तक्रार दाखल दि.07/01/2013
तक्रार निकाली दि.29/09/2016
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. सदस्या–सौ. मनिषा एस.कुलकर्णी.
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ट्रक क्र.एम.एच.-09-ए.-9525 चेसीस क्र.364352578477 या वाहनाचे जाबदार यांनी विनाकारण ट्रकचे काम सुरळीत चालु न दिलेने तक्रारदारांचे झालेले आर्थिक नुकसान तसेच मागणीप्रमाणे कर्जखाते उतारा व संबंधीत कागदपत्रे नाकारलेमुळे झालेले मानसिक त्रासाबद्दल दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की–
तक्रारदार हे राशिवडे, ता.राधानगरी, लि.कोल्हापूर येथे राहत असून स्वत:चे उपजिवीकेसाठी ट्रकचा व्यवसाय करतात. टाटा या कंपनीचा रजिस्ट्रेशन क्र.एम.एच.-09-ए-9525, चेसीस क्र.364352578477, इंजिन क्र.692 डी 02585176 हा ट्रक तक्रारदारांचे मालकीचा असून एकमेव उपजिवीकेचे साधन आहे. जाबदार ही कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत कंपनी असून हेवी मोटार व्हेईकल खरेदीसाठी ग्राहकांना वित्तपुरवठा करत असून त्यांची एक शाखा कोल्हापूर येथे आहे. तक्रारदारांनी जाबदार यांचेकडून जुना ट्रक क्र.एम.एच.-09-ए.-9525 हा खरेदी करणेसाठी रक्कम रु.1,35,000/- एवढी रक्कम जाबदार व तक्रारदार यांचेत ठरलेप्रमाणे द.सा.द.शे.18 टक्के सरळ व्याजदराने तीन वर्षे म्हणजे 36 महिने मुदतीचे अटीवर ऑक्टोबर, 2010 मध्ये कर्जाऊ घेतली होती. तक्रारदारांनी दरमहा रक्कम रु.6,000/- कर्ज परतफेड हप्त्याप्रमाणे एकूण रक्कम रु.1,22,700/- ची रक्कम वेळोवेळी जाबदार कंपनीकडे कर्जखातेस जाबदार कंपनीचे कर्मचा-यांमार्फत मार्च-2012 अखेर परतफेड केलेली आहे. त्याप्रमाणे तक्रारदारांनी वि.प.चे कर्मचारी पांडुरंग जाधव यांचेमार्फत कर्जाचे हप्त्याच्या ब-याच रकमा भरलेल्या होत्या व आहेत. दि.07.02.2012 रोजी रक्कम रु.20,000/- व दि.30.03.2012 रोजी रक्कम रु.27,000/- तक्रारदारांनी जाबदार यांचेकडे भरलेले आहेत. मार्च-2012 पर्यंत 17 हप्त्यांच्या प्रत्येकी रक्कम रु.6,000/- प्रमाणे रक्कम रु.1,02,000/- जरी होत असले तरी प्रत्यक्षात रक्कम रु.1,22,,700 जाबदार यांचेकडे तक्रारदारांनी भरलेले आहेत. तक्रारदारांनी अगदी ठरले तारखेला वेळेत जरी हप्त्यांच्या रकमा भरल्या तरी एकाही कर्ज हप्त्यांची रक्कम मार्च-2012 पर्यंत थकलेली नव्हती व नाही व त्यानंतर देखील वर नमुदप्रमाणे ब-याच रकमा वेळोवेळी कर्जखातेस भरणेस पांडुरंग जाधव यांचेकडे दिलेल्या आहेत. जाबदार यांनी तक्रारदाराचे कर्जखात्यावर नियमबाहय व्याज आकारणी केली, चुकीच्या रकमा कर्जखातेवर खर्च टाकल्या, कर्जाचे हप्त्याच्या रकमा कर्जखातेस न भरता त्याचा अपहार केला, सुरवातीस व त्यानंतर तीन महिन्यापुर्वी कागदपत्रास येणारा खर्च देऊन लेखी अर्जाने मागणी करुनदेखील कर्जखाते उतारा व संबंधीत कागदपत्रे जाबदाराने तक्रारदारास नाकारली. त्यानंतर अवास्तव अशी रक्कम रु.1,65,000/- थकबाकीची मागणी केली. तसेच रक्कम न भरलेस ट्रक ओढून नेणार असलेची भाषा वापरली व धमक्या दिल्या. दि.14.12.2012 रोजीची नोटीस पोहचूनदेखील कागदपत्रे देणेचे टाळले व अलिकडे दि.19.12.2012 ला तक्रारदारांचा ट्रक ओढून नेणेचा प्रयत्न केला व त्यावेळी सदर तक्रारीस कारण घडले म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज मे.मंचात दाखल केला आहे. जाबदाराने विनाकारण तक्रारदाराचे ट्रकचे काम सुरळीत न चालू दिल्यामुळे तक्रारदारांचे झाले आर्थिक नुकसानीदाखल रक्कम रु.3,00,000/-, जाबदाराने तक्रारदारास द्यावेत तसेच नोटीस मागणीप्रमाणे कर्जखाते उतारा व संबंधीत कागदपत्रे नाकारलेमुळे झाले मानसिक त्रासाबद्दल रक्कम रु.25,000/-, तक्रार अर्जाचा खर्च, नोटीस खर्च व टायपिंग व कोर्ट खर्च रक्कम रु.5,000/- अशी एकूण रक्कम रु.3,30,000/- जाबदार यांनी तक्रारदारांना अदा करावी तसेच सदरहू तक्रारदारांचे मालकीचे वाहन जाबदार किंवा तर्फे एजंट, नोकर, चाकर अगर अन्य इसमांनी जप्त करु नये अगर ओढून नेऊ नये म्हणून जाबदार यांना कायम मनाई ताकीद व्हावी तसे तक्रारदारांनी मागणी केलेली कर्जासंबंधीची सर्व कागदपत्रे व कर्जखाते उतारा तक्रारदारास ताबडतोब जाबदार यांनी द्यावा अशी सदरहू मंचास विनंती केलेली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत पुढीलप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत. माल वाहतुक परवाना, गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र, आर.टी.ओ.कडील टेंम्सची पावती, गाडीची विमा पॉलीसीची पावती, तक्रारदाराने जाबदार यांना रजि.ए.डी.ने नोटीस पाठविलेबाबतची पावती, पोस्टाकडील पोचपावती, तक्रारदाराने जाबदारास पाठविलेली नोटीसीची प्रत, तक्रारदाराने जाबदार यांचेकडे रक्कम भरलेल्या पावत्यां-एकूण चार, विमा हप्ता भरलेली पावती, जाबदार यांनी तक्रारदरास पाठविलेली उत्तरी नोटीस तसेच तक्रारदाराचे दि.01.01.2016 चे पुराव्याचे शपथपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. जाबदार फायनान्स कंपनीस नोटीस आदेश होऊन जाबदार कंपनी मंचासमोर हजर होऊन जाबदार यांनी आपले म्हणणे दाखल केले. जाबदार यांचे कथनानुसार तक्रारदार यांनी दाखल केलेली कथने ही मंचाची दिशाभूल करणारी आहेत. तक्रारदाराने हेतुपुरस्सर सदरची कर्जरक्कम बुडविणेचे हेतुने सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. सदरची कथने जाबदार यांना मान्य नसून तक्रारदाराने तसा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराने दि.23.11.2010 रोजी रक्कम रु.1,35,000/- इतके कर्ज घेतले असून त्याकरीता फायनान्शीअल चार्जेस फ्लॅट रेटने रक्कम रु.74,618/- इतके होतात. सदरचे चार्जेस हे जर रितसर शेडयुल-II प्रमाणे भरल्यास लागू होते अन्यथा व्याज व दंड भरावा लागतो व तक्रारदाराचे कर्जाची थकबाकी आजरोजी रक्कम रु.1,32,395/- इतकी आहे. तक्रारदाराने शेडयुल-III प्रमाणे हप्ते न भरता व नाहक सुडबुध्दीने आरोप केलेले आहेत. जाबदार कंपनीनचे कर्मचारी श्री.पांडूरंग जाधव यांच्यावरही सुडबुध्दीने आरोप केलेले आहेत. मात्र जाबदार यांनी तरीदेखील खातेउतारा न दिलेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. तक्रारदारास उत्तरी नोटीसी दाखल व त्यासोबत खातेउतारा जोडलेला आहे. तरीदेखील नाहक आरोप तक्रारदार करीत आहेत. तक्रार अर्जाचे कलम-3, 4, 5, 6 व 7 यामधील मजकूर जाबदार यांना मान्य नसून जाबदार यांना आपले म्हणणेसोबत हायपोथीकेशन करार हजर केला आहे व तक्रारदार हे थकीत कर्जदार आहेत ही बाब मंचासमोर येते. जाबदार यांनी हजर केलेला करार पाहता या मंचास अधिकारक्षेत्र नाही. सबब, जाबदार यांनी सेवा देणेस कुठेही त्रुटी केलेली नाही. सबब, सदरची तक्रार फेटाळणेत यावी. लवाद कायदा, 1996 अन्वये तक्रार चालविणेस बाधा येते. सदरचे तक्रारीस कोणताही पुरावा नसलेने तक्रारदारांना दंड म्हणून रक्कम रु.10,000/- करणेत यावा व थकीत कर्जदार असतानाही नाहक अर्ज दाखल केलेने रक्कम रु.5,000/- दंड करणेत यावा असे जाबदार यांचे कथन आहे.
5. जाबदार यांनी म्हणणेसोबत अॅग्रीमेंट ऑफ लोन-कम-हायपोथिकेशन, एक्सटॅक्ट फॉर सेड लोन ट्रान्सलेशन इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6. तक्रारदारांची तक्रार, दाखल पुरावे व लेखी युक्तीवाद तसेच जाबदार यांचे लेखी म्हणणे व पुरावा यावरुन मंचासमोर खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | जाबदार यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे का ? | नाही |
3 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवरण:-
7. मुद्दे क्र.1 ते 3 :- तक्रारदाराने जाबदार यांचेकडे टाटा या कंपनीचा रजिस्ट्रेशन क्र.एम.एच.-09-ए-9525 हा ट्रक खरेदी केला. यामध्ये उभय पक्षांमध्ये वाद नाही. सबब, तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम-2(1)(डी) खाली ग्राहक होतो. वर नमुद अर्जाप्रमाणे जाबदार यांचेवर आरोपी केलेले आहेत. तक्रारदारांचे कथनानुसार जाबदार कंपनीचे कर्मचारी पांडूरंग जाधव यांचेकडे कर्जाच्या हप्त्याच्या रकमा जमा करीत होतो. मात्र त्यांनी काहीवेळा पावतीच दिली नाही व रकमा स्विकारल्या. सबब त्यांनी अपहार केला असे कथन तक्रारदारांनी केलेले आहे. तथापि तक्रारदारांनी दिलेले कर्जाचे हप्ते अगर काही रकमा भरलेला कोणताही पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच तक्रारदारांची मागणी पाहता, त्यांनी तक्रारदारांचे ट्रकचे काम जाबदार यांनी सुरळीत चालू न दिलेने तक्रारदारांचे झालेले आर्थिक नुकसान रक्कम रु.3,00,000/- तसेच जाबदार यांनी मागणीप्रमाणे कर्जखाते उतारा व संबंधीत कागदपत्रे नाकारलेने झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रक्कम रु.25,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- मागितलेला आहे. तथापि वर नमुद तक्रारदारांचे मागणीचा विचार करता, तक्रारदारांनी कर्जखाते उतारा अथवा संबंधीत कागदपत्रे यांची कोठेही मागणी केलेली नसून तक्रारदार हा फक्त त्याबद्दल झालेल्या मानसिक त्रासाबद्दल भरपाई मागत आहे. मात्र सदरचा खातेउतारा अगर संबंधीत कागदपत्रे मिळाली अथवा नाही याबद्दल काहीही कथन तक्रारदाराने तक्रार अर्जात केलेले नाही. सबब, कागदपत्रे मिळाली अथवा नाही ही बाबच तक्रारदाराने या मंचापासून लपवून ठेवलेली आहे. तसेच जाबदार यांनी तक्रारदारांचे काम सुरळीत चालू न दिलेने नुकसानभरपाईची रक्कम रु.3,00,000/- मागितलेली आहे. मात्र खरोखरच तक्रारदाराने सदरचे वाहन ओढून नेले अथवा नाही याचाही खुलासा तक्रार अर्जात केलेला नाही. वाहन जर ओढून नेले नसेल तर तक्रारदारास जाबदार यांनी त्रास देणेचा प्रश्नच उदभवत नाही. मात्र तक्रारदाराने या मंचासमोर सदरची कोणतीही बाब पुराव्याने शाबीत केली नसलेने जाबदार यांनी काही त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येऊ शकत नाही. सबब, जाबदार यांनी तक्रारदारांना सेवा देणेमध्ये काहीही त्रुटी केलेली नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे व जाबदार यांनी संबंधीत खाते उताराही दाखल केलेला आहे. सबब, या कारणास्तव हे मंच सदरचा तक्रार अर्ज नामंजूर करीत आहे. त्यामुळे तक्रारदाराने मागितलेल्या मागण्या मिळणेचा प्रश्नच उदभवत नाही. सबब, हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
[1] तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो.
[2] खर्चाबाबत आदेश नाहीत.
[3] सदर निकालपत्राच्या प्रती उभय पक्षकारांना द्याव्यात.