तक्रार क्र.51/2015.
तक्रार दाखल दि.04-04-2015.
तक्रार निकाली दि.17-02-2016.
श्री. मारुती रामचंद्र तोडकर,
रा.मु.पो.वेणेगाव,ता.जि.सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
मा. सहाय्यक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
अतित उपविभाग, अतित, ता.जि.सातारा. .... जाबदार.
.....तक्रारदारतर्फे-अँड.व्ही.पी.जगदाळे .
.....जाबदारतर्फे- एकतर्फा.
न्यायनिर्णय
(मा.श्री. श्रीकांत कुंभार,सदस्य यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. प्रस्तुत तक्रारदार यांनी त्यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 12 प्रमाणे जाबदारांचे सेवात्रुटीबाबत दाखल केला आहे. प्रस्तुत तक्रार अर्जातील तक्रारदाराचे थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदाराचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे,-
प्रस्तुत तक्रारदार हे मु.पो.वेणेगाव, ता.जि.सातारा येथील रहिवाशी असून गावी त्यांची गट नं.488, 489, 501 या नंबरची शेती आहे. त्यांनी गट नंबर 501 मध्ये 0.25 गुंठे क्षेत्रामध्ये खोडवा ऊसाचे पिक घेतलेले आहे. प्रस्तुत तक्रारदार यांचे वरील गटापैकी गट नं.489 मध्ये विहीर असून त्यावर जाबदारकडून पाणीपुरवठा मोटारीसाठी विजकनेक्शन घेतलेले आहे व त्या विहीरीतून तक्रारदाराचे शेतीस पाणीपुरवठा होतो. प्रस्तुत मोटारीसाठी इलेक्ट्रीक कनेक्शन हे ही गट नं. 501 मधील खांबाबाबत आलेली आहे. तक्रारदाराचे याच गटातून जाबदारांची उच्चदाब विज वहन करणा-या वाहिन्या (तार) गेलेल्या आहेत. दि.31/10/2014 रोजी दुपारी 1 चे सुमारास प्रस्तुत तक्रारदार हे त्यांच्या ऊसाला पाणी पाजत असताना ऊसाचे क्षेत्रातून धूर येत असलेचे त्यांनी दिसले. लगेच या तक्रारदाराने शेतात जाऊन पाहिले असता ऊसाचे क्षेत्रामधून गेलेल्या विजेच्या तारांमध्ये स्पारकिंग होवून त्याच्या ठिणग्या तक्रारदाराचे ऊसाचे क्षेत्रात पडून त्यांचा ऊस जळून गेला व सदर आगीमध्ये तक्रारदाराचे 13 महिन्यांचे 0.25 गुंठयातील ऊसपिक जळून तक्रारदाराचे सुमारे रक्कम रु.1,40,000/- चे नुकसान झाले व ती मिळणेसाठी या तक्रारदाराने जाबदारांकडे वारंवार पाठपुरावा केला. मागणी केली परंतु जाबदाराने शेवटपर्यंत ती तक्रारदाराला दिली नाही. त्यामुळे प्रस्तुत जाबदारांनी त्यांच्या तक्रारदाराचे शेतातून जाणा-या विजेच्या तारांचे (लाईन) वाहिन्या जोडताना योग्य ती काळजी न घेतलेने विद्युत लाईनमध्ये स्पार्कींग होऊन तक्रारदाराचे नुकसान झाले ही त्यांची सेवात्रुटी आहे. या सेवात्रुटीबद्दल तक्रारदार यांनी मे मंचात जाबदारांविरुध्द दाद मागितली व जाबदारांकडून जळीत ऊसाची नुकसानभरपाई रक्कम रु.1,40,000/- त्यावर ऊस जळाले तारखेपासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याज, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.20,000/- जाबदारांकडून मिळावा अशी विनंती मे मंचास केली आहे.
3. प्रस्तुत तक्रारदार यांनी प्रकरणी नि. 1 कडे त्यांची तक्रार, तक्रारीपृष्ठयर्थ्य नि. 2 कडे शपथपत्र, नि.4 कडे तक्रारदारतर्फे विधिज्ञ व्ही.पी.जगदाळे यांचे वकिलपत्र, नि.5 कडे पुराव्याची कागदपत्रे त्यामध्ये नि.5/1 कडे तक्रारदाराचे जमिनीचा खातेउतारा, नि. 5/2 कडे गट नं.501 चा सातबारा चा उतारा, नि. 5/3 व नि. 5/4 कडे जळीत ऊसाचे फोटो, नि.5/5 कडे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि.सातारा याचा दाखला, नि.5/6 कडे बोरगांव पोलीस ठाणे यांनी ऊस जळीत स्थळाचा केलेला पंचनाम्याची सही शिक्क्याची नक्कल, नि.10 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.11 कडे अंतिम लेखी युक्तीवाद इत्यादी कागदपत्रे प्रकरणी दाखल केलेली आहेत.
4. प्रस्तुत प्रकरणाची नोटीस यातील जाबदारांना मे मंचामार्फत रजिस्टर पोष्टाने पाठविण्यात आली. प्रस्तुत नोटीस यातील जाबदारांना मिळाली. त्याची पोष्टाची पोहोच पावती नि. 8 कडे प्रकरणी दाखल आहे. यातील जाबदारांना वरील विषयांकित प्रकरणाची नोटीस मिळूनही प्रस्तुत जाबदार हे मे. मंचात हजर झाले नाहीत किंवा त्यांनी वकिल नेमून किंवा स्वतः हजर होवून मंचात तक्रारदाराचे अर्जास म्हणणे किंवा आक्षेप दाखल केले नाहीत. त्यामुळे मे मंचानी यातील जाबदारांविरुध्द दि.27/7/2015 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला आहे. वरील वस्तुस्थितीमुळे प्रस्तुत प्रकरण एकतर्फा सुनावणीस घेऊन तक्रारदारांचा युक्तीवाद ऐकून प्रकरण निकालासाठी घेण्यात आले.
5. प्रस्तुत तक्रारदारांचा तक्रार अर्ज, त्यातील आशय, उपलब्ध तक्रारदारांचा पुरावा याचा विचार करता प्रस्तुत प्रकरणाच्या न्यायनिर्णयासाठी आमचेसमोर खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दा उत्तर
1. प्रस्तुत तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत काय?- होय.
2. प्रस्तुत जाबदारांनी तक्रारदारांच्या ऊस जळीताची रक्कम
देण्याचे नाकारुन तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे काय?- नाही.
3. जाबदारांच्या हायटेन्शन विद्युत वाहिन्यांच्या घर्षणामधून
निर्माण होणा-या दोषामुळे नुकसानी मिळणेस
प्रस्तुत तक्रारदार पात्र आहेत काय?- नाही.
4. अंतिम आदेश? तक्रार नामंजूर.
6. कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 ते 4
प्रस्तुत तक्रारदार हा मु.पो. वेणेगांव, ता.जि.सातारा येथील रहिवाशी असून तो व्यवसायाने शेतकरी असलेचे त्याने प्रकरणी दाखल केलेल्या नि.5/1, नि.5/2 कडील तलाठी वेणेगाव यांनी दिलेल्या सहीचा खातेउतारा व गट नं. 501 चा सातबारा उतारा पाहीला असता शाबीत होते. तक्रारदारांचे नावे एकूण गट नं. 488, 489 व 501 या क्रमांकाच्या शेत मिळकती असून त्यांनी त्यांचे गट क्र. 489 मध्ये असलेल्या विहीरीवर पाणीपुरवठा पंपास यातील जाबदाराकडून विज कनेक्शन घेतलेले आहे. जाबदारांचा व्यवसाय हा जाबदारांनी ठरवलेल्या दराने शुल्कावर विविध प्रकारचे (category) कनेक्शनप्रमाणे विजेची सेवा ग्राहकाला देणे हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यामुळे सेवापुरवठादार व सेवा विकत घेणारा असे नाते वरील कनेक्शनमुळे तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये असलेचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार हा जाबदाराचा ग्राहक आहे हे निर्विवादरित्या शाबित होते. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
6(2) यातील नि.5/2 कडे प्रकरणी दाखल असलेल्या याच गट क्र.501 मध्ये तक्रारदारांचा सन 2014-15 ला गळीतास जाणारा 13 महिन्याचे ऊसाचे पिक 0.25 गुंठे इतके होते असे त्यांचे कथन आहे व याच गटामधून जाबदारांची उच्च दाब विज वहन करणा-या वाहिन्या (विजेच्या तारा-लाईन्स) गेलेल्या असलेचे तक्रारदार तक्रारीत नमूद करतात. त्याचप्रमाणे प्रस्तुत तक्रारदार यांनी नि.5/7 कडे बोरगांव पोलीस ठाणेकडील ऊस जळीत नोंदीचे घटनेसंदर्भात दिलेल्या फिर्यादीस अनुसरुन पोलीसांकडे नोंदलेल्या जबाबाची सहीशिक्क्याची प्रत प्रकरणी दाखल आहे. तिचे अवलोकन करता असे स्पष्ट दिसते की, प्रस्तुत तक्रारदार यांनी दिले जबाबामध्ये त्यांनी ही गोष्ट मान्य केली आहे की, “विषयांकित ऊसपिकाला लागलेली आग ही माझे ऊस पिकातून गेलेले इलेक्ट्रीक मेन लाईनचे तारा एकमेकांना घासून शॉर्टसर्कीट होऊन आग लागून नुकसान झाले.” या तक्रारदाराचे कथनाचा विचार करता, प्रस्तुत जाबदारांनी तक्रारदार यांना त्यांच्या गट नं. 489 मधील विहीरीवरील मोटार कनेक्शनच्या विद्युत जोडणीमधून वा या संचाला विद्युतपुरवठा करणा-या वायर मधून, मीटर मधून किंवा या संबंधीत संचामधून कशामधूनही शॉर्टसर्कीट व अन्य प्रकारानी जळीत झालेले नाही व त्यातील दोषामुळे शॉर्टसर्कीट होऊन ऊस जळीत झालेले नाही हे पूर्णतः शाबीत होते. तसेच प्रस्तुत तक्रारदाराचे कथन आहे की, त्यांनी लगेचच व वेळोवेळी जाबदारांकडे घडलेली घटना कळवून त्यांच्या ऊस जळीताची नुकसानभरपाई मागणी केली परंतु या अनुषंगे आम्ही प्रकरणाची पडताळणी केली असता, प्रस्तुत तक्रारदाराचे वरील कथनाबाबत आम्हास कोणताही ठोस पुरावा प्रकरणी दाखल केलेचे आढळून आले नाही की, अशाप्रकारच्या घटनेत नुकसानभरपाई मागणीबाबत जाबदारांशी कोणताही पत्र व्यवहार किंवा जळीताची घटना जाबदारांनी कळविलेबाबतचा तत्सम पुरावा वा जाबदारांनी तक्रारदाराचे नुकसान नाकारलेचा पत्रव्यवहार अशा प्रकारचा कोणताही पुरावा दाखल केलेला आम्हास आढळून आलेला नाही. किंवा वकीलामार्फत नोटीसही जाबदारांना दिलेले दिसून आली नाही वा स्वतः तक्रारदारानेही साधा अर्ज देवून घडलेली घटना जाबदारांना कळविलेली नाही. किंबहूना जाबदारांना याबाबत काहीच माहिती (knowledge) नाही हेसुध्दा आमचेसमोर स्पष्ट होते. यातील तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीत “जाबदारांना भेटलो, वारंवार भेटलो, नुकसानीची मागणी केली, त्या त्यांनी नाकारली” ही घेतलेली कथने पूर्णतः खोटी व लबाडीची, तक्रारीची रचना करण्यासाठी घेतली आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. भारतीय पुराव्याच्या कायद्यातील तरतूदीनुसार अशी कथने म्हणजे पुरावा होवू शकत नाहीत व तक्रारदारांना जाबदारांनी दिलेल्या मोटार पंपावरील विद्युत कनेक्शनच्या यंत्रणेमधून शॉर्टसर्कीट होऊन किंवा ते बाधित होऊन त्यामधून काही नुकसान झालेले नाही हे तक्रारदारांनासुध्दा मान्य व कबूल (Admit) आहे त्यामुळे प्रस्तुत जाबदारांनी या तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही हे या ठिकाणी स्पष्ट होते. त्यामुळे मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही नकारार्थी देतो.
6(3) प्रस्तुत प्रकरणी दाखल असलेली नि.5/6 कडील पोलीस फिर्याद व नि. 5/7 कडील तक्रारदाराचा पोलीस जबाब व तक्रारदाराची तक्रार पाहीली असता, तथकथीत विषयांकीत ऊस जळीत हे तक्रारदारांचे गट नं. 501 वरुन जाणा-या उच्च विद्युत वाहिन्यांच्या घर्षणातून ठिणग्या पडून झालेचे तक्रारीवरुन दिसते. परंतु ही घटना प्रत्यक्ष पाहणारे अन्य साक्षीदार वा शेतकरी नाहीत वा तक्रारदाराने ते विद्युत तारांचे घर्षण (शॉर्टसर्कीट) स्वतः पाहीलेचे तो सांगत नाही. त्यामुळे अशाप्रकारे काही ऊस जळीतासारखी नुकसानी झालेस त्या विद्युत निरिक्षकांचा पंचनामा, अहवाल व इतर साक्षी पुराव्यानिशी ते शाबीत होवून त्याबाबत निर्णय होणे आवश्यक आहे. तसेच याठिकाणी(Facts & Legal Questions) चे प्रश्नही निर्माण होतात व ते विस्तृत साक्षीपुराव्याचे रेकॉर्डवरुन संपूर्ण पुराव्याचे आधारे निर्गत (सविस्तर चौकशी) करणे आवश्यक आहे व हे अधिकार दिवाणी न्यायालयानाच आहेत. त्यामुळे प्रस्तुत मंच वरील प्रकारची ऊस जळीत नुकसानीचे प्रकरण केवळ तक्रार अर्जावर व अँफीडेव्हीट वरती निर्गत करु शकत नाही. ग्राहक व सामनेवाला कडून होणारी सेवात्रुटी एवढयाच बाबतीत शपथपत्रावर पुरावा व इतर आनुषंगीक पुराव्याव्दारे ग्राहक तक्रारी निर्गत केल्या जातात. त्यामुळे उच्च विद्युत दाबाच्या जाणा-या वाहिन्यांमधून काही नुकसानी झालेस त्याची मागणी ग्राहक मंचातून मिळणेस हा तक्रारदार पात्र नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारदाराची प्रस्तुतची तक्रार नामंजूर करणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हा मंच येत आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 3 व 4 चे उत्तर आम्ही नकारार्थी देतो.
7. वरील सर्व वस्तुस्थिती व कारणमिमांसा व विवेचन याला अधिन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतात.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात येतो.
2. प्रस्तुत जाबदार यांनी तक्रारदार यास कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही
असे घोषित करण्यात येते.
3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
4. प्रस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.17-02-2016.
सौ.सुरेखा हजारे, श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.