| Complaint Case No. CC/21/187 | | ( Date of Filing : 25 Oct 2021 ) |
| | | | 1. Sharad Dinakar Pachkhede | | Police Mukhyalaya samor,Patel nagar,Chandrapur | | Chandrapur | | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
| Versus | | 1. Mayur A Raikwar,Sanchalak Tadoba Arban Surksha Nidhi Ltd.Chandrapur | | Janata college jawal,Bapat nagar,civil line,Chandrapur | | Chandrapur | | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
| Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या) (पारीत दिनांक २८/०२/२०२३) - तक्रारकर्ता हा महाराष्ट्र राज्याच्या ग्राऊंड सर्व्हे डेव्हलपमेंट एजेंसी या कार्यालयात लिपीक म्हणून काम करीत होता आणि दिनांक ३१/३/२०१९ रोजी सेवा निवृत्त झाले. तक्रारकर्त्यास पैशाची आवश्यकता होती परंतु त्याच्याकडे बॅंकेकडे गहाण ठेवण्याकरिता योग्य मालमत्ता नव्हती. त्यामुळे त्याला कर्ज मिळू शकत नव्हते. परंतु तक्रारकर्त्याचा मुलगा हा विरुध्द पक्ष यांचा मिञ असल्यामुळे त्याने कर्ज मिळवून देऊ शकतो असे सांगितले आणि त्याकरिता दिनांक १५/४/२०१९ रोजी त्याचेकडे असलेला भूखंडाचे कागदपञ घेऊन विरुध्द पक्ष यांची भेट घेतली. त्याकरिता विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास त्याच्या ज्या बॅंकेतून पगार होतो त्या बॅंकेचे सांक्षांकित धनादेश आणण्यास सांगितले आणि तसे पञ दिले. तक्रारकर्त्याने फी भरुन कर्ज मिळण्याकरिता अर्ज केला आणि करारनामा करण्याकरिता रुपये ५,५००/- विरुध्द पक्ष यांना दिले. तक्रारकर्त्याकडे असलेला मौजा वडगांव, त.सा.क्र. ११, सर्व्हे क्रमांक २२, एकूण आराजी १९०९ चौरस फुट हा भुखंड विरुध्द पक्षाच्या सांगण्याप्रमाणे कर्ज घेण्याकरिता विरुध्द पक्षाच्या नावाने नोटरी करुन दिला. त्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास रुपये २,००,०००/- चे कर्ज दिले आणि त्या कर्जाची परतफेड दरमहा ३ टक्केप्रमाणे रुपये ६,०००/- दरमहा व्याज लागणार होते आणि ज्यावेळी तक्रारकर्ता हा पूर्ण कर्जाची परतफेड करेल त्यावेळी विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्यास उपरोक्त भूखंडाचे संपूर्ण दस्तावेज आणि त्याने सही करुन दिलेले १० कोरे धनादेश परत करतील असे सांगितले. तक्रारकर्त्यास दिनांक २०/०४/२०१९ रोजी कर्जाची रक्कम मिळाल्यानंतर त्यांनी दरमहा रुपये ६,०००/- विरुध्द पक्ष यांच्याकडे तर कधी ताडोबा अर्बन सुरक्षा निधी लि. चंद्रपूर च्या रोखपालाकडे भरत होते. रोखपाल त्याची पावती देत होता. विरुध्द पक्ष हे पावती देत नव्हते. रक्कम भरल्याची नोंद रजिस्टरला घेण्यात येत होती. विरुध्द पक्ष यांनी दिनांक १८/१२/२०२० रोजी तक्रारकर्त्यास फसवून त्याच्याकडून त्यांचे सासुने ज्या व्यक्तीकडून भुखंड घेतले होते त्याची मुळ प्रत बॅंकेत ऑडीटकरिता आवश्यक आहे असे सांगून मागवून घेतले. त्यावेळी तक्रारकर्ता हा संपूर्ण कर्जाची रक्कम व्याजासह भरण्यास तयार असल्याने उपरोक्त भुखंडाची विक्री करु नये असे सांगितले. त्यावेळी विरुध्द पक्षाने भुखंडाची विक्री करणार नाही असे सांगितले. तक्रारकर्ता हा सेवानिवृत्तीचे वेतन मिळू न शकल्यामुळे त्यांना व्याजाची रक्कम भरता आली नाही आणि तक्रारकर्ता हा थकीतदार झाला. त्यावेळी त्याने नातेवाईकाकडून पैसे घेऊन विरुध्द पक्षाकडे गहाण ठेवलेला भुखंड परत घेण्याकरिता गेले असता विरुध्द पक्षाने भुखंड विकल्याचे सांगितले. तक्रारकर्ता हा दिनांक २६/८/२०२१ रोजी त्या भुखंडावर गेला असता तेथे विरुध्द पक्षाच्या मालकी हक्काचा बोर्ड लावला होता म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास दिनांक २६/८/२०२१ रोजी नोटीस पाठविला. सदर नोटीसला विरुध्द पक्षाने अधिवक्ता श्री वाळके यांनी संपूर्ण खोटे व बनावट उत्तर दिले. त्यामुळे तक्रारकर्ता हा पोलीस स्टेशन, रामनगर येथे रिपोर्ट देण्याकरिता गेले असता त्यांनी रिपोर्ट न घेतल्याने त्यांनी दिनांक १५/९/२०२१ रोजी पोलीस स्टेशन, चंद्रपूर यांचेकडे रजिस्टर पोच पावतीसह लेखी रिपोर्ट पाठविला परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. विरुध्द पक्षास तक्रारकर्त्याने गहाण मध्ये दिलेला भुखंड विकण्याचा अधिकार नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास फसवून भुखंड विकला. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचे विरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून कर्जाची रक्कम व्याजासह देऊन त्यांचेकडून घेतलेला उपरोक्त भुखंड क्रमांक २१ चे माधुरी क्रिष्णराव अवताडे यांच्या नावाचे दस्तावेज व स्टेट बॅंकेचे १० कोरे धनादेश परत द्यावे अथवा तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम रुपये २,००,०००/- कपात करुन ८,००,०००/- द.सा.द.शे. ३ टक्के व्याजासह परत द्यावे याशिवाय शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्कम रुपये १,००,०००/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये ५०,०००/- द्यावे अशी प्रार्थना केली.
- तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांना आयोगामार्फत नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष उपस्थित राहून त्यांनी लेखी कथन दाखल करुन त्यामध्ये तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन अमान्य करुन आपले विशेष कथनात नमूद केले की, विरुध्द पक्ष हा ताडोबा अर्बन बचत निधी लि. चंद्रपूर चे माजी संचालक होते आणि तक्रारकर्त्याचा मुलगा श्री पियुष हा त्यांचा मिञ आहे. सन २०१९ मध्ये तक्रारकर्त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ते २०१९ मध्ये विरुध्द पक्ष यांच्याकडे कर्ज घेण्याकरिता आले. त्यावेळी त्यांनी स्वतःचे वडगांव येथे असलेल्या भुखंडाचे दस्तावेज आणले होते परंतु सदर भुखंड हा Diverted नसल्यामुळे त्या भुखंडावर कर्ज देता येत नाही असे सांगितले. तक्रारकर्त्याच्या विनंतीवरुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास वैयक्तिक लोन देण्यास तयार झाले. त्याकरिता तक्रारकर्त्याने दिनांक १५/०३/२०१९ रोजी अर्ज केला. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दिनांक १५/०४/२०१९ रोजी रुपये २,००,०००/- चे कर्ज दिले. तक्रारकर्त्याने सदर कर्जापोटी काही हफ्ते भरले व त्यानंतर हफ्ते भरणे बंद केले. तक्रारकर्त्यास परत ४,००,०००/- ची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी त्याचे वडगांव येथील असलेला भुखंड विकायचा आहे असे सांगितल्यामुळे विरुध्द पक्षाने ताडोबा अर्बन बचत निधी लि. चंद्रपूर ला गुंतवणूकीकरिता घेण्यास तयार झाले आणि तक्रारकर्ता सुध्दा रुपये २,००,०००/- मध्ये सदर भुखंड विकण्यास तयार झाला आणि त्या विक्रीबाबतची दिनांक २०/०४/२०१९ राजी नगदी रक्कम देऊन करारनामा/कब्जा पावती नोटरी करुन विरुध्द पक्षाला त्याचा ताबा दिला. ताडोबा अर्बन बचत निधी लि. चंद्रपूर ची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना उपरोक्त प्लॉट विकावा लागला आणि त्याबाबतचे विक्रीपञ करुन देण्यात आले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास त्याने घेतलेल्या वैयक्तिक कर्जाची रक्कम भरण्याकरिता वारंवार सांगण्यात आले होते. तक्रारकर्ता दिनांक २०/०८/२०२१ रोजी विरुध्द पक्षास भेटण्यास आले होते त्यावेळी सुध्दा कर्ज भरण्यास सांगितले. तक्रारकर्त्याने कर्जाची रक्कम भरलेली नाही व कर्जाच्या रकमेचा भरणा करायचा नसल्यामुळे विरुध्द पक्षावर खोटे आरोप लावून त्याचे विरुध्द प्रकरण दाखल केले. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
- तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तिवाद तसेच विरुध्द पक्षाचे लेखी कथन, दस्तावेज, शपथपञ व लेखी युक्तिवाद आणि तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन कारणमीमांसा आणि निष्कर्षे पुढीलप्रमाणे...
कारणमीमांसा - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडे कर्ज मिळण्याकरिता अर्ज केला त्यानुसार विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास दिनांक १५/४/२०१९ रोजी रुपये २,००,०००/-, चे कर्ज मंजूर करुन कर्जाची रककम दिली. तक्रारकर्त्यास उपरोक्त कर्जाच्या रकमेची परतफेड ४२ महिण्यात दरमहा रुपये ६,०००/- ने करावयाची होती. कर्जाच्या रकमेवर रुपये १३.४९ टक्के द.सा.द.शे. प्रमाणे तक्रारकर्त्यास व्याज द्यावे लागणार होते. याबाबत विरुध्द पक्षाने कर्ज मंजूरीचा दस्त दाखल केला आहे. विरुध्द पक्ष यांचे लेखी कथनानुसार तक्रारकर्ता यांनी कर्जाच्या रकमेचे काही हप्ते भरले आणि त्यानंतर कर्जाच्या रकमेचे हप्ते भरणे बंद केले व तक्रारकर्ता यांनी सुध्दा आपल्या तक्रारीत ही बाब मान्य केली आहे की रक्कम भरता आली नाही यावरुन तक्रारकर्ता हा थकीतदार होता व आहे आणि कर्जाची रक्कम व्याजासह विरुध्द पक्षाला देणे लागतो ही बाब स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने आक्षेप घेतला की, विरुध्द पक्ष यांनी त्याचे मालकीचा खास मौजा वडगांव, त.सा.क्र. ११, तह व जिल्हा चंद्रपूर येथील सर्व्हे क्रमांक २२, राष्ट्रवादीनगर मधील प्रस्तुत भुखंड क्रमांक २१, एकूण आराजी १९०९.०० चौरस फुट चे मुळ दस्तावेज विरुध्द पक्ष यांनी ऑडीट करायला हवे असे सांगून मागवून घेतले आणि वरील भुखंडाची विक्री केली. परंतु विरुध्द पक्ष यांनी दिनांक १७/२/२०२२ रोजी दाखल केलेल्या दस्तऐवजाच्या यादीसोबत विक्रीचा करारनामा/कब्जा पावती दिनांक २०/०४/२०१९ ची नक्कल प्रत प्रकरणात दाखल केली आहे. त्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून २,००,०००/- रक्कम घेऊन विरुध्द पक्ष/ताडोबा अर्बन बचत निधी लि. चंद्रपूर ला दिनांक २०/०४/२०१९ रोजी उपरोक्त भुखंड विक्रीबाबतचा करारनामा/कब्जा पावती नोटरी करुन कब्जा/ताबा दिला. त्यामध्ये तक्रारकर्त्याने ‘माझे वापरी व कब्ज्यातील मालमत्ता मी आज रोजी कब्जा पावती करारनाम्यानुसार तुमचे ताब्यात दिली आहे. या मालमत्तेचा तुम्ही लिहून घेण्या-यांनी अनुभव व उपभोग घ्यावा आणि तुम्ही तुमचे मर्जीनुसार मालकी हक्काने वहीवाट व विल्हेवाट करावी.’ असे नमूद असून त्यावर तक्रारकर्ता, विरुध्द पक्ष आणि दोन साक्षीदार यांची स्वाक्षरी असल्याचे दिसून येत आहे. यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास उपरोक्त भुखंड विक्री करण्याचा करारनामा/कब्जा पावती लिहून कब्जा/ताबा दिल्याचे स्पष्ट होते त्यामुळे तक्रारकर्त्याचे कथन की, विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त भुखंडाचे मुळ दस्तावेज बॅंकेला ऑडिट करण्याकरिता आवश्यक आहे असे सांगून मागवून घेतले आणि ते तक्रारकर्त्याचा भुखंड विकणार नाही असे सांगितले, हे कथन ग्राह्रय धरणे योग्य नाही. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षाकडे कर्जाच्या रकमेच्या परतफेडीपोटी किती रकमेचा भरणा केला आणि किती रक्कम बाकी आहे याबाबत स्पष्टता नाही परंतु तक्रारकर्ता हा आज रोजी थकीतदार आहे ही बाब स्पष्ट आहे. तक्रारकर्ता हा थकीतदार असला तर विरुध्द पक्ष यांना कर्जाची रक्कम वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. वरील वस्तुस्थिती व परिस्थितीचा विचार करता तक्रारकर्ता हा थकीतदार असून त्यांनी दाखल केलेली प्रस्तुत तक्रार ही तथ्यहीन आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याप्रती कोणतीही न्युनतम सेवा दिली नसल्याचे सिध्द होते, या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे. सबब आयोग खालीलप्रमाणे आदेशपारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र. १८७/२०२१ खारीज करण्यात येते.
- उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |