न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडून दि. 2/7/2013 रोजी अर्जात नमूद मिळकत खरेदी केलेली होती. सदरची मिळकत खरेदी करीत असताना वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना सदर रो-हाऊसची ड्रेनेज व्यवस्था प्रत्येक रो-हाऊसला वेगवेगळी आहे अशी खात्री दिलेली होती. तथापि सदरची मिळकत तक्रारदार वापरीत असताना तक्रारदार यांना सदर प्लॉट नं.14ए, 14बी, तसेच 15ए या प्लॉटधारकांचे सांडपाणी तक्रारदार यांचे रो-हाऊसमधून बाहेर काढणेत आलेचे समजले. त्यामुळे तीन फ्लॅटधारकांचे ड्रेनेजच्या सांडपाण्याचा निचरा तक्रारदार यांचे प्लॉटमधून होत असलेने याचा नाहक त्रास व मनःस्ताप तक्रारदार यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे तक्रारदार यांना योग्य ती सेवा व सुविधा वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडून दिलेली नव्हती व नाही. याकरिता वि.प.क्र.1 ते 3 यांनी केलेल्या या फसवणूकीबद्दल तक्रारदार यांना अर्ज दाखल करणे भाग पडले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडून दि. 2/07/2013 रोजी खाली नमुद मिळकत खरेदी केलेली आहे. जिल्हा कोल्हापूर ता.करवीर यांचे अधिकारक्षेत्रातील कोल्हापूर महानगरपालिका ई वॉर्ड तसेच कसबा बावडी हद्दीतील भूमापन गट नं. 540 पैकी प्लॉट नं. 15 याचे येणारे एकूण क्षेत्र 91.35 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या रो-हाऊस युनिट मधील 15ब याचे क्षेत्र प्लॉट क्षेत्र 53.35 चौ.मी. म्हणजे 574 चौ.फूट सदर मिळकतीवर बांधण्यात आलेले इमारतीचे क्षेत्र 46.43 चौ.मी. बिल्टअप म्हणजेच 499.58 चौ.फूट ही मिळकत तक्रारदार यांनी रेडी पझेशनने खरेदी केली आहे. सदरची मिळकत खरेदी करीत असताना वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना सदर रो-हाऊस प्लॉट नं.15ब ची ड्रेनेज व्यवस्था प्रत्येक रो-हाऊसला वेगवेगळी आहे असे विश्वासाने सांगितलेले होते व आहे. तथापि सदरची मिळकत तक्रारदार वापरत असताना तक्रारदारांना रो-हाऊस प्लॉट नं. 14ए, 14बी व 15ए या प्लॉट धारकाचे ड्रेनेजचे सांडपाणी तक्रारदार यांचे रो-हाऊस युनिट नं. 15 बी या मिळकतीमधून बाहेर काढणेत आलेचे कळून आले. त्यामुळे तक्रारदार यांना इतर तीन प्लॉटधारकांचे ड्रेनेजचा सांडपाण्याचा निचरा तक्रारदार यांचे प्लॉटमधून होत असलेने त्याचा नाहक त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे तक्रारदारंना वि.प.क्र.1 ते 3 यांनी वर नमूद प्लॉट विक्री करतेवेळी चुकीची व खोटी माहिती देवून तक्रारदार यांची दिशाभूल केलेली आहे व योग्य ती सेवा व सुविधा दिलेली नव्हती व नाही. या कारणाकरिता सदरचे तक्रारदार यांचे रो-हाऊसमधील ड्रेनेज वारंवार चोकअप होत असलेने त्याचा विनाकारण मनःस्ताप तक्रारदार यांना सहन करावा लागत आहे व याबाबत वि.प.क्र.1 ते 3 यांनी वारंवार विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. याबाबत तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 ते 3 यांना वकीलांमार्फत नोटीसही पाठविली आहे. मात्र सदरची नोटीसीस उत्तर देताना वि.प.क्र.1 ते 3 यांनी निव्वळ भरपाईच्या हव्यासापोटी नुकसान भरपाईच्या हव्यासापोटी सदरची नोटीस आपणांस पाठविली आहे अशा मजकुराचे कथन केलेले आहे व वि.प.क्र.1 ते 3 यांनी याबाबत कोणतीही योग्य व ठोस कारवाई केलेली नाही व केलेली कारवाई ही तात्पुरती व जुजबी कारवाई केलेली आहे. मात्र तक्रारदार यांच्या रो-युनिटला धोका होईल व सांडपाण्याचा निचरा तक्रारदार यांच्या घराच्या भिंतीमध्ये होर्इील अशा चुकीच्या प्रकाराने केलेला आहे. सबब, तक्रारदार यांच्या इमारतीचे भिंतीस धोका निर्माण झाल्याने प्रस्तुतचा तक्रारअर्ज तक्रारदार यांना दाखल करणे भाग पडले. याकरिता तक्रारदार यांनी रो-हाऊस युनिटमधील ड्रेनेजचे ब्लॉकेज काढण्याकरिता लागलेला खर्च रक्कम रु. 35,000/-, नोटीसीचा खर्च रक्कम रु.5,000/- व वकील फी रक्कम रु. 30,000/- तसेच कोर्ट खर्च रक्कम रु.10,000/-, तक्रारदार क्र.1 व 2 यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटीची रक्कम रु. 3 लाख असा एकूण रु. 3,80,000/- खर्च वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडून मिळणेसाठी आदेश व्हावा या स्वरुपाचा तक्रारअर्ज तक्रारदार यांनी दाखल केलेला आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत तक्रारदार यांचे मालकीचे खरेदीपत्र, तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, नोटीसच्या पोस्टाच्या पावत्या, नोटीसच्या पोहोच पावत्या, नोटीशीचे परत आलेले लखोटे, वि.प. यांची उत्तरी नोटीस इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांना आयोगाची नोटीस लागू होवून त्यांनी हजर होवून या आयोगासमोर आपले म्हणणे दाखल केले. त्यांचे कथनानुसार, सदरचा तक्रारअर्ज तक्रारदार यांनी नुकसान भरपाईची रक्कम मिळविणेचे गैरहेतूने केला असलेने नामंजूर करणेत यावा. तक्रारदार यांनी वर नमूद मिळकतीची ड्रेनेज व्यवस्था एकत्र असलेबाबत माहिती घेवूनच व संपूर्ण मिळकतीची प्रत्यक्ष पाहणी करुनच रो-हाऊस युनिट नं. 15ब या मिळकतीची खरेदी केलली होती व आहे व रो-हाऊस दि. 02/07/2013 रोजी खरेदी केलेनंतर तब्बल पाच वर्षानंतर सदरचे युनिटमधील बांधकामाबाबत व सेवा सुविधांबाबत तक्रार करणेचा तक्रारदारांना कोणताही कायेदशीर हक्क व अधिकार नाही. सबब, तथाकथित तक्रार ही मुदतीत नसलेने त्याला कायद्याची बाधा येत आहे यास्तव नामंजूर करावा. एकत्रित ड्रेनेजची संपूर्ण माहिती तक्रारदार यांना दिलेली होती व आहे. तसेच वर नमूद मिळकतीतील सांडपणी हे रो-हाऊस युनिट नं.15ब म्हणजेच तक्रारदार यांचे मिळकतीचे उत्तर बाजूस असलेल्या साईड मार्जिनमधील बंदीस्त नळातून केली असलेचे माहिती तक्रारदार यांना होती व आहे. तक्रारदारांना सुरुवातीपासूनच इतर तीन प्लॉट धारकांच्या ड्रेनेजच्या सांडपाण्याचा निचरा तक्रारदार यांचे प्लॉट नं.15ब या मिळकतीचे साईड मार्जिनमधून मोकळया असलेल्या जागेतून बंदिस्त पाईपलाईनद्वारे होत असलेची माहिती होती व आहे. मात्र असे असूनही तक्रारदार यांचे अॅडव्होकेट मार्फत नोटीस दिलेनंतर वि.प. यांनी त्याची दखल घेतलेली आहे व त्यानुसार त्यांचे तक्रारीचे कायमस्वरुपी निवारण करणेच्या हेतूने रो-हाऊस युनिट नं.14अ 14ब व 15अ या मिळकतींची ड्रेनेजची व्यवथा स्वतंत्रपणे युनिट नं. 14अ, 14ब व 15अच्या पाठीमागील पश्चिम बाजूस तीन स्वतंत्र चेंबर्सद्वारे बंदिस्त नळातून केलेली आहे व आजरोजी तक्रारदारांच्या रो-हाऊस युनिटमधून वर नमूद युनिटधारकांचे ड्रेनेजचे सांडपाणी साईड मार्जिनमधील ड्रेनेज पाईपलाईनद्वारे बाहेर जात नाही याची पूर्ण माहिती तक्रारदार यांना आहे. मात्र तरीसुध्दा सदरची तक्रार तक्रारदार यांनी दाखल केलली आहे. वर नमूद युनिट धारकांचे ड्रेनेजचे सांडपणी हे स्वतंत्र नळामध्ये नाल्यामध्ये सोडलेले आहे. मात्र वि.प. यांना त्रास देणेच्या उद्देशाने सदरचा तक्रारअर्ज तक्रारदार यांनी दाखल केलेला आहे व मागितलेला खर्चही चुकीचा आहे. या कारणास्तव नुकसानीदाखल (Compensatory cost) वि.प.क्र.1 ते 3 यांना रक्कम रु.1 लाख देणेचे आदेश व्हावेत असे कथन वि.प यांनी केलेले आहे.
5. वि.प. यांनी या संदर्भात कागदयादीसोबत ड्रेनेज पाईपलाईनचे आठ फोटो व सदर फोटोंचे फोटोग्राफरने दिलेले बिल तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडून वर अर्जात नमूद मिळकत दि. 02/07/2013 रोजी खरेदी केलेली आहे. याबाबत उभय पक्षांमध्ये वादाचा मुद्दा नाही. यासंदर्भातील खरेदीपत्रही तक्रारदाराने दाखल केले आहे. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे. याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. तक्रारदार यांचे वर अर्जात नमूद ड्रेनेज वारंवार चोकअप होत असलेचा मुद्दा व त्या कारणास्तव तक्रारदार यांना त्याचा होणारा त्रास हा या तक्रारअर्जाचा विषय आहे. तक्रारदार यांनी अन्य युनिटधारक यांचे सांडपाणी हे तक्रारदार यांच्या मिळकतीतून बाहेर काढणेत आलेले आहे व या कारणास्तव तक्रारदार यांचा ड्रेनेज वारंवार चोकअप होण्याचा त्रास होत आहे असे तक्रारदार यांचे कथन आहे. मात्र वि.प.क्र.1 ते 3 यांनी आपल्या कथनाद्वारे सदरचे ड्रेनेजचे सांडपाण्याबाबत तक्रारदार यांची वकीलांचेमार्फत नोटीस आलेनंतर वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांची तक्रार समजून घेवून त्यांचे तक्रारीचे कायमस्वरुपी निराकरण केलेले आहे. युनिट नं. 14अ, 14ब व 15अ या मिळकतींची ड्रेनेजची व्यवस्था सदरचे युनिटच्या पाठीमागील पश्चिम बाजूस तीन स्वतंत्र चेंबर्स द्वारे बंदिस्त नळातून केलेली आहे. सबब, सदरचे तक्रारदार यांचे युनिटमध्ये असणारे वर नमूद युनिटधारकांचे ड्रेनेजचे पाणी येत नाही. यासंदर्भात वि.प. यांनी पुराव्याचे शपथपत्र तसेच दावा मिळकतीमधील वादाचे घराचे व त्यामागील बाजूस स्वतंत्र पध्दतीचे काढलेले ड्रेनेज पाईपलाईन्सचे फोटो दाखल केलेले आहेत. मात्र सदरचे कामी कोर्ट कमिशन यांची नेमणूक होवून त्या संदर्भातील अहवाल या आयोगास दि. 12/8/2020 रोजी प्राप्त झालेला आहे. यावरुन तक्रारदार यांचे युनिट नं. 14अ, 14ब व 15अ या युनिटचे सांडपणी हे 15ब या मिळकतीच्या ताब्यात असलेल्या जागेतून जात नाही म्हणजेच तक्रारदार यांचे 15ब या युनिटमधून जात नाही असे स्पष्ट कथन केलेले आहे. तसेच या अहवालामध्ये पुढे असेही नमूद केलेले आहे की, युनिट नं. 14अ, 14ब व 15अ यांचे सांडपाणी हे स्वतंत्र चेंबरद्वारे कंपाऊंडच्या मागून काढण्यात आल्याचे दिसून आले. याचेही अवलोकन या आयोगाने केलेले आहे. कोर्ट कमिशन अहवाल प्राप्त झालेनंतर वि.प. यांनी 12/8/2020 रोजी अहवालास म्हणणे दाखल करुन सदरचा अहवाल हा वि.प. क्र.1 ते 3 यांना मान्य व कबूल असलेने तो पुराव्याचे कामी वाचणेत यावा असेही स्पष्ट कथन केले आहे. या कारणास्तव तक्रारअर्ज हा या आयोगात चालणेस पात्र नाही असेही कथन केलेले आहे. वि.प. यांनी दाखल केलेले कागदपत्रांचा विचार करता तसेच सदरची बाब वि.प.क्र. 1 ते 3 यांनी पुराव्याद्वारेही कथन केलेली आहे. तसेच तक्रारदार व वि.प. यांनी युक्तिवादा दरम्यानही सदरचे ड्रेनेजचे पाणी स्वतंत्र काढण्यात आलेले आहे हे मान्य केलेले आहे. या कारणास्तव तक्रारदार यांनी जरी सदरचा तक्रारअर्ज हा वर नमूद कारणासाठी दाखल केला असला तरी सद्यपरिस्थितीत तक्रारअर्जास घडलेले कारण संपुष्टात आले आहे. मात्र तरीसुध्दा तक्रारदार यांना आजअखेर याचा मानसिक व शारिरिक त्रास हा निश्चितच झालेला आहे व तसे कथन त्यांनी लेखी व तोंडी युक्तिवादामध्ये केलेले आहे. यामध्ये तक्रारदार यांना सदरचे अर्जात नमूद युनिट सोडून दुसरीकडे दुस-या जागेत स्थलांतर करावे लागले ही बाब तक्रारदार यांनी कथन केलेली आहे.
9. वरील कारणांचा विचार करता तक्रारदार यांनी मागितलेली मानसिक व शारिरिक त्रासापोटीची नुकसान भरपाईची रक्कम रु.3 लाख ही या आयोगास संयुक्तिक वाटत नसलेने त्याकरिता रक्कम रु. 20,000/- देणेचे आदेश वि.प.क्र.1 ते 3 यांना करणेत येतात. तक्रारदार यांनी याबरोबरच अर्जात नमूद रो-हाऊसचे युनिटमधील ड्रेनेजचे ब्लॉकेज काढण्याचा खर्च रक्कम रु.35,000/- मागितलेला आहे. मात्र या संदर्भातील कोणताही पुरावा तक्रारदार यांनी या आयोगासमोर दाखल केलेला नाही. सबब, याचा विचार हे आयोग करीत नाही. मात्र तक्रारदार यांनी नोटीसीचा खर्च रक्कम रु.5,000/-, वकील फी रक्कम रु.30,000/- व कोर्ट खर्च रक्कम रु.10,000/- मागितलेला आहे. मात्र सदरचा खर्चही या आयेागास संयुक्तिक वाटत नसलेने कोर्ट खर्च, नोटीस व वकील फी याचा संयुक्तिक खर्च रक्कम रु.3,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. सदरचा खर्च हा तक्रारदार यांनी तक्रार दाखल केले तारखेपासून संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने देणेचे आदेश वि.प.क्र.1 ते 3 यांना करणेत येतात तसेच जरी वि.प. यांनी सदरचे सांडपाण्याचा निचरा स्वतंत्र व वेगळा केलेला आहे असे कथन केले असले तरी सुध्दा जर तक्रारदार यांच्या युनिटमधून सदरचे सांडपाणी जात असेल तर त्याचा निचरा स्वतंत्र व वेगळा करणेत यावा असे आदेश वि.प.क्र.1 ते 3 यांना करणेत येतात. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 20,000/- देणेचे आदेश करणेत येतात. तसेच सदरचे रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देणेचे आदेश करणेत येतात.
3. वि.प. क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.