न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा)
1) तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986, कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे
तक्रारदार हे पुंगाव, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर येथे कायमस्वरुपी आहेत. ते पुंगाव ग्रामीण सब-पोस्ट ऑफिसमध्ये ब्रॅंच पोष्टमास्तर म्हणून काम करतात. टपाल कार्यालयाने आपले कार्यक्षेत्र विस्थापित करणेसाठी वेगवेगळया योजनांचा प्रारंभ केला त्यापैकीच एक म्हणजे “ग्रामीण टपाल जीवन विमा योजना” होय. तक्रारदार हे टपाल खात्यातच नोकरीला असलेने त्यांना प्रस्तुत विमा योजनेची माहिती होती. म्हणून तक्रारदाराने त्यांचे कुटूंबियाच्या सुरक्षिततेसाठी उतार वयाची पुंजी म्हणून व दिर्घ स्वरुपाची गुंतवणुक म्हणून पत्नीच्या नावाने म्हणजेच मयत कल्पना आनंद नारकर हिच्या नावाने ग्राम संतोष ग्रामीण टपाल विमा योजनेअंतर्गत पत्नीच्या साठाव्या वर्षी मुदत पूर्ण होईल या हिशोबाने दि. 9-12-2004 रोजी विमा पॉलिसी घेतली. सदर पॉलिसीचा कालावधी दि. 9-12-2035 अखेर असून विमा हप्ता मासिक रक्कम रु. 245/- होता. तर विमा पॉलिसी नं. R-MH-GR-EA-952716 असा होता. तसेच पॉलिसीच्या नियमाप्रमाणे विमा रक्कम परत मिळण्याची मुदत किंवा विमाधारकाचा मृत्यू यापैकी जी घटना प्रथम होईल त्यावेळी बोनससह विम्याची रक्कम मिळण्याची तरतुद होती. तक्रारदाराने त्यांचे पत्नीच्या नावे घेतलेल्या प्रस्तुत विमा पॉलिसीचे दरमहा रक्कम रु. 245/- प्रमाणे दि. 9-12-2004 ते दि. 26-05-2011 एकूण 6 वर्षे 05 महिन्याच्या कालावधीत एकूण रक्कम रु. 19,149/- (रक्कम रु. एकोणीस हजार एकशे एकोण पन्नास मात्र) भरलेले आहेत. त्यापुढेही तक्रारदार नियमितपणे हप्ते भरणार होते मात्र दुर्दैवाने दि. 18-06-2011 रोजी सायंकाळी 7.00 वाजणेच्या दरम्यान घरी जेवण करणेकरिता स्टोव्ह पेटवत असताना अचानक स्टोव्हचा भडका उडून तक्रारदाराची पत्नीचे साडीने पेट घेतला व त्यामध्ये तक्रारदाराची पत्नी गंभीररित्या जखमी झाली उपचारासाठी सी.पी.आर. हॉस्पीटल येथे दाखल केले असताना उपचार चालू असताना ती मयत झाली. पोस्ट मार्टेममध्ये तक्रारदाराचे पत्नीचा मृत्यू 95 % भाजलेमुळे झाले आहे असे मृत्यूचे कारण नोंदवलेले आहे. प्रस्तुत अकस्मात मृत्यूची नोंद राधानगरी पोलीस स्टेशन येथे झाली आहे.
प्रस्तुत घटनेनंतर पत्नीच्या मृत्यूमुळे विमा क्लेम मिळणेसाठी तक्रारदाराने वि.प. यांचेकडे विमा क्लेम फॉर्म सर्व कागदपत्रांसह दाखल केला. परंतु वि.प. यांनी प्रस्तुत विमा क्लेमची रक्कम तक्रारदाराला देणेसाठी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल केला आहे.
2) तक्रारदाराने प्रस्तुत कामी वि.प. यांचेकडून विमा क्लेमची रक्कम रु. 3,37,149/- वसूल होऊन मिळावेत, अशी विनंती याकामी केली आहे.
3) तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफिडेव्हीट, नि. 5 चे कागद यादीसोबत नि. 5/1 ते 5/15 कडे अनुक्रमे ग्रामीण टपाल जीवन विमा पत्रक, विमा पॉलिसी, तक्रारदाराचे पत्नीचा मृत्यू झालेची वर्तमानपत्रातील बातमी, विमाधारकास सी.पी.आर. हॉस्पीटलमध्ये अॅडमीट केलेची पावती, पोलिस निरिक्षक राधानगरी यांनी उपविभागीय अधिकारी, राधानगरी यांना पाठवलेला अहवाल, उपविभागीय अधिकारी, राधानगरी यांनी पारीत केलेला आदेश, कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांनी मयत कल्पना यांचा दिलेला मृत्यूचा दाखला, हप्ते भरलेचा खातेउतारा, तक्रारदाराने वि.प. कडे केलेली विम्याची लेखी मागणी अर्ज, तक्रारदाराचे मुलीचे इ. 10 वी चे मार्कलिस्ट, तक्रारदाराचे रेशनकार्ड, तक्रारदाराचे मतदान ओळखपत्र, क्लेम फॉर्मची टपाल कार्यालय विभाग परिते यांचेकडून वि.प. कडे पाठविलेले पत्र, क्लेम फॉर्मची प्रत, तक्रार अर्जासोबत दाखल अॅफिडीव्हेट व कागदपत्रे हेच पुराव्याचे शपथपत्र समजणेत यावे म्हणून पुरसीस, लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केली आहेत.
4) वि.प. ने प्रस्तुत कामी म्हणणे, म्हणण्याचा मराठी अनुवाद, दि. 10-08-2016 रोजी वि.प.ने तक्रारदाराला विमा क्लेम रक्कम रु. 1,36,248/- अदा केलेचे पेमेंट व्हॉऊचर, चेकलिस्ट, वरिष्ठ अधिक्षक डाकघर यांनी पोस्ट ऑफिस निरिक्षक गारगोटी यांना पाठवलेले पत्र, पुराव्याचे शपथपत्र, व लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे वि.प.ने या कामी दाखल केली आहेत.
वि.प.ने त्यांचे म्हणणे/कैफियतीमध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.
(i) तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील कथन मान्य व कबूल नाही.
(ii) प्रस्तुत तक्रारदाराचा विमा क्लेम नामंजूर करणेचा वि.प. यांचा उद्देश नव्हता. फक्त विमाधारकाचा भाजल्यामुळे संशयीतपणे मृत्यू झालेला होता त्यामुळे सदर प्रकरणात फिल्ड ऑफिसर यांचा सखोल रिपोर्ट घेऊन चौकशी करुन निर्णय घेणे आवश्यक असते.
(iii) वि.प. पुढे सांगू इच्छितात की, वि.प. यांनी तक्रारदाराला विमा क्लेमची सर्व रक्कम कोणतीही रक्कम वजा न करता दि. 19-08-2016 रोजी अदा केली आहे. तसेच प्रस्तुत विमा रकमेवर बोनसही अदा केला आहे.
(iv) तक्रारदाराने तक्रार अर्ज कलम 12 मध्ये केलेली मागणी अवास्तव व चुकीची आहे. त्यामुळे प्रस्तुत रक्कम वि.प. यांचेकडून वसूल होऊन मिळणेस तक्रारदार पात्र नाहीत. कारण तक्रारदाराने वि.प. कडे विमा क्लेम दाखल केलेनंतर सर्व चौकशी होऊन क्लेम मंजूर झाला. व रक्कम रु. 1,36,248/- दि. 19-08-2016 रोजी वि.प. ने तक्रारदाराला अदा केले आहेत. आणि तक्रारदार एवढीच रक्कम वि.प. कडून मिळणेस पात्र होते. सबब, या रक्कमेव्यतिरिक्त अर्ज कलम 12 मध्ये नमूद केलेली रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र नाहीत. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावा अशी विनंती वि.प. यांनी या कामी केली आहे.
(v) तक्रारदार तर्फे वकिलांनी पाठवले नोटीसला वि.प. ने अॅड. मोकाशी यांचेतर्फे समर्पक उत्तर दिलेले आहे. वि.प. ने कोणतीही अनुचित प्रथा अवलंबिली नाही व तक्रारदाराला सदोष सेवा दिली नाही. त्यामुळे वि.प. ने तक्रारदाराला रक्कम रु. 1,09,925/- कधीही देणे लागत नाहीत.
5) वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार वि.प. यांचेकडून नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
वि वे च न –
मुद्दा क्र. 1 ते 3 –
6) वर नमूद मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण तक्रारदार टपाल खात्यातच नोकरीला होते त्यांनी त्यांची पत्नी कल्पना नारकर हिचे नावाने “ग्राम संतोष ग्रामीण टपाल विमा योजना” अंतर्गत पत्नीच्या साठाव्या वर्षी मुदत पूर्ण होईल या हिशोबाने दि. 9-12-2004 रोजी विमा पॉलिसी घेतली. सदर विमा पॉलिसीचा क्र. R-MH-GR-EA-952716 असा असून या विमा पॉलिसीचा कालावधी दि. 9-12-2035 अखेर असा एकूण 31 वर्षाचा होता. व पॉलिसीचा विमा हप्ता मासिक रक्कम रु. 245/- असा होता. या पॉलिसीच्या नियमाप्रमाणे विमा रक्कम परत मिळण्याची मुदत किंवा मृत्यू यापैकी जी घटना प्रथम होईल त्यावेळी बोनससह विम्याची रक्कम मिळण्याची तरतूद होती. तक्रारदाराने त्यांचे पत्नीचे नावे दरमहा रक्कम रु. 245/- प्रमाणे दि. 9-12-2004 ते 26-05-2011 एकूण 06 वर्षे 05 महिन्याच्या कालावधीत एकूण रक्कम रु. 19,149/- (रक्कम रुपये एकोणीस हजार एकशे एकोणपन्नास मात्र) भरलेले आहेत ही बाब वि.प. ने मान्य व कबूल केली आहे. तसेच यापुढेही तक्रारदार नियमितपणे हप्ते भरणार होते मात्र दुर्दैवाने दि. 18-06-2011 रोजी सायंकाळी 7.00 वाजता चे दरम्यान घरी जेवण करण्यासाठी स्टोव्ह पेटवत असताना अचानक स्टोव्ह भडकला व त्यामध्ये तक्रारदाराची पत्नी विमाधारक कल्पना नारकर यांचे अंगावरील साडीने पेट घेतला व त्यामध्ये त्या गंभीर भाजल्या. म्हणून तिला तक्रारदार व आजूबाजूच्या लोकांनी सी.पी.आर. हॉस्पीटल येथे अॅडमिट केले असता त्यांचेवर उपचार चालू असताना त्या मयत झाल्या. मयताच्या प्रेताचे पोस्टमार्टेम सी. पी.आर. हॉस्पीटल कोल्हापूर येथे केलेले असून डॉक्टरनी तक्रारदाराचे पत्नीस 95 % भाजलेमुळे मृत्यू अशाप्रकारे मत मांडले आहे. प्रस्तुत घटनेची नोंद राधानगरी पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मयत रजि. नं. 42/2011 ला झाला आहे. तक्रारदाराने त्यांच्या पत्नीचे मृत्यूनंतर वि.प. यांचेकडे सर्व कागदपत्रासह विमा क्लेम सादर केला. मात्र वि.प. यांना सर्व कागदपत्रासह विमा क्लेम फॉर्म मिळूनदेखील वि.प. ने तक्रारदाराचा विमा क्लेम वेळेवर अदा करणे आवश्यक व गरजेचे असतानाही वि.प. ने टाळाटाळ केली व विमा क्लेम अदा केला नाही म्हणून तक्रारदाराने वि.प. ने दिले सेवा त्रुटीबद्दल व विमा क्लेमची रक्कम वि.प. यांचेकडून वसूल होऊन मिळणेसाठी मे. मंचात तक्रार अर्ज दाखल केला. थोडक्यात तक्रारदाराने वि.प. यांचेकडे विमा क्लेम दि. 10-04-2012 रोजी वि.प. यांचेकडे सादर केला. परंतु वि.प. यांनी दि. 27-04-2016 अखेर तक्रारदाराचा विमा क्लेम मंजूर केला नव्हता व रक्कम तक्रारदाराला अदा केली नव्हती. म्हणून तक्रारदाराने दि. 27-04-2016 रोजी वि.प. ला रजि.ए.डी. ने पत्र पाठवून विमा रक्कमेची मागणी केली परंतु वि.प. ने विमा क्लेमची रक्कम तक्रारदाराला अदा केली नाही म्हणून तक्रार अर्ज दाखल केला व तक्रार अर्ज दाखल झालेनंतर वि.प. यांनी दि. 19-08-2016 रोजी विमा क्लेमची रक्कम व भरलेले हप्ते बोनससह एकूण रक्कम रु. 1,36,248/- (रक्कम रु. एक लाख छत्तीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस मात्र) वि.प. ने तक्रारदाराला अदा केली आहे. मात्र दरम्यानचे व्याज, तक्रारदाराला झाले मानसिक त्रासाची रक्कम व अर्जाचे खर्चाची रक्कम वि.प. ने तक्रारदाराला अदा केली नाही. या सर्व बाबी दाखल सर्व कागदपत्रे वि.प. यांचे म्हणणे, तक्रारदार व वि.प. यांची पुराव्याची शपथपत्रे व उभयतांचे लेखी व तोंडी युक्तीवाद यावरुन स्पष्ट व सिध्द झाल्या आहे. म्हणजेच वि.प.ने तक्रारदाराची विमा क्लेमची रक्कम वेळेवर अदा न केलेने तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे व तक्रारदार व वि.प. यांचेकडून मानसिक त्रास व अर्जाचे खर्चाची रक्कम मिळणेस पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
सबब, प्रस्तुत कामी विमा क्लेमची रक्कम वि.प. ने तक्रारदाराला अदा केली आहे. परंतु तक्रारदार वि.प. यांचेकडून प्रस्तुत विमा क्लेमची रक्कम रु. 1,36,248/- या रक्कमेवर दि. 10-04-2012 तारखेपासून द.सा.द.शे. 9 % व्याजाची रक्कम तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- तक्रारदार वि.प. यांचेकडून मिळणेस पात्र आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. यांनी तक्रारदाराला विमा क्लेम रक्कम रु.1,36,248/-(रक्कम रुपये एक लाख छत्तीस हजार दोनशे अठ्ठेचाळी हजार मात्र) या रकमेवर दि. 10-04-2012 तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 % व्याजाची रक्कम अदा करावी.
3) मानसिक त्रासापोटी वि.प.ने तक्रारदाराला रक्कम रु. 10,000/- (अक्षरी रक्कम रुपये दहा हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच मात्र) अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत वि.प. यांनी मे. मंचाचे आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. नं. 2 विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.