द्वारा- श्री.ना.द.कदम...................मा.सदस्य.
1. सामनेवाले 2 ही टि.व्ही उत्पादक कंपनी आहे. सामनेवाले 1 हे, सामनेवाले 2 यांचे वितरक आहेत. सामनेवाले 2 यांनी उत्पादीत केलेले एलईडी टीव्ही तक्रारदारांनी सामनेवाले 1 यांचेकडुन विकत घेतल्यानंतर, सदर टीव्ही सदोष निघाल्याच्या बाबीतुन प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदाराच्या तक्रारीमधील कथनानुसार, सामनेवाले 2 यांनी उत्पादित केलेला, 50” एलईडी टीव्ही सामनवेाले 2 यांचेडुन रु. 53,990/- या किमतीस दि. 02/5/2014 रोजी विकत घेतला. सदर टीव्ही फिटींग करण्यासाठी सामनेवाले 2 यांचे इंजिनिअर श्री. विनोद, दि. 07/05/2014 रोजी घरी येवुन त्यांनी बॉक्स ओपन केला असता टीव्हीस आगेदरच हुक आणि स्टँण्ड, फिटींग केल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर सर्विस इंजिनिअरने याबाबत आश्चर्य व्यक्त केले. यानंतर, सर्विस इंजिनिअरने टीव्ही ठेबलावर माऊंट करुन चालु केला परंतु त्यामधील पिक्चर्स थोडीशी अस्पष्ट दिसत होती. त्यामुळे इंजिनिअरच्या सांगण्यानुसार, टीव्हीची केबल तपासली परंतु पिक्चरमध्ये काही फरक पडला नाही. सदर टीव्ही टेबलाऐवजी भिंतीवर लावणे श्रेयसकर असल्याने तकारदाराच्या विनंतीनुसार सर्विस इंजिनियरने दि. 23/05/2014 रोजी भिंतीवर टीव्ही लावून दिला. त्यावेळी तो काही क्षणापुर्ता चालू झाला. परंतु त्यानंतर रात्री चालु केला असता त्यामध्ये उभ् भ्या आडव्या अशा रेषा येऊ लागल्याने याबाबतची तक्रार दि. 24/05/2014 रोजी केली असता, सामनेवाले 2 यांचे इंजिनिअरने तपासणी केली असता टीव्हीचा पॅनल खराब झाल्याचे त्यांनी सांगून याबाबतची तक्रार, सामनेवाले 2 यांचेकडे ते करतील असे सांगितले. यानंतर दि. 27/05/2015 रोजी सदर इंजिनिअरकडे विचारणा केली असता, पॅनलची आर्डर देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु दोनच दिवसानंतर सामनेवाले 2 यांचे कार्यालयातुन तक्रारदारांना फोन आला व रु. 30,000/- भरण्यास सांगितले परंतु टीव्ही वॉरंटीमध्ये असल्याने व टीव्ही उत्पादनामध्येच दोष असल्याने तक्रारदारांनी सदर रक्कम भरण्यास नकार दिला यानंतर अनेकवेळा विनंती करुनही, सामनेवाले यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन टीव्हीची मुद्दल रक्कम व नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या तक्रारदारांनी केल्या आहेत.
3. सामनेवाले 1 यांनी लेखी कैफियत दाखल करुन असे नमुद केले की, ते सामनेवाले 2 यांच्या टीव्हीचे केवळ विक्रेते आहेत. त्यामुळे, टीव्ही च्या उत्पादनामध्ये काही दोष असल्यास, त्यास सामनवेाले 2 जबाबदार राहतात. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदारांना टीव्ही विकल्यानंतर तो त्यांच्या सांगण्याप्रमाणे टेबलवर बसवुन देण्यात आला व काही काळ तक्रारदारांनी त्याचा वापर केला म्हणजेच सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना टी.व्ही ची डिलीव्हरी व्यवस्थितपणे केली होती ही बाब स्पष्ट होते. त्यामुळे, सामनेवाले 1 यांची कोणतीही जबाबदारी येत नाही.
4. सामनेवाले 2 यांनी, लेखी कैफियत दाखल करुन प्रामुख्याने असे नमुद केले आहे की, सामनेवाले यांचे टेक्नीशियनने, तक्रारदाराचा टीव्ही बसवुन दिल्यानंतर तो 27 दिवस वापरामध्ये होता. तक्रारदारांनी त्यांचा टीव्ही, मूव्हेवल ब्रॅकेटचा वापर करुन भिंतीवर लावण्यासाठी स्टँण्डर्ड ब्रॅकेटचा वापर न करता, बाजारामधुन ब्रँकेट आणून टीव्ही अनाधिकृतपणे भिंतीवर बसवुन घेतला. त्यामुळे टीव्हीस काही नुकसान झाले असल्यास सामनेवाले 2 हे जबाबादार राहु शकत नाही. तकारदाराच्या टीव्हीचा पॅनल तक्रारदाराच्या चुकीच्या हाताळणीमुळे खराब झाला असल्याने त्यास सामनवेाले 2 हे जबाबदार राहु शकत नाहीत.
5. तकारदार व सामनेवाले 1 यांनी पुरावा शपथपत्र दाखल केले. सामनेवाले 2 यांना बराच काळ संधी मिळुनही त्यांनी पुरावा शपथपत्र दाखल केले नाही. उभय पक्षांनी लेखी युक्तिवाद दाखल केला व त्यांचा तोंडी युक्तिवाद ही ऐकण्यात आला. उभय पक्षांचा वाद प्रतिवाद व शपथेवर दाखल केलेली कागदपत्रे यांचे वाचन मंचाने केले त्यावरुन प्रकरणामध्ये खालील प्रमाणे निष्कर्ष निघतात.
अ) प्रकरणात, तक्रारदारांनी सामनेवाले 2 यांच्या कंपनीचा 50” एलईडी टीव्ही, सामनेवाले 1 यांच्याकडुन दि. 05/05/2014 रोजी विकत घेतल्याची बाब, उभय पक्षी मान्य करण्यात आली आहे. तसेच सदर टीव्ही तक्रारदाराच्या सदनिकेमध्ये प्रथमतः टेबलावर व त्यानंतर, भितीवर सामनेवाले 2 यांचे सर्विस इंजिनिअर श्री. विनोद यांनी बसवुन दिल्याची बाब उभय पक्षी मान्य केली आहे. तसेच तक्रारदाराचा टीव्ही भिंतीवर बसविल्यानंतर लगेचच टीव्ही पुर्णतः नादुरूस्त झाल्याची बाब उभय पक्षांनी मान्य केली आहे.
ब) प्रस्तुत प्रकरणामध्ये, प्रामुख्याने तक्रारदारांना विकण्यात आलेला टीव्ही हा विक्री पुर्व सदोष होता काय ? किंवा तकारदाराच्या चुकीच्या हाताळणीमुळे टीव्ही मध्ये दोष निर्माण होऊन त्याचे पॅनल खराब झाले काय ? या बाबी निश्चित करणे आवश्यक आहे, असे मंचास वाटते.
या संदर्भात असे नमुद करावेसे वाटते की, तक्रारदार यांचा टीव्ही दि. 07/05/2014 रोजी बसविण्यासाठी सर्विस इंजिनिबर श्री विनोद यांनी बॉक्स ओपन केला असता तो टीव्ही टेबल माऊन्टिंग ब्रँकेट आगोदरच फिट करुन आल्याचे इंजिनिअरच्या निदर्शनास आले व माऊंन्टिंग ब्रॅकेट हे स्वतंत्रपणे असते व ते माऊंटिंग करतांना टेक्नीशियन बसवतो असे टेकनीशीअनने नमुद केल्याची बाब तक्रारदारांनी तक्रारीमध्ये शपथेवर कथन केली आहे. मात्र याबाबत सामनेवाले 1 व 2 यांनी कोणताही खुलासा कैफियत शपथपत्र अथवा लेखी युक्तिवादामध्ये केला नाही. या शिवाय दि. 07/05/2014 रोजी टीव्ही टेबलावर माऊंट केल्यानंतर चित्रे असपष्ट दिसत होती याबाबतची तक्रार सर्विस इंजिनिअरकडे त्याचवेळी केली होती परंतु त्याने केबल तपासून पाहण्याचा सल्ला दिला. मात्र केबल व्यवस्थित असतांनाही अस्पष्ट चित्रे दिसत होती या तक्रारदाराच्या कथनाबाबत सामनेवाले यांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे.
क) सामनेवाले 2 यांचे सर्विस इंजिनिअर श्री. विनोद यांनी दि. 07/05/2014 रोजी टेबलवर माऊंट केलेला टीव्ही, दि. 23/05/2014 रोजी भिंतीवर माऊन्ट केला ही बाब तक्रारदारांनी स्पष्टपणे नमुद केली आहे. मात्र ही बाब सामनवाले 1 व 2 यांनी नाकारलेली नाही.
5. दि. 23/05/2014 रोजी टीव्ही वॉल माऊन्ट केल्यानंतर तो काही सेकंदापुरताच टेक्लीशियनने चालु करुन दिला यानंतर त्यादिवशी तक्रारदारांनी मधला काळ टीव्ही बंद केला व रात्री 10 वाजता चालु केला असता त्यामध्ये उभ्या आडव्या रेषा दिसू लागल्या व याबाबतची तक्रार लगेच दुस-या दिवशी करण्यात आली व यानंतर पॅनल खराब झाल्याचे निदान सामनेवाले 2 यांचे सर्विस इंजिनिअर यांनी केले व सदर पॅनलसाठी तक्रारदाराकडुन सामनेवाले 2 यांनी प्रथमतः रु. 30,000/- मागणी केली. या संदर्भात असे नमुद करावेसे वाटते की, तक्रारदारांना विकण्यात आलेल्या टीव्हीमध्ये दि. 07/05/2014 पासूनच पिक्चर क्वॉलीटीमध्ये दोष होते यानंतर, सदर टीव्ही वॉल माऊंन्ट केल्यानंतर त्याच दिवसापसून टीव्ही पुर्णतः खराब झाल्याचे स्पष्ट होते. सामनेवाले 2 यांचे प्रतिनिधीने तोंडी युक्तिवादाचे वेळी प्रामुख्याने असे नमुद केले की, तक्रारदाराच्या वॉलमाऊंन्ट टीव्हीवर बाहेरील एखाद्या वस्तुचा आघात (External Force) झाला असल्यामुळे पॅनल खराब झाला आहे. या निष्कर्षासंबंधि काही पुरावा आहे का ? अशी विचारणा मंचातर्फे केली असता, सर्विस इंजिनिअरने तसा अभिप्राय दिला असल्याचे त्यांनी नमुद केले. परंतु सर्विस इंजिनिअरचा असा कोणताही अहवाल अभिलेखावर सामनेवाले 1 व 2 यांनी दाखल केला नाही. त्यामुळे सामनेवाले यांचे सदरील कथन ग्राह्य आहे असे मंचास वाटत नाही.
इ) यापुढे असे ही नमुद करावेसे वाटते की, सामनेवाले 2 यांचे सर्विस इंजिनिअर श्री. विनोद दि. 23/05/2014 रोजी सामनेवाले यांच्या सेवेत असतांना त्यांनी टीव्ही वॉल माऊंन्ट केल्यास, पॅनल खराब होण्याचा धोका असतो ही बाब त्या सर्विस इंजिनिअरने तकारदारांना सांगितल्याबाबत कोणताही पुरावा अभिलेखावर नाही. तसा काही धोका असल्यास सर्विस इंजिनिअर श्री. विनोद यांने तक्रारदारांना सांगणे आवश्यक होते. त्यामुळे वॉल माऊंट मुळे पॅनल खराब झाला असल्यास सामनेवाले यांच्या कथनानुसार त्यांची जबाबदारी सुध्दा सामनेवाले 2 यांचेवरच येते.
उपरोक्त बाबी विचारात घेतल्यास सामनेवाले 1 व 2 यांनी तकारदार यांना सदोष टीव्ही पुरविल्याचे स्पष्ट होत असल्याने आणि विशेषतः तक्रारदाराचा टिव्ही, वॉरंटी कालावधीमध्ये, खरेदीनंतर केवळ 20 दिवसामध्येच खराब झाल्यामुळे सामनेवाले हे सदोष सेवेबद्दल जबाबदार आहेत असे मंचास वाटते.
6. उपरोक्त चर्चेवरून व निष्कर्षानुसार प्रकणामध्ये खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 676/2014 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले 1 व 2 यांनी तक्रारदारांना सदोष टीव्ही विकुन त्रृटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले 1 व 2 यांनी तक्रारदारांना विकलेल्या सदोष टीव्ही ची किंमत रु. 53,990/- (अक्षरी रु. त्रेपन्न हजार नऊशे नव्वद फक्त) दि. 15/01/2017 रोजी किंवा तत्पुर्वी तक्रारदारांना परत करावी व तक्रारदारांनी त्यांच्याकडे असलेला, एलईडी टीव्ही सामनेवाले यांचेकडुन रक्कम रु. 53,990/- (अक्षरी रु. त्रेपन्न हजार नऊशे नव्वद फक्त) स्वीकारते वेळी सामनेवाले यांना परत करावा. सदर आदेशपुर्ती नमुद कालावधीमध्ये न केल्यास दि. 16/01/2017 पासून आदेशपुर्ती पर्यंत 9% व्याजासह संपुर्ण रक्कम तक्रारदारांना परत करावी.
4. तक्रारदारांना झालेल्या त्रासाबद्दल रु. 3,000/- (अक्षरी रु. तीन हजार फक्त) व तक्रार खर्चाबद्दल रु. 2,000/- (अक्षरी रु. दोन हजार फक्त) अशी एकुण रु. 5,000/- (अक्षरी रु. पाच हजार फक्त) सामनेवाले यांनी दि. 15/01/2017 रोजी किंवा तत्पुर्वी तक्रारदारांना द्यावी.
5. आदेश पुर्तीसाठी सामनेवाले 1 व 2 स्वतंत्ररित्या तसेच संयुक्तरित्या जबाबदार असतील.
6. आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब विना मूल्य पाठविण्यात याव्यात.