निकालपत्र (दि.29.10.2015) व्दाराः- मा. सदस्या - सौ. रुपाली डी. घाटगे
1 प्रस्तुतचा अर्ज तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 अन्वये नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केलेला आहे.
2 प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांचेविरुध्द नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाले क्र.1 व 2 यांना नोटीसा लागू होऊन देखील या कामी हजर नाहीत. सबब, सामनेवाले यांचेविरुध्द दि.06.01.2015 रोजी एकतर्फा आदेश पारीत करणेत आलेला आहे. तक्रारदार तर्फे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. सदरचे प्रकरण गुणदोषावर खालीलप्रमाणे निर्णय देत आहे.
तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की–
3 सामनेवाले क्र.1 व 2 हे व्यवसायाने बिल्डर व डेव्हलपर्स असून ते भागीदारीमध्ये मे. व्ही.बी.डेव्हलपर्स या नावाने जागा विकसीत करणे, माल मटेरियलसह बांधकाम करणेचा व्यवसाय करतात. तक्रारदार क्र.1 व 2 यांनी आंबेवाडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर येथील स्वत:च्या प्लॉटवर स्वत:करीता व कुटूंबाकरीता राहण्यासाठी घराचे बांधकाम कंत्राट भरघोस मोबदला देऊन सामनेवाले क्र.1 व 2 यांना दिलेले असून तसा दि.16.10.2013 रोजी लेखी करार तक्रारदार व सामनेवाले यांचे दरम्यान रक्कम रु.100/- च्या स्टँम्पवर केला. त्याचबरोबर संपूर्ण मटेरियलसहित बांधकाम हातात घेतलेनंतर वेळेत पूर्ण करणे व प्लॅनप्रमाणे बिल्डींग उभी करणे, बांधकामाकरीताचे लागणारे साहित्य चांगल्या प्रतीचे वापरणे इत्यादी बाबींची हमी व खात्रीही सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदार क्र.1 व 2 यांना दिली. तसेच ज्यादा काम करावयाचे असलेस प्रति स्क्वे.फूट रक्कम रु.1,200/- असा दर आकारला जाईल अशी अट सामनेवाले यांनी तक्रारदारांनी सदर करारपत्रामध्ये घालून दिलेली आहे. परंतु सदर करारात ठरलेप्रमाणे बांधकाम न करता तसेच बिल्डींग अपूर्ण ठेवुन सामनेवाले यांनी तक्रारदारांची घोर निराशा केलेली आहे.
4 तक्रारदारांचे म्हणण्याप्रमाणे सामनेवाले यांनी ठरलेप्रमाणे बांधकाम पूर्ण न करता बिल्डींग अपुरी ठेवलेली आहे. सदर बिल्डिंगला बाहेरुन गिलावा केलेला नाही, ग्राऊंड फ्लोअरला बिल्डींग प्लॅन प्रमाणे संडास बांधावयाचा होता तो बांधून दिलेला नाही. इमारतीच्या पुढे पाय-या करावयाच्या होत्या त्या केलेल्या नाहीत, त्यामुळे बिल्डिंगमध्ये ये-जा करणेस प्रचंड त्रासिक स्वरुपाची कसरत तक्रारदारांस व त्यांचे कुटुंबियांस करावी लागत आहे. तसेच किचन कट्टयाला बसविलेली फरशी ही अत्यंत हलक्या प्रतीची बसविलेली असून बाथरुम व किचनमधील संपूर्ण फरशीदेखील निष्कृष्ट प्रतिची बसविलेली आहे तसेच बांधकामामध्ये सर्व मटेरियल हे करारापत्रामध्ये ठरलेल्या मोबदल्यात सामनेवाले यांनी स्वत: चांगल्या प्रतिचे आणून वापरावयाचे होते, परंतु बांधकामावेळी सामनेवाले यांनी तक्रारदारांना स्वत:च्या तथाकथित अडचणी सांगून तक्रारदारांना फरशी, सिमेंटची पोती, ग्रील स्वतंत्ररित्या आणावयास लावले. याचबरोबर सामनेवाले यांनी बिल्डींगच्या ग्राऊंड फ्लोअरला बांधावयाचा संडास न बांधल्यामुळे व बांधकाम अपूर्ण ठेवून पळ काढल्याने नाईलाजास्तव तक्रारदारांना स्वत: वेगळे पैसे खर्च करुन संडास बांधून घेणे भाग पडले. निष्कृष्ट दर्जाच्या साहित्य वापरल्यामुळे निष्कृष्ट बांधकाम केल्यामुळे पहिल्या पावसाळयातच संपूर्ण बिल्डिंगमध्ये पावसाच्या पाण्याची गळती लागलेली आहे. तसेच बिल्डिंग एका बाजूला कलल्यासारखी बांधल्यामुळे ती केव्हाही दुरुस्त करता येणे शक्य नाही. तसेच सामनेवाले यांनी करारपत्रामध्ये ठरलेल्या रक्कमेबरोबरच ज्यादा बांधकामाचे नावावर तक्रारदारांकडून रक्क्म रु.2,25,000/- एवढी ज्यादा घेतलेली रक्कम आहे, जी तक्रारदारांचेकडून स्विकारुन प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम केलेले नाही. सदर बांधकामाचे कामी रक्कम रु.1,50,000/-, तक्रारदारांना स्वत: संडासचे बांधकामापोटी रक्कम रु.35,000/- करावे लागले. तसेच बांधकामास वापरलेले साहित्य हलक्या व निष्कृष्ट प्रतिचे वापरल्यामुळे रक्कम रु.2,00,000/- इतके मटेरियलमध्ये सामनेवाले यांनी आर्थिक लाभ उठवून नुकसान केलेले आहे, अशा प्रकारे एकूण रक्कम रु.6,10,000/- वाढीव घेऊन सामनेवाले यांनी तक्रारदारांचे बाबतीत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे व बांधकामाचे मटेरियल निष्कृष्ट दर्जाचे वापरुन, बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे करुन, बांधकाम अपूर्ण ठेवुन, इलेव्हेशनप्रमाणे बांधकाम न करुन सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक या नात्याने दयावयाचे सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेली आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार या मंचात दाखल करुन सामनेवाले यांचेकडून रक्कम रु.6,10,000/- ही संपूर्ण रक्कम फिटेपावेतोच्या द.सा.द.शे.18 टक्के व्याजदराने तसेच तक्रारदारांना झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.1,00,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु.10,000/- सामनेवाले क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार क्र.1 व 2 यांना देववावी अशी विनंती केलेली आहे.
5 तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकुण 10 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अनुक्रमे तक्रारदार व सामनेवाले यांचे दरम्यान झालेले करारपत्र, बांधकाम नकाशा (मंजूर), बिल्डींग फोटो (बांधण्यापूर्वी) सामनेवाले यांनी हमी दिलेप्रमाणे, बांधकाम परवाना, सामनेवाले यांना बांधकामापोटी पैसे दिलेल्या पावत्यां एकूण 14, तक्रारदारांनी स्वत: साहित्य खरेदी बिले (बांधकामाकरीता), सामनेवाले यांना पाठविलेली वकील नोटीस, सामनेवाले क्र.1 यांनी नोटीस स्विकारलेली पोहोच पावती, सामनेवाले क्र.2 यांची नोटीस परत आलेला लखोटा, तसेच दि.12.08.2015 रोजी दाखल केलेला दि.30.07.2015 रोजीचा कोर्ट कमिशनर अहवाल, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6 तक्रारदारांचा तक्रार अर्ज, अनुषांगिक कागदपत्रे, कोर्ट कमिशनचा अहवाल, तक्रारदारांचा तोंडी युक्तीवादाचा विचार करता, निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे | होय |
2 | तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून, सामनेवाले यांनी तक्रारदारांचेकडून स्विकारलेली जादा बांधकामापोटीची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
3 | तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा:-
मुद्दा क्र.1:- प्रस्तुत कामी दि.16.10.2013 रोजी तक्रारदार क्र.1 व 2 यांनी सामनेवाले क्र.1 व 2 यांना स्वत:चे मालकीचे प्लॉटवर राहणेसाठी आरसीसी घराचे बांधकाम करणेचे कंत्राट सोपविले. त्यानुसार, रक्कम रु.100/- चे स्टॅंम्पवर करार झाला. करारानुसार रक्कम रु.10,25,000/- व जादा काम करावयाचे असलेस प्रति स्वे.फुट रक्कम रु.1,200/- दर याप्रमाणे अटी व शर्तीवर सदरचे करारपत्र झाले. परंतु सदर कराराप्रमाणे बांधकाम न करता, अपुर्ण बांधकाम ठेऊन व हलक्या प्रतीचे मटेरियल वापरुन व सदर बांधकामापोटी जादा रक्कम स्विकारुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.
प्रस्तुत तक्रारीत तक्रारदारांनी सामनेवाले यांनी करारपत्राप्रमाणे ठरलेल्या रक्कमेबरोबर ज्यादा बांधकामाचे नांवावर तक्रारदाराकडून रक्कम रु.2,25,000/- ज्यादा रक्कम घेतली आहे. परंतु सदरची रक्कम स्विकारुन प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम केलेले नाही असे नमुद केले आहे. सदर मुद्दयाचे अनुषंगाने या मंचाने तक्रारदारांनी दाखल केलेले करारपत्राचे अवलोकन केले असता, सदर करारपत्रांवर तक्रारदारांचे करारपत्र लिहून घेणार व सामनेवाले यांचे करारपत्र लिहून देणार नांव नमुद असून सदरचे करारपत्र रक्कम रु.100/- स्टॅम्पवर नोटरी केलेली आहे. सदर करारपत्रामध्ये एकूण रक्कम रु.10,25,000/- ज्यादा काम करावयाचे प्रती स्वेअर फुट 1200/- दर आकारण्यात येईल असे नमुद असून त्यावर तक्रारदार व सामनेवाले यांच्या सहयां आहेत. सदरचे करारपत्राप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाले यांना एकूण रक्कम रु.12,50,000/- इतके दिलेचे पावत्यां दाखल केलेल्या आहेत. म्हणजेच तक्रारदाराने करारपत्रातील अटी व शर्तीप्रमाणे एकूण रक्कम रु.10,25,000/- बांधकामापोटी व जादा रक्कम रु.2,25,000/- जादा बांधकामापोटी दिलेचे स्पष्टपणे दिसून येते. तक्रारदारांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये सामनेवाले क्र.1 व 2 यांनी ग्रामपंचायतीच्या मंजूर केलेल्या बांधकाम प्लॅनप्रमाणे 1020.00 स्वे.फुट बांधकाम पूर्ण करुन दयावयाचे होते असे नमुद केले आहे. त्या अनुषंगाने या मंचाने तक्रारदाराने दाखल केलेल्या कोर्ट कमिशनरचे अवलोकन केले असता, (10) सदर इमारतीचे प्रत्यक्षात एकूण बांधकाम 990 चौ.फुट असल्याचे दिसून येते. यावरुन, सामनेवाले यांनी तक्रारदारांचे इमारतीचे बांधकाम 990 चौ.फुट केल्याचे दिसून येते. परंतु सामनेवाले यांनी सदर बांधकामापोटी रक्कम रु.10,25,000/- इतकी रक्कम व जादा काम करावयाचे झालेस प्रती स्वेअर फुट 1200/- दर हा करारपत्राप्रामणे ठरलेला असताना देखील अपूर्ण बांधकाम करुन रक्कम रु.2,25,000/- इतकी जादा रक्कम स्विकारुन अनुचित प्रथेचा अवलंब केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीमध्ये, बिल्डिंगला बाहेरुन गिलावा केलेला नाही, ग्राऊंड फ्लोअरला बिल्डींग प्लॅन प्रमाणे संडास बांधावयाचा होता तो बांधून दिलेला नाही. इमारतीच्या पुढे पाय-या करावयाच्या होत्या त्या केलेल्या नाहीत, त्यामुळे बिल्डिंगमध्ये ये-जा करणेस प्रचंड त्रासिक स्वरुपाची कसरत तक्रारदारांस व त्यांचे कुटुंबियांस करावी लागत आहे. तसेच किचन कट्टयाला बसविलेली फरशी ही अत्यंत हलक्या प्रतीची बसविलेली असून बाथरुम व किचनमधील संपूर्ण फरशीदेखील निष्कृष्ट प्रतिची बसविलेली आहे. सामनेवाले यांनी बिल्डींगच्या ग्राऊंड फ्लोअरला बांधावयाचा संडास न बांधल्यामुळे व बांधकाम अपूर्ण ठेवून पळ काढल्याने नाईलाजास्तव तक्रारदारांना स्वत: वेगळे पैसे खर्च करुन संडास बांधून घेणे भाग पडले. निष्कृष्ट दर्जाच्या साहित्य वापरल्यामुळे निष्कृष्ट बांधकाम केल्यामुळे पहिल्या पावसाळयातच संपूर्ण बिल्डिंगमध्ये पावसाच्या पाण्याची गळती लागलेली आहे. तसेच बिल्डिंग एका बाजूला कलल्यासारखी बांधल्यामुळे ती केव्हाही दुरुस्त करता येणे शक्य नाही. त्या अनुषंगाने या मंचाने तक्रारदारांनी दाखल केलेल्या कोर्ट कमिशनर अहवालाचे अवलोकन केले असता,
- करारपत्राप्रमाणे किचन कट्टा ग्रॅनाईटमध्ये केलेला दिसून येतो.
- बांथरुममधील फरशी करारपत्राप्रमाणे बसविलेली आहे.
- इमारतीच्या पुढील व मागील बाजूस (दक्षिण आणि उत्तर) गिलावा केलेला आहे.
- इमारतीच्या लांबीच्या बाजूला गिलावा केलेला नाही.
- मंजूर नकाशामध्ये इलीव्हेशन दाखविण्यात आलेले नाही. त्यामुळे इलीव्हेशनप्रमाणे बांधकाम आहे किंवा नाही सांगता येत नाही.
- मंजूर नकाशामध्ये दाखविलेप्रमाणे पूर्वीच्या अस्तित्वातील संडास इमारतीच्या पाठीमागे दिसून येते. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मंजूर नकाशामध्ये स्टोअर रुम दाखविलेली आहे परंतु प्रत्यक्षात तेथे बाथरुम केलेले आहे.
- इमारतीच्या पुढील बाजूला ये-जा करण्यासाठी पाय-या केलेल्या आहेत असे सद्दय स्थितीत दिसते.
- किचन कट्टा व किचनमधील फरशीची प्रत करारामध्ये ठरविलेली नाही, त्यामुळे प्रत सांगता येत नाही.
- बाथरुममधील फरशीच्या प्रतीबाबत करारामध्ये उल्लेख नसल्यामुळे प्रत सांगता येत नाही. दर्जा तपासण्यासाठी लॅब टेस्ट घेणे आवश्यक आहे.
- बांधकामास वापरलेल्या एकदंरतीत साहित्याचा दर्जा ठरविण्यासाठी लॅब टेस्ट घेणे गरजेचे आहे. यावरुन दर्जा ठरविता येणार नाही.
सदर कोर्ट कमिशन अहवालामध्ये मंजूर नकाशामध्ये दाखविलेप्रमाणे, पूर्वीचे अस्तित्वातील संडास इमारतीच्या पाठीमागे दिसून येतो असे नमुद आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मंजूर नकाशामध्ये स्टोअर रुम दाखविलेली आहे परंतु प्रत्यक्षात तेथे बाथरुम केलेले आहे असे नमुद आहे. सदर संडासाच्या बांधकामापोटी तक्रारदारांनी रक्कम रु.35,000/- ची मागणी या मंचात केलेली आहे. परंतु सदर बांधकामापोटी झालेल्या खर्चाची पावतीची प्रत सदर कामी दाखल नाही. तसेच सदरचे संडास हे मंजूर नकाशाप्रमाणे इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेने तक्रारदारांची सदरची रक्कम रु.35,000/- ची मागणी हे मंच विचारात घेत नाही. तसेच कोर्ट कमिशन अहवालामध्ये, इमारतीच्या पुढील बाजूला ये-जा करण्यासाठी पाय-या केलेल्या आहेत असे सद्दय स्थितीत दिसते. बांधकामास वापरलेल्या एकदंरतीत साहित्याचा दर्जा ठरविण्यासाठी लॅब टेस्ट घेणे गरजेचे आहे. यावरुन दर्जा ठरविता येणार नाही असे नमुद असलेने तक्रारदारांनी तक्रारीमध्ये हलक्या व निष्कृष्ट प्रतीचे साहित्य वापरलेमुळे रक्कम रु.2,00,000/- ची मागणी हे मंच पुराव्याअभावी विचारात घेत नाही. तक्रारदारांनी बांधकामासाठी अतिरिक्त मटेरियल रक्कम रु.1,50,000/- इतक्या रक्कमेची मागणी मा. मंचात केली आहे. तथापि अतिरिक्त मटेरियलच्या अनुषंगाने कोणतीही पावतीची प्रत या मंचात दाखल केलेली नसलेने तक्रारदारांचे सदरची मागणी हे मंच विचारात घेत नाही.
परंतु तक्रारदारांचे दि.04.03.2014 रोजीची रक्कम रु.52,000/- Adhesive and Bonding Agent च्या अनुषंगाने कागदपत्र दाखल केलेला आहे. तथापि सदरचे कागदपत्रांवर विक्रेत्याचे नांव, सही अथवा शिक्का नाही. दि.29.05.2014 रोजीची पोर्च रिलींग, बाल्कनी रिलींग, जिना रिलींग तयार करुन बसविणे. या अनुषंगाने रक्कम रु.15,000/- ची पावतीची प्रत दाखल केलेली आहे. परंतु सदरचे दि.16.10.2013 रोजीच्या करारापत्रातील कामाच्या तपशील क्र.1 ते 20 मध्ये सदरचे पोर्च रिलींग, जिना रिलींग, बाल्कनी रिलींग सामनेवाले यांनी करुन देण्याचे नमुद नसलेने, सदरचे पावती हे मंच विचारात घेत नाही.
सबब, वरील सर्व कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेकडून सदर बांधकामापोटी ठरलेल्या रक्कमेपेक्षा जादा रक्कम स्विकारुन व अपूर्ण बांधकाम करुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र..2 व 3 :- मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयायवयाचे सेवेत त्रुटी केली असलेने, तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून सदर बांधकामापोटी सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेकडून स्विकारलेली जादा रक्कम रु.2,25,000/- व सदर रक्कमेवर तक्रार दाखल दि.24.09.2014 पासून ते सदरची संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारदारांनी सामनेवाले यांना नोटीस पाठवून देखील सामनेवाले यांनी सदर नोटीसीस उत्तर दिले नाही अथवा सदर कामी मंचात म्हणणेही दाखल केले नाही. त्यामुळे तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळण्यास पात्र आहे. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4:- सबब, हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदर बांधकामापोटी स्विकारलेली जादा रक्कम रु.2,25,000/- (अक्षरी रुपये दोन लाख पंचवीस हजार फक्त) व सदर रक्कमेवर तक्रार दाखल दि.24.09.2014 पासून ते सदरची संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
3 सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु.3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त ) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून सामनेवाले यांनी 30 दिवसांचे आत पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.