::: आ दे श :::
( पारित दिनांक : 26/10/2016 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले , यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश थोडक्यात खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ता हा मैराळडोह जि. वाशिम येथील रहिवासी असून शेतीचा व्यवसाय करतो. तक्रारकर्त्याला त्याचे शेतात पाईप लाईन करावयाची होती म्हणून तक्रारकर्ता दिनांक 13/12/2012 रोजी विरुध्द पक्षाचे दुकानात गेला आणि तेथे एस.पी. कंपनीचे 3 इंची पाईप विकत घेण्यासाठी ऑर्डर दिली. विरुध्द पक्षाने उत्तम दर्जाचा माल पुरविण्याचे आश्वासन दिले. सदर पाईप चे मुल्य वाटाघाटी नंतर रक्कम रुपये 1,01,600/- ठरले. त्या पैकी रक्कम रुपये 75,000/- हे तक्रारकर्त्याने दिनांक 02/02/2013 रोजीचे डिमांड ड्राफ्ट ने दिले, तसेच रक्कम रुपये 25,000/- हे दुस-या डिमांड ड्राफ्ट ने दिले. विरुध्द पक्षाने सदर रक्कम ही डिमांड ड्राफ्ट वटवून प्राप्त केली. त्यानंतर ऑक्टोबर 2013 मध्ये सदर पाईप हे शेतोपयोगी कामाकरिता जमिनीखाली दाबण्यात आले आणि एका महिन्याचे आत सदर पाईप हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे तक्रारकर्त्याचे लक्षात आले. म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास तशी माहिती दिली व पाईप बदलवून देण्याची विनंती केली, परंतु विरुध्द पक्षाने टाळाटाळ केली. म्हणून तक्रारकर्त्याने वकिलामार्फत पाईप बदलवून देण्याची मागणी करणारी नोटीस दिनांक 11/02/2014 रोजी विरुध्द पक्षास दिली, ती विरुध्द पक्षास दिनांक 15/02/2014 रोजी मिळाली. परंतु विरुध्द पक्षाने नोटीसची पुर्तता केली नाही किंवा ऊत्तर पण दिले नाही. अशाप्रकारे विरुध्द पक्षाने सेवेत न्युनता दर्शविलेली आहे.
म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल केली व विनंती केली की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर व्हावी, विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्यास निकृष्ट दर्जाचे पाईप बदलवून उत्कृष्ट दर्जाचे पाईप पुरविण्याचे आदेश व्हावे. विकल्पेकरुन विरुध्द पक्षान, तक्रारकर्त्याकडून घेतलेली रक्कम 1,00,000/- रुपये परत करण्याचे आदेश व्हावे. तसेच तक्रारकर्त्याचे झालेले आर्थिक नुकसान रुपये 75,000/- व मानसिक, शारिरिक त्रासापोटी रुपये 25,000/- अशी रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई देण्याचा आदेश व्हावा, तक्रारीचा खर्च विरुध्द पक्षाकडून मिळावा, अशी विनंती, सदर तक्रारीचे शेवटी, केलेली आहे. तक्रार शपथेवर दाखल आहे.
2) या प्रकरणात दिनांक 15/01/2015 रोजी आदेश पारित करण्यांत आला की, विरुध्द पक्ष यांनी मुदतीत लेखी जबाब दाखल केला नाही. तरी प्रकरण वि.प. विरुध्द लेखी जबाबाशिवाय पुढे चालविण्यात यावे.
त्यानंतर विरुध्द पक्षाने निशाणी-10 प्रमाणे, विरुध्द पक्षाविरुध्द विनाजबाब प्रकरण चालविण्याबाबतचा आदेश रद्द होऊन, वि.प. ला लेखी जबाब दाखल करण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज केला. सदरहू वि.प. यांचा हा अर्ज रुपये 500/- दंडासह मंजूर करण्यात आला.
3) विरुध्द पक्षाचा लेखी जबाब - विरुध्द पक्ष यांनी निशाणी 11 प्रमाणे त्यांचा लेखी जबाब मंचासमोर दाखल करुन, तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे फेटाळले. सदर पाईपचे मुल्य वाटाघाटीनंतर रुपये 1,01,600/- ठरले याबाबत वाद नाही, या रक्कमेपैकी रुपये 75,000/- तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्षाला 02/02/2013 रोजी डिमांड ड्राफ्ट व्दारा दिले, परंतु रुपये 25,000/- दुस-या डिमांड ड्राफ्ट ने दिल्याचे नाकारले. विरुध्द पक्षाने पुढे अधिकच्या कथनात थोडक्यात नमुद केले की, पाईप पुरवित असतांना विरुध्द पक्षाने त्याच्या दर्जाबाबत आश्वासन वा हमी दिलेली नाही कारण पाईप हे विरुध्द पक्षाकडे निर्मीत होत नाहीत. विरुध्द पक्ष हे फक्त विक्रेता आहेत. म्हणून पाईपच्या दर्जाबद्दलची मागणी, ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदीत बसणारी नाही. तक्रारकर्त्याने विकत घेतलेल्या पाईपच्या उत्पादक कंपनीला पक्ष म्हणून सदर तक्रारीत जोडलेले नाही, या मुख्य मुद्दयावर तक्रार खारिज होण्यास पात्र आहे. पाईप कसे निकृष्ट आहेत हे दर्शविण्यासाठी तक्रारकर्त्याजवळ कोणताही पुरावा नाही. जमिनीखाली अंथरलेले पाईप हे कसे आंथरले, किती खोलीवर आंथरले, ते एका विशिष्ट लेव्हलमध्ये आहेत किंवा नाहीत, मोटार किती हॉर्स पॉवरची आहे, पाण्याचा दाब कशाप्रकारे होता, या सर्व बाबीसुध्दा पाईप लाईन फुटण्याला कारणीभूत ठरतात. या कारणाचा उहापोह तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीत केलेला नाही. तक्रारकर्त्याने घेतलेल्या कंपनीचे पाईप त्याच कालावधीत विरुध्द पक्षाने इतर ग्राहकांना सुध्दा विकले, त्यांची नांवे लेखी जबाबात नमूद केलेली असून त्यापैकी कोणाचीही सदर पाईप निकृष्ट असल्याबाबत तक्रार, विरुध्द पक्ष किंवा कंपनीकडे नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेला तलाठी, मौजे मैराळडोहचा पंचनामा हा तक्रारकर्त्याने स्वतःचे मताप्रमाणे लिहून घेतलेला आहे व त्या पंचनाम्यास पुराव्याकामी कोणताही कायदेशीर आधार नाही. पाईप निकृष्ट आहेत किंवा नाहीत हे सांगण्याचा कोणताही अधिकार तलाठयाला नाही, तसे अधिकारक्षेत्र तलाठयाला नाही व ते त्या संदर्भातील तज्ञ नाही. कोणताही तज्ञाचा पुरावा नाही. म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार ही आधारहीन असल्यामुळे व अनावश्यक तक्रार दाखल केल्यामुळे तक्रारकर्त्याकडून विरुध्द पक्षाला रुपये 25,000/- दंड देण्याचा आदेश व्हावा.
4) कारणे व निष्कर्ष ::
तक्रारकर्ते यांची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, तक्रारकर्ते यांचा लेखी युक्तिवाद व उभय पक्षाचा तोंडी युक्तीवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला.
उभय पक्षात ही बाब मान्य आहे की, तक्रारकर्ते यांनी दिनांक 13/12/2012 रोजी त्यांच्या शेतात पाईप लाईन टाकण्यासाठी, लागणारे पाईप एस.पी. कंपनीचे 3 इंची पाईप विरुध्द पक्षाच्या दुकानातून विकत घेतले. विरुध्द पक्षाला ही बाब मान्य आहे की, सदर पाईपचे मुल्य रुपये 1,01,600/- ठरले व त्यापैकी रुपये 75,000/- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिनांक 02/02/2013 रोजी डिमांड ड्राफ्ट व्दारा दिले. म्हणून तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक होतो, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्यांनी विरुध्द पक्षाला पाईपची रक्कम रुपये 75,000/- व त्यानंतर रक्कम रुपये 25,000/- इतकी रक्कम डिमांड ड्राफ्ट व्दारा दिली. परंतु रेकॉर्डवर फक्त एक डिमांड ड्राफ्ट ची प्रत दिनांक 02/02/2013 रोजीची दाखल केली आहे. त्यामुळे रक्कम रुपये 25,000/- ही तक्रारकर्त्याने डिमांड ड्राफ्ट व्दारे विरुध्द पक्षाला दिली होती का? यात मंचाला शंका आहे.
तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, सदर पाईप ऑक्टोबर 2013 मध्ये शेतोपयोगी कामाकरिता जमिनीखाली दाबण्यात आले व एका महिन्याच्या आत सदर पाईप हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे लक्षात आले. तक्रारकर्त्याने याबद्दल तलाठी यांचा पंचनामा दाखल केला आहे व त्यामध्ये तलाठी यांचे असे म्हणणे आहे की, सदर पाईप हे गुणवत्तेपेक्षा कमी दर्जाचे व नादुरुस्त व फुटलेले निघाल्याने ते निकामी झाले. यावर विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याचे पाईप कसे फुटले, का फुटले व कशाप्रकारे निकृष्ट आहे याबाबत तक्रारकर्त्याने कुठलाही स्पष्ट पुरावा दिला नाही, व पाईप विक्री करण्याचे काम फक्त विरुध्द पक्षाचे आहे. तक्रारकर्त्याने पाईपच्या उत्पादक कंपनीला पक्ष केले नाही. परंतु मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्ते यांनी, विरुध्द पक्षाने पाईपच्या सदर कंपनीचे पूर्ण नांव, पत्ता पुरविण्याबद्दल एक अर्ज रेकॉर्डवर दाखल केला होता. त्यावर विरुध्द पक्षाने कोणतेही निवेदन दिले नाही किंवा सदर पाईप खरेदी केल्यानंतर अल्पावधीतच त्यात तक्रार आढळली त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास नोटीस पाठविली होती. सदर नोटीस विरुध्द पक्षाला मिळाली असे दिसते. तरी विरुध्द पक्षाने स्वतः ते पाईप का तपासले नाही किंवा त्याबद्दलची तक्रार पाईप कंपनीला का केली नाही ? याचे स्पष्टीकरण विरुध्द पक्षाकडून आले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचा युक्तिवाद मंचाने ग्राहय धरुन, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास सदर पाईप त्याच किंमतीत बदलवून द्यावे अथवा विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून डिमांड ड्राफ्ट व्दारे स्विकारलेली रक्कम रुपये 75,000/- सव्याज तक्रारकर्त्याला परत करावी. तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाई, प्रकरण खर्चासह रुपये 5,000/- दयावी, या निष्कर्षास मंच एकमताने आले आहे.
सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून आधीचे पाईप स्विकारुन त्यानंतर ते बदलून त्याच किंमतीत पुरवावे अथवा विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्यास सदर पाईपची स्विकारलेली रक्कम रुपये 75,000/-(रुपये पंचाहत्तर हजार फक्त) दरसाल, दरशेकडा 8 % व्याजदराने दिनांक 20/10/2014 ( प्रकरण दाखल तारीख )पासुन प्रत्यक्ष रक्कम अदाईपर्यंत व्याजासहीत दयावे.
- विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाईपोटी प्रकरण खर्चासह रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त ) दयावे.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यानंतर 45 दिवसाचे आत करावे.
- या आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य पुरवाव्या.
(श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri