निकालपत्र :- (दि.18/11/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षांच्या वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार ही तक्रारदाराचे क्रेडीट कार्डवर चुकीचा आकार टाकून सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेमुळे दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-तक्रारदार हे कोल्हापूर येथील कायमचे रहिवाशी असून सामनेवाला क्र.1 ही नामांकित बँक आहे व सामनेवाला क्र.2 ही त्यांची कोल्हापूर शहरातील शाखा आहे. यातील तक्रारदार यांनी सामनेवाला बँकेवर विश्वास ठेवून सदर बँकेमध्ये आपले खाते काढले. त्याचा रेग्युलर खाते क्र.016601513344 असा आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला बँकेकडून क्रेडीट कार्डची सुविधादेखील घेतली आहे. सदर क्रेडीट कार्डचा क्र.4477474135860008 असा आहे. सदर क्रेडीट कार्डची मर्यादा प्रत्येक महिन्याला रु.30,000/- पर्यंतची होती. तक्रारदार सदर क्रेडीट कार्डचा उपयोग करुन वेळोवेळी खरेदी करत होते व खरेदीच्या रक्कमा त्यात्या वेळी भागविल्या जात होत्या. त्यानुसार जुलै-2007 रोजी यातील तक्रारदार यांनी रक्कम रु.5,687/- इतक्या रक्कमेची खरेदी केली व ती रक्कम यातील सामनेवाला बँकेने भागवली. सदर रक्कम तक्रारदार यांचे खातेवरुन दि.17/08/2007 रोजी 442684 या रेफरन्स नंबरने चेक पेमेंट रिसिव्हड थँक्यू असा शेरा मारुन सामनेवाला बँकेने ट्रान्झॅक्शन डिटेल्स देखील दिलेले आहेत. तसेच दि.05/09/2007 रोजी रेफरनस् नंबर 442685 ने परत तोच शेरा मारुन पुन्हा एकदा कळविले आहे. केवळ तक्रारदार यांना मानसिक व आर्थिक त्रास देणेच्या दुष्ट हेतूने यातील सामनेवाला यांनी दि.10/03/08 व दि.11/03/08 रोजी चेक पेमेंट रिव्हर्सल असा शेरा मारुन दि.29/03/2008 च्या स्टेटमेंटने कळवले आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या अकौन्ट स्टेटमेंटमध्ये सदर डबल रक्कमेवर जादा व्याज सामनेवाला बँकेने टाकलेले आहे. त्यानंतर दि.18/12/2010 व दि.29/12/2010 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.38,581.83/- इतकी देणे लागत असलेबाबत व सदरची रक्कम सदरचे पत्र मिळालेपासून सात दिवसांचे आत सामनेवाला यांचेकडे जमा करणेबाबत कळवले. त्यानंतर दि.15/12/2010 रोजी अॅड.प्रशांत कुलकर्णी यांचे मार्फत सामनेवाला यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.38,582/- इतकी देणे लागत असलेबाबतच खोटी व चुकीची डिमांड लिगल नोटीस पाठवली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास आपआपसामध्ये तडजोड करणेसाठी दि.31/12/2010 पर्यंतचा वेळ दिला होता. परंतु त्यापूर्वीच दि.29/12/2010 रोजी तक्रारदार यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता तक्रारदार यांचे सामनेवालांकडील बचत खातेवरुन रक्कम रु.38,582/- सामनेवाला यांनी स्वत:कडे जमा करुन घेतले आहे व सदरचे सामनेवालांचे हे कृत्य चुकीचे, बेकायदेशीर व अनाधिकाराचे आहे. सदर सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे गैरकृत्यामुळे तक्रारदारास मानसिक, शारिरीक व आर्थिकदृष्टया त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन सामनेवाला यांनी जमा करुन घेतलेली रक्कम रु.38,582/-, वकील फी रु.5,000/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.30,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ क्रेडीट कार्ड ई स्टेटमेंट, तक्रारदाराचे सेव्हींग अकौन्ट स्टेटमेंट, बँकेची पत्रे इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदार हा स्वच्छ हाताने मे. मंचासमोर आलेला नाही. तक्रारदाराने पैसे उकळण्याचे दृष्टीने प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. वस्तुस्थिती मे. मंचापासून दडवून ठेवलेली आहे. तक्रारदार हा स्वत:चे देय असणारी रक्कम भरावी लागू नये म्हणून प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. प्रस्तुतची तक्रार ही कायदयाचे दृष्टीने चालणेस पात्र नाही. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, वास्तविक 5,687/- इतकी रक्कमेची चुकून दोनदा नोंद झालेली होती. तसेच सदर चुकीची दुरुस्ती करुन तक्रारदाराशी तडजोड करुन रक्कम रु.22,700/- भरणेबाबत सामनेवाला यांनी तक्रारदारास सांगितले होते. मात्र तक्रारदाराने सदर रक्कम भरलेली नाही. सदर नुकसानीसाठी तक्रारदार स्वत: जबाबदार आहे. तक्रारदार सामनेवाला यांचे देणे लागतो. सबब तक्रारदाराने प्रस्तुतची खोटी तक्रार दाखल केलेने सदरची तक्रार खर्चासह नामंजूर करावी. तसेच सामनेवालांना रु.10,000/- कॉम्पेसेंटरी कॉस्ट देणेबाबत तक्रारदारांना हुकूम व्हावा अशी विंनती केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांचे म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, लेखी युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात- 1) सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? --- होय. 2) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे. मुद्दा क्र.1:- तक्रारदाराचे सामनेवाला बँकेत रेग्युलर खाते क्र.016601513344 आहे. सदर बँकेतून तक्रारदाराने क्रेडीट कार्ड सुविधा घेतलेली होती. सदर क्रेडीट कार्डचा नंबर 4477474135860008 असा आहे. सदर कार्डची मर्यादा प्रतिमाह रु.30,000/- इतकी आहे. सदर क्रेडीट कार्डवर तक्रारदार वेळोवेळी खरेदी करत होते व खरेदीच्या रक्कमा ज्यात्यावेळी भागवत होते हे दाखल कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे. जुलै-07 मध्ये तक्रारदाराने रक्कम रु.5,687/- इतक्या रक्कमेची खरेदी केली होती व सदर रक्कम तक्रारदाराचे खातेवरुन दि.17/08/2007 रोजी 442684 या रेफरन्सने चेकव्दारे रक्कम मिळालेचा शेरा नमुद करुन व्यवहाराचे डिटेल्स दिलेले आहेत. तरीही पुन्हा दि.05/09/2007 रोजी रेफरन्स क्र.442685 ने नमुद शे-याने कळवलेले आहे. सदरची रक्कम सामनेवाला यांना दि.17/08/2007 पूर्वीच मिळालेली आहे. तरीही दि.10/03/08 व 11/03/08 चे चेक पेमेंट रिव्हर्सल असा शेरा मारुन दि.29/03/08 चे स्टेटमेंटने कळवलेले आहे हे दाखल स्टेटमेंटवरुन निर्विवाद आहे. त्याबाबतच्या नोंदी नमुद स्टेटमेंटवर दि.10/03/08 व दि.11/03/08 रोजी केलेल्या दिसून येतात. तसे दि.27/12/2010 चे पत्राने सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून रक्कम रु.22,700/- इतक्या रक्कमेची मागणी केलेचे दिसून येते. त्यावर विविध जादा आकारणी केलेली आहे. तसेच जादा आकारणी व जादा व्याज आकारुन दि.18/12/10 व 29/12/10 रोजी रु.38,581.83/- इतक्या रक्कमेची मागणी तक्रारदाराकडे केली आहे. प्रस्तुत रक्कम कशी देय आहे? याबाबतचे स्पष्टीकरण दिलेले नाही अथवा त्यांचे म्हणणेसोबत तशा प्रकाराचा कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. याउलट सदर वादाबाबत तक्रारदाराने दि.15/12/2010 रोजी अॅड. प्रशांत कुलकर्णी यांचेमार्फत सदर मागणी चुकीची असलेबाबत नोटीस पाठवली होती. त्यावेळी तक्रारदार व सामनेवाला क्र.2 यांचेमध्ये तडजोड करणेसाठी दि.31/12/2010 पर्यंतचा वेळ दिला होता. मात्र तत्पुर्वीच दि.29/12/2010 रोजी तक्रारदारास कोणतीही पूर्वसुचना न देता तक्रारदाराचे बचत खातेवरुन रु.38,582/- इतकी रक्कम सामनेवाला बँकेने स्वत:कडे जमा करुन घेतलेली आहे. याचा विचार करता सामनेवाला यांनी रु.5,687/- रक्कम मिळूनही दोनदा चुकीच्या एंट्रीची नोंद करुन त्यावर जादा आकार घेतलेला आहे. तसेच सदर वसुल केलेली रक्कम ही कशा पध्दतीने देय आहे. याबाबतचा कोणताही पुरावा स्पष्टीकरण दिलेले नाही. सबब बाबींचा विचार करता सामनेवाला यांनी प्रस्तुत रक्कम तक्रारदार कशा पध्दतीने देय लागतो तक्रारदाराने कुठे खरेदी केली. त्यासंदर्भातील बिले, तसेच प्रस्तुत रक्कम दिलेली नाही याबाबतच्या नोटीस अथव अन्य कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. सबब कोणत्याही आधाराशिवाय व पुराव्याशिवाय सामनेवाला यांनी दि.29/12/2010 रोजी तक्रारदाराचे बचत खातेवरुन रु.38,582/- इतकी रक्कम कपात करुन घेतलेचे दाखल स्टेटमेंटवरुन निर्विवाद आहे. तक्रारदाराचे विनासंमत्ती परस्पर तक्रारदाराचे बचत खातेवरुन रक्कम कपात करुन सामनेवाला यांनी सेवात्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- रक्कम रु.5,687/- या रक्कमेची दोनदा नोंद करुन नांवे टाकलेली रक्कम तसेच त्यावर आकारलेले विविध जादा आकार व्याज इत्यादी आकारुन सदर व्यवहारापुरती कपात करुन घेतलेली रक्कम तक्रारदाराचे खातेवर पुन्हा जमा करावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर व्यवहार सोडून व अन्य व्यवहारापोटी भागवलेल्या रक्कमा सोडून अन्य व्यवहारापोटी देय असणा-या रक्कमा वसुल करणेचा सामनेवाला यांचा अधिकार सुरक्षित राखणेत येतो या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदाराचे क्रेडीट कार्डवरील रु.5,687/- या रक्कमेची दोनदा नोंद करुन नांवे टाकलेली रक्कम तसेच त्यावर आकारलेले विविध जादा आकार व्याज इत्यादी सदर व्यवहारापुरती परस्पर कपात करुन घेतलेली रक्कम रु.38,582/- तक्रारदाराचे खातेवर पुन्हा जमा करावी. सदर नमुद केलेला व्यवहार सोडून अन्य कायदेशीर देय रक्कमा वसुल करणेचा सामनेवाला यांचा अधिकार सुरक्षीत ठेवणेत येतो. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारस मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| | [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |