-निकालपत्र-
(पारीत दिनांक-26 डिसेंबर, 2018)
(मा. सदस्य, श्री नितीन माणिकराव घरडे यांच्या आदेशान्वये )
- तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खालील विरुध्दपक्ष बिल्डर विरुध्द दोषपूर्ण सेवा आणि अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्याने ग्राहक मंचा समक्ष दाखल केली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात तपशिल खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाने उभारलेल्या ईमारती मधील गाळा क्रं-युजी-23, मौजा माणकापूर, खसरा क्रं 18/1, 26/2, सिटी सर्व्हे क्रं 272, शिट क्रं 525/13 दिनांक-10 जुलै, 2013 रोजी विरुध्दपक्षाकडून नोंदणीकृत विक्रीपत्रान्वये विकत घेतला होता. सदरचा गाळा विकत घेताना त्या गाळयामध्ये भिंतीच्या एका बाजुने पाण्याचे स्विपेज व लिकेज होत होते, त्या करीता विकत घेतानाच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला या बाबत कळविले होते व विरुध्दपक्षाने स्विपेज व लिकेज दुरुस्त करुन देण्याची हमी दिली होती परंतु विरुध्दपक्षाने आज पर्यंत सदरच्या लिकेज व स्विपेजची दुरुस्ती करुन दिली नाही त्यामुळे सदरचा गाळा दुस-या कोणाला किरायाने देता आला नाही व या सर्व कारणामुळे तक्रारकर्त्याचे अतिशय आर्थिक नुकसान झाले. विरुध्दपक्षाची ही सेवेतील त्रृटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे. करीता तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचात दाखल करुन खालील प्रमाणे मागणी केलेली आहे-
- विरुध्दपक्षाने सेवेत त्रृटी दिल्याचे घोषीत करावे.
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला गाळयातील लिकेज व स्विपेजचे काम दुरुस्त करुन द्दावे. तसेच तक्रारकर्त्याला सदरचा गाळा भाडयाने देऊ न शकल्याने रुपये-3,00,000/- चे आर्थिक नुकसान भरपाई आणि शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/- भरपाई देण्याचे आदेशित व्हावे.
03. तक्रारीचे तक्रारी संबधाने विरुध्दपक्षांना मंचाचे मार्फतीने नोटीस तामील करण्यात आली. विरुध्दपक्ष क्रं-1-अ आणि 1-क यांना नोटीस मिळूनही ते उपस्थित झाले नाहीत म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1-अ व 1-क विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात दिनांक-10 ऑगस्ट, 2018 रोजी पारीत केला.
04. विरुध्दपक्ष क्रं-1-ब याने उपस्थित होऊन नि.क्रं 7 वर वकील श्री जे.बी.चव्हाण यांचे वकीलपत्र दाखल केले. परंतु बरीच संधी देऊनही त्याने तक्रारीला लेखी उत्तर दाखल केले नाही.
05. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत नि.क्रं 2 वरील यादी नुसार अक्रं-1 व 2 दस्तऐवज दाखल केले असून त्यात प्रामुख्याने विक्रीपत्राची प्रत व गाळयाचे छायाचित्र इत्यादी दस्तऐवजाचा समावेश आहे.
06. तक्रारकर्त्याची तक्रार व त्याने दाखल दस्तऐवजाचे मंचाने अवलोकन केले त्यावरुन मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले व त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारकर्ता विरुध्दपक्षाचा ग्राहक होतो काय? होय.
2. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या सेवेत त्रुटी अथवा अनुचित
व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे दिसून येते काय? नाही
3. काय आदेश? अंतिम आदेशा नुसार
कारणमिमांसा
मुद्दा क्रं.1 ते 3 बाबत –
07 तक्रारकर्त्याची तक्रारी प्रमाणे त्याने विरुध्दपक्षा कडून गाळा विकत घेतला व त्यापोटी मोबदला दिला व विक्रीपत्र दिनांक-10.07.2013 चे विक्रीपत्र अभिलेखावर दाखल केले, यावरुन तो विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे, त्यामुळे मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते. विरुध्दपक्षाने सदरचा गाळा तक्रारकर्त्याला विकताना त्या गाळयामध्ये पाण्याचे स्विपेज व लिकेज दुरुस्त करुन देऊ या बाबत त्यांच्या विक्रीपत्रामध्ये कोणताही उल्लेख केल्याचे दिसून येत नाही तसेच तक्रारकर्त्याने तक्रारी बरोबर दाखल केलेली छायाचित्रे ही तक्रारकर्त्याने विकत घेतलेल्या त्याच गाळयाचे आहे किंवा नाही या बाबत कोणताही पुरावा किंवा छायाचित्रा बाबत छायाचित्रकाराचा प्रतिज्ञालेख किंवा छायाचित्र घेतल्याचे बिल अभिलेखावर दाखल केलेले नाही. तसेच तक्रारकर्त्याने सदरचा गाळा हा दिनांक-10 जुलै, 2013 या रोजी विकत घेतलेला असून सदर तक्रार ही दिनांक-10/09/2015 रोजी दाखल केली आहे. दरम्यानचे काळात विरुध्दपक्षाशी सदर दुरुस्त करुन द्दावी या बाबत कोणताही लेखी पुरावा अभिलेखावर दाखल केला नाही, त्यामुळे मुद्दा क्रं 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते. या कारणास्तव योग्य त्या पुराव्या अभावी प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
08. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच प्रस्तुत तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 विरुध्द खारीज करण्यात येते.
- खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
- संबधित सर्व पक्षकारांना निकालपत्राची प्रत निःशुल्क उपलब्ध करुन द्दावी.
- तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात