श्री. शेखर मुळे, मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार वाहन विक्रेत्या विरुध्द त्याने दोषपूर्ण वाहन विकल्यासंबंधी ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्त्याने MH 40 N 4002 या क्रमांकाची PIAGGIO Mini van वि.प.कडून दि.25.02.2011 ला विकत घेतली होती. वि.प. त्या वाहनाचे अधिकृत विक्रेता आहे. त्या वाहनावर वाहन घेतल्यापासून 15 महिने किंवा 45 किलोमीटर यापैकी जे आधी घडेल त्या अवधीत वारंटी देण्यात आली होती. परंतू ते वाहन विकत घेतल्यापासूनच त्रास देऊ लागले. त्या वाहनाची दुरुस्ती वि.प.ने करुन दिली होती. त्यानंतर पुन्हा दि.27.04.2012 ला वारंटी कालावधीमध्ये ते वाहन बंद पडले. वि.प.ने ते दुरुस्त केले व त्याबद्दल अवास्तव रक्कम तक्रारकर्त्याकडून मागितली. तरीहीसुध्दा वाहनामध्ये असलेले दोष पूर्णपणे दूर झाले नव्हते आणि अधून-मधून त्यामध्ये काही तरी बिघाड होत राहत होते. वि.प.ने त्या वाहनाची योग्यरीत्या दुरुस्ती केली नाही. तसेच त्यामध्ये असलेल्या दोषाबद्दल वाहन निर्मिती कंपनीला कळविले नाही. दि.02.02.2013 ला तक्रारकर्त्याने पुन्हा ते वाहन वि.प.कडे दुरुस्तीकरीता नेले. परंतू वि.प.ने बरेचदा विनंती करुनही वाहनाची दुरुस्ती केली नाही. तक्रारकर्त्याने वि.प.ला ते वाहन बदलवून नविन वाहन देण्याबाबत विनंती केली होती. परंतू त्याचा काहीही फायदा न झाल्यामुळे शेवटी ही तक्रार दाखल केली आहे. त्याने वि.प.कडून त्या वाहनाऐवजी नविन वाहन देण्यासाठी, तसेच त्याला नादुरुस्त वाहनामुळे धंद्यामध्ये जे नुकसान झाले, त्याबाबत रु.50,000/-, झालेल्या त्रासाबद्दल रु.40,000/- नुकसान भरपाई आणि रु.10,000/- तक्रारीचा खर्च मागितला आहे.
3. वि.प.ने आपले लेखी उत्तर नि.क्र. 6 वर दाखल केले. त्यांनी हे मान्य केले की PIAGGIO वाहनाचे ते अधिकृत विक्रेता आहेत आणि तक्रारकर्त्याने त्यांच्याकडून सदर वाहन विकत घेतले होते. परंतू ही बाब नाकबूल केली की, त्या वाहनामध्ये सुरुवातीपासूनच काही दोष होता. वाहनावर असलेली वारंटीसुध्दा वि.प.ने मान्य केली आहे. वि.प.ने पुढे असे नमूद केले आहे की, त्या वाहनावर 5 मोफत सर्व्हिसिंग आणि 3 भुगतान करुन द्यावयाच्या सर्व्हिसिंग होत्या. तक्रारकर्त्याने ते वाहन त्याच्याकडे मोफत सर्व्हिसिंग करीता आणून देणे अनिवार्य होते. तक्रारकर्त्याने पहिले मोफत सर्व्हिसिंगकरीता वाहन आणले होते, तेव्हा ते 982 किमी चालले होते. त्यानंतर दुसरे मोफत सर्व्हिसिंग करीता तक्रारकर्त्याने वाहन आणले नाही आणि त्याने ते वाहन इतर ठिकाणावरुन सर्व्हिसिंग करुन घेतले होते. जे वारंटीच्या विरुध्द होते. तिसरे मोफत सर्व्हिसिंग वि.प.ने केले, त्यावेळी ते वाहन 10561 किमी चालले होते. चौथे आणि पाचवे सर्व्हिसिंग सुध्दा वि.प.ने करुन दिले होते. परंतू त्यानंतर तक्रारकर्त्याने ते वाहन पुढील सर्व्हिसिंग करीता वि.प.कडे कधीच आणले नाही. वि.प.ने हे कबुल केले आहे की, त्या वाहनामध्ये वारंटी कालावधीत बिघाड निर्माण झाला आणि वाहनाची दुरुस्ती व्यवस्थितरीत्या करण्यात आली होती. वि.प.ने सर्व्हिसिंग करतांना जे भाग वारंटीमध्ये नव्हते आणि जे बदलविणे गरजेचे होते, तेवढीच किंमत तक्रारकर्त्याकडून घेतली आहे. वि.प.ने हेसुध्दा मान्य केले की, तक्रारकर्त्याने ते वाहन त्याच्याकडे दुरुस्तीकरीता 02.02.2013 ला आणले होते. परंतू वि.प.ने दुरुस्ती केली नाही हे नामंजूर केले. उलट, तक्रारकर्ता वाहन घेऊन जाण्यास तयार नव्हता. पुढे वि.प.चे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने जे वाहन व्यावसायिक उपयोगाकरीता घेतले असल्याने तो ग्राहक होत नाही आणि त्याची तक्रार ग्राहक तक्रार म्हणून चालू शकत नाही, म्हणून खारिज करण्यात यावी.
- नि ष्क र्ष –
4. तक्रारीत जी वस्तुस्थिती नमूद केली आहे, ती वाचल्यावर ही बाब स्पष्ट दिसून येते की, तक्रारकर्त्याची तक्रार वि.प.ने त्याला दोषपूर्ण वाहन विकल्यासंबंधीची आहे. थोडक्यात तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार त्या वाहनामध्ये पूर्वीपासूनच दोष होता. ही बाब सिध्द करण्यासाठी तज्ञांचा अहवाल असणे आवश्यक आहे. त्या वाहनात नेमका कुठला दोष होता याचे स्पष्टीकरण तक्रारकर्त्याने कुठेही दिलेले नाही. तसेच वाहन मोफत सर्व्हिसिंग करीता ज्यावेळी देण्यात आले होते, त्यावेळी तयार केलेल्या जॉब कार्डच्या प्रतीसुध्दा तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे हे समजणे कठीण आहे की, त्या वाहनामध्ये नेमका कुठला निर्मिती दोष होता. तक्रारकर्त्याने केवळ मोघमपणे असे म्हटले आहे की, त्या वाहनामध्ये सुरुवातीपासूनच दोष होता आणि विकत घेतल्यापासून ते वाहन त्याला काही ना काही प्रकारे त्रास देत होते. याउलट, वि.प.तर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, ज्यावेळी ते वाहन पहिले आणि तिसरे मोफत सर्व्हिसिंगकरीता आणले होते, त्यावेळी ते वाहन बरेच कीलोमीटर चालले होते. म्हणजेच तक्रारकर्ता म्हणतो त्याप्रमाणे त्या वाहनामध्ये कुठलाही बिघाड होता तर ते वाहन तक्रारकर्ता इतके कीलोमीटर चालवू शकत नव्हता.
5. ज्याअर्थी, ही तक्रार वाहनामध्ये असलेल्या निर्मिती दोषासंबंधीची आहे, त्यामुळे यासंबंधाने उत्तर देण्यास केवळ वाहन निर्मिती करणारी कंपनी जबाबदार राहू शकते. वाहनाचे अधिकृत विक्रेता वाहनामध्ये असलेल्या निर्मिती दोषासंबंधी जबाबदार राहू शकत नाही. परंतू तक्रारकर्त्याने वाहन निर्माण करणा-या कंपनीला प्रतीपक्ष बनविले नाही. या सर्व कारणास्तव ही तक्रार वाहन विक्रेत्या विरुध्द चालू शकत नाही. त्याशिवाय, तक्रारीचे पुष्ट्यर्थ कुठलेही दस्तऐवज तक्रारकर्त्याने दाखल केलेले नाही.
6. संपूर्ण वस्तुस्थिती आणि अभिलेखावर असलेल्या पुराव्याचा विचार करता या तक्रारीत वि.प.विरुध्द कुठलेही तथ्य दिसून येत नसल्याने खारिज करण्यात येते.
- तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यात येते.
- उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्वतः सोसावा.
- आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यात यावी.