तक्रारदारातर्फे : वकील मेनन अॅण्ड असोसिएटस कंपनी
सामनेवाले : वकील श्री. उदय वावीकर
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- मा. श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सामनेवाले क्रमांक 1 ही विकासक/बिल्डर व्यवसाय करणारी कंपनी असून सामनेवाले क्रमांक 2 हे सामनेवाले क्रमांक 1 कंपनीचे संचालक आहेत. तक्रारीतील चार तक्रारदारांनी सामनेवाले यांच्या साईधाम माहुलगांव चेंबूर येथील प्रकल्पामध्ये 4 वेगवेगळया सदनिका खरेदी करण्याचे ठरविले. त्याबद्दल तक्रारदार क्रमांक 1 यांनी सामनेवाले यांना सदनिकेची एकूण किंमत रुपये 4,27,329/- पैकी रुपये 42,693/- वेगवेगळया हप्त्यांमध्ये अदा केले. त्याबद्दल सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पावत्या दिल्या, करारनामा देखील करण्यात आला.
2. तक्रारदार क्रमांक 2 यांना 304 चौरस फूटाची ए विंगमधील सदनिका क्रमांक 201 किंमत रुपये 4,27,329/- खरेदी करण्याचे ठरविले व त्यापोटी सामनेवाले यांना एकूण रक्कम रुपये 42,693/- अदा केले. तक्रारदार क्रमांक 3 यांनी ए विंगमधील सदनिका क्रमांक 201 क्षेत्रफळ 381.25 चौरस फूट एकूण किंमत रुपये 5,23,719/- या किंमतीस खरेदी करण्याचे ठरविले व एकूण किंमती पैकी वेगवेगळया हप्त्यांमध्ये सामनवेाले यांना रुपये 52,372/- अदा केले. तक्रारदार क्रमांक 4 यांनी ए विंगमधील सदनिका क्रमांक 101, 381.25 चौरस फूट किंमत रुपये 5,23,719/- खरेदी करण्याचे ठरविले व त्या पैकी रुपये 52,372/- वेगवेगळया हप्त्यांमध्ये सामनेवाले यांना अदा केले. करारनामा देखील करण्यात आला.
3. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे सामनेवाले यांनी प्रकल्पाचे काम पूर्ण केले नाही. सामनेवाले यांचेकडून तक्रारदारांना दिनांक 15/3/2001 रोजी पत्र प्राप्त झाले व विकास आराखडयाच्या बाहेर प्रकल्प असल्याने बांधकाम होऊ शकत नाही असे कळविले. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदनिकेचा करार रद्द करण्याकामी तक्रारदार क्रमांक 1 व 2 यांना प्रत्येकी रुपये 1,74,762/- व तक्रारदार क्रमांक 3 व 4 यांना रुपये 1,72,617/- प्रत्येकी असे धनादेश पाठविले. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांना व्याजाची मागणी करणारे पत्र दिले. सामनेवाले यांनी ती मागणी नाकारली त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
4. सामनेवाले यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली, व कथन केले की, चारही तक्रारदारांचे करारनामे वेगळे असल्याने व व्यवहार देखील वेगळे असल्याने एकत्रित तक्रारी दाखल होऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी रकमेच्या परताव्यापोटी धनादेश स्विकारले असल्याने तक्रारदार व सामनेवाले यांच्या दरम्यान ग्राहक व सेवा सुविधा पुरविणारे ग्राहक नाते शिल्लक राहत नाही. त्याचप्रमाणे तक्रार मुदतबाहय आहे कारण प्रकल्प पूर्ण होत नाही ही बाब सामनेवाले यांनी तक्रारदारांना वर्ष 2001 मध्ये कळविलेली आहे. याप्रकारे तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यास कसूर झाली या आरोपास समानेवाले यांनी नकार दिला.
5. तक्रारदारांनी व सामनेवाले यांनी आपले पुराव्याचे शपथपत्र, व कागदपत्रे दाखल केले, तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. दोन्ही बाजूंच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
6. प्रस्तुत मंचाने तक्रारदारांची तक्रार, पुराव्याचे शपथपत्र, व कागदपत्रे, तसेच सामनेवाले यांची कैफीयत, शपथपत्र व कागदपत्रे व दोन्ही बाजूंचा लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | प्रस्तुत तक्रारीत सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या सदनिकेच्या ताब्याच्या संदर्भात, रकमेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही |
2 | अंतीम आदेश? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
7. वर नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक तक्रारदारांनी सामनेवाले यांच्या साईधाम प्रकल्पातील प्रत्येकी एक सदनिका खरेदी करण्याचे ठरविले. त्याबद्दल तक्रारदार व सामनेवाले यांच्या दरम्यान वेगवेगळे करारनामे करण्यात आले. प्रत्येक तक्रारदारांनी आपल्या सदनिकेच्या किंमतीपोटी सामनेवाले यांना वेगवेगळया रकमा अदा केल्या. याप्रकारे चारही तक्रारदारांचा सामनेवाले यांच्यासोबत सदनिका खरेदीचा व्यवहार वेगळा होता, व तो एकत्रित नव्हता. सामनेवाले यांच्या किंमतीच्या परताव्यापोटी प्राप्त झालेले धनादेश देखील वेगवेगळे होते. तरीदेखील तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याविरुध्द वेगवेगळया तक्रारी दाखल करण्याच्या ऐवजी एकच तक्रार दाखल केलेली आहे. तक्रार दाखल करण्याचे कारण सर्व तक्रारदारांकरीता एकसारखे असले तरी देखील त्या समान नाहीत. एकत्रित तक्रार केवळ सामुहिक अथवा समान घटनेकरीता (Same cause of action) दाखल केली जाऊ शकते. परंतु एकसारख्या दिसणा-या (Similar cause of action) करीता एकच तक्रार दाखल होऊ शकत नाही. ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(बी) प्रमाणे एकापेक्षा अधिक तक्रारदार त्याच घटनेकरीता किंवा समान हक्क असतील तर (Same Interest) एकच तक्रार दाखल करु शकतात. त्यातही ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 13(6) प्रमाणे एकापेक्षा जास्त तक्रारदार समान हक्काकरीता मंचाची परवानगी घेऊन व ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 13(6) मध्ये नमूद केलेल्या बाबींची पूर्तता करुन एकच तक्रार दाखल करु शकतात. प्रस्तुतच्या प्रकरणात तक्रारदारांचे हक्क वेगवेगळे आहेत ते सारखे दिसत असले तरी समान नव्हेत. त्यांचे हक्क वेगवेगळया मालमत्तेमध्ये वेगवेगळया स्वरुपाचे आहेत. याप्रकारे तक्रारदारांची तक्रार चूकीच्या पध्दतीने दाखल झालेली असल्याने व तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 13(6) ची पूर्तता केलेली नसल्याने तक्रार सदोष आहे. सहाजिकच तक्रारदार कुठल्याही प्रकारची दाद मिळणेस पात्र नाहीत.
8. त्यातही तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडून रक्कम परताव्याचे धनादेश स्विकारलेले आहेत. तक्रारदारांचे असे कुठेही कथन नाही की, तक्रारदारांनी ते धनादेश आक्षेपासह अथवा आपले हक्क अबाधित ठेवून ते धनादेश स्विकारले. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून मूळ रकमेचे धनादेश स्विकारले असल्याने व त्याबद्दल कुठलाही आक्षेप नोंदविला नसल्याने तक्रारदार त्यानंतर मागावून अन्य दादी मागू शकत नाहीत. एकूणच प्रस्तुतच्या तक्रारीत तक्रारदार सामनेवाले यांचेकडून कुठलीही दाद मिळणेस पात्र नाहीत.
9. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षानुरुप पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रार क्रमांक 885/2009 रद्द करण्यात येते.
- खर्चाबद्दल हुकूम नाही.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 06/01/2014
( एस. आर. सानप ) (ज.ल.देशपांडे)
सदस्य अध्यक्ष
एम.एम.टी./-