जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 224/2015.
तक्रार दाखल दिनांक : 16/06/2015.
तक्रार आदेश दिनांक : 18/07/2016. निकाल कालावधी: 01 वर्षे 01 महिने 02 दिवस
मोतीचंद तिलोकचंद बेदमुथा, वय 63 वर्षे, व्यवसाय : व्यापार व
शेती, रा. 3/11, भगवान महावीर पथ, उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, सोनी इलेक्ट्रॉनिक्स्,
सिव्हील हॉस्प्टिल रोड, मारवाडी गल्ली, उस्मानाबाद.
(2) कार्यकारी संचालक, सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स् प्रा.लि.,
ए-25, तळमजला, फ्रंट टॉवर, मोहन को-ऑपरेटीव्ह
इंडस्ट्रीयल इस्टेट, नवी दिल्ली – 110 044. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : देविदास वडगांवकर
विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेतर्फे विधिज्ञ : ओ.ए. मोरवे
विरुध्द पक्ष क्र. 2 यांचेतर्फे प्रतिनिधी
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, त्यांनी दि.1/9/2014 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांचेद्वारे उत्पादीत ‘सॅमसंग कोअर-2 गॅलेक्सी ब्लॅक’ मोबाईल हँडसेट विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून रु.12,400/- किंमतीस खरेदी केला आहे. मोबाईल खरेदीच्या पावतीचा क्रमांक 259 व मोबाईल क्रमांक 354799/06/ 244391/5 आहे. तक्रारकर्ता यांनी मोबाईल हँडसेट खरेदी केल्यापासून सातत्याने हँग होत असल्यामुळे त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या सेवा केंद्रातून मोबाईल हँडसेट फॉरमेट करुन घेतला तरी तो दोष कायम राहिला. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे लेखी तक्रार करुन हँडसेट बदलून द्यावा किंवा किंमत परत करावी, अशी विनंती केली असता दखल घेण्यात आली नाही. प्रस्तुत वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून हँडसेट बदलून मिळावा किंवा हँडसेटची किंमत रु.12,400/- परत मिळावी आणि मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.25,000/- व्याजासह मिळावी, अशी विनंती केलेली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील विधाने व मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारकर्ता यांची तक्रार उत्पादकीय दोषासंबंधी असून ते मोबाईल हँडसेटचे उत्पादक नाहीत. त्यांच्याकडून मोबाईल विक्री झाल्यानंतर विक्रीपश्चात सेवा देण्याकरिता स्वतंत्र यंत्रणा आहे. तक्रारकर्ता यांनी सेवा केंद्रास आवश्यक पक्षकार केलेले नाही. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
3. विरुध्द पक्ष क्र.2 हे प्रतिनिधीमार्फत मंचापुढे उपस्थित झाले. उचित संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द विनाउत्तर आदेश केले आणि सुनावणी पूर्ण केली.
4. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्ष यांनी दोषयुक्त मोबाईल हँडसेट
विक्री केल्याचे सिध्द होते काय ? तसेच विरुध्द पक्ष
यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे
सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारकर्ता मोबाईल हँडसेट किंवा मोबाईलची किंमत
परत मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून वादकथित मोबाईल हँडसेट खरेदी केल्याचे अभिलेखावर दाखल पावतीवरुन निदर्शनास येते. तक्रारदार यांच्या वादकथनाप्रमाणे मोबाईल हँडसेट खरेदी केल्यापासून सातत्याने हँग होत असे आणि त्यामुळे त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या सेवा केंद्रातून मोबाईल हँडसेट फॉरमेट करुन घेतला तरी तो दोष कायम राहिल्याचे त्यांचे वादकथन आहे.
5. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांना दिलेल्या पत्राचे अवलोकन केले असता मोबाईल हँडसेटमध्ये दोष असल्याचे कळवण्यात आलेले आहे. त्यांनी सॅमसंग केअरमध्ये मोबाईल हँडसेट दाखवून फॉरमेट केला असता दोष कायम राहिल्याचे नमूद केले आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या प्रतिवादाप्रमाणे ते मोबाईल हँडसेटचे उत्पादक नाहीत आणि मोबाईल विक्रीपश्चात सेवा देण्याकरिता स्वतंत्र यंत्रणा आहे. वास्तविक पाहता तक्रारकर्ता यांनी दोषाचे निराकरण होण्याकरिता मोबाईल हँडसेट ग्राहक सेवा केंद्राकडे दिलेला होता. परंतु तेथेही मोबाईल हँडसेटमधील दोषाचे निराकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांना लेखी स्वरुपात त्याबाबत कळवल्याचे निदर्शनास येते. अशा परिस्थितीत विरुध्द पक्ष क्र.1 यांना त्यांची जबाबदारी झटकता येणार नाही, असे आम्हाला वाटते. त्यानंतर मोबाईल हँडसेट उत्पादन करणा-या विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या जबाबदारीचा मुद्दा विचारार्थ येतो. निर्विवादपणे विरुध्द पक्ष क्र.2 हे वादकथित मोबाईल हँडसेट उत्पादन करणारी कंपनी आहे. ग्राहकाने मोबाईल हँडसेटची तक्रार केल्यानंतर त्याचे निराकरण करणे, ही त्यांची जबाबदारी आहे. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी अभिलेखावर लेखी उत्तर व पुराव्याची कागदपत्रे दाखल करुन तक्रारदार यांच्या तक्रारीचे खंडन केलेले नाही. त्यामुळे तक्रारीतील मजकूर व कागदपत्रे त्यांना मान्य आहे, असे अनुमान काढणे उचित वाटते. ज्यावेळी विरुध्द पक्ष क्र.2 हे मोबाईल हँडसेटचे उत्पादन करुन वितरकामार्फत विक्री करतात, त्यावेळी त्यांनी दिलेल्या वॉरंटी कालावधीत हँडसेटमध्ये दोष निर्माण झाल्यास त्याचे योग्य निराकरण होते काय ? किंवा कसे ? हे पाहण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. तक्रारदार यांचा मोबाईल हँडसेट वॉरंटीमध्ये का दुरुस्त करुन दिलेला नाही ? आणि त्यातील दोष कायम का राहिले ? याची उचित कारणे देण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. अशा परिस्थितीत वादकथित मोबाईल हँडसेट दुरुस्त करण्यासाठी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत, असे ग्राह्य धरावे लागते.
6. प्रस्तुत प्रकरणामध्ये वादकथित मोबाईल हँडसेट तपासणी करुन अहवाल देण्याकरिता सॅमसंग केअर सेंटर, उस्मानाबाद यांना आदेशित केले होते. त्यांच्या अहवालाप्रमाणे 5 तासाकरिता सीम नं. 9890980709 हँडसेटमध्ये बसवून मोबाईल हँडसेटचा वापर केला असता कोणतीही हँग होण्याबाबत अडचण आली नाही. ते विरुध्द पक्ष क्र.2 चे सेंटर आहे. विरुध्द पक्ष क्र.2 ने कोणताही बचाव मांडलेला नाही. आमच्या मते यदाकदाचित अहवालाप्रमाणे मोबाईल हँडसेटमध्ये हँग होण्याचा दोष आढळून आला नसला तरी अहवाल देणा-या व्यक्तीने हँडसेट वापर केवळ 5 तासाकरिता केलेला आहे आणि त्यांनी मोबाईल हँडसेटमध्ये तांत्रिक दोष असल्याबाबत कोणतीही पाहणी केली नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे सॅमसंग केअर सेंटरने दिलेला अहवाल ग्राह्य धरणे उचित ठरणार नाही, असे या जिल्हा मंचाचे मत झाले आहे.
7. उपरोक्त विवेचनावरुन तक्रारदार यांचा मोबाईल हँडसेट नादुरुस्त झालेला आहे आणि त्यामध्ये निर्माण झालेल्या दोषाचे निराकरण करण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी पूर्ण केलेली नाही, हे मान्य करावे लागते. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी मोबाईल हँडसेटच्या विक्रीपश्चात देय सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केल्याचे सिध्द होते. अंतिमत: तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडून नवीन मोबाईल हँडसेट किंवा त्याची किंमत रु.12,400/- परत मिळण्यास पात्र ठरतात. वरील विवेचनावरुन आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना नवीन ‘सॅमसंग कोअर 2 (गॅलक्सी) ब्लॅक’ मोबाईल हँडसेट द्यावा किंवा वादकथित मोबाईल हँडसेटकरिता स्वीकारलेली किंमत रु.12,400/- परत करावी.
3. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
4. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी उपरोक्त क्र.2 ची पूर्तता केल्यानंतर तक्रारकर्ता यांनी वादकथित मोबाईल हँडसेट विरुध्द पक्ष यांना परत करावा.
5. उपरोक्त आदेशांची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
6. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (सौ. व्ही.जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
(संविक/स्व/18716)