निकालपत्र
निकाल दिनांक – १३/०२/२०२०
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
___________________________________________________________
१. तक्रारदार हे हिवरे कोरडा, ता.पारनेर, जि.अहमदनगर येथील रहिवासी आहेत. ते शेती व्यवसाय करतात. त्यांना शेती व्यवसायासाठी ट्रक खरेदी करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी सामनेवालेकडे कर्ज प्रकरण केले होते. वाहन घेणेसाठी त्यांनी रक्कम रूपये ९,९५,०००/- कर्ज सामनेवाले बॅंकेकडे मंजुर केले व त्या कर्जावर ९ टक्के द.सा.द.शे. व्याज आकारले होते. सदरचे रकमेची ४४ समान मासिक हप्त्यामध्ये परतफेड करण्याचे ठरले होते. त्यानुसार सामनेवालेने हप्त्याची रक्कम रूपये २८,५१०/- ठरवली होती. तक्रारदाराचा कर्ज खाते क्रमांक सी.व्ही. १२९१७०६ असा असुन तक्रारदार व सामनेवाले यांच्या दरम्यान कर्जाबाबत झालेल्या करारनाम्याची तारीख दिनांक २३-०८-२००६ अशी आहे. तक्रारदाराचा मासिक हप्ता सप्टेंबर २००६ मध्ये सुरू झाला व एप्रिल २०१० मध्ये संपला होता. तक्रारदाराने सदरचे वाहन खरेदी केल्यानंतर त्याचे रजिस्ट्रेशन केले व त्यानुसार आर.टी.ओ. कडुन रजिस्ट्रेशन क्रमांक एम.एच.१६-क्यु-५१५९ देण्यात आला. सामनेवाले बॅंकेने तक्रारदाराकडुन मासिक हप्त्यांची परतफेडकरीता धनादेश स्विकारले होते. तक्रारदाराने कथन केले की, सदरचे चेक तांत्रिक कारणाने वटविले गेले नाही. त्यामुळे न वटलेले चेकची रक्कम रोखीने व डिमांड ड्राफ्टद्वारे तक्रारदाराने सामनेवालेस दिलेले आहेत. तक्रारदाराने एप्रिल २०१० अखेर पावेतो सर्व कर्जाची व्याजासह परतफेड केली. सामनेवाले यांचेकडे तक्रारदाराची कोणतीही थकबाकी शिल्लक नाही. त्यामुळे सामनेवालेने तक्रारदाराला नो डयुज सर्टिफीकेट देणे गरजेचे आहे. परंतु सामनेवालेने तक्रारदाराला नो डयुज सर्टिफीकेट दिले नाही. अशा प्रकारे सेवेत त्रुटी दिली आहे. तक्रारदाराने दिनांक १९-१०-२०१५ रोजी त्याबाबत सामनेवालेंना नोटीस दिली. परंतु सामनेवाले यांनी दिनांक २७-१०-२०१५ रोजी तक्रारदाराला रक्कम रूपये ५,४३,६०७.३३ एवढी थकबाकी असल्याचे नोटीसद्वारे कळविले. उलट सामनेवाले यांनी तक्रारदाराला कर्जाची परतफेड झाल्यानंतर नोडयुज दिले नाही. त्यामुळे तक्रारदाराला मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल करून परिच्छेद क्रमांक १४ प्रमाणे मागणी केली आहे.
२. सामनेवालेने त्यांची लेखी कैफीयत प्रकरणात दाखल केली. सामनेवाले यांनी त्यांचे लेखी कैफीयतीमध्ये असे कथन केले की, तक्रारदाराला त्यांनी वाहन खरेदीसाठी रक्कम रूपये ९,९५,०००/- चे कर्ज दिले होते व त्याबाबत सामनेवाले व तक्रारदारामध्ये करारनामा झालेला होता. सदरचे कर्जाची परतफेड मुदतीत करावयाची तक्रारदाराने मान्य केले होते. तसे न केल्यास सदरील कर्ज रकमेवर दंड व्याज व इतर शुल्क आकारले जाईल, असे करारनाम्यान नमूद होते. कर्जाची परतफेड ही ४४ समान मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करण्याचे ठरले होते. तक्रारदाराने सामनेवाले यांना बरेचसे धनादेश दिले व ते त्यांच्या खात्यात पुरेसी रक्कम नसल्याने न वटता परत आले. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवालेंनी दिलेली कर्जाची रक्कम भरली नाही. म्हणुन सदरची कर्जाची रक्कम दंड व व्याजासह वाढत गेली. तक्रारदाराने रक्कम देण्याची टाळाटाळ केली. त्यामुळे कर्ज खाते निल असल्याचा दाखला देणे शक्य नाही. त्याबाबत सामनेवाले यांनी सदर नोटीसीस योग्य व खरे उत्तर तारीख २७-१०-२०१५ रोजीच्या उत्तराने दिलेले व त्यापावेतो तक्रारदाराकडुन रक्कम रूपये ५,४३,६०७.३३/- एवढी थकबाकी होती. परंतु तक्रारदाराने थकबाकीची रक्कम भरली नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी नो डयुज सर्टिफीकेट दिले नाही. सामनेवालेने तक्रारदारास कोणतीही सदोष सेवा दिली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
३. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्रीमती तांबोळी यांनी केलेला युक्तिवाद तसेच सामनेवाले यांनी केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.एस.बी. पादीर यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | नाही |
(३) | आदेश काय ? | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
४. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार हे शेतकरी असुन त्यांनी स्वतचे शेती व्यवसायासाठी सामनेवाले यांच्याकडुन वाहन कर्जासाठी रक्कम रूपये ९,९५,०००/- चे कर्ज प्रकरण केले. सदरची रक्कम ४४ समान हप्त्यांमध्ये परतफेड करण्याचे ठरले होते. त्यानुसार सामनेवालेने हप्त्याची रक्कम रूपये २८,५१०/- ठरवली होती. असे त्यांचे करारनाम्यामध्ये नमुद केलेले होते. सदरचा करारनामा हा दिनांक २३-०८-२००६ रोजी केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये ग्राहक नातेसंबंध निर्माण झाला. ही बाब सामनेवाले यांनी नाकारलेली नाही. म्हणुन मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
५. मुद्दा क्र. (२) - तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे कर्ज प्रकरण केले व त्याचा भरण ४४ समान मासिक हप्त्यांमध्ये प्रत्येकी हप्ता रक्कम रूपये २८,५१०/- तक्रारदाराने सामनेवालेंना देण्याचे करारानाम्यात नमुद केले होते. मुदतीत कर्ज भरले नाही तर त्यावर दंड व व्याज आकारण्यात येईल, असे करारनाम्यात नमुद होते. तक्रारदाराने तक्रारीत कथन केले की, त्यांनी कर्जाचे संपुर्ण हप्ते भरले होते व परिच्छेद ५ मध्ये असे कथन केले की, तक्रारदाराने सामनेवाले यांना दिलेले धनादेश न वटता परत आले. परंतु तक्रारदाराने सदरची रक्कम ही रोख किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे सामनेवाले यांना दिली आहे. परंतु रोख स्वरूपात रक्कम दिलेबाबत पुरावा किंवा साक्षीपुरावा प्रकरणात दाखल नाही. तक्रारदाराने सदरची रक्कम रोख स्वरूपात दिली, ही बाब मंचासमक्ष स्पष्ट झाली नाही. तक्रारदाराने पावत्या प्रकरणात दाखल केल्या आहेत. परंतु सदरचे पावत्यांचे अवलोकन केले असता कर्जाची रक्कम कर्ज खात्यात भरणा केल्याचे स्पष्ट होत नाही. सामनेवाले यांनी त्यांचे लेखी कैफीयतीमध्ये असा बचाव घेतला की, काही हप्ते भरले व काही हप्तांचे धनादेश न वटता परत आले. सदर बाब स्पष्ट करणेसाठी सामनेवालेने बॅंकेचा खाते उतारा दाखल केला आहे. सदरहु खाते उता-याचे अवलोकन केले असता तक्रारदाराकडे रक्कम रूपये ६,४३,३६०/- एवढी थकबाकी असल्याचे निदर्शनास येते. तसेच तक्रारदाराने तक्रारीत कथन केले की, त्यांचे काही धनादेश न वटता परत आले, त्याबाबत सामनेवालेने खाते उतारा दाखल केलेले आहे. यावरून ही बाब स्पष्ट होते की, नमुद धनादेश हे न वटता परत आले. त्यामुळे सामनेवाले यांना कर्ज खात्याची व्याजासह संपुर्ण रक्कम प्राप्त झाली नाही, ही बाब दाखल खातेउता-यावरून स्पष्ट होते. तक्रारदाराने संपुर्ण कर्जाची परतफेड केली नाही. उलट तक्रारदाराकडे रक्कम रूपये ५,४३,६०७.३३/- एवढी रकमेची थकबाकी असल्याचे सामनेवाले यांनी कथन केले व त्या रकमेची मागणी करण्यासाठी दिनांक १९-१०-२०१५ रोजी तक्रारदाराला नोटीस दिलेली होती. सदरची नोटीस प्रकरणात दाखल केलेली आहे. त्यामध्ये ७ दिवसाचे आत थकीत रक्कम भरण्याची मागणी केलेली आहे. तक्रारदाराचे तक्रारीतील कथनामध्ये त्यांनी संपुर्ण रक्कम भरली, असे नमुद केले व धनादेश वटले नाही ती रक्कम रोख स्वरूपात दिली, याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा किंवा शपथपत्र मंचासमोर दाखल केले नाही व कोणतेही कागदपत्र प्रकरणात दाखल नाही. त्यामुळे सदरची रक्कम सामनेवालेला दिली आहे, ही बाब स्पष्ट होत नाही. तसेच ज्या हप्त्यांमध्ये तक्रारदाराने रक्कम सामनेवालेला दिली त्याबाबतचा स्वहस्तक्षरात तपशील सादर केलेला आहे. परंतु त्याला पुरक असा पुरावा, सादर केला नाही. त्यामुळे तक्रारदाराने केलेले कथन हे विचारात घेता येणार नाही. सामनेवाले यांनी दाखल केलेल्या खाते उता-यावरून वरून तक्रारदाराने दिलेले धनादेश न वटता परत आलेचे दिसते. त्यामुळे सामनेवालेने तक्रारदाराला नो ड्युज सर्टिफीकेट देण्याचा प्रश्नच येत नाही. सामनेवाले यांनी नो डयुज सर्टिफीकीट दिले नाही, असे तक्रारदाराने कथन केले. परंतु तक्रारदाराची थकबाकी असल्याने सामनेवाले यांनी नो ड्युज सर्टिफीकीट दिले नाही, यामध्ये सामनेवाले यांनी कोणतीही सेवेत त्रुटी दिली नाही, असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.२ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
६. मुद्दा क्र. (३) - मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. |
२. उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा. |
३. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्क देण्यात यावी |
४. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |