निकालपत्र (दि.12.11.2014) व्दाराः- मा. सदस्य – श्री दिनेश एस.गवळी,
1 प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांना दुकानगाळयाचे नोंद खरेदीपत्र (Registered Sale Deed) पुर्ण करुन न देऊन सेवेत त्रुटी ठेवल्याने नुकसानभरपाई व खरेदीपत्र पुर्ण करुन मिळणेकरीता दाखल केली आहे.
2 प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाले वकीलामार्फत मंचापुढे हजर झाले. तथापि सामनेवाले यांनी वेळेत म्हणणे दाखल न केल्याने मे.मंचाने सामनेवाले यांचे दाखल केलेले म्हणणेवरती तक्रारदारांना कॉस्ट देणेचे अटीवर म्हणणे दाखल करुन घेतले. तथापि सामनेवाले यांना वेळोवेळी संधी देऊनदेखील त्यांनी कॉस्ट न दिल्याने तक्रारदाराने सामनेवाले यांचेविरुध्द नो से चा आदेश पारीत करणेत यावा यासाठी अर्ज दिल्याने सामनेवाले यांचेविरुध्द “नो से” चा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारदार तर्फे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकणेत आला. सामनेवाले गैरहजर, सबब, याकामी गुणदोषावरती खालीलप्रमाणे निकाल पारीत करणेत येतो.
तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी –
3 सामनेवाले हे व्यवसायाने बिल्डर्स व डेव्हलपर असून तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून स्वत:च्या व कुंटुंबाच्या उदरनिर्वाहाकरीता व चरितार्थासाठी अर्थार्जन करणेपोटी दुकानगाळा खरेदीचे संबंधात सामनेवाले यांचेशी करार केला. सामनेवाले यांनी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सिटी सर्व्हे नं.1758/ब/2, ए वॉर्ड, साकोली कॉर्नर, कोल्हापूर ही पार्वतीबाई वासुदेव दामले यांची मिळकत विकसीत करुन तेथे अनिरुध्द अपार्टमेंटस् नावाचे संकुल उभारलेले आहे. तक्रारदार हे व्यवसायाने चार्टर्ड अकौंटंट असून त्यांनी सदर सामनेवाले यांनी डेव्हलप केलेल्या अनिरुध्द अपार्टमेंटस् मध्ये फ्लॅट व शॉप विक्रीकरीता उपलब्ध असलेचे समजून आलेने तक्रारदारांना सामनेवाले यांचेबरोबर स्वत:ला राहणेकरीता फ्लॅट व व्यवसायाकरीता दुकानगाळा खरेदीपोटी दोन करार केले. त्यापैकी फ्लॅटचे खरेदीपत्र पूर्ण होऊन तक्रारदार सदर फ्लॅटमध्ये राहातदेखील आहेत. सदर फ्लॅटमध्ये वीज मीटर देखील बसवून मिळालेले असून सदर वीज मीटरचा ग्राहक क्र.266511617251 असा आहे. तक्रारदार सदर फ्लॅटचे वीज बिल आजपर्यंत नियमीतपणे भरत आहेत. सदर फ्लॅटसोबत तक्रारदारांनी त्याच अनिरुध्द अपार्टमेंटस् मधील ग्राऊंड फ्लोअरला असणारा दुकानगाळा नं.4 क्षेत्र 19.51 चौ.मी.बिल्ट-अप (210 चौ.फुट) इतक्या क्षेत्रफळाचा दुकानगाळा सामनेवाले यांचेकडून दि.18.07.1989 रोजी लेखी करारपत्राव्दारे खरेदी केलेला आहे. सदर करारानुसार सदर दुकानगाळयाची किंमत रक्कम रु.50,000/- इतकी ठरलेली असून करारपत्रावेळी रक्कम रु.10,000/- तसेच तदनंतर रु.40,000/- अशी एकूण रककम रु.50,000/- ही खरेदीपोटी ठरलेली संपूर्ण मोबदला रक्कम तक्रारदाराने सामनेवाले यांना अदा केलेली आहे. तसेच करारपत्रामधील कलम-20 अनुसार ज्यादाची रक्कम रु.5,000/- इलेक्ट्रिसिटी डिपॉझीट इतयादी कायदेशीर आकारापोटी दिलेली आहे व त्यानुसार तक्रारदाराला सदर गाळयामध्ये वीज मीटर देखील बसवून मिळालेले आहे. सदर वीज मीटरचा ग्राहक क्र.266511617260 असा असून तक्रारदार सदर गाळयाचे वीज बिल नियमीतपणे भरत आहेत. तसेच कराराप्रमाणे देय असणा-या अन्य रक्कमाही सामनेवाले यांना अदा केलेल्या आहेत. सदर कराराप्रमाणे दुकानगाळयाची रक्कम, तसेच करारापत्राप्रमाणे आवश्यक इतर रक्कमा संपूर्णत: अदा केलेमुळे सामनेवाले यांनी तक्रादारांना दुकानगाळयाचा ताबा दिलेला आहे व त्याप्रमाणे कोल्हापूर महानरपालिकेकडे मालकी हक्काने भोगवटादार म्हणून मिळकत कोड नं.A010300375 म.न.पा.प्रभाग क्र.ए वॉर्ड, सि.स.नं./रि.स.नं.1758 ब/2, साकोली कॉर्नर, अन्वये नोंद झालेली आहे. त्यानुसार तक्रारदारांनी सदर गाळयाचा ताबा घेतलेपासून कोल्हापूर महानगरपालिकेचे कायदेशीर कर भरलेले आहेत व भरत आहेत.
4 प्रस्तुत कामी सामनेवाले यांनी सदर अनिरुध्द अपार्टमेंटस मधील इतर फ्लॅटधारकांना व दुकानगाळाधारकांना करारपत्रानुसार त्यांचे मिळकतीचे खरेदीखत करुन दिलेले आहे. तसेच तक्रारदारांना देखील त्यांच्या फ्लॅटचे खरेदीपत्र पूर्ण करुन दिलेले आहे. परंतु तक्रारदारांना उपरोक्त कलम-3 मध्ये नमुद वर्णनाच्या दुकानगाळयाचे खरेदीपत्र सामनेवाले यांनी अदयाप पुरे करुन दिलेले नाही. सदर दुकानगाळयाचे खरेदीखत करुन न दिलेने तक्रारदारांना प्रचंड आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास भोगावा लागत आहे. तसेच वेळोवेळी होणारे महसूलाबाबतचे शासन निर्णयाप्रमाणे आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. याकारणे सामनेवाले यांनी करारपत्राप्रमाणे व कायदयाप्रमाणे खरेदीपत्र पूर्ण करुन न दिल्याने तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत फार मोठी त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून तक्रारदारांच्या तक्रार अर्जाचे कलम-3 मध्ये नमुद केलेल्या दुकानगाळयाचे नोंद खरेदीपत्र (Registered Sale Deed) करुन देणेचा आदेश व्हावा तसेच सामनेवाले यांचेमुळे तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.5,000/- दयावेत अशी सदरहू मंचास विनंती केली आहे.
5 तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत एकूण 7 कागदपत्रे दाखल केलेली असून अनुक्रमे ती पुढीलप्रमाणे, सामनेवाले यांना पाठविलेली वकील नोटीस, सामनेवाले यांनी न स्विकारलेने परत आलेला नोटीसीचा लखोटा-रजि.ए.डी., सामनेवाले यांनी तक्रारदारास करुन दिलेले अॅग्रीमेंट टू सेल, विवादीत दुकानगाळयाचे वीज बील, विवादीत अपार्टमेंटमधील तक्रारदाराच्या फ्लॅटचे वीज बील, विवादीत दुकानगाळयाची असेसमेंट शीट, विवादीत दुकानगाळा असणा-या अनिरुध्द अपार्टमेंट सि.स.नं.1758-ब/2 चे मिळकत पत्रिका, इत्यादी कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीं दाखल केल्या आहेत.
6 तक्रारदारांची तक्रार, तक्रारीसोबत दाखल कागदपत्रे व युक्तीवादाचा विचार करीता, पुढील मुद्दे निष्कर्षाप्रत उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
3 | आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा:-
मुद्दा क्र.1:- तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे व तोंडी युक्तीवाद यांचा साकल्याने विचार करता, मंचास असे दिसुन येते की, तक्रारदार व जाबदार यांच्यात दि.18.07.1989 रोजी करारपत्र झाले होते व या करारपत्रानुसार सामनेवाले यांनी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सिटी सर्व्हे.नं.1758/ब/2 ए वॉर्ड साकोली कॉर्नर, कोल्हापूर ही पार्वतीबाई वासुदेव दामले यांची मिळकत विकसीत करुन तेथे अनिरुध्द अपार्टमेंटस् या नावाचे इमारत बांधून त्यामधील ग्राऊंड फ्लोअरला असणारा दुकानगाळा नं.4 क्षेत्र 19.51चौ.मी. रक्कम रु.50,000/- तक्रारदारास खरेदी देणेचे ठरले होते. सदरचे करारपत्राच्या दिवशी तक्रारदारांनी सामनेवाले यांना विक्री रक्कमेपैकी रक्कम रु.10,000/- आगाऊ देणेचे ठरले होते व उर्वरीत रक्कम करारपत्रातील कलम-3 मध्ये रक्कमेचा भरणा तपशीलप्रमाणे देणेचे नमुद आहे. सदर तपशीलाप्रमाणे रक्कम रु.20,000/- बांधकामाच्या Plinth Level च्या वेळी रक्कम रु.10,000/-, Brick Masonry चे काम पुर्ण झाल्यानंतर, रक्कम रु.8,000/- प्लॅस्टरचे काम पुर्ण झाल्यानंतर, रक्कम रु.2,000/- ताबा देणेचे वेळी अशी एकूण रक्कम रु.50,000/- इतकी रक्कम तक्रारदारांनी सामनेवाले यांना देणेचे ठरले होते. सदरचे करारपत्रावर सामनेवाले मैथिली बिल्डर तर्फे भागीदार म्हणून सामनेवाले यांची व तक्रारदार यांची सही आहे.
तक्रारदाराने त्यांचे तक्रार अर्जात सामनेवाले यांनी दुकानगाळाचा ताबा त्यांना दिलेचे कथन केले आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जासोबत सदर दुकान गाळयाचा ताबा त्यांचेकडे असलेबाबत सदर दुकानगाळयाचे वीजबील, असेसमेंट शीट दाखल केले आहेत. सदर वीजबील व असेसमेंट पाहिले असता, तक्रारदार यांचेकडे वर नमुद दुकानगाळा ताबेत असलेचे दिसुन येते. त्याचप्रमाणे करारपत्रामध्ये नमुद केलेल्या रक्कम भरणा तपशीलाप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाले यांना सदर दुकान गाळयाचा ताबा घेतेवेळी पर्यंत खरेदीचे संपूर्ण रक्कम तपशीलाप्रमाणे दिलेली आहे असे तक्रार अर्जात नमुद केलेले आहे. परंतु तक्रारदारास तक्रार अर्जात नमुद अनिरुध्द अपार्टमेंटस् मधील दुकानगाळा नं.4 चे खरेदीपत्र पूर्ण करुन देणे कायदयाने व करारपत्रातील अटीप्रमाणे बंधनकारक व आवश्यक असताना देखील त्यांनी ते करुन दिले नाही. त्याचप्रमाणे तक्रारदाराने सामनेवाले यांना खरेदीपत्र पूर्ण करुन देण्याकरीता त्यांचे वकीलामार्फत नोटीस पाठविली असताना सुध्दा, सदर नोटीसीस उत्तर देण्याचे सौजन्य ही दाखविले नाही. या सर्व बाबींचा विचार करीता, सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि.18.07.1989 रोजीचे करारपत्रानुसार खरेदीपत्र पूर्ण करुन न दिल्याने सेवेत गंभीर त्रुटी ठेवली. या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 व 3:- मुद्दा क्र.1 मध्ये सामनेवाले यांनी सदोष सेवा दिल्याचे शाबीत झाल्याने सामनेवाले तक्रार अर्जात नमुद दुकानगाळयाचे खरेदीपत्र सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करुन दयावे. त्याचप्रमाणे जाब देणार यांच्या सदोष सेवेमुळे तक्रारदारांना ज्या शारिरीक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्याची दखल घेऊन त्यापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/- तक्रारदारांना अदा करावेत असा आदेश देण्यात येत आहे. मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे. सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
- तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील अनिरुध्द अपार्टमेंट मधील ग्राऊंड प्लोअरला असणारा दि.18.07.1989 रोजीचे करारपत्रामध्ये नमुद दुकानगाळा नं.4 क्षेत्र 19.51चौ.मी. यांचे नोंद खरेदीपत्र निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्यापासुन सहा आठवडयाचे आत करुन दयावे.
- सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) तसेच या अर्जाचा खर्च रक्कम रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळालेपासुन सहा आठवडयांचे आत अदा करावेत.
- आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.