न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदारांनी फियाट लिनिया क्र. एमएच 09 सी.एम.4553 ही कार खरेदी केली होती. सदर कारचा विमा वि.प.क्र.1 यांचेकडे पॉलिसी क्र. 3362/01036617/000/00 ने दि. 28/7/2015 ते दि. 27/7/2016 या कालावधीपर्यंत उतरविला होता. दि. 21/8/2015 रोजी तक्रारदार सोलापूरहून कोल्हापूरकडे येत असताना सांगोला येथे कारचा अपघात झाला व त्यामध्ये वाहनाचे नुकसान झाले. सदरचा कारची विमा रक्कम वि.प. यांनी अदा न केलेने तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे कथन आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे वर नमूद पत्त्यावरील रहिवासी आहेत. सदर ठिकाणी त्यांची निर्मिती संवाद प्रकाशन प्रा.लि. व संवाद प्रकाश प्रा.लि. नावाच्या प्रकाशन संस्था आहेत. सदर संस्थेच्या कामाकरिता तक्रारदारांनी फियाट लिनिया क्र. एमएच 09 सी.एम.4553 ही कार खरेदी केली होती. सदर कारचा विमा वि.प.क्र.1 यांचेकडे पॉलिसी क्र. 3362/01036617/000/00 ने दि. 28/7/2015 ते दि. 27/7/2016 या कालावधीपर्यंत उतरविला होता. दि. 21/8/2015 रोजी तक्रारदार सोलापूरहून कोल्हापूरकडे येत असताना सांगोला येथे कारचा अपघात झाला व त्यामध्ये वाहनाचे नुकसान झाले. याबाबत वि.प.क्र.2 यांना त्वरित कळविले होते. त्यानंतर तक्रारदारांनी याबाबत वि.प.क्र.1 यांना विचारणा केली असता त्यांनी तक्रारदार यांची कार कोल्हापूर येथे ऑरोन व्हिल्स एल.एल.पी. कंपनी या ठिकाणी पूर्णपणे दुरुस्ती करुन देतो अशी हमी दिली होती. त्यानुसार तक्रारदाराने सदर कंपनीमध्ये कार दुरुस्तीसाठी सोडली. सदर ठिकाणी वि.प. कंपनीचे सर्व्हेअरने येवून दि.26/8/2015 रोजी तक्रारदार यांचे गाडीचे फोटो व गाडीचा तपशील नेला. परंतु तदनंतर वि.प. यांनी कार दुरुस्तीबाबत कोणतीही पूर्तता केली नाही. म्हणून तक्रारदार यांनी सदर कारचा ताबा वि.प.क्र.2 यांचेकडे दि. 28/9/2015 रोजी दिला. तदनंतर वि.प.क्र.1 यांनी ऑरोन व्हिल्स एल.एल.पी. कंपनीला मंजूर इस्टीमेटचे पत्र पाठविले तसेच गाडीचे 100 टक्के काम करुन देणेबाबतचे पत्रही दिले. परंतु वि.प. यांनी तक्रारदार यांची कार दुरुस्ती करुन देणेस टाळाटाळ केली. सदर कारचा ताबा सध्या वि.प.क्र.1 यांचेकडे आहे. तदनंतर वि.प. यांनी तक्रारदारांना खोटया आशयाच्या नोटीसा पाठवून त्रास देण्याचा प्रयत्न केला. तक्रारदार यांनी वि.प. यांना नोटीस पाठविलेली आहे तसेच शाहुपूरी पोलिस ठाणे, कोल्हापूर तसेच पोलिस प्रमुख कोल्हापूर यांचेकडे तक्रारीअर्जही दाखल केले आहेत. परंतु तरीही वि.प. यांनी गाडी दुरुस्त करुन दिली नाही. सबब, तक्रारदारास वाहनाचे अपघात नुकसानीपोटी रक्कम रु.11,00,000/-, व्यवसायाचे नुकसानीपोटी रु. 3,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.2,00,000/- व तक्रारीचा खर्च रु.25,000/- देणेबाबत वि.प. यांना आदेश व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत वाहनाचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, तक्रारदार यांचा वाहन चालविण्याचा परवाना, विमा उतरविलेबाबत कागदपत्र, ऑरोन व्हिल्स एल.एल.पी. कंपनी यांचेकडील जॉब कार्ड, रिपेयर इस्टिमेट, तक्रारदार यांचे पत्र, तक्रारदार यांनी ऑरोन व्हिल्स एल.एल.पी. कंपनी यांचेसोबत केलेला पत्रव्यवहार, वि.प. यांचेशी केलेला पत्रव्यवहार, पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारींच्या प्रती, वि.प. यांनी तक्रारदार यांना पाठविलेली नोटीस, तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसची पोहोच इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच वाहनाचे फोटो, पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
4. वि.प.क्र.1 व 2 यांना नोटीस लागू झालेनंतर वि.प. यांनी आयोगासमोर हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले. वि.प. यांनी आपले लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. वि.प. यांचे कथनानुसार, अपघातानंतर तक्रारदाराने स्वतःहून त्यांची कार ही ऑरोन व्हिल्स एल.एल.पी. कंपनी यांचेकडे दुरुस्तीसाठी सोडली. वि.प. यांनी त्याबाबत तक्रारदाराला सांगितलेले नव्हते. वि.प. यांनी सर्व्हे केल्यानंतर तक्ररदारांनी दुरुस्तीचे अंदाजपत्रक देणे, वाहनाची दुरुस्ती करुन घेणे व दुरुस्तीची बिले वि.प यांना सादर करणे हे तक्रारदारावर बंधनकारक होते जेणेकरुन वि.प. यांना बिलचेक रिपोर्ट तयार करणे सोईचे झाले असते. परंतु तक्रारदारांनी या बाबींची पूर्तता केली नाही. विमा पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार वाहनाची दुरुस्ती करुन घेणे ही तक्रारदाराची जबाबदारी होती परंतु ती त्याने पार पाडली नाही. वि.प यांनी तक्रारदाराचे वाहन दुरुस्त करण्याची कोणतीही हमी तक्रारदाराला दिलेली नव्हती. तक्रारदाराने वाहनाची दुरुस्ती करुन विमा क्लेम सादर केलेला नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदारास कोणतीही सेवात्रुटी न दिलेने तक्रारअर्ज नामंजूर करावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
5. वि.प. यांनी याकामी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार यांनी त्यांचे संस्थेच्या पुस्तकांची ने-आण करणेसाठी फियाट लिनियो क्र. एमएच 09 सी.एम.4553 ही कार खरेदी केली होती व आहे. सदर कारसाठी अॅक्सीस बँक, कोल्हापूर यांचेकडून कर्ज घेतले होते. सदर कारचा विमा वि.प.क्र.1 चोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कं. लि. या कंपनीकडे विमा पॉलिसी क्र. 3362/01036617/ 000/00 ने 100 टक्के नुकसान भरपाईने दि. 28/7/2015 ते दि. 27/7/2016 या कालावधीकरिता उतरविला होता. याबद्दल उभय पक्षांमध्ये वाद नाही. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते प्रस्थापित झालेचे दिसून येते. सबब, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार वि.प. यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. तक्रारदार यांनी त्यांचे संस्थेच्या पुस्तकांची ने-आण करणेसाठी फियाट लिनियो क्र. एमएच 09 सी.एम.4553 ही कार खरेदी केली होती व आहे. सदर कारसाठी अॅक्सीस बँक, कोल्हापूर यांचेकडून कर्ज घेतले होते. सदर कारचा विमा वि.प.क्र.1 चोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कं. लि. या कंपनीकडे विमा पॉलिसी क्र. 3362/01036617/000/00 ने 100 टक्के नुकसान भरपाईने दि. 28/7/2015 ते दि. 27/7/2016 या कालावधीकरिता उतरविला होता. वि.प. विमा कंपनीने दि.26/9/2015 रोजी तसेच दि. 29/9/15 रोजीचे पत्राने We are again requesting you to please get repair your vehicle as per the assessment and provide us the opportunity to reinspect your vehicle after repairing alongwith the repair bills to enable us to settle the claim as per policy terms & conditions. कळविले होते व आहे. तक्रारदारास गाडी रिपेअर करुन बिले दाखल करणेस सांगितले होते. वि.प. विमा कंपनीने लगेचच दि. 30/11/2015 रोजी If you do not agree with the settlement as per policy terms & conditions, we advise you to come through proper channel as per court law. अशा आशयाचे पत्र पाठविले. सदरचा विमादावा वमा पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार सेटल होत नसेल तर योग्य त्या चॅनेलकडे जाणेसाठी कथन केले आहे.
9. तक्रारदाराने तक्रारअर्जासोबत काही कागदपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये Arron Wheels LLP चे Job slip तसेच Repair Estimate ही दाखल कले आहे. दि.15/10/2015 रोजी Arron Wheels LLP चे पत्रानुसार Your were told by the Insurance Company that the delay for sanctioning was due to the unavailability of spares in our workshop असे जरी कळविले असले तरी आपल्याकडे सदर गाडीचे स्पेअर पार्ट्स आहेत असे स्पष्ट कथन Arron Wheels LLP ने केले आहे. तसेच सदरचे अॅरॉन व्हिल्सचे पत्रानुसार Cholamandalam Insurance surveyor has inspected the vehicle initially and sanctioned only the frontal impact damage initially on 26/08/2015 then later on the side damage on 21/09/2015 and finally the full damage on 04/10/2015 at the insistence of you who wanted the full damage to be settled. सदरचे पत्रावरुन असे दिसून येते की, वि.प. विमा कंपनीचेच सर्व्हेअरने सदरचे वाहन हे Full damage असलेचे कथन केले आहे. तसेच दि. 22/9/2015 चे तक्रारदार यांनी विमा कंपनीस लिहिलेले पत्रानुसार वर नमूद वाहन हे दि. 25/8/2015 रोजीच अॅरॉन व्हिल्स कंपनीकडे सोडले असून प्रतिसाद नसलेचे कथन केले आहे व वि.प.यांची पोहोचही दिसून येते. यावरुन वि.प.विमा कंपनीनेच तक्रारदार यांना सेवा देणेमध्ये विलंब केलेची बाब या आयोगाचे निदर्शनास येते. तक्रारदाराने सदरचे वाहन हे दि.25/8/2015 रोजीच दुरुस्तीसाठी सोडले आहे व दि.26/9/15 तसेच दि.29/9/15 रोजी वि.प.कंपनीने सदरचे वाहन दुरुस्ती करुन घेणेस सांगितले आहे. सबब, सदरचे वाहन तक्रारदार यांनी दुरुस्तीसाठी सोडले असूनही त्याची कार्यवाही वि.प. कंपनीने केली नसलेचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. जर सदरची कार्यवाही वि.प.कंपनीने लवकर केली असती तर तक्रारदार यांना दि.22/9/15 ला वि.प. कंपनीस पत्र लिहिणेची गरजच नव्हती. अशा प्रकारे सदरचे वाहन हे Full damage असून तसेच पॉलिसी “O” depreciation ची असूनही वि.प.विमा कंपनीने वाहन दुरुस्तीसाठी असणारी कार्यवाही न करुन तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली असलेची बाब या आयोगाचे निदर्शनास येते. तसेच तक्रारदाराने तसेच वि.प. यांनी यासंदर्भात पुराव्याचे शपथपत्रही दाखल केले आहे. वर नमूद कारणांचा विचार करता तक्रारदाराने मागितलेल्या मागण्या अंशतः मंजूर करणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तक्रारदाराने दि. 21/8/2015 रोजीचे अपघाताने झालेले कारचे नुकसान रक्कम रु.11,00,000/- ची मागणी केली आहे. मात्र सदरचे रकमेसंदर्भात कोणताही पुरावा या आयोगासमोर नाही. मात्र दाखल विमा पॉलिसीवरुन सदरचे वाहनाची आयडीव्ही (Insured Declared Value) ही रक्कम रु. 6,00,000/- असलेचे दिसून येते. सबब, सदर वाहनाची आयडीव्ही रक्कम रु. 6,00,000/- देणेचे आदेश वि.प. विमा कंपनीस करणेत येतात. सदरची रक्कम तक्रारअर्ज दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने देणेचे आदेश करणेत येतात. तसेच तक्रारदाराने व्यावसायिक नुकसान व मानसिक व शारिरीक नुकसान यासाठी प्रत्येकी रक्कम रु. 3,00,000/- व अर्जाचा खर्च रु. 25,000/- मागितला असला तरी तो या आयोगास संयुक्तिक वाटत नसलेने तक्रारदाराचे व्यवसायाचे नुकसान भरपाईपोटी रु. 10,000/- तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचा खर्च रु. 3,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना वाहन अपघात नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 6,00,000/- अदा करणेचे आदेश करणेत येतात. सदर विमा क्लेमचे रकमेवर वि.प. यांनी तक्रारदार यांना तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3. वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना व्यावसायिक नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.10,000/-, मानसिक व शारिरिक त्रसापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.