ग्राहक तक्रार क्र. 183/2014
अर्ज दाखल तारीख : 23/09/2014
निकाल तारीख : 08/03/2016
कालावधी: 01 वर्षे 05 महिने 15 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. अनिल पि. बापुराव करंजकर,
वय - 37 वर्षे, धंदा – व्यापार,
रा.दत्त नगर, कळंब, ता. कळंब, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. व्यवस्थापक,
श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
E-8, EPIP, RIICO सितापुरा, जयपुर(राजस्थान)
2. व्यवस्थापक,
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि.,
भानु नगर, येडशी रोड, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधिज्ञ : श्री. पी.आर. बारसकर.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधिज्ञ : श्री. पी.व्हि.सराफ.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधिज्ञ : श्री. आर.एस.जगदाळे.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
आपल्या पेट्रोल टँकरसाठी विरुध्द पक्षकार (विप क्र.2) कडून कर्ज घेतले व विप क्र.1 कडे त्यांचा विमा उतरविला मात्र टँकर जळून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास विप क्र.1 ने नकार दिल्यामुळे तक्रारकर्ता (तक) यांने ही तक्रार दिेलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
1. तक हा कळंब चा रहिवासी असून आपले उपजिवीकेकरिता विप क्र.2 कडून वित्त सहाय घेऊन त्यांने टँकर नंबर एम एच 12 डीटी 4109 खरेदी केला. टँकर चा विमा विप क्र.1 कडे दि.25.12.2013 ते 24.12.2014 या कालावधीकरिता उतरविला. टँकरला होणारे अपघात अगर नुकसान यांची भरपाई करण्याचे विप क्र.1 ने कबूल केले होते. तक टॅकंर द्वारे मुंबई हून कळंब कडे पेट्रोलची वाहतूक करीत होते.
2. दि.22.02.2014 रोजी मुंबईहून टँकर मध्ये पेट्रोल कळंब येथे आणले. पेट्रोलपंपावर टँकर रिकामा केला. टँकर पेट्रोल पंपासमोर उभार होता अचानक टॅकंरचा स्फोट झाला. टॅकर टाकी व केबीनचे मिळून रु.3,00,000/- चे नुकसान झाले. विप क्र.1 व 2 यांचेशी संपर्क साधून त्यांना घटनेची कल्पना दिली. त्यांनी सर्व्हेअर टॅकरचे पाहणीकरिता येईल असे सांगितले.
3. विप यांचे सूचनेप्रमाणे टँकर पुणे येथील भारत वेल्डींग वकर्स येथे दुरुस्तीकरिता नेला. सर्व्हेअर ने तेथे टँकरची पाहणी करुन पंचनामा केला व दुरुस्ती करुन घेण्यास सांगितले. तक ने दुरुस्ती करुन घेतली. नवीन टँक बसवला. एकूण खर्च रु.2,93,125/- आला. कागदपत्रासह विप क्र.1 कडे नुकसान भरपाईची मागणी केली.
4. विप क्र.1 ने दि.12.08.2014 चे पत्र देऊन नुकसान भरपाई नाकारली. पॉलिसी मेटल बॉडी ट्रकची उतरवली असे कारण दिलेले आहे. वास्तविक आर सी बुकावर टॅकंर असल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. विप क्र.1 यांनी चुकीचे कारण देऊन तक ची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे दुरुस्तीपोटी झालेला खर्च रु.3,00,000/- मानसिक शारीरिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- व्याजासह मिळावे म्हणून तक ने ही तक्रार दि.23.09.2014 रोजी दाखल केलेली आहे.
5. तक ने तक्रारीसोबत आर सी बूक, विमा पॉलिसी, भारत वेल्डींग वकर्स चे बिल, दि.01.08.14 चा विप कडे दिलेला अर्ज, दि.12.08.14 चे विप चे पत्र, टँकरचे फोटो इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
6. विप क्र.1 यांना नोटीस मिळूनही दिल्या तारखेस हजर झाले नाही त्यांचे विरुध्द दि.18.10.14 रोजी एकतर्फा आदेश झालेला आहे. त्यानंतर दि.23.03.15 रोजी विप क्र.1 ने एकतर्फा आदेश रद्द करण्याचा अर्ज दिला. तो ही नामंजूर झालेला आहे.
7. विप क्र.2 ने दि.14.01.15 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक ने विप क्र.2 कडून वित्त सहाय घेतले हे मान्य आहे. सदर विप ने नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले हे मान्य नाही. तक ने नुकसानीबद्दल या विप ला कळविले नाही. या विप ने तक ला सर्व्हेअर येईल असे सांगितले नव्हते. या विप च्या सूचनेप्रमाणे टँकर दूरुस्तीस नेला हे कबूल नाही. नुकसान भरपाईशी या विप चा काहीही संबंध नाही. या विप विरुध्द तक्रार रदद व्हावी कॉमपेन्सटरी कॉस्ट रु.5000/- मिळावेत असे म्हटलेले आहे.
8. तक ची तक्रार, त्यांने दाखल केलेली कागदपत्रे, तसेच विप चे म्हणणे, यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणासाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तरे
1. विप ने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? होय
2. तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2 ः-
9. आर सी बूकाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, वाहन 2006 साली उत्पादन झालेले होते. रजिस्ट्रेशन दि.16.01.2007 रोजी झालेले आहे. हेवी गुडस व्हेईकल या वाहन प्रकाराला आळे केलेले असून पेनने टँकर बॉडी असे लिहीलेले आहे. त्याठिकाणी आर टी ओ चा सही व शिक्का आहे. वजनाचे कॉलममध्ये सुध्दा दुरुस्ती करुन वजन लिहील त्याठिकाणी आर टी ओ चा सही व शिक्का आहे. टॅाकर विप क्र.2 कडे हायथिपोकेटेड केल्याबददल नोंद घेण्यात आलेली आहे. विप क्र.2 कडून वित्त् सहाय घेऊन तक ने टँकर घेतले याबद्दल वाद नाही.
10. सर्वसाधारणपणे ज्या वित्त कंपनीकडून वित्त सहायक घेतले ती वित्त कंपनी वाहनाचा विमा उतरत असते व प्रिमियमची रक्कम मालकाचे नांवे खात्यामध्ये टाकते. यांचे कारण म्हणजे वाहनाचे नुकसान झाल्यास वित्त कंपनीला विम्याची रक्कम मिळून तोटा भरुन काढता येतो. प्रस्तूत प्रकरणी वित्त कंपनी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स येडशी ही आहे. विमा काढलेली कंपनी श्रीराम जनरल इन्शूरन्स जयपूर राजस्थान अशी आहे. प्रस्तूत प्रकरणी वित्त संस्थेने वाहनाचा विमा उतरवीला अशी तक ची केस नाही. शिवाय वाहन 2007 साली घेतले होते वाहनाचा अपघात दि.22.02.2014 साली झाला. वित्त सहाय घेतले त्यावेळेस वित्त संस्था विमा उतरवण्याबद्दल जाग्रुकता दाखवतात जसा जसा काळ जातो तसा तसा विमा उतरणे बददल वित्त संस्था जाग्रुकता दाखवत नाहीत अशा वेळेस विमा उतरवणे हे वाहन मालकाचे कर्तव्य ठरते. सर्वसाधारणपणे वित्त संस्था यांच्याच विमा कंपन्या वाहनाचा विमा उतरवितात. प्रस्तूत प्रकरणी सुध्दा विप क्र.1 विमा कंपनी ही विप क्र.2 वित्त संस्थेशी निगडीत कंपनी दिसून येते. मात्र तक ने त्याबाबत स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. तक ने स्वतःच विप क्र.2 कडे विमा उतरल्याचे म्हटले आहे.
11. इथे हे पण लक्षात घेतले पाहिजे की विप क्र.1 विमा कंपनी ही जयपूर राजस्थानची आहे. तक ने जयपूरला जाऊन वाहनाचा विमा उतरवला असेल अशी शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे विप क्र.2 मार्फत विप क्र.1 कडून वाहनाचा विमा उतरलेला असू शकतो. त्याचप्रमाणे वाहन हे कळंब येथे राहणार असून तेथूनच व्यवसाय करणार होते. यासर्व व्यवसायाची जोखीम विप क्र.1 ने घेतलेली होती. वाहनाला कळंब येथे अपघात झाला तसेच विप क्र.1 चे पत्र तक ला कळंब येथे मिळाले. त्यामुळे तक्रारीस कारण या मंचाचे कार्यक्षेत्रात घडले हे तक चे म्हणणे मान्य करता येईल.
12. विमा पॉलिसीचे अवलोकन केले असता वाहनाची किंमत रु.5,35,906/- दाख्वलेली आहे. टाईप बॉडी मध्ये ओपन वूडन बॉडी असे नमूद करण्यात आलेले आहे. विप क्र.1 ने आपल्या दि.12.08.2014 च्या पत्रामध्ये म्हटले आहे की, पॉलिसी ही ओपन मेटल बॉडी ट्रक म्हणून घेतली होती वाहनावर टँकर बसवून पॉलिसी मधील अटीचा भंग झाला तसेच गुडफेथ या तत्वाचा पण भंग झाला. याकारणामुळे विप चा विमा नाकारण्यात आलेला आहे. पुन्हा हे लक्षात घेतले पाहिजे की, विप क्र.1 विरुध्द ही तक्रार एकतर्फा चाललेली आहे. म्हणजेच विप चे म्हणणे याकामी विचारात घेण्यात आलेले नाही.
13. हे खरे आहे की, कराराचा शब्दशः अर्थ काढला पाहिजे. विमा पॉलिसी मध्ये ओपन मेटल बॉडी असा वाहनाचा प्रकार नमूद केलेला आहे. टँकरचे फोटो पाहिले असता जळून गेलेली टाकी बाजूला काढून ठेवल्याचे दिसते. नवीन टाकी बसवून घेतल्याचे दिसते. लाकडी बॉडी असल्याच्या काहीही खाणाखुणा दिसत नाहीत. याउलट विप चे पत्राप्रमाणे मेटल बॉडी म्हणजे धातूची बॉडी असली पाहिजे त्यांचा कूठल्याही कागदपत्राशी मेळ लागत नाही.
14. वर नमूद केल्याप्रमाणे आर सी बूकामध्ये हेवी गूउस व्हेईकल या शब्दाला आळे करुन पेनने टँकर बाडी असे नेांदवण्यात आलेले असून ते थे आरटीओ चा सही व शिक्का आहे. डिस्क्रीप्शन या कॉलम मध्ये ट्रक ओपन बॉडी असे लिहीलेले आहे. काहीही असले तरी वाहनाचे टँकर म्हणून रजिस्ट्रेशन झाल्याचे स्पष्ट होत आहे. फोटोचे अवलोकन केले असता टँक बसवून घेतल्याचे दिसून येत आहे. हे खरे आहे की, विमा पॉलिसी मध्ये ओपन वूडन बॉडी अशी नोंद दि.25.12.2013 रोजी करण्यात आली. बहूधा पूर्वीच्या पॉलिसीवर ओपन बॉडी ट्रक अशी नोंद असणार मात्र वूडन बॉडी ही नोंद कशी आली हे समजून येत नाही. सर्वसाधारणपणे विमा कंपन्या कार्यालयात बसून वाहनाचे निरिक्षण न करता वाहनाची नोंद पॉलिसी मध्ये करतात. त्यामुळे त्यामध्ये चूक होण्याची बरीच शक्यता असते.
15. वास्तविक विप क्र.1 यांनी पॉलिसी देताना आर सी बूकाचे अवलोकन करायला पाहिजे हेाते किंवा वाहनाचे निरीक्षण करायला पाहिजे होते. आर सी बूकावर वरील नेांदी प्रमाणे टँकर बॉडी म्हणून नोंद दि.07.11.2012 रोजी झाल्याचे दिसते. व त्याबददल फी भरल्याची नोंद आहे. त्यानंतर एक वर्षाचे कालावधीनंतर आताची पॉलिसी विप क्र.1 ने दिलेली आहे. वर म्हटल्याप्रमाणे आर सी बूक न पाहता तसेच वाहनाचे निरीक्षण न करता विप क्र.1 ने पॉलिसी मध्ये चूकीची माहीती दिलेली आहे असे दिसून येत आहे.
16. हे खरे आहे की, विप क्र.1 ने फसवणूक केली हे सिध्द करण्याची जबाबदारी तक वर येते. तक ने त्याबददल पुरेसा पुरावा दिलेला नाही. मात्र विप ने दावा नाकारताना मेटल बॉडी ट्रकची पॉलिसी होती म्हणून विमा न दिल्याचे म्हटले आहे. हे म्हणणे पॉलिसीशी विसंगत आहे. काहीही झाले तरी विप क्र.1 ने वाहनाचा विमा उतरविला होता हे उघड आहे.
17. विप क्र.1 ने विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केली असे आमचे मत आहे. प्रश्न असा उदभवतो की, तक किती अनुतोषास पात्र आहे. जे बिल तक ने हजर केले आहे. त्याप्रमाणे केबीन दुरुस्तीसाठी रु.40000/- खर्च आला नवीन टँक साठी रु.2,25,000/- खर्च आला जुना टँक का दुरुस्त होऊ शकला नाही यांचा काहीही खुलासा देण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे जुना टँक विकून किती पैसे मिळाले याबददलही तक ने खुलासा केलेला नाही. तसेच विप चे म्हणण्याप्रमाणे ती मेटालिक बॉडी असती किंवा वूडन बॉडी असती तरीही तिची काही किंमत असती. अशी किंमत रु.80,000/- धरता येईल असे आमचे मत आहे. त्यामुळे तक एकूण रु.1,20,000/- भरपाई मिळण्यास पात्र आहे असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो
आदेश
तक ची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते.
1. विप क्रं.1 ने यांने तक ला विम्याची भरपाई रु.1,20,000/- (रुपये एक लक्ष वीस हजार फक्त) 30 दिवसांचे आंत द्यावी, न दिल्यास तक्रार दाखल तारखेपासून रक्कम फिटेपर्यत त्यावर द. सा. द. शे. 9 दराने व्याज द्यावे.
2. विप क्र.1 ने तक ला या तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.
3. वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
4. उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (श्रीमती विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
1) मा. अध्यक्ष व मा. सदस्य यांनी दिलेल्या निर्णयाशी मी अंशत: सहमती दर्शवत असून न्यायनिर्णयाचे विवेचन, निष्कर्ष याबाबतीत कसलेही दुमत नाही. तथापि नुकसान भरपाई ठरवताना विचारात घेतलेल्या रकमांचे विवेचन व रकमा या तांत्रिक अंगाने व गणीच्या (हिशोबाच्या) दृष्टीने मी सहमत नाही.
2) त्याचे माझ्या मताप्रमाणे विष्लेषण व केलेली रक्कम निश्चिती वेगळया स्वरुपात असुन ती खालीलप्रमाणे.
3) तक्रारदाराने या न्यायमंचात त्याने स्पोटानंतर (टँकरमधील) नवीन टँकर बनवून घेतला आहे. त्या टँकरचे बिल (Vat सह) या न्यायमंचात दाखल केलेले आहे. या न्यायमंचात बिल दाखल झाल्यानंतर ते या न्यायमंचातील मा. अध्यक्ष व मा. सदस्य यांनी त्यातील Vat वगळून केबीन खर्च अधिक टँकर चे बिल असे रु.2,65,000/- हे मान्य केले आहे. जुन्या टँकरची किंमत ही स्क्रॅप भावाने ही रु.80,000/- होऊ शकते हे ही संपूर्णत: मान्य आहे व हे salvage सध्यातीरी तक च्या कस्टडीत आहे किंवा त्याने ते विकून ही रक्कम मिळवली असणर हे गृहीत धरण्यास काही हरकत नाही. तक ने ही जुने टँकर विप ला दिल्याचे कुठेही म्हंटलेले नाही. त्यामुळे रु.2,65,000/- मधून रु.80,000/- ही रक्कम वजा जाता तक ला रु.1,85,000/- मिळणे अपेक्षीत व व्यवहार्य व कायदेशीर असताना ती रक्कम रु.1,20,000/- एवढी दाखवण्यात आली आहे. सबब न्यायनिर्णयातील ही रक्कम म्हणजे रु.1,20,000/- या बाबतीत मी असहमती दर्शवून ती रु.1,85,000/- इतकी द्यावी या स्वतंत्र मतासह मी हा वेगळा निर्णय देत आहे.
आदेश
तक्रादाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
1) विप क्र.1 यांनी तक ला विम्याची भरपाई रु.1,85,000/- (रुपये एक लक्ष पंच्यांशी हजार फक्त) तीस दिवसात द्यावी न दिल्यास तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष अदा होईपर्यंत निकाल तारखेपासून 9 टक्के दराने व्याज अदा करावी.
2) विप क्र.1 व 2 यांनी रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) तक्रारीच्या खर्चापोटी व मानसिक त्रासापोटी तक यास द्यावे.
3) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकुंद.बी.सस्ते)
सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद