::: आ दे श :::
( पारित दिनांक : 26/06/2018 )
मा. अध्यक्षा सौ. एस. एम. ऊंटवाले , यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे :-
तक्रारदार हे शेतकरी असुन, त्यांची मौजे वसारी, ता. मालेगांव, जि. वाशिम येथे 39 आर शेती आहे. वडिलांचे नांव 7/12 वर आहे, वडील मयत आहेत व तक्रारकर्ता हा त्यांचा एकमेव वारसदार आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 हे कृषी सेवा केंद्र असुन ते बियाण्याचे विक्रेते आहेत. विरुध्द पक्ष क्र. 2 हे बियाण्याचे उत्पादक आहेत तथा विरुध्द पक्ष क्र. 1 मार्फत विक्रेते आहेत. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 येथून वान उडीद TAU 1, बिल क्र. 1233 दिनांक 27/06/2016 रोजी 1 बॅग रुपये 900/- ला खरेदी केली. खरेदी करतेवेळी विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याला विश्वासात घेवून आश्वासन दिले की, उडीद TAU 1 बियाणे उत्तम प्रतीचे असुन चांगले ऊत्पन्न मिळेल. पेरणी केल्यानंतर तक्रारकर्त्याच्या असे निदर्शनास आले की, बियाणे भेसळयुक्त आहे. सदर वानामध्ये इतर वानाची भेसळ असल्याने तक्रारकतर्याचे 100 % नुकसान झाले. तक्रारकर्त्याने कृषी अधिकारी, पंचायत समिती, मालेगांव यांचेकडे लेखी तक्रार दिली. त्यानुसार 17/10/2016 रोजी तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीने तक्रारकर्त्याचे शेतीस भेट देवून पाहणी केली व 19/10/2016 रोजी अहवाल दिला. ज्यानुसार 55.55 टक्के नुकसान झाले आहे. तक्रारकर्त्याने नुकसान भरपाई मिळणेबाबत विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना दिनांक 25/11/2016 रोजी नोटीस पाठवून विनंती केली पण विरुध्द पक्ष यांनी नोटीसचे ऊत्तर दिले नाही व नुकसान भरपाई दिली नाही. म्हणून तक्रारकर्ता याने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 विरुध्द सदर तक्रार दाखल केली आहे.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 यांचा लेखी जबाब थोडक्यात खालीलप्रमाणे.
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडून दिनांक 27/06/2016 रोजी उडीद TAU 1, कंपनीचे बियाणे स्वतःच्या मागणीप्रमाणे खरेदी केले. सदर माल हा सिलबंद परिस्थितीमध्ये होता. त्यामुळे बियाणे नियम 7 नुसार, विकणा-याची कोणतीही जबाबदारी येत नाही. तक्रारकर्ता हा शेतकरी नसून, तक्रारकर्त्याने निवृत्ती जगाजी हे त्यांचे वडील आहेत व तो त्यांचा एकमेव वारसदार आहे, याबाबतचे कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाही. तक्रारकर्त्याच्या 7/12 नुसार, त्याने खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी केलेली आहे. उडीद TAU 1, कंपनीचे या लॉट मधील बियाणे इतर कास्तकारांना पण दिले आहे आणि कोणाचीही तक्रार नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 यांना चौकशीच्या वेळी न बोलविता संगनमताने एकतर्फी व खोटा अहवाल बनवून घेतला आहे. सदर शासनाचे, तक्रारीचे चौकशीचे परिपत्रकानुसार, समीतीवर जाणकार वैज्ञानीक असणे आवश्यक आहे व तुलनात्मक चौकशी न केल्याने, अहवाल ग्राहय धरता येणार नाही. तक्रारकर्ता हा शेतकरी नसल्याने, त्यास उडीद पिकाच्या पेरणीची संपूर्ण माहिती नसल्याने व त्याने योग्य ती काळजी न घेतल्याने, तक्रारकर्त्याचे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
3) विरुध्द पक्ष क्र. 2 यांचे थोडक्यात म्हणणे, लेखी जबाबानुसार खालीलप्रमाणे.
विरुध्द पक्ष क्र. 2 हे बियाण्याची प्रतिष्ठीत कंपनी असून, सदर कंपनीने उत्पादीत केलेले बियाणे APSSC AGENCY KURNOOL व्दारा प्रमाणीत केले जाते. तक्रारकर्त्याने जोडलेला 7/12 वडिलांच्या नावावर असून ते मयत आहेत व तक्रारकर्ता वडिलांचा एकटा वारसदार आहे, याचा काही पुरावा जोडलेला नाही. सदर शेतक-याने घेतलेले बियाणे प्रमाणीत असुन, त्याची शुध्दता 98.8 टक्के असुन, उगवणीचे प्रमाण 82 टक्के आहे. यावरुन बियाणे भेसळयुक्त नसुन योग्य दर्जाचे असल्याचे सिध्द होते. तक्रारकर्त्याने कृषी अधिकारी यांचेकडे केलेली तक्रार लेखी स्वरुपात विरुध्द पक्ष क्र. 2 यांना कळविले नाही. त्यामुळे कंपनीच्या प्रतिनीधीस प्रत्यक्ष पाहणीच्या वेळेस उपस्थित राहून आपला अभिप्राय नोंदविता आला नाही, म्हणून झालेला पंचनामा मान्य नाही. उडीद बियाण्याची पेरणी दिनांक 30/06/2016 रोजी केली आहे व पंचनामा दिनांक 17/10/2016 रोजी म्हणजे 106 दिवसानंतर केला आहे. वास्तवीक उडीदाचे पिक 65 ते 75 दिवसाचे असते, त्यानंतर शेंगा काळ्या पडून वाळतात, म्हणून शेतकरी पीक ठेवत नाही. त्यामुळे समितीने पंचनामा केला तेंव्हा पीक उभे होते काय ? याचा बोध होत नाही. भेसळीची टक्केवारी नमूद करण्याकरिता कोणती पध्दत वापरली आहे याचा बोध होत नाही. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष, उप विभागीय कृषी अधिकारी हे असतात परंतु सदर प्रकरणात समितीचे अध्यक्ष म्हणून तालुका कृषी अधिकारी, मालेगांव यांची स्वाक्षरी आहे व अन्य सदस्यांच्या सह्या नाहीत. तसेच समितीने ह्याच लॉटचे शेजारच्या शेतक-याची विनोद काशीराम जटाळे यांच्या शेताची पाहणी करुन सदर शेतक-याने कापणी व मळणी झाल्याचे नमूद केले आहे व त्याच्या पिकात कोणत्याही प्रकारची भेसळ नाही, अशी साक्ष दिली आहे. त्यामुळे हा पंचनामा मान्य नाही.
4) तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे स्वतंत्र लेखी जबाब, तक्रारकर्त्याचे प्रतिऊत्तर, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज तसेच तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांचा युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
5) तक्रारकर्ता याने दाखल केलेली पावती मे. गजानन कृषी सेवा केंद्र, पावती क्र. 1233 दिनांक 7/06/2017 ही तक्रारकर्ता यांचे नावावर आहे. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्र. 1 व विरुध्द पक्ष क्र. 2 जे ऊत्पादक आहे, दोघांचा ग्राहक आहे, हे स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्र. 1 व विरुध्द पक्ष क्र. 2 चा ग्राहक आहे, यास विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी कुठलाही आक्षेप नोंदविला नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक आहे, हे स्पष्ट होते.
6) तक्रारकर्ता याने जे 7/12 चे उतारे व 8 अ चा उतारा दाखल केला त्यावरुन तक्रारकर्ता हा त्यांच्या मयत वडिलांचा वारसदार असून तोच शेती वहीती करतो हे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने दाखल केलेला 7/12 चा उतारा हा 2015-16 चा असून सदर उडीद पीक हे 2016-17 मध्ये घेतले असल्याने विरुध्द पक्ष यांचा तक्रारकर्ता यांनी उडीद पीक लावले नाही, या आक्षेपात फारसे तथ्य उरत नाही. विरुध्द पक्ष यांच्या प्रमुख आक्षेपानुसार उडीद पीक हे 65 ते 75 दिवसाचेच असते, त्यामुळे तालुका तक्रार निवारण समितीने पंचनामा केला तेंव्हा उडीद पीक उभे होते किंवा नाही याचा बोध होत नाही. यास पुष्टी देणारी साक्ष श्री. विनोद काशीराम जटाळे यांनी तालुका तक्रार निवारण समितीपुढे दिलेली आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार समितीच्या अवलोकनाच्या वेळेस त्याचे उडीद पिकाची कापणी व मळणी झाली होती व त्यांना पिकात कुठलीही भेसळ आढळून आली नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी घेतलेल्या आक्षेपात तथ्य आढळते. तसेच तालुका तक्रार निवारण समितीचा अहवाल हा प्राथमिक अवलोकन करुन घेतला आहे. त्याउलट विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी ए.पी. स्टेट सीड सर्टीफीकेशन एजन्सी यांचे टेस्टींग सर्टीफीकेट लावले आहे, ज्यातुन बियाण्याची शुध्दता 98.8 आहे, असे दिसते. त्यामुळे वरिष्ठ न्यायालयांच्या न्यायतत्वानुसार मंच तालुका तक्रार निवारण समितीचा अहवाल ग्राह्य न धरता, टेस्टींग सर्टीफीकेट ग्राह्य धरावे, यावर मंचाने भिस्त ठेवली आहे. तसेच तक्रारकर्ता यांनी दाखल केलेली बियाणे खरेदी पावती ही 07/06/2017 ची असून तालुका तक्रार निवारण समितीचा अहवाल दिनांक 17/10/2016 चा असल्याने यात सुध्दा मंचाला संदिग्धता दिसून येत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार सिध्दतेअभावी खारीज करण्यात येत आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित केला.
:: अंतीम आदेश ::
1) तक्रारकर्ता यांची तक्रार सिध्दतेअभावी खारिज करण्यात येते.
2) न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3) उभय पक्षास आदेशाच्या प्रती विनामुल्य दयाव्यात.
(श्रीमती शिल्पा एस. डोल्हारकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,वाशिम,(महाराष्ट्र).
Svgiri