न्यायनिर्णय
द्वारा – मा. सौ सविता प्रकाश भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केलेला आहे.
2. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार हे मेन रोड, कागल, ता.कागल, जि.कोल्हापूर येथील रहिवाशी असून तक्रारदार याचा अपूर्व भांडयाचे दुकान आहे. भांडी व्यापार हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. भांडयाचे दुकान हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. तक्रारदार यांचे पती यांचे वय 70 असून त्यांना मधुमेह व हायपर टेन्शनचा आजार आहे. तक्रारदार यांचे व्यापा-यावर तक्रारदारांचे कुटूंब अवलंबून आहे. राजे दिलीपसिंह जयसिंगराव घाटगे ग्रामीण सह.पतसंस्था मर्या., पिंपळगाव खुर्द संस्था महाराष्ट्र सहकारी कायद्याप्रमाणे नोंदणीकृत संस्था असून रजि.नं. केपीआर/केजीएल/आरएसआर/सी.आर- 28.12.2002-2003 असा आहे. ही संस्था ठेवीदारांचे ठेवी स्विकारत आहे. वि.प.क्र.1 हे संस्थेचे मॅनेजर असून वि.प.क्र.2 या संस्थेचे विद्ममान चेअरमन आहेत. तक्रारदार यांचा मुख्य भांडी व्यापार हा व्यवसाय असून तक्रारदार यांनी भांडयाच्या व्यापारातून बचत करुन त्यांच्या स्वत:च्या व पतीच्या वृध्दापकाळातील देखभालीकरीता, औषधोपचाराकरीता वि.प.संस्थेकडे तक्रारदार यांनी स्वत:चे नावे, वि.प.संस्थेकडे दैनिक भिशीचे खाते सुरु केले होते. सदरचा खाते क्र.35 असा असून सदर खाते दि.13.04.2016 रोजी वि.प. संस्थेचे मॅनेजर यांचेकडे उघडले आहे व दि.13.04.2016 पासून प्रतिदिन रक्कम रु.500/- प्रमाणे दि.13.04.2017 पर्यंत जमा केलेली आहे. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे 1 वर्षामध्ये दैनिक भिशी स्वरुपात एकूण रक्कम रु.85,000/- जमा केलेली आहे. दैनिक भिशीचे पासबुक वि.प.यांनी तक्रारदार यांना दिलेले आहे. त्याच्यावर तक्रारदार यांच्या सहया आहेत. वि.प.यांनी सदर पासबुकावर द.सा.द.शे.7टक्के दराने व्याज देणेच मान्य व कबुल केलेले आहे. वर नमुद केलेली रक्कम तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 कडे ठेवलेली असून त्याची मुदत संपलेली आहे.सदरची रक्कम तक्रारदार व त्यांचे पतीच्या औषधापाण्याकरीता व्याजासह परत मिळणे आवश्यक आहे. तथापि तक्रारदार यांनी वि.प.यांचेकडे मागणी केली असता, आज देतो उद्या देतो असे खोटे वायदे सांगून सदरची रक्कम देणेस टाळाटाळ करीत आहेत. तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक असून त्यांना संस्थेकडे विनाकारण हेलपाटे मारुन त्यांची वि.प. घोर फसवणूक करीत आहेत व तक्रारदार यांना जाणूनबुजून मानसिक व शारिरीक त्रास देत आहेत. तक्रारदार यांनी वर नमुद केलेली दैनिक भिशीची एकूण रक्कम रु.85,000/-, दि.13.04.2016 पासून दि.13.04.2017 पर्यंतचे द.सा.द.शे.7टक्के प्रमाणे होणारी एकूण व्याजाची रक्कम रु.6,942/- आहे तेव्हा मुद्दल व त्यावरील व्याज मिळून होणारी एकूण रक्कम रु.91,942/- इतकी वि.प.यांचेकडून तक्रारदार यांना येणे आहे. तक्रारदार यांनी वि.प.कडे सदर रक्कमेची मागणी केली असता, वि.प. ठेवीची देय रक्कम मुदतीनंतर देत नाहीत. तक्रारदार यांनी दि.12.06.2017 रोजी रजि.पोस्टाने वि.प.यांना नोटीस पाठवून सदर रक्कमेची मागणी केली. परंतु सदरची नोटीस वि.प. यांना लागून होऊनसुध्दा वि.प.यांनी तक्रारदार यांना त्यांची रक्कम दिली नाही अथवा नोटीसीस उत्तर दिलेले नाही. तक्रारदार यांचा उदरनिर्वाह भांडी दुकानावर अवलंबून असलेने त्यांना सदर रक्कमेची अत्यंत आवश्यकता आहे, असे असताना देखील वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली, कसुर केली आहे. म्हणून तक्रारदार यांनी सदरची तक्रार या मंचात दाखल करुन पुढीलप्रमाणे मागण्यां केलेल्या आहेत. तक्रारदार यांचा अर्ज खर्चासह मंजूर करणेत यावा. तक्रारदार यांनी वर नमुद केलेप्रमाणे रक्कम रु.91,942/- वि.प.यांचेकडून व्याजासह वसुल होऊन मिळावी. ठेवीची संपुर्ण रक्कम वसुल होऊन तक्रारदार यांना मिळेपर्यंत द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे व्याज तक्रारदार यांना मिळावे. ठेवीची संपूर्ण रक्कम वसुल होऊन तक्रारदार यांना मिळेपर्यंत द.सा.द.शे.12 टक्केप्रमाणे व्याज तक्रारदार यांना मिळावे. तसेच तक्रारदार हया ज्येष्ठ नागरीक असून त्यांनी दिलेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- वि.प.कडून वसुल होऊन मिळावी तसेच या दावेचाचा कोर्ट खर्च व वकील फी खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून तक्रारदार यांना मिळावेत अशी विनंती सदरहू मंचास केलेली आहे.
3. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत पुढीलप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत. वि.प.क्र.1 व 2 यांना वकीलांमार्फत पाठविलेल्या नोटीसीची प्रत, तक्रारदार यांचे वि.प.संस्थेचे भिशीठेव पासबुक, वि.प.संस्थेचे मॅनेजर यांना पाठविलेल्या आर.पी.डी.ने नोटीसीची पोहच पावती, वि.प.संस्थेचे चेअरमन यांना पाठविलेल्या आर.पी.डी.नोटीशीची पोहच पावती, तसेच वि.प. यांना पाठविलेल्या नोटीसीचा परत आलेला लखोटा, तसेच तक्रारदार यांचे वि.प.क्र.1 यांचे नोटीसीवरील पत्ता बरोबर असलेचे शपथपत्र, तक्रारदारचे पुरावा शपथपत्र, पुरावा संपलेची पुरशिस, इत्यादी कागदपत्रे या कामी दाखल केलेली आहेत.
4. वि.प.क्र.1 यांना नोटीस लागू होऊन देखील मंचात गैरहजर आहेत. सबब, वि.प.यांचेविरुध्द दि.27.12.2018 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला.
5. वि.प.क्र.2 यांनी हजर होऊन तक्रारदारांचे तक्रार अर्जास म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविलेले आहेत. तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदार यांचे अर्जातील संपूर्ण मजकूर खोटा, चुकीचा व वस्तुस्थितीस धरुन नसलेमुळे वि.प. यांना सदर मजकूर मान्य व कबूल नाही. सदर मजकूराचा वि.प. हे स्पष्ट शब्दांत इन्कार करतात. वि.प. यांनी तक्रारदार यांना कधीही दैनंदिन भिशी सुरु करणेबाबत सांगितलेले नव्हते. तसेच दैनंदिन भिशी पासबुकवरती वि.प.क्र.2 यांनी कधीही चेअरमन म्हणून सहयां केलेल्या नाहीत. वि.प.यांनी तक्रारदार यांचेकडून कधीही दैनिक भिशी म्हणून रक्कम रु.85,000/- स्विकारलेली नाही. वि.प.क्र.2 यांना पाठविलेल्या नोटीसीची बाब माहित नाही. तसेच तक्रारदार म्हणतात अशी तथाकथित नोटीस ही वि.प.यांना मिळालेली नाही कारण वि.प.हे दरम्यानचे काळामध्ये बाहेर गावी होते. तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक नाहीत. त्यामुळे सदरची केस मे.न्यायालयात चालणेस पात्र नाही. सदर मजकूराचा वि.प. हे स्पष्ट शब्दांत इन्कार करतात. तक्रारदार हे वि.प.यांचे ग्राहक नाहीत त्यामुळे सदरची केस मे.न्यायालयामध्ये चालणेस पात्र नाही, तसेच सदर तक्रार अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही.
6. तसेच वि.प.यांनी सदर कथनास बाधा न येता वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे. वि.प.क्र.2 हे सदर संस्थेचे विद्यमान चेअरमन नाहीत. मा.सहा.निबंधक सह.संस्था कागल यांनी दि.04.12.2015 रोजी सदरची संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम-102-1-क-2 व 103-1 अन्वये अवसायनात काढून सदर संस्थेवरती अवसायक म्हणून श्री.पी.डी.जाधव यांची नियुक्ती करणेबाबतचा अंतिम आदेश पारीत केलेला आहे. त्यामुळे सदरची संस्था ही दि.04.12.2015 पासून अवसायक यांचे ताबेत असून सदर संस्थेचा दैनंदिन कारभार हा अवसायक पाहत आहेत. सदरची संस्था अवसानात निघालेचे आदेश राजपत्रकात प्रसिध्द करुन सदरच्या प्रती या सह.संस्था कागल यांचे कार्यालयाने मा.व्यवस्थापक, येरवडा कारागृह मुद्रणालय, पुणे-6 यांना कळविलेले होते. त्यानुसार सदरची बाब ही राजपत्रात प्रसिध्द केलेमुळे तक्रारदार यांना माहित असूनही वि.प.हे दैनंदिन कारभार पाहत आहेत व वि.प. हे सदर संस्थेचे चेअरमन आहेत ही बाब पूर्णत: चुकीची आहे. वि.प.क्र.2 यांनी सदरची संस्था अवसायनात निघालेमुळे कधीही दैनंदिन भिशी अथवा ठेवी ठेवणेबाबत कोणासही आव्हान केलेले नव्हते तसेच तक्रारदार यांनी आपण दैनंदिन भिशी सदर संस्थेकडे ठेवत असलेबाबत हजर केलेल्या पासबुकवरती चेअरमन म्हणून कधीही सही केलेली नाही, त्यामुळे तक्रारदार हे सदर संस्थेचे ग्राहक होत नसून ग्राहकाप्रती असणा-या कोणत्याही कर्तव्याबाबत जबाबदारी वि.प.यांची येत नाही. तक्रारदार यांनी सदर संस्थेवरती अवसायक असताना दि.13.04.2016 ते दि.13.04.2017 पर्यंत व्यवहार केलेचा दिसतो. सदर संस्था ही दि.04.12.2015 रोजी अवसायनात निघाल्यामुळे झालेल्या व्यवहाराबाबत वि.प.हे जबाबदार नाहीत. त्यामुळे तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक होत नाहीत. वि.प.क्र.2 यांना कधीही भिशी ठेव रक्कम परत मागणीसाठी नोटीस पाठविलेली नाही व तशी नोटीसही वि.प.क्र.2 यांना प्राप्त झालेली नाही. तक्रारदार यांनी वि.प.यांना पाठविलेल्या तथाकथित नोटीसीच्या लखोटयावरती सदर र.प.मालक नोकरीसाठी परगावी राहतात पुढील पत्ता मिळत नाही मुळ मालकांस परत अशा शे-यानिशी परत गेलेली आहे. सदर दिवशी सदरची पतसंस्था ही अस्तित्वात नव्हती ही बाब तक्रारदार यांना रजि.ए.डी.च्या पर मिळालेल्या लखोटयावरुन माहीत असतानाही तक्रारदार यांनी वि.प.यांचे विरुध्द खोटी तक्रार दाखल केलेली आहे. म्हणून तक्रारदार हे वि.प. संस्थेचे ग्राहक होत नाहीत तसेच तक्रारदार हे सदर पतसंस्थेचे ग्राहक आहेत हे शाबीत करीत नसलेमुळे सदरचा अर्ज मे.न्यायलयामध्ये चालणेस पात्र नाही, त्यामुळे सदरचा अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती सदरहू मंचास वि.प.क्र.2 यांनी केलेली आहे.
7. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्र तसेच वि.प.क्र.2 यांचे म्हणणे, शपथपत्र, इत्यादींचे अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.क्र.1 व 2 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून पासबुकच्या ठेवीची व्याजासह रक्कम व नुकसानभरपाईची मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
विवेचन:–
8. मुद्दा क्र.1 ते 4:- वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत, कारण तक्रारदार हे मुख्य भांडी व्यापार व्यवसाय करत असून तक्रारदार यांनी भांडयाच्या व्यापारातून बचत करुन त्यांच्या स्वत:च्या व पतीच्या वृध्दापकाळातील देखभालीकरीता, औषधोपचाराकरीता वि.प.संस्थेकडे तक्रारदार यांनी स्वत:चे नावे, वि.प.संस्थेकडे दैनिक भिशीचे खाते सुरु केले होते. सदरचा खाते क्र.35 असा असून सदर खाते दि.13.04.2016 रोजी वि.प. संस्थेचे मॅनेजर यांचेकडे उघडले आहे व दि.13.04.2016 पासून प्रतिदिन रक्कम रु.500/- प्रमाणे दि.13.04.2017 पर्यंत जमा केलेली आहे. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे 1 वर्षामध्ये दैनिक भिशी स्वरुपात एकूण रक्कम रु.85,000/- जमा केलेली आहे. तक्रारदार यांना दैनिक भिशीचे पासबुक वि.प.यांनी तक्रारदार यांना दिलेले आहे. सदर पासबुकावर तक्रारदार यांच्या सहया आहेत. वि.प.यांनी सदर पासबुकावर द.सा.द.शे.7टक्के दराने व्याज देणेचे मान्य व कबुल केलेले आहे. तक्रारदार यांनी वि.प. संस्थेत वर नमुद भिशी ठेव पासबुकात नमुद केलेली रक्कम वि.प. यांचेकडे ठेवली होती हे तक्रारदाराने दाखल केलेल्या मुळ भिशी ठेव पासबुकावरुन स्पष्ट होते तसेच वि.प.क्र.1 यांनी प्रस्तुत तक्रारदाराची सदरची ठेवी ठेवल्याबाबत तक्रार अर्जात केलेले कथन मंचात हजर राहून खोडून काढलेले नाही. त्यामुळे वि.प.क्र.1 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश मंचाने पारील केलेला आहे. तथापि वि.प.क्र.2 यांनी म्हणणे दाखल केले व सदर दैनंदिन भिशी पासबुक वरती वि.प.क्र.2 यांनी कधीही चेअरमन म्हणून सहयां केलेल्या नाहीत असे म्हणणे दाखल केलेले आहे. परंतू तक्रारदार यांची दैनंदिन भिशी असलेचे नाकारलेले नाही. सबब, तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
9. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी सदरहू रक्कमेची वि.प.यांचेकडे मागणी केली असता, वि.प.यांनी रक्कम आज देतो उद्या देतो असे खोटे वायदे सांगून सदरची रक्कम तक्रारदार यांना देणेस टाळाटाळ केली आहे व करीत आहेत. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांना संस्थेकडे विनाकारण हेलपाटे मारावयास लावून तक्रारदार यांची वि.प.यांनी घोर फसवणूक केलेली आहे. सबब, वि.प.यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. त्यामुळे वि.प.यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिलेली आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्हीं होकारार्थी दिलेले आहे.
10. प्रस्तुत कामी वि.प.यांनी तक्रारदार यांना जाणूनबुजून मानसिक व शारिरीक त्रास दिलेला आहे व देत आहेत. तक्रारदार यांनी वर नमुद केलेली दैनिक भिशीची एकूण रक्कम रु.85,000/-, दि.13.04.2016 पासून दि.13.04.2017 पर्यंतचे द.सा.द.शे.7टक्के प्रमाणे होणारी एकूण व्याजाची रक्कम रु.6,942/- आहे तेव्हा मुद्दल व त्यावरील व्याज मिळून होणारी एकूण रक्कम रु.91,942/- इतकी वि.प.यांचेकडून तक्रारदार यांना येणे आहे असे कथन केलेले आहे. तक्रारदार यांनी वि.प.कडे सदर रक्कमेची मागणी केली असता, वि.प. ठेवीची देय रक्कम मुदतीनंतरही दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास झालेला आहे. सबब, वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांची दैनिक भिशीची एकूण रक्कम रु.85,000/- (अक्षरी रक्कम रुपये पंच्याऐंशी हजार मात्र), दि.13.04.2016 पासून दि.13.04.2017 पर्यंतचे द.सा.द.शे.7टक्के प्रमाणे होणारी एकूण व्याजाची रक्कम रु.6,942/- (अक्षरी रक्कम रुपये सहा हजार नऊशे बेचाळीस मात्र) अशी एकूण रक्कम रु.91,942/- (अक्षरी रक्कम रुपये एक्यानऊ हजार नऊशे बेचाळीस मात्र) तक्रारदार यांना मिळणेस पात्र आहेत तसेच सदर रक्कमेवर तक्रार अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदार यांचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6% दराने होणारे व्याजाची रक्कम वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिरित्या तक्रारदार अदा करावी. तसेच तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार मात्र) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.3,000/- (अक्षरी रक्कम रुपये तीन हजार मात्र) वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना अदा करणेचे आदेश मंच करीत आहे.
11. सबब, प्रस्तुत कामी आम्हीं खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांची दैनिक भिशीची एकूण रक्कम रु.85,000/- (अक्षरी रक्कम रुपये पंच्याऐंशी हजार मात्र), दि.13.04.2016 पासून दि.13.04.2017 पर्यंतचे द.सा.द.शे.7टक्के प्रमाणे होणारी एकूण व्याजाची रक्कम रु.6,942/- (अक्षरी रक्कम रुपये सहा हजार नऊशे बेचाळीस मात्र) अशी एकूण रक्कम रु.91,942/- (अक्षरी रक्कम रुपये एक्यानऊ हजार नऊशे बेचाळीस मात्र) अदा करावी. तसेच सदर रक्कमेवर तक्रार अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदार यांचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6% दराने होणारे व्याजाची रक्कम वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिरित्या तक्रारदाराला अदा करावी.
- वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार मात्र) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.3,000/- (अक्षरी रक्कम रुपये तीन हजार मात्र) अदा करावेत.
- वर नमूद सर्व आदेशाची पुर्तता वि.प.क्र.1 व 2 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम-25 व कलम-27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- प्रस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
कोल्हापूर.
दि.28.02.2019