंध नाही. वादातील ट्रॅक्टर हा डिलरने तक्रारदारास विकलेला आहे. कंपनीने डायरेक्ट विकलेला नाही. कंपनीमार्फत उत्पादित केलेले ट्रॅक्टर्स हे कंपनीमार्फत क्वालिटी कंट्रोल टेस्ट करुन उत्पादित केले जातात की जेणेकरुन ते उच्च दर्जाचे ग्राहकांना मिळावेत. सदरची कंपनी बाजारात नावाजलेली आहे तिला ISO 9001-20001 सर्टिफिकेट मिळालेले आहे.
वि.प. त्यांचे म्हणण्यात पुढे असे कथन करतात, वि.प.नं. 2 यांनी वॉरंटीच्या नियमाप्रमाणे शर्तीप्रमाणे सेवा दिली असून एकदा ट्रॅक्टर बदलूनही दिलेला आहे. आणि एकदा इंजिन बदलून दिलेले आहे. ब-याचवेळा तक्रारदारांना चांगली सेवा दिलेली आहे. परंतु तक्रारदाराचे वर्तन योग्य नसलेने प्रत्येकवेळी तांत्रिक बाबीचा आधार घेऊन ते कंपनी व डिलर्स विरुध्द तक्रार करत असत. वि.प. यांनी तक्रारदारांना देणेचे सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवेलेली नाही. त्याचप्रमाणे त्याची तक्रार ट्रॅक्टरमध्ये उत्पादित दोष असलेबाबत नाही. तसेच अलिकडेच कंपनीचे तंत्रज्ञ यांनी चाचणी घेतली असता त्यांना असे आढळून आले की diesel consumption हे कंपनीचे नॉर्मसप्रमाणे within limit मध्ये आहे. परंतु तक्रारदार हे कंपनीचे चांगुलपणाचा व सेवाचा गैरफायदा घेऊन पहात आहेत. तक्रारदाराने खरेदी केलेला ट्रॅक्टर हा वॉरंटी कार्डप्रमाणे व अटी व शर्तीप्रमाणे घेतलेला असून आणि त्याप्रमाणे त्यातील नमूद अटी व शर्ती पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे नुकसानभरपाईचा प्रश्नच निर्माण होत नाही त्यामुळे कंपनीचा तक्रारदार व वि.प.नं. 1 यांचेमध्ये झालेल्या व्यवहाराचे अनुषंगाने होणारे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी येत नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत नामंजूर करणेत यावी व तक्रारदार यांचेवर कॉम्पेनसेटरी कॉस्ट म्हणून रक्कम रु. 50,000/- बसवावेत.
(7) तक्रारदारांचा तक्रार अर्ज, तक्रारीसोबत दाखल कागदपत्रे, तक्रार अर्जास वि.प. यांनी दाखल केलेले म्हणणे व उभय पक्षकारांचे वकिलांचा युक्तीवादाचा विचार करता पुढील मुद्दे निष्कर्षासाठी मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? होय.
2. तक्रारदार तक्रार अर्जात नमूद
नुकसानभरपाईची मिळणेस पात्र आहेत काय ? होय अंशत:.
3. तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम
मिळणेस पात्र आहेत काय? होय.
4. आदेश काय ? अंतिम निर्णयाप्रमाणे.
कारणमीमांसा:-
मुद्दा क्र.1:
प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार हे शेतकरी असून वि.प.नं. 2 ही न्यू हॉलंड या नावाने ट्रॅक्टर्स उत्पादित करणारी कंपनी असून वि.प.नं. 1 हे कोल्हापूर येथील डिलर आहेत. तक्रारदारांनी वि.प.नं. 1 यांचेकडून वि.प. कंपनीने उत्पादित केलेला ट्रॅक्टर प्रथमत: दि. 24-10-2011 रोजी खरेदी केला परंतु सदर ट्रॅक्टरमध्ये उत्पादित दोष असल्याने सदरचा ट्रॅक्टर वि.प.यांनी परत घेऊन दि. 6-12-2011 रोजी चेसिस नं. 2194229 व इंजिन नं. 083249 डी.टी. हा नवीन ट्रॅक्टर तक्रारदारांना दिला. त्याप्रमाणे वि.प. यांनी तक्रारदारांना वॉरंटी प्रमाणपत्र दिलेले आहे. सदर ट्रॅक्टरला दोन किंवा 2400 तासांची वॉरंटी आहे. सदरचा वॉरंटी काळामध्ये केवळ 225 दिवसांमध्ये सुमारे 1800 तास ट्रॅक्टर कसाबसा विना अॅव्हेरेज चालला आणि जवळजवळ 445 दिवस बंद अवस्थेत वि.पचे वर्कशॉपमध्ये पडून होता. ट्रॅक्टरला अॅव्हेरेज नाही. तसेच दि. 2-07-2012 रोजी ट्रॅक्टरचे इंजिन खराब असलेमुळे कंपनीकडून पॅक पेटी नवीन इंजिन बसवून न देता सदर ट्रॅक्टरचे जुनेच इंजिन बसवुन ट्रॅक्टर तक्रारदारांना दिला आहे. सबब तक्रारदार यांना वि.प. यांनी उत्पादित दोष असलेला ट्रॅक्टर देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे, म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केला आहे. सदर तक्रारीस वि.प. यांनी म्हणणे दाखल केले असून त्यामध्ये त्यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिलेली नाही. तसेच सदरच्या ट्रॅक्टरला चांगले अॅव्हरेज होते. वि.प. यांनी तक्रारदारांना पॅक पेटी इंजिन बदलून दिले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारांना ट्रॅक्टर दुरुस्त करुन वेळचेवेळी योग्य ती सेवा दिली आहे. वि.प. यांनी सेवेत त्रुटी ठेवली नाही.
प्रस्तुत प्रकरणात तक्रारदाराची तक्रार, वि.प. चे म्हणणे व उभय वकिलांचा युक्तीवाद या सर्व बाबींचा साकल्याने विचार करता, प्रस्तुत कामी तक्रारदारांना दि. 6-12-2011 रोजी वि.प. यांचेकडून विक्री केलेल्या ट्रॅक्टर नं. इंजिन नं.083249 डी.टी मध्ये उत्पादित दोष हाता का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्दयांचे अनुषंगाने या मंचाने तक्रारदारांचे तसेच वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदारांना दि. 6-12-2011 रोजी इंजिन नं.083249 डी.टी. चा ट्रॅक्टर वि.प. यांनी विक्री केलेला आहे. सदरची बाब वि.प. यांनी त्यांचे म्हणणेमध्ये मान्य केली आहे. त्याबद्दल वाद नाही. सदरचा ट्रॅक्टर घेतले नंतर सदरचा ट्रॅक्टर अॅव्हरेज देत नसल्याने तक्रारदाराने वि.प. यांचेकडे सदरचा ट्रॅक्टर वॉरंटी काळात सर्व्हीस डिलरकडे दिल्याबद्दल वॉरंटी प्रमाणपत्र दाखल केले असून सदर वॉरंटीप्रमाणपत्राचे पाठीमागे अॅव्हेरज प्रॉब्लेम असे नमूद असून त्यावर तारीख व तास नमूद आहेत. त्याचप्रमाणे वि.प. यांनी दाखल केलेल्या जॉब कार्डवरती देखील ऑईल चेंज, जनरल चेकअप असे नमूद आहे त्यामुळे प्रस्तुतचा ट्रॅक्टर वि.प.यांचेकडे सदर कालावधीमध्ये सर्व्हीससाठी गेला असलेचे दिसून येते. तथापि, वि.प. नं. 1 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये दि. 24-07-2012 रोजी तक्रारदार यांने ट्रॅक्टरच्या इंजिनबाबत वाद करुन असामाधन व्यक्त करुन कंपनीच्या प्रतिनिधीला व प्रस्तुत वि.प. यांचे प्रतिनिधीना त्रास दिलेने कंपनीकडून पेटी पॅक नवीन इंजिन मागवून ट्रॅक्टरला नवीन इंजिन बदलून दिले असे नमूद आहे. तथापि, तक्रारदार यांनी वि.प. यांनी नवीन इंजिन न देता जुनेच इंजिन बसवून दिले आहे असे लेखी युक्तीवादात नमूद केले आहे. त्याअनुषंगाने या मंचाने सदर कामी दि. 24-07-2012 रोजीचे नंतरचे जॉबकार्ड दि. 28-09-2012 रोजीचे पाहिले असता त्यावर इंजिन 083249 असेच नमूद आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी आपल्या कागद यादीसोबत दि. 28-11-2013 रोजीचा श्री. साळोखे यांचा दाखला हजर केला असून त्यामध्ये त्यांनी ट्रॅक्टरचा इंजिन नं. 083249 डी.टी. असा नमूद करुन सदरचा ट्रॅक्टर चाचणी करुन पाहिला असता, ट्रॅक्टर लोड घेत नाही. पिकअप नाही. अॅव्हरेज नाही असे नमूद केले आहे. त्याचे पृष्ठयर्थ त्यांनी या मंचात शपथपत्रही दाखल केलेले आहे. यावरुन वि.प. कंपनी पेटी पॅक नवीन इंजिन बदलून न देता जुनेच इंजिन नं.083249 डी.टी. या नंबरचे इंजिन बसविलेचे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे तक्रारदाराचे तक्रार अर्जात नमूद ट्रॅक्टरमध्ये वर नमूद केलेप्रमाणे इंजिनमध्ये दोष आहे हे दिसून येते. तथापि वि.प.यांनी तक्रारदाराने प्रस्तुत कामी Expert Opinion दाखल केलेले नाही असा बचाव घेतलेला असून श्री. साळोखे यांनी दिलेले मत विचारात घेऊ नये असे कथन केले याचा विचार करता, तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे वि.प. यांनी तक्रारदारांना दि. 24-10-2011 रोजी विकलेला पाहिला ट्रॅक्टर सदोष असलेमुळे वि.प. यांनी त्यांना दूसरा नवीन ट्रॅक्टर इंजिन नं. 083249 दिलेला आहे व त्यामध्येही वारंवार दोष निर्माण झालेले आहेत ही वस्तुस्थिती तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन या मंचाचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सदरचा बचाव हे मंच या ठिकाणी विचारात घेत नाही. प्रस्तुत कामी वि.प. नं. 2 यांनी कंपनी आणि डिलर्स यांचेमधील नाते प्रिन्सीपल-टू-प्रिन्सीपल असे असून त्यांचेमध्ये प्रिन्सीपल आणि एजंट असे नाते नाही असे नमूद करुन आपली जबाबदारी नाकारली आहे. त्याचप्रमाणे वि.प. नं. 1 यांचे वकिलांनी युक्तीवादाचे वेळी वि.प.नं. 1 कडील वि.प. नं. 2 कंपनीची डिलरशिप खंडीत (Terminate) झालेली आहे असे कथन करुन संबंधीत कंपनीचा खातेउतारा दाखल केलेला आहे. त्यामुळे वि.प.नं. 1 नुकसान भरपाई रक्कम देय लागत नाही असे कथन केले आहे. सदर बाबीचा विचार प्रस्तुत कामी वि.प.नं. 1 यांनी तक्रारदारांना वि.प. नं. 2 कंपनी यांनी उत्पादित केलेला सदोष ट्रॅक्टर विकलेला आहे. त्यामुळे वि.प.नं. 1 व 2 हे केवळ तांत्रिक बाबीचा आधार घेऊन आपली जबाबदारी नाकारु शकत नाहीत असे या मंचाचे मत आहे. उपरोक्त परिस्थितीचा विचार करता तक्रारदारांनी प्रथम घेतलेल्या ट्रॅक्टरमध्ये उत्पादीत दोष होते व तो वि.प. यांनी बदलून दिलेला आहे व त्यानंतरही नवीन दिलेल्या ट्रॅक्टरमध्ये वर नमूद केलेप्रमाणे दोष निर्माण झालेले आहेत स्पष्टपणे दिसून येते. वरील सर्व बाबींचा विचार करता वि.प. नं. 2 यांनी उत्पादित केलेला ट्रॅक्टर व वि.प. 1 यांनी वि.प. 2 यांचे डिलर म्हणून तक्रारदार यांना सदोष ट्रॅक्टर विक्री करुन तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत वि.प. नं. 1 व 2 यांनी त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2 :-
वि.प. नं. 1 व 2 यांनी. 1 मध्ये नमूद केलेप्रमाणे तक्रारदारांना सदोष ट्रॅक्टर देऊन सेवेत त्रुटी ठेवली असल्याने, इंजिन नं. 083249 डी.टी. चा ट्रॅक्टर परत घेऊन तक्रारदार यांना सदर ट्रॅक्टरची किंमत रक्कम रु. 7,14,900/- तसेच सदर रक्कमेवरती तक्रार स्विकृत दि. 20-12-2013 पासून ते संपूर्ण रक्कम मिळोपावेतो द.सा.द.शे. 6 % व्याज अदा करावेत. सदर आदेशाची अमंलबजावणी करण्यासाठी वि.प.नं. 1 उत्पादित कंपनी व वि.प. क्र. 2 विक्रेते हे वैयक्तीक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे. तथापि, तक्रारदारांनी तक्रार अर्जात नुकसानभरपाई दाखल मागणी केलेल्या अन्य रक्कमा जसे हातउसने घेतलेली रक्कम, कर्जास घेतलेली अद्याप देय रक्कम, पंकज पाचट कटींग मशिन भरपाई, मयुर रोटर चॅम्पीयन भरपाई मशीनची रक्कम, नांगरटीची कामे इत्यादी बद्दलची नुकसानभरपाई रक्कम तक्रारदारांनी योग्य तो कागदोपत्री पुरावा मे. मंचात दाखल न केलने सदरची रक्कम तक्रारदार मिळणेस पात्र नाहीत असे या मंचाचे मत आहे.
मुद्दा क्र. 3 :-
प्रस्तुतची तक्रार ही वि.प यांनी तक्रारदारांना सदोष ट्रॅक्टर दिलेमुळे दाखल करावी लागली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला तसेच त्यांना सदरची तक्रार दाखल करण्यासाठी खर्च करावा लागला आहे. त्यामुळे मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 4,000/- तक्रारदार मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 4 : सबब, हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि.प. नं. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रादारांना ट्रॅक्टर खरेदीची किंमत रक्कम रु. 7,14,900/- (अक्षरी रुपये सात लाख चौदा हजार नऊशे फक्त) नुकसान भरपाई म्हणून अदा करावेत. व सदर रक्कमेवरती तक्रार स्विकृत दि. 20-12-2013 रोजीपासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 % प्रमाणे व्याज अदा करावे. तक्रारदारांनी वि.प. यांना तक्रार अर्जात नमूद केलेला ट्रॅक्टर परत करावा.
3. वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 4,000/- (अक्षरी चार हजार फक्त ) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 60 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.