न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे -
तक्रारदार हे जयसिंगपूर येथील कायमचे रहिवासी आहेत. त्यांनी स्वराज माझदा मालवाहतूक टेम्पो नं. एम.एच.09-सी.व्ही.8171 हे वाहन दि. 07/05/2014 रोजी फेडरल बँक लि. जयसिंगपूर यांचेकडे तारण देवून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता खरेदी केले. सदर वाहनाचे माल न भरता वजन 3250 किलोग्रॅम असून सदर वाहनात वाहनाच्या वजनासह 10450 किलोग्रॅम मालवाहतूकीस परवानगी आहे. तक्रारदार व त्यांचे बंधू गजानन बापू क्षीरसागर दोघेही नमूद वाहन चालवतात. जादा अंतरावर माल वाहतूक करणेची असलेस दोघेही नमूद वाहनातून जातात. तक्रारदाराचे बंधू गजानन क्षीरसागर यांचे ड्रायव्हींग लायसेन्स असून त्याना मोटार सायकल, लाईट मोटर व्हेईकल, ट्रान्स्पोर्ट तसेच इतर ट्रान्स्पोर्ट व्हेईकल चालविणेचे लायसेन्स आहे. तक्रारदार यांनी त्यांचे वर नमूद वादातील वाहनाचा विमा वि.प. कंपनीकडे उतरविला होता. सदर वाहनाची किंमत आय.डी.व्ही. रक्कम रु.8,83,500/- इतकी दाखवली होती. दि. 19/05/2014 रोजी तक्रारदार व त्यांचे बंधू गजानन क्षीरसागर हे जयसिंगपूर येथे टी.व्ही.एस. कंपनीचे स्पेअर पार्ट्स भरुन घेवून अंदाजे 4.00 वा. निघाले. सदरचा टेम्पो गजानन क्षीरसागर हे तक्रारदाराचे देखरेखीखाली चालवत होते. त्यावेळी नमूद वाहन पुणे-बंगलोर हायवेवरतील आले असता बारीक पाऊस पडत असलेने सदरचे वाहन गजानन क्षीरसागर यांनी बाजूला घेत असता रस्त्याच्या कठडयाला धडकले. त्यामध्ये तक्रारदाराचे वाहनाचे मोठे नुकसान झाले.
2. सदरच्या अपघातानंतर तक्रारदाराने सदरचे अपघाताची माहिती वि.प. विमा कंपनीला दिली. त्यांचे सूचनेनुसार अपघातग्रस्त वाहनाचा पहिला सर्व्हे अपघात ठिकाणी बी.जी. संजया चित्रदुर्ग यांनी केला. सदर सर्व्हेनुसार सदर वाहन हे टी.व्ही.एस. स्पेअर पार्ट्सने भरलेले होते व चलन व्हेरिफाय करावे असा उल्लेख सर्व्हअरने केलेला दिसतो. त्यानुसार सरोज इंजिनियर्स कडील अस्सल चलन विमा कंपनीने घेतलेले आहे. त्यांनी गाडीच्या नुकसानीचे वर्णनही केले आहे. त्यानंतर सदर अपघातग्रस्त वाहन कोल्हापूर येथे आणलेनंतर दिगे असोसिएट्स यांनी वाहनाचा पुन्हा सर्व्हे चौगुले इंडस्ट्रीज, एम.आय.डी.सी. कोल्हापूर येथे केला आहे व रिइन्स्पेक्शन रिपोर्ट सादर केला. तक्रारदाराने वि.प. चे सांगणेप्रमाणे सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे सादर केली व वाहन दुरुस्तीचे आदेश दिले. गाडी तक्रारदाराने दुरुस्त करुन घेतली असून एकूण रक्कम रु. 2,20,674/- इतकी रक्कम खर्च केली आहे. वादातील अपघातग्रस्त वाहन चौगुले कंपनीकडे दुरुस्त केलेनंतर वि.प. विमा कंपनीने सदर दुरुस्तीचे बिल न भागवता तक्रारदाराला दि. 26/09/2014 राजी पत्र पाठवून कळविले की, तक्रारदार यांचे अपघातावेळी वैध ड्रायव्हींग लायसेन्स नव्हते. त्यामुळे सदर कामी तक्रारदाराने वैध लायसेन्स नसताना गाडी चालवून विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केला आहे असे कळविले.
3. वास्तविक वि.प. कंपनीने क्लेम नाकारणेसाठी दिले कारणांचा विचार करता गजानन क्षीरसागर हे अपघातसमयी वाहन चालवत होते व त्यांचेकडे एम.व्ही.जी. वाहन चालवणेचे लायसेन्स नव्हते या कारणावरुन विमा क्लेम नाकारला आहे. परंतु अपघातसमयी तक्रारदाराकडे ट्रान्स्पोर्ट व्हेईकलचे लर्निंग लायसेन्स होते. अशा परिस्थितीत तक्रारदाराचा विमा क्लेम लायसेन्सचा मुद्यावरुन नाकारणे ही सेवेतील त्रुटी आहे व वि.प. ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असलेने तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे.
4. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वादातील वाहन दुरुस्तीसाठी आलेला खर्च रक्कम रु. 2,20,674/-, सदर रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज, कोर्ट खर्च रु. 5,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- वि.प. कडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
5. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 17 कडे अनुक्रमे वाहनाची विमा पॉलिसी, डी.व्ही. संजया यांचा सर्व्हे रिपोर्ट, दिगे असोसिएट्स यांचा सर्व्हे रिपोर्ट, तसेच रिइन्स्पेक्शन रिपोर्ट, चौगुले इंडस्ट्रीज शिरोली यांचेकडील दुरुसृती रिसीट, टेम्पो दुरुस्ती इस्टिमेट, टेम्पो दुरुस्ती रिटेल इनव्हॉईस, टेम्पो दुरुस्ती लेबर चार्जेस, टेम्पो पेंटींग काम, वि.प. कडील लायसेन्स मागणी पत्र, लायसेन्स पर्टीक्युलर्स, क्लेम नाकारलेचे पत्र, तक्रारदाराचे ड्रायव्हींग लायसेन्स, तक्रारदाराने हजर केलेल्या कागदपत्रे परत मागणीचा अर्ज, वाहनाची आर.सी., टी.व्ही.एस. कंपनीकडील माल पोहोचलेचे पत्र, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच मे.वरिष्ठ न्यायालयांचे पुढील नमूद न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
- First Appeal No. A/11/660
(Hon’ble State Consumer Disputes Redressal Commission, Maharashtra Mumbai)
- 2019 ACJ 2385 (Supreme Court of India)
M/s Bhati Vs. National Insurance Co.Ltd.
- 2019 ACJ 2816 (High Court of Judicature at Bombay)
Sangita Vs. Aslam Altaf Shaikh & Ors.
6. सदर कामी वि.प. विमा कंपनीने म्हणणे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच कागदयादीसोबत आर.सी.बुक झेरॉक्स, गजानन बापू क्षीरसागर, यांचे मोटार ड्रायव्हींग लायसेन्सचा एक्स्ट्रॅक्ट, दिघे असोसिएट्स सर्व्हेअर यांचा बिलचेक रिपोर्ट, विमा पॉलिसी, वगैरे कागदपत्रे वि.प. यांनी याकामी दाखल केले आहत.
वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. ने तक्रारदाराचा विमा क्लेम योग्य कारणे देवून नाकारला आहे. त्यामुळे तक्रारदाराचा विमाक्लेम दाखल करणेचे कारण नाही आणि या आयोगाला सदरचा तक्रारअर्ज चालवणेचा अधिकार नाही. सदर वि.प. ने तक्रारदाराचा क्लेम योग्य कारणे देवून नाकारला असलेने वि.प ने तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत यावा.
iii) या तक्रारदाराने ज्या वाहनाबाबत क्लेम दाखल केला आहे, त्या वाहनाचा नंबर एमएच 09 – सीव्ही 8971 असा आहे. वि.प. ने याकामी सदर वाहनाची आर.सी. बुक झेरॉक्सप्रत तसेच विमा पॉलिसी, वाहन मालकाचा वाहन चालवणेचा परवाना, आर.टी.ओ. चे शपथपत्र वगैरे कागदपत्रे वि.प. ने पुरावा म्हणून दाखल केली आहेत. सदर कागदपत्रांतून असे दिसते की, या कामातील संबंधीत वाहन चालकाकडे अपघातावेळी अपघातग्रस्त वाहन चालविणेचा परवाना नव्हता. हा विमा पॉलिसी आणि मोटार वाहन कायद्याचा भंग आहे. सबब, वि.प. यांची नुकसान भरपाई देणेचे जबाबदारी नव्हती व नाही. तसेच अपघातग्रस्त वाहन हे मेडियम गुड्स व्हेईकल म्हणून नोंद झाले आहे आणि याकामातील संबंधीत वाहन चालकाकडे मेडियम गुड्स व्हेईकल चालवणेचे ड्रायव्हींग लायसेन्स नव्हते तर सदर चालकाकडे फक्त लाईट मोटार व्हेईकल (टी.आर.) चालविण्याचा परवाना होता. म्हणजेच तक्रारदाराने योग्य परवाना नसताना वाहन चालवलेने विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचा भंग केला आहे. त्यामुळे यातील वि.प. विमा कंपनीची नुकसान भरपाई देणेची कोणतीही जबाबदारी नाही. परंतु वरील कथनास बाधा न येता वि.प. चे असे कथन आहे की, अपघातानंतर अपघातातील वाहनाचा सर्व्हे दिगे सर्व्हेअर यांनी केला होता. त्यांचा फायनल बिलचेक रिपोर्ट याकामी दाखल आहे. त्याप्रमाणे वि.प. ची लायेबिलीटी जास्तीत जास्त रु. 1,61,370/- इतकीच असेस केली आहे. त्यामुळे वि.प. ची जबाबदारी ही फक्त रु. 1,61,370/- पेक्षा जास्त होणार नाही. तथापि वस्तुतः वि.प. ची कोणतीही जबाबदारी येत नाही. सबब, तक्रारदारचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
7. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
8. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदार यांनी त्यांचे मालकीचा टेम्पो क्र. एम.एच.09-सी.व्ही.8171 हे वाहन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कर्ज काढून खरेदी केले. सदर वाहनाची नोंदणी आर.टी.ओ. कोल्हापूर यांचेकडे केली असून सदर वाहनाचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला असून त्याचा कालावधी दि. 1205/2014 ते दि. 11/05/2015 असा होता. सदर विमा पॉलिसीचे विमा हप्ते तक्रारदाराने वि.प. विमा कंपनीकडे जमा केले आहेत. ही बाब तक्रारदाराने व वि.प. विमा कंपनीने याकामी दाखल केले विमा पॉलिसीवरुन स्पष्ट होते. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
9. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदाराचे वादातील वाहनाचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला होता. त्याची विमा पॉलिसी व कालावधीबाबत वि.प. ने वाद उपस्थित केलेला नाही. दि. 20/05/2014 रोजी नमूद वाहनाचा अपघात झाला. सदर अपघातानंतर तक्रारदाराने अपघाताची सूचना वि.प. कंपनीस दिली. सदर सूचनेनंतर सदर अपघातग्रस्त वाहनाचा पहिला सर्व्हे बी.जी. संजया चित्रदुर्ग यांनी अपघातादिवशीच अपघाताचे ठिकाणीच केला आहे. सदर सर्व्हेनुसार नमूद वाहनात टी.व्ही.एस. स्पेअर पार्टस भरलेले होते व चलन व्हेरिफाय करावे असा उल्लेख सर्व्हेअरने केलेला दिसतो. त्यानुसार सरोज इंजिनियर्स कडील अस्सल चलन विमा कंपनीन घेतले आहे. सर्व्हेअर यांनी सदर वाहनाच्या नुकसानीचेही वर्णन सर्व्हे रिपेार्टमध्ये केलले आहे व सदरच्या अपघातामुळ वाहनाचे नुकसान झालेचे नमूद केले आहे. त्यानंतर सदर वाहन कोल्हापूर येथे आणलेनंतर दिगे असोसिएटस यांनी सदर वाहनाचा सर्व्हे शिरोली एम.आय.डी.सी. चौगुले इंडस्ट्रीज येथे सर्व्हे केला. याकामी तक्रारदाराने चौगुले इंडस्ट्रीजकडील पेमेंटबाबतचे स्पेअर पार्टस बाबत, लेबर अॅण्ड सर्व्हिसेसचे संपूर्ण कागदपत्रे दाखल केली असून ते याकामी कागदयादीसोबत दाखल आहेत. त्यानुसार तक्रारदाराचे अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्तीसाठी रु.2,20,674/- एवढा खर्च आला आहे हे स्पष्ट होते.
10. सदरच्या खर्चाबाबत तक्रारदाराने वि.प. विमा कंपनीकडे विमाक्लेम दाखल केला असता वि.प. विमा कंपनीने दुरुस्तीचे बिल न भागविता तक्रारदार यांना दि. 26/9/2014 रोजी आर.पी.ए.डी. ने पत्र पाठवले. सदर पत्रात अपघातावेळी गजानन क्षीरसागर यांचे MGV class vehicle चालवणेचे लायसेन्स नव्हते तर LMV (TR) हे लायसेन्स होते. त्यामुळे वैध ड्रायव्हींग लायसेन्स नसलेने विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केला असलेने तक्रारदाराचा वादातील वाहनाचा विमा क्लेम नाकारलेबाबत कळविले आहे.
11. वास्तविक गजानन क्षीरसागर (तक्रारदाराचे भाऊ) यांचे अपघातादिवशी LMV Transport Licence होते आणि M.V. Act Sec. 2(21) नुसार त्यामध्ये 7500 किलोग्रॅम पर्यंतचे वजन, असलेचे वाहन चालविणेचा अधिकार सदर लायसेन्स धारकास आहे. याकामी सर्व्हे रिपोर्टचे अवलोकन करता अपघातग्रस्त वाहनाचे वजन 3250 किलोग्रॅम इतके आहे. सदर वाहनाच्या आर.सी.बुक वरती देखील व वाहनाचे वजन 3250 किलोग्रॅम नोंद आहे हे स्पष्ट होते. तसेच अपघात तारखेस सदर वाहनामध्ये 3350 किलोग्रॅम माल भरलेला होता ही बाब तक्रारदाराने तक्रारअर्जासोबत जोडले कागदयादी अ.क्र.16 ला दाखल मालाच्या पोहोचपावतीवरुन स्पष्ट होते. सदरची पोहोच होसूर तामिळनाडू येथील नमूद ऑफिसची आहे. म्हणजेच तक्रारदाराचे वाहनाचे मूळ वजन 3250 किलोग्रॅम + मालाचे वजन 3350 किलोग्रॅम = 6600 किलोग्रॅम एवढे सदर वाहनाचे मालासह वजन अपघातादिवशी होते. तक्रारदाराचे भाऊ गजानन क्षीरसागर यांचेकडे LMV (TR) चे लायसेन्स होते. म्हणजेच त्यांना 7500 किलोपर्यंत वजनाचे वाहन चालविणेचा परवाना होता हे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. आर.सी.बुकास तरी सदरचे वाहन MGV दाखवले असले तरी सदर वाहनात फक्त 3350 किलोग्रॅम माल भरला होता. त्यामुळे अपघातग्रस्त वाहनाचे मालासहीत वजन हे 7500 किलोग्रॅमपेक्षा कमी म्हणजे 6600 किलोग्रॅम झाले असलेने व गजानन क्षीरसागर यांचेकडे LMV (TR) लायसेन्स असलेने त्यांचे सदरचे लायसेन्स वैध आहे असे समजणे योग्य असतानाही वि.प. कंपनीने तक्रारदाराचे अपघातग्रस्त वाहनाचा विमा क्लेम नाकारणे ही सेवेतील त्रुटी आहे कारण गजानन क्षीरसागर याला ट्रान्सपोर्ट वाहन चालविणेचा अनुभव 10 वर्षाहून अधिक असलेने तसेच LMV Transport वाहन चालविणारे इसमाने MGV वाहन चालविले त्यामुळे Breach of Policy होते हे म्हणणे तांत्रिक स्वरुपाचे आहे. एम.व्ही अॅक्ट कलम 3 अथवा सेंट्रल मोटार व्हेईकल्स अॅक्टच्या तरतुदींचा कोणताही भंग तक्रारदाराने केलेला नाही. सेंट्रल मोटार व्हेईकल्स रुल्स मधील कलम 3 पुढीलप्रमाणे -
Section 3 of Central Motor Vehicle Rules 1989 – General –
The provisions of sub-sec.(1) of Sec.3 shall not apply to a person while receiving instructions or gaining experience in driving with the object of presenting himself for a test of competence to drive so long as
- Such person is the holder of an effective learner’s licence issue to him in form 3 to drive the vehicle.
- Such person is accompanied by an instructor holding an effective driving license to dive the vehicle and such instructor is sitting in such a position to control or stop the vehicle and
- There is painted in front and the rear of the vehicle or on a plate or card affixed to the front and the rear, the letter “L” in red.
Provided that a person while receiving instructions or gaining experience in driving a motor cycle (with or without a side car attached) shall not carry any other person on the motor cycle except for the purpose and in the manner referred to in clause(b).
12. याकामी गजानन क्षीरसागर यांचेकडे MGV लायसेन्स नाही याबाबत आरटीओ कडील पुरावा वि.प. विमा कंपनीने हजर केला आहे. पण तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात व त्यानंतर पुराव्याच्या शपथपत्रामध्ये शपथेवर कथन केले आहे की, गजानन क्षीरसागर यांचे HGV लायसेन्स काढणेपूर्वी Learning license काढले होते.
13. तसेच वि.प. कंपनीने विमाक्लेम नाकारणेसाठी दिले कारणांचा विचार करता वाहन चालक गजानन क्षीरसागर यांचे MGV वाहन चालविणेचे लायसेन्स नव्हते. खरेतर दि. 20/5/2014 रोजी हा अपघात झाला, तेव्हा तक्रारदाराने ट्रान्स्पोर्ट व्हेईकलचे लर्निंग लायसेन्स होते तसेच तक्रारदार स्वतः सदर वाहनात गजानन क्षीरसागर या वाहन चालकासोबत बसलेले होते. तक्रारदाराने ट्रान्स्पोर्ट ड्रायव्हींगचे पक्के लायसेन्स आहे. ते तक्रारदाराने याकामी नि.3 चे कागदयादीसोबत दाखल केलेले आहे. सबब, तक्रारदाराचा विमा क्लेम वि.प. कंपनीने नाकारुन तक्रारदार यांना सेवात्रुटी दिली आहे.
14. सबब, वाहन चालक गजानन क्षीरसागर यांचेसोबत ट्रान्स्पोर्ट लायसेन्स असणारे तक्रारदार बसले होते. त्यामुळे सेंट्रल मोटार व्हेईकल्स रुल्स कलम 3 प्रमाणे गजानन क्षीरसागर वाहन चालक यांचे ड्रायव्हींग लायसेन्स वैध समजणे न्यायोचित होणार आहे असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे. सबब, याकामी मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
15. प्रस्तुत बाबतीत आम्ही तक्रारदाराने दाखल केले मे. वरिष्ठ न्यायालयाच्या पुढील न्यायनिवाडे व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
1) 2019 ACJ 2816
In the High Court of Judicature at Bombay, Aurangabad Bench
Sangita Vs. Aslam Altaf Shaikh & Ors.
Head Note : Motor Vehicles Act 1988 Sec.149 (2)(a)(ii) – Motor insurance – Driving license – liability of insurance company – Jeep dashed against the bicycle and cyclist sustained fatal injuries – Tribunal exonerated insurance company on the ground that driver was holding license to drive Light Motor Vehicle (Non-transport- but he was not driving a jeep, a transport vehicle, without endorsement to that effect and there was breach of policy – once a license is issued to drive a light motor vehicle, it would also mean specific authorization to drive a transport vehicle if the gross vehicle weight or unladen weight of vehicle does not exceed 7500 kg – weight of jeep did not exceed 7500 kg – Whether driver was holding valid licence and insurance company is liable – Held : Yes.
2) 2019 ACJ 2385
In the Supreme Court of India at New Delhi.
C.A. No. 3322 of 2019
M.S. Bhati Vs. National Insurance Co.Ltd.
Motor Insurance – own damage claim – Driving license – Repudiation of claim – jeep met with accident and was damaged – Claim under the policy was repudiated by insurance company – complaint filed before District Forum was dismissed on ground that accident occurred on 11/04/2008 at 2.10 p.m. whereas driving license of deceased driver was renewed at 2.42 p.m. on the same day and thus, driver was not holding a valid license to drive transport vehicle at the time of accident – state Commission reversed the decision of District Forum and allowed the complaint – National Commission restored the order of District Forum – In the claim before MACT a finding of fact was recorded to the effect that deceased driver had license to drive four wheeler vehicle upto the capacity of 7500 kg. and same was valid from 16/08/1994 to 18/05/2013 for light motor vehicle – Definition of light motor vehicle under Sec.2(21) of the Motor Vehicles Act 1988 covers transport vehicle whose gross weight does not exceed 7500 kg. – Insurance company has not disputed that gross weight of vehicle was not conformity with Sec.2(21) of motor Vehicles Act – finding of MACT proves that driver had a valid license on the date of accident – order of National Commission set aside and that of State Commission restored.
16. प्रस्तुतकामी मुद्दा क.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण सदर कामी तक्रारदार व वि.प यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचा ऊहापोह करता याकामी वाहन चालक गजानन क्षीरसागर यांचेसोबत तक्रारदार हे अनुभवी ड्रायव्हींग करणारे तसेच ट्रान्स्पोर्ट वाहनाचे ड्रायव्हींग लायसेन्स असणारे तक्रारदार वाहनामध्ये ड्रायव्हर शेजारी बसून प्रवास करत होते. तसेच तक्रारदाराचे अपघातग्रस्त वाहनाचे मालासहीत एकूण वजन 6600 किलोग्रॅम होते. म्हणजेच 7500 किलोग्रॅमपेक्षा कमी होते. त्यामुळे गजानन क्षीरसागर यांचे ड्रायव्हींग लायसेन्स अपघात तारखेस वैध होते असे गृहीत धरणे न्यायोचित होईल. सबब, तक्रारदार हे अपघातग्रस्त वाहनाच्या सर्व्हे सर्व्हेअर दिगे यांनी केला होता. त्यांचे सर्व्हे रिपोर्ट व फायनल बिलचेक रिपोर्ट याकामी दाखल आहे. त्याप्रमाणे सदर फायनल बिलचेक रिपोर्टप्रमाणे तक्रारदार हे वि.प. कंपनीकडून विमाक्लेमची रक्कम रु.1,61,750/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने व्याज मिळणेस पात्र आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु.1,61,750/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.