| Final Order / Judgement | (आदेश पारित व्दारा -श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य ) आदेश - तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
- तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारकर्ता नागपूरचा मूळ रहिवासी असुन विद्यार्थी आहे व नागपूर येथे शिक्षण घेत आहे. विरुध्द पक्ष क्रं. 1 ही आंतरराष्ट्रीय कंपनी असुन कंपनीज अक्ट-1956, खाली नोंदणीकृत आहे. त्यांचा व्यवसाय मोबाईल फोन व त्यासंबंधीत इतर सामग्रीच्या उत्पादनात त्यांच्या आयात व त्या साहित्यांच्या विक्रीच्या व्यवसाय संल्गनीत आहे. तसेच विरुध्द पक्ष क्रं. 2 हे सुध्दा कंपनीज अक्ट-1956 खाली नोंदणीकृत असुन इंटरनेट व्दारे वेगवेगळया व निरनिराळया वस्तुंच्या विक्रीचा व्यवसाय संल्गनीत आहे. तसेच विरुध्दपक्ष 3 व 4 हे देखिल कंपनी अक्ट-1956 खाली नोंदणीकृत आहे. विरुध्दपक्ष क्रं.1 व्दारे उत्पादीत मोबाईल फोनच्या दरुस्तीच्या कामाचा त्यांचे बरोबर करार आहे. ते विरुध्द पक्ष क्रं. 1 चे उत्पादीत वस्तुंची दुरुस्ती करुन देतात व त्याबाबत विरुध्द पक्ष क्रं.4 बरोबर करारनामा केलेले आहे.
- तक्रारकर्ता पुढे असे नमुद करतात की, विरुध्द पक्ष क्रं. 2 यांना भारतात विरुध्दपक्ष क्रं. 1 व्दारे उत्पादीत मोटो-एक्स, मोटो-जी आणि मोटो-ई, विकण्याचा व अनन्य अनुज्ञाप्ती करार केलेला आहे. सदर कराराप्रमाणे विरुध्द पक्ष क्रं.2 यांना सोडुन वर नमुद मोबाईल दुसरे विक्रेते विकु शकत नाही आणि ग्राहकाला सदर मॉडेलचे फोन इंटरनेट विरुध्दपक्ष क्रं. 2 कडे ऑर्डर करुन घ्यावे लागतात. त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्रं. 2 कडुन वर नमुद मोबाईल फोनची इंटरनेट व्दारे ऑर्डर नोंदविली. सदर ऑर्डर नुसार विरुध्दपक्ष क्रं. 2 यांचे तक्रारकर्त्याला दिनांक 5.7.2014 रोजी त्यांचे पत्त्यावर मोबाईल फोन ज्याचा मॉडेल क्रं. MOTO X XT 1052,कलर–ब्लॅक, आणि इएमआयई नं.353217051110677 प्रमाणे तक्रारकर्त्याला सदर मोबाईल संच पाठविण्यात आला. व तक्रारकर्त्याकडुन रोख रक्कम कॅश ऑन डिलीव्हरी प्रमाणे रुपये 23,999/- घेण्यात आली. सदर मोबाईलवर एक वर्षाची हमी देण्यात आली होती.
- तक्रारकर्ता पुढे असे नमुद करतात की मार्च -2015 चे तिस-या आठवडयात तक्रारकर्त्याचे मोबाईलमधे सतत बँटरी बॅकअपची कायम अडचण येत होती. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 1 ने नेमलेल्या विरुध्द पक्ष क्रं. 3 व 4 यांचेकडे दिनांक 1.4.2015 रोजी संपर्क केला व मोबाईलची तपासणी केली व विरुध्दपक्ष क्रं.4 यांना तक्रारकर्त्याचे मोबाईलमधे उत्पादीत दोष असल्याचे तोंडी सांगीतले व तो मोबाईल ज्या बॉक्समधे दिला होता तो बॉक्स आणण्याची ताकीद दिली. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने मोबाईल बॉक्ससहित विरुध्द पक्ष क्रं.4 यांचेकडे सुपूर्द केला. विरुध्दपक्ष क्रं.4 यांनी वर्क ऑर्डर /MG/15/00005, ची मुळ प्रत तक्रारकर्त्याला दिली व तसेच तक्रारकर्त्याला सांगण्यात आले की त्या मोबाईल ऐवजी त्याच मॉडेलचा नवीन मोबाईल 7-10 दिवसात देण्यात येईल. त्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक 7.4.2017 रोजी विरुध्द पक्षाशी संपर्क करुन मोबाईल बद्दल विनंती केली असता विरुध्द पक्ष क्रं.4 यांनी सांगीतले की सदर मोबाईल हा विरुध्दपक्ष क्रं.1 कडुन बदलवुन आलेला नाही व त्याबद्दल काहीही कळविले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने वेळोवेळी विरुध्दपक्ष क्रं. 4 यांचेकडे संपर्क साधला होता . विरुध्द पक्ष क्रं. 4 यांचे कडुन सुध्दा तक्रारकर्त्याला कोणतेही सहकार्य प्राप्त झाले नाही. त्या कारणास्तव दिनांक 14.4.2015 रोजी विरुध्दपक्ष क्रं. 1 यांना ई-मेल व्दारे तक्रार केली व त्यात असे नमुद केले की लवकरात लवकर मोबाईल बदलवुन नवीन मोबाईल देण्याची विनंती केली सदर ई-मेल प्राप्त झाल्यानंतर विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी दिनांक 15.4.2015 रोजी परत ई-मेल व्दारे तक्रारीचे निदान 24-48 तासात त्यांच्या तक्रारीचे निदान करावे असे कळविले. परंतु त्या दिवशी सुध्दा कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने सुध्दा विरुध्द पक्षाला ई-मेल करीत राहिले परंतु त्यांना कोणताही प्रतीसाद प्राप्त झाला नाही. सरतेशेवटी तक्रारकर्त्याने सदर तक्रार या मंचासमक्ष दाखल केली.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, विरुध्दपक्ष क्रं. 1 ते 4 यांनी त्याच्या उत्पादनातील दोष असलेला मोटरोला MOTO X XT 1052, मोबाईल बदलवून त्यांच मॉडेलचा सिलपॅक डब्ब्यात असलेला नवीन फोन देण्याचे करावे. अथवा हे शक्य नसेल तर तक्रारकर्त्याने मोबाईलची किंमत रुपये 24,299/- दिनांक 6.5.2014 पासुन रक्कम मिळेपर्यत त्यारकमेवर 24 टक्के द.सा.द.शे व्याज मिळावे. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केलेली आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन वि.पक्ष क्रं 1 ते 4 ला नोटीस बजावण्यात आली. नोटीस मिळूनसुध्दा विरुध्द पक्ष क्रं.1,2,4, हे तक्रारीत हजर झाले व तक्रारीला कोणतेही उत्तर सादर केले नाही. करिता दिनांक 21.8.2015 रोजी त्यांचे विरुध्द विना जवाब तक्रार चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी आपला लेखी जवाब दाखल केला त्यात असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं.2 हे फ्लीपकार्ट नावाने व्यवसाय चालवित असुन ते कंपनी कायदा 1956 चे नियमाप्रमाणे नोंदणीकृत कंपनी आहे व त्यामुळे तक्रारकर्त्याची सदरची तक्रार या मंचात चालू शकत नाही. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांचा व्यवसाय संकेतस्थळाचे माध्यमातुन चालतो व विरुध्द पक्षाचे मुख्य कार्यालय वैश्नवी सम्मीट, तळ मजला, 7 मेन , 80 फिट रोड, तिसरे ब्लॉक, कोरामंगला इंडस्टीयल ले-आऊट, विपरो आफीसच्या बाजूला, कॉरपोरेशन वार्ड नं.68, कोरामंगला, बेंगलूरु -560034, येथे अस्तीत्वात आहे.विरुध्द पक्ष हे वस्तु खरेदी व विक्री याबाबतचा व्यवसाय करुन त्यांचे मुख्य व्यवसाय हा विविध प्रकारचे ऑनलाईन व्यवहार, तसेच मोबाईल फोन, संलग्नीत वस्तुंचा व्यवसाय आहे. तसेच विरुध्द पक्ष क्रं.2 यांचा व्यवसाय intermediary कायद्याच्या कलम 2(1) (W) इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी कायदा 2000 प्रमाणे तक्रारकर्ता व ग्राहक या तत्वात बसत नाही. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार चुकीच्या न्यायालयात दाखल केलेली आहे व त्यात विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 यांना चुकीचे पक्षकार केलेले आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं.2 यांची कोणताही जबाबदारी नाही. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ही संकेत स्थळाचे माध्यमातुन नोंदणीक,त करुन विरुध्द पक्ष क्रं. 1 उत्पादीत वस्तु विकत घेतलेल्या आहे त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 2 हे कोणत्याही भुर्देंडास जबाबदार नाही. तसेच तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्रं.2 यांचेत कोणताही करारनामा नाही म्हणुन तक्रारकर्त्याची ही खोटी तक्रार खारीज करण्यात यावी.
- तक्रारकर्त्याने सदर तक्रारीसोबत दस्त क्रं.1 ते 17 दाखल करुन त्यांत विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी दिलेल्या पावत्या,विरुध्द पक्ष क्रं.4 यांनी दिलेली पावती, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला केलेल्या ई-मेलच्या प्रती व त्यांची उत्तराच्या प्रती, तक्रारकर्त्याने फेसबुक व्दारे केलेल्या प्रती, ई-मेल व्दारे केलेल्या पत्राच्या प्रती दाखल केलेल्या आहे. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जवाब, लेखी युक्तीवाद व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ आले.
मुद्दे निष्कर्ष 1. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय. 2. विरुध्द पक्ष कं.1 ते 4 यांनी तक्रारकर्त्याचे प्रती न्युनतम सेवा दर्शविली आहे काय ? होय. 3. आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणमिमांसा - तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, विरुध्दपक्ष क्रं. 1 चे उत्पादीत मोबाईल मॉडेल क्रं. MOTO X XT 1052, कलर–ब्लॅक, आणि इएमआयई नं.353217051110677 हा संकेतस्थळाचे माध्यमातुन विरुध्द पक्ष क्रं. 2 फ्लीपकार्ट यांचेकडुन रुपये 23,999/- मधे दिनांक 3.5.2014 रोजी मोबाईल विकत घेतला व दिनांक 6.5.2014 ला त्यांना मिळाला. परंतु काही दिवसात मार्च-2015 चे 3-4 थ्या आठवडयामधे बॅटरी बॅकअपचा दोष निर्माण झाला. विरुध्द पक्ष क्रं. 3-4 उत्पादीत केलेल्या केन्द्राशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रारकर्त्याला सांगीतले की त्यामधे उत्पादनातील दोष आहे. त्यामुळे सदर मोबाइल त्यांचे बॉक्स बरोबर द्यावा. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं.4 यांचे कडे मोबाईल जमा केला. परंतु 4-5 दिवसानंतर त्यांचेशी संपर्क साधला असता त्यांचे कडुन कोणताही प्रतीसाद मिळाला नाही. तसेच विरुध्दपक्ष क्रं.1 कडे ई-मेल व्दारे तक्रार नोंदविली व लवकरात लवकर मोबाईल पाठविण्याचे विनंती केली. काही दिवसांनी विचारपूस केली असता विरुध्द पक्षाने तक्रार प्राप्त झाली नाही असे सांगीतले. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी आपले उत्तरात ही बाब स्पष्ट केली की त्यांचा तक्रारकर्त्याशी कोणताही करारनामा नाही. सदरची मागणी ही संकेतस्थळाचे माध्यमातुन नोंदविली होती व विरुध्द पक्ष क्रं. 2 हे ती मागणी पुर्ण केलेली आहे. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार चुकीचे न्यायालयात दाखल केलेली आहे तसेच तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष हा तक्रारकर्त्याचा मोबाईल बदलवून देण्यस जबाबदार नाही. सबब सदर तक्रार खोटी दाखल केलेली असुन ती खारीज होण्यास पात्र आहे.
- दोन्ही पक्षाचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारकर्त्याची व दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे असे मत आहे. की विरुध्द पक्ष क्रं.2 फ्लीपकार्ट प्रा.लि. चे कंपनी कायद्याचे अंतर्गत नोंदणीकृत असले तरी संकेतस्थळाचे माध्यमातुन त्यांनी तक्रारकर्त्याला त्यांचे मागणीनुसार मोबाईल विकला व त्याबाबत रुपये 23,999/- मोबदला कॅश आन डिलेव्हरी चे माध्यमातुन स्वीकारला म्हणजेच तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक ठरतो हे सिध्द होते. तसेच मोबाईल विरुध्द पक्ष कं. 3 व 4 हे दुरुस्ती केंद्राकडे जमा केल्याबाबत दस्तऐवज अभिलेखावर दाखल केलेले आहे व याबाबत त्यांनी ई-मेल व्दारे विरुध्द पक्ष क्रं. 1 यांचेशी सतत संपर्क केलेला आहे. त्या सर्व ई-मेलच्या प्रती तक्रारीत दाखल केल्या आहेत. यावरुन ही बाब स्पष्ट होते की सतत संपर्क करुनही विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचे तक्रारीकडे दुर्लेक्ष केलेले आहे. तक्रारकर्त्याने मोबाईल मधे उत्पादीत दोष असल्याबाबत नवीन मोबाईलची मागणी करुनही नवीन मोबाईल पुरविलेला नाही ही बाब मंचाचे मते अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब आहे. त्यामुळे तक्रारकर्ता मॉडेल क्रं. MOTO X XT 1052, कलर–ब्लॅक मोबाईल बदलवून नवीन देण्यास विरुध्द पक्ष जबाबदार आहे असे मंचाचे मत आहे सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
- अंतीम आ दे श - 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला मॉडेल क्रं. MOTO X XT 1052, कलर–ब्लॅक, आणि इएमआयई नं.353217051110677 बदलवुन नविन त्याच कंपनीचा व त्याच मॉडलचा नवीन मोबाईल दयावा. विरुध्द पक्ष मोबाईल बदलवून देण्यास असमर्थ असल्यास तक्रारकर्त्याने घेतलेल्या मोबाईलची किंमत रुपये 23,999/- दिनांक 06.05.2014 पासुन द.सा.द.शे. 7 टक्के दराने व्याजासह रक्कम परत करावी. 3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई दाखल रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- ( रुपये पाच हजार फक्त) द्यावेत. 4. वरील आदेशाची पुर्तता विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 4 यांनी संयुक्तीक अथवा वैयक्तीकरित्या, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी. 5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क द्यावी. 6. तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी. | |