श्री. अमोघ कलोती, अध्यक्ष यांचे कथनांन्वये.
-आदेश-
(पारित दिनांक :07/10/2013)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण पुढीलप्रमाणे-
तक्रारकर्ता शासकीय भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरचे संचालक आहेत. तक्रारकर्ता संस्थेने दि.06.09.2008 रोजी विरुध्द पक्षकार क्र. 1 यांचेकडून एकूण रु.17,830/- चे मोबदल्यात मायक्रोटेक 800 व्हीए इनव्हर्टर व ओकाया बॅटरी संच खरेदी केला. विरुध्द पक्षकार क्र. 2 हे सदर इनव्हर्टर व बॅटरीचे नागपूर शहरातील मुख्य वितरक असून, विरुध्द पक्षकार क्र. 3 चे कार्यालय नवि दिल्ली येथे आहे. तक्रारकर्त्याचे कथनानुसार खरेदीपासूनच सदर इनव्हर्टर व बॅटरी सतत बिघडत होती व बंद पडत होती. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 कडे वारंवार तक्रारी केल्यावर त्यांनी संच दुरुस्तीचा प्रयत्न केला. परंतू संच सुरु होत नव्हता. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.01.10.2009 व 03.12.2009 रोजी विरुध्द पक्षकार क्र. 1 ते 3 यांना संच बदलवून देण्यासाठी पत्र दिले. परंतू त्यांनी कुठल्याही प्रकारची सेवा दिली नाही व उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तक्रारकर्त्याने 08.10.2010 रोजी विरुध्द पक्षकारांना नोटीस पाठविली. परंतू विरुध्द पक्षकारांनी नोटीसचे उत्तरही दिले नाही. करिता तक्रारकर्त्याने सदरची तक्रार दाखल केली.
2. मंचाने जारी केलेल्या नोटीसची बजावणी झाल्यानंतर वि.प.क्र.1 ने प्रकरणात हजर होऊन लेखी उत्तर व शपथपत्र दाखल केले. विरुध्द पक्षकार क्र. 3, मे. अॅरो इंटरनॅशनल प्रा.लि., मायक्रोटेक इनव्हर्टर व ओकाया बॅटरीज यांची एजंसी विरुध्द पक्षकार क्र. 1 कडे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांचे कथनानुसार ते केवळ विक्रेते असल्यामुळे त्यांची या प्रकरणी कोणतीही जबाबदारी नाही. तक्रारकर्त्याने सदर इनव्हर्टर व बॅटरी घेतल्यापासून सतत बिघडत होती व बंद होत होती ही बाब विरुध्द पक्षकार क्र. 1 ने कबूल केली. परंतू त्यांचे कथनानुसार विरुध्द पक्षकार क्र. 1 ने वारंवार तक्रारकर्त्याकडे जाऊन सदर इनव्हर्टर व बॅटरी दुरुस्त करुन दिली. तक्रारकर्त्याचे आरोप व सेवेतील कमतरता नाकारुन विरुध्द पक्षकार क्र. 1 ने तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
3. नोटीसची बजावणी होऊनही विरुध्द पक्षकार क्र. 3 प्रकरणात हजर झाले नाही. करिता प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फी चालविण्यात आले. वारंवार संधी देऊनही विरुध्द पक्षकार क्र. 2 ने प्रकरणात लेखी उत्तर दाखल केले नाही, त्यामुळे प्रकरण त्यांचे लेखी जवाबाशिवाय पुढे चालविण्यात आले.
4. तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकल्यानंतर प्रकरण विरुध्द पक्षकारांचे युक्तीवादाकरीता नेमण्यात आले. परंतू संधी देऊनही विरुध्द पक्षकारांनी युक्तीवाद सादर केला नाही. करिता प्रकरण आदेशाकरीता बंद करण्यात आले. अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे मंचाने अवलोकन केले.
5. प्रस्तुत प्रकरणी मंचाच्या निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्यावरील निश्कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. विरुध्द पक्षकारांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय होय.
2. आदेश अंतिम आदेशाप्रमाणे.
-कारणमिमांसा-
6. विरुध्द पक्षकार क्र. 1 ने जारी केलेल्या प्री-रीसीप्ट बिल, पावतीची प्रत व वारंटी कार्डाची प्रत तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र.2, 3 व 4 अन्वये अभिलेखावर दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने दि.10.10.2008 रोजी विरुध्द पक्षकाराला सदर इनव्हर्टर व बॅटरीच्या खरेदीपोटी रु.17,830/- दिल्याचे पावतीवरुन स्पष्ट होते. सदर वारंटी कार्डामध्ये नमूद केलेली वारंटी नोट खालीलप्रमाणे आहे.
WARRANTY NOTE
“18 Months from the date of sale or 20 months from the date of dispatch code, whichever is earlier.”
खरेदीपासून वारंटीची मुदत 18 महिने असल्याचे स्पष्ट होते.
7. तक्रारकर्त्याने सदर इनव्हर्टर व बॅटरी खरेदी केल्यापासून त्यामध्ये सतत बिघाड होत होता व संच बंद होत होता ही बाब विरुध्द पक्षकार क्र. 1 ने लेखी उत्तरात स्पष्टपणे कबूल केली आहे. शिवाय, सदर संचामध्ये वारंवार दुरुस्ती केल्याचेही विरुध्द पक्षकार क्र. 1 यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे. मात्र दुरुस्तीनंतरही सदर संच कार्यान्वीत झाला नाही ही बाब अभिलेखावर दाखल कागदपत्रावरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने सदर संच दि.06.09.2008 रोजी खरेदी केल्यानंतर त्याची वारंटी 18 महिनेपर्यंत होती. वारंटी काळातच सदर संचामध्ये बिघाड उत्पन्न झाला. वारंवार दुरुस्ती करुनही त्यातील दोष दूर झाला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षकारांकडे सदर संच बदलवून मिळण्याची मागणी केली. परंतू विरुध्द पक्षकारांनी तक्रारकर्त्याच्या मागणीची पूर्तता केली नाही. सदर संचाच्या उत्पादक/निर्मात्याने याबाबत पाठपुरावा करणे ही विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 ची जबाबदारी होती. मात्र, ही जबाबदारी पार पाडण्यात ते अपयशी ठरले. प्राप्त परिस्थितीत विरुध्द पक्षकारांच्या सेवेतील कमतरता सिध्द होते असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्ता ही शासकीय प्रशिक्षण संस्था असून, विद्यार्थी हिताचे दृष्टीने संस्थेने नविन संच घेतला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर संचाची किंमत परत मिळण्याची मागणी केली आहे. शिवाय, आपल्या न्याय्य मागणीसाठी तक्रारकर्त्याला मंचाकडे दाद मागावी लागल्याने, शारिरीक व मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. करिता आदेश पुढीलप्रमाणे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार क्र. 1 ते 3 यांना निर्देश देण्यात येतो की, त्यांनी संयुक्तपणे व विभक्तपणे तक्रारकर्त्याला सदोष इनव्हर्टर व बॅटरी संचाची किंमत रु.17,830/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत परत करावी अन्यथा तक्रार दाखल दि.23.05.2011 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत सदर रक्कम द.सा.द.शे. 6 टक्के व्याजाने देय राहील.
3) विरुध्द पक्षकार क्र. 1 ते 3 यांना निर्देश देण्यात येतो की, त्यांनी संयुक्तपणे व विभक्तपणे तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाईपोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1500/- द्यावे.
4) आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षांना निःशुल्क देण्यात यावी.
5) ‘ब’ व ‘क’ फाईल्स तक्रारकर्त्याला परत करण्यात याव्या.