- आ दे श –
(पारित दिनांक – 11 फेब्रुवारी, 2019)
श्री. अविनाश प्रभुणे, मा. सदस्य यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये, वि.प.ने त्यांच्या सहनिवासामध्ये आश्वासित करुनही उद्वाहकाची व्यवस्थित सेवा दिली नसल्याने दाखल केलेली आहे.
2. सदर तक्रारीतील वि.प.क्र. 1 ते 3 यांचेकडून दि. 30.12.2014 रोजी तक्रारकर्त्याने त्यांच्या ‘’महालक्ष्मी रेसीडेंसी III’’ मधील फ्लॅट क्र. 401 हा रु.35,50,000/- मध्ये विकत घेण्याचा करारनामा करुन व संपूर्ण रक्कम देऊन सदर सदनिकेचा ताबा घेतला. सदर सदनिका विकत घेण्यामागे तक्रारकर्त्याचा असा हेतू होता की, त्याचे वयोवृध्द आईवडिल असल्याने या सहनिवासामध्ये वि.प.क्र. 1 ते 3 स्वयंचलित उद्वाहकाची सोय 5 व्यक्तींकरीता उपलब्ध करुन देणार होते व त्याबाबत वि.प.ने त्यांच्या माहिती पत्रकातसुध्दा प्रसिध्द केले होते. प्रत्यक्षात जेव्हा तक्रारकर्ता तेथे राहायला गेल्यावर त्यांचे असे लक्षात आले की, सदर उद्वाहक हे वापर करीत असतांना वारंवार बंद पडते. तक्रारकर्ता व त्यांचे म्हातारे वडीलसुध्दा उद्वाहकामध्ये अडकून पडले होते. उदवाहकामध्ये आपातकालीन फोन क्रमांक, कॉल बेल नसल्याने त्यांना अनेक लोकांना फोन लावून उद्वाहक उघडावे लागले. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे वि.प.क्र. 1 ते 3 यांनी प्रसिध्द कंपनीचे उद्वाहक लावून देण्याचे आश्वासित केले होते. परंतू सहनिवासामध्ये असलेले उद्वाहकावर कुठल्याची कंपनीचे नाव, निर्मिती वर्ष, मशीनचा क्रमांक, टोल फ्री फोन क्रमांक, आपातकाली फोन क्रमांक आणि कॉल बेल नमूद नाही, त्यामुळे हे उद्वाहक कुठल्या कंपनीचे आहे याचा अर्थबोध होत नाही व ते अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. वि.प.यांनी उद्वाहक लावण्याकरीता सक्षम सरकारी अधिका-याचे प्रमाणपत्र घ्यावे लागले ते घेतलेले नाही. याबाबत सदनिकाधारकांनी वि.प. यांना वारंवार उद्वाहन बदलवून देण्याबाबत विनंती केली. परंतू त्यांनी विनंतीची दखल घेतली नाही. जसा तक्रारकर्त्याला उद्वाहकामध्ये अडकण्याचा प्रसंग आला, तसाच त्रास इतरही सदनिकाधारकांना झाला, म्हणून त्यांनी वि.प.क्र. 1 ते 3 ला त्यांनी आश्वासित केल्याप्रमाणे चांगल्या प्रसिध्द कंपनीचे उद्वाहक इमारतीमध्ये लावून देण्याची विनंती केली व पुढे कायदेशीर नोटीसची बजावणी केली. परंतू वि.प.क्र. 1 ते 3 यांनी कायदेशीर नोटीसलाही प्रतिसाद दिला नाही, म्हणून तक्रारकर्त्यांनी मंचासमोर तक्रार दाखल करुन, माहितीपत्रकात दिल्याप्रमाणे नामवंत कंपनीची स्वयंचलित 5 व्यक्तींकरीता उद्वाहक उपलब्ध करुन द्यावे, असे करण्यास वि.प. असमर्थ असतील तर नामवंत कंपनीचा दाखल केलेल्या अंदाजित खर्चाप्रमाणे येणारी रक्कम सदनिकाधारकांना रोख स्वरुपात मंचासमक्ष द्यावी, झालेल्या मानसिक व आर्थिक नुकसानीबाबत नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
3. सदर प्रकरणी वि.प.क्र. 1 ते 3 ला नोटीस प्राप्त झाल्याचा अहवाल प्राप्त. वि.प.क्र. 1 ते 3 ने लेखी उत्तर दाखल करुन त्यांनी तक्रारकर्त्याला सदनिका विकल्याचा व नोंदणीकृत विक्रीपत्र केल्याची बाब मान्य केली. तक्रारकर्त्याने स्वतः सुविधांची पाहणी केली व ताबा देण्याआधीच ईमारतीमध्ये उद्वाहक लावण्यात आले होते. त्यावेळी तक्रारकर्त्याने कुठलाही उजर अथवा आक्षेप व्यक्त केला नव्हता. वि.प.क. 1 ते 3 ने ‘आयएसओ’ मार्क असलेली मे. गणेश एलिव्हेटर्स या प्रख्यात कंपनीची पाच व्यक्ती वहन करणारी स्वयंचलित उद्वाहक लावलेले होते. तक्रारकर्त्याचे म्हणण्याप्रमाणे ती लोकल नसून प्रख्यात कंपनीची आहे व ती कंपनी तिच्या मानकाप्रमाणे व गुणवत्तेप्रमणे उद्वाहकाची निर्मिती करते. उद्वाहक ही विजेवर चालणारी यंत्रणा असून ती विजेच्या कमी जास्त दाबामुळे त्यामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होऊ शकतो. तक्रारकर्त्याने वारंवार उद्वाहकामध्ये बिघाड निर्माण झाल्याची बाब नमूद केली आहे. परंतू त्याबाबत कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने केलेले आरोप सिध्द न केल्याने तक्रार खारिज होण्यायोग्य आहे असे वि.प.क्र. 1 ते 3 चे म्हणणे आहे.
4. प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यावर तक्रारकर्त्यांचा व वि.प.क्र. 1 ते 3 तर्फे त्यांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला व दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- नि ष्क र्ष –
5. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 ते 3 कडून ‘’महालक्ष्मी रेसीडेंसी III’’ मधील सदनिका क्र. 401 रु. 35,50,000/- मध्ये विकत घेतल्याचे दि.04.04.2015 च्या विक्रीपत्र नोंदणी केल्याच्या दस्तऐवजावरुन (दस्तऐवज क्र 3) दिसून येते. वि.प. हे सदनिकाधारकांना नामवंत कंपनीचे उद्वाहक उपलब्ध करुन देणार होते आणि अशाच आधुनिक सोई आणि सवलती जेव्हा बिल्डर्स सदनिकाधारकांना देतात तेव्हाच ग्राहक आधुनिक सुविधा मिळतील म्हणून अधिक किंमत असलेली सदनिका विकत घेतात. प्रस्तुत वाद हा केवळ हलक्या दर्जाचे उद्वाहक लावल्या संबंधी आणि त्याच्या सेवेसंबंधी असल्याचे दिसते. त्यामुळे प्रस्तुत व्यवहारात तक्रारकर्ता आणि वि.प.क्र. 1 ते 3 यांच्यामध्ये ‘ग्राहक’ आणि ‘सेवादाता’ हा संबंध दिसून येतो. तक्रारकर्ता वि.प.क्र. 1 ते 3 चा ग्राहक असल्याने सदर तक्रार मंचासमोर चालविण्यायोग्य असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. माहितीपत्रकाच्या प्रतीवरुन (दस्तऐवज क्र 1) परंतू वि.प.क्र. 1 ते 3 यांनी अशी आकर्षक जाहिरात दर्शवून सहनिवासामध्ये मात्र ‘’विद्युत निरीक्षक (सचिव व अनुज्ञापक मंडळ व उद्वाहन निरीक्षक) चेंबूर, मुंबई यांचा परवानगी न घेता उद्वाहकाची स्थापना करुन ग्राहकाला द्यावयाच्या सेवेत त्रुटि व निष्काळजीपणा केल्याचे दिसते. मंचाचे मते सदनिका विकतांना आकर्षक जाहिराती देऊन व तक्रारकर्त्यांना खोटी प्रलोभने दाखवून वि.प.क्र. 1 ते 3 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे.
6. वि.प.क्र. 1 ते 3 ने मात्र कायदेशीर नोटीस आणि नंतर तक्रारीची नोटीस प्राप्त होऊनही सदर उद्वाहकाच्या दुरुस्तीबाबत किंवा बदलविण्याबाबत कोणतीही पाऊले उचलली नाहीत. तक्रारकर्त्याचा प्रतिउत्तर दि. 21.02.2017 (Exhibit 14 आणि 15) नुसार आक्षेप आहे की, वि.प.क्र. 1 ते 3 यांनी Bombay Lift Act 1939, Section 8(2) नुसार उद्वाहक लावतांना ‘’विद्युत निरीक्षक (सचिव व अनुज्ञापक मंडळ व उद्वाहन निरीक्षक) चेंबूर, मुंबई यांची परवानगी (Permission) व परवाना (license) न घेता उद्वाहकाची स्थापना केली. त्याबाबत त्यांनी संबंधित बाब स्पष्ट करण्याकरीता विद्युत निरीक्षक कार्यालय, महाराष्ट्र शासन मुंबई येथील संबंधित विभागाचे दि.19.01.2017 रोजीचे पत्र तक्रारीसोबत लावलेले आहे. सदर पत्रांनुसार परवानगी/परवाना न घेता केलेला उद्वाहक वापर अतिशय गंभीर, दखलपात्र व सार्वजनिक सुरक्षीततेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असल्याचे स्पष्टपणे नमूद केल्याचे दिसते. तसेच नियमबाहय व अनधिकृत वापरामुळे भविष्यात अपघात घडून जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी व्यक्तीशा जबाबदारी वि.प.ची असल्याबद्दल स्पष्टपणे नमूद केल्याचे दिसते. तसेच दि. 19.01.2017 रोजीचे पत्रांनुसार लावण्यात आलेल्या उद्वाहकातील दोष (defects) नमूद केल्याचे दिसते व सदर त्रुटींची पूर्तता 09.02.2017 पर्यन्त करण्याचे निर्देश दिल्याचे व दिलेल्या मुदतीत पूर्तता न केल्यास कारवाई करण्याबद्दल नमूद केल्याचे दिसते. वि.प.क्र. 1 ते 3 यांनी उद्वाहनात असलेल्या त्रुटीची पूर्तता केली नसल्याने त्याचा अहवाल निरंक असल्याची माहिती संबंधित विभागाने दिलेली आहे. वि.प.क्र. 1 ते 3 उद्वाहनाच्या देखरेखीबाबत आणि त्रुटीची पूर्तता करण्याबाबत उदासिन दिसून येतात. उपरोक्त बाबीवरुन वि.प.क्र. 1 ते 3 सदनिकाधारकांना सेवा देण्यात त्रुटि आणि निष्काळजीपणा करीत असल्याचे स्पष्ट होत असल्याने तक्रारकर्त्याची तक्रार दाद मिळण्यास पात्र असल्याचे मंचाचे मत आहे.
7. सदर प्रकरण मंचासमोर दाखल झाल्यानंतर वि.प.ने तक्रारकर्त्याची तक्रार खोडून काढण्याकरीता असे कुठलेही दस्तऐवज दाखल केले नाही की, ज्यावरुन वि.प. हे स्पष्ट करु शकतील की, लावण्यात आलेले उद्वाहक हे नामांकित कंपनीचे असून ते आधुनिक सुविधेसह नेहमीच उपलब्ध राहील. सदर उद्वाहक वापर करीत असतांना वारंवार बंद पडल्याचे, तक्रारकर्ता व त्यांचे म्हातारे वडील उद्वाहकामध्ये अडकून पडल्याचे तसेच उदवाहकामध्ये आपातकालीन फोन क्रमांक, कॉल बेल नसल्याने त्यांना अनेक लोकांना फोन लावून उद्वाहक उघडावे लागल्यासंबंधी निवेदन दिल्याचे दिसते. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे वि.प.क्र. 1 ते 3 यांनी प्रसिध्द कंपनीचे उद्वाहक लावून देण्याचे आश्वासित केले होते परंतू सहनिवासामध्ये असलेले उद्वाहकावर कुठल्याची कंपनीचे नाव, निर्मिती वर्ष, मशीनचा क्रमांक, टोल फ्री फोन क्रमांक, आपातकाली फोन क्रमांक आणि कॉल बेल नमूद नाही, त्यामुळे हे उद्वाहक कुठल्या कंपनीचे आहे याचा अर्थबोध होत नाही व ते अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याचे तक्रारकर्त्याचे निवेदन सत्य समजण्यास मंचाला हरकत वाटत नाही. वयोवृध्द किंवा आजारी व्यक्तींना जीना चढतांना त्रास होतो म्हणून उद्वाहक ही एक चांगली सुविधा आहे व उद्वाहकाची सुविधा ही बहुमजली इमारतीमध्ये एक आवश्यक बाब आहे पण ती सुविधाच जर चांगली नसेल तर ती तेवढीच धोकादायकही आहे. सदर स्थिति अत्यंत गंभीर असून अश्या घटना मानसिक व शारिरीक त्रास देणार्या आहेत. त्यामुळे वि.प.क्र. 1 ते 3 ने संवेदनशीलतेने वागणे व अपघाताची वाट न बघता ताबडतोब उचित कारवाई करणे आवश्यक होते पण दुर्दैवाने तसे झाल्याचे दिसत नाही. मा. राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या न्यायनिवाड्यात (“Mrs. Rashmi Handa and others –Versus- OTIS Elevator Company (India) Ltd & Ors Original Petition No.25 of 2005, Judgment Dated 21.01.2014.”) अश्याच प्रकारे उद्वाहकाची योग्य निगा न राखल्याने झालेल्या मृत्यू प्रकरणी संबंधितांना दोषी ठरवत मोठी नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्वाहकाची योग्य निगा राखण्या संबंधी नोंदविलेली काही निरीक्षणे प्रस्तुत प्रकरणात लागू असल्याचे दिसते. प्रस्तुत प्रकरणात जरी अपघात झालेला नसला तरी दोषपूर्ण उद्वाहकामुळे भविष्यात अपघात/जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
8. तक्रारकर्त्याने तक्रारीत मागणी करतांना त्यांनी उद्वाहकाच्या खर्चाचे ईस्टीमेट (अंदाजित खर्च) तक्रारकर्ता दाखल करेल त्या ईस्टीमेटनुसार द्यावा असे नमूद केल्याचे दिसते. तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दि. 21.02.2017 सोबत (Exhibit 14 आणि 15) KONE कंपनीचे नवीन उद्वाहक लावण्यासाठी दि.28.01.2017 रोजीचे रु 7,52,000/- किमतीचे ईस्टीमेट सादर केल्याचे दिसते. सध्या अस्तीत्वात असलेल्या उद्वाहकातील दोष निवारण करण्यास आणि विद्युत निरीक्षक (सचिव व अनुज्ञापक मंडळ व उद्वाहन निरीक्षक) चेंबूर, मुंबई यांच्याकडून यांची परवानगी (Permission) व परवाना (license) घेण्यासाठी वि.प.क्र. 1 ते 3 ला निर्देश देण्यात येतात आणि जर वि.प.क्र. 1 ते 3 सदर निर्देशांचे पालन करण्यास असमर्थ राहिले तर त्यांनी ‘’महालक्ष्मी रेसीडेंसी III’’ मधील सदनिका/कार्यकारिणी सदस्यांशी संपर्क साधून त्यांच्या मान्यतेने नामांकित कंपनीचे नवीन उद्वाहक आवश्यक परवानगी व परवाना घेऊन लावून देण्याची व्यवस्था करावी व नविन उद्वाहनाकरीता येणारा संपूर्ण खर्च वि.प.क्र. 1 ते 3 ने सोसावा.
9. प्रस्तुत प्रकरणी तक्रारकर्त्याने रु 35,50,000/- देऊनही आश्वासित सुविधांपासून वंचित राहावे लागले त्यामुळे त्याला शारिरीक, मानसिक त्रास होणे साहजिक आहे, सदर त्रासाबद्दल रु 50,000/- नुकसान भरपाई तक्रारकर्त्याने मागितली आहे पण मागणीसाठी कुठलाही मान्य करण्यायोग्य पुरावा अथवा निवेदन दिले नाही. सदर मागणी अवाजवी असल्याचे मंचाचे मत आहे पण तक्रारकर्त्याला झालेल्या त्रासासाठी माफक नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारकर्ता पात्र असल्याचे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने दि 24.11.2015 रोजी वकिलामार्फत नोटिस पाठवून देखील वि.प. ने कुठलीही कारवाई केली नाही अथवा नोटिसला उत्तर दिले नाही त्यामुळे मंचासमोर आपला वाद मांडावा लागला व पर्यायाने तक्रारीच्या कार्यवाहीचा खर्च सहन करावा लागला. मंचाचे मते तक्रारकर्ता तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे.
उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत असून वि.प.क्र. 1 ते 3 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी ‘’महालक्ष्मी रेसीडेंसी III’’ मध्ये स्थापीत करण्यात आलेल्या उद्वाहकाची ‘’विद्युत निरीक्षक (सचिव व अनुज्ञापक मंडळ व उद्वाहन निरीक्षक) चेंबूर, मुंबई यांचेकडून तपासणी करुन आणि त्रुटी असल्यास त्याची पूर्तता स्वखर्चाने करुन पूर्तता अहवाल, परवानगी व परवाना प्रत तक्रारकर्त्यास द्यावी.
किंवा
कायदेशीर किंवा तांत्रिक बाबींमुळे वरील बाबींची पूर्तता शक्य नसल्यास त्यांनी ‘’महालक्ष्मी रेसीडेंसी III’’ मधील सदनिका/कार्यकारिणी सदस्यांशी संपर्क साधून त्यांच्या मान्यतेने नामांकित कंपनीचे नवीन उद्वाहक आवश्यक शासकीय परवानगी व परवाना घेऊन लावून देण्याची व्यवस्था करावी व नविन उद्वाहनाकरीता येणारा संपूर्ण खर्च वि.प.क्र. 1 ते 3 ने सोसावा व आवश्यक कारवाई 3 महिन्यात पूर्ण करावी.
- वि.प.क्र. 1 ते 3 ने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाबाबत नुकसान भरपाईदाखल रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.5,000/- द्यावे.
- सदर आदेशाचे पालन वि.प.क्र. 1 ते 3 ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे तीन महिन्याचे आत करावे.
- सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.