श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे कथनांन्वये. - आदेश - (पारित दिनांक – 15/04/2014) तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण खालीलप्रमाणे. 1. तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 व 2 महिंद्रा अँड महिंद्रा प्रा.लि. यांनी उत्पादित केलेली VLX Automotive Transmission ही पांढ-या रंगाची गाडी वि.प.क्र. 3 उन्नती मोटर्स, नागपूर यांचेकडे बुक केली होती आणि त्याकरीता महिंद्रा अँड महिंद्रा फायनांस सर्व्हिस लिमि. यांचेकडून रु.8,00,000/- चे मुदती कर्ज घेतले. सदर गाडीची पूर्ण किंमत रु.10,38,102/- देऊन तक्रारकर्त्याने सदर गाडी वि.प.क्र. 3 कडून खरेदी केली होती व ती त्याच्या नावाने दि.20.04.2010 रोजी नोंदविण्यात आली. सदर गाडीचा इंजिन क्र. HCA4C16367 व चेसिस क्र. MA1TA2HCPA2C31364 होता. तक्रारकर्त्याने खरेदी केलेल्या वरील गाडीत लगेच तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आल्याने, तक्रारकर्त्याने दुरुस्तीसाठी सदर गाडी वि.प.क्र. 3 कडे 26.04.2010 रोजी जमा केली. सदर गाडीची तपासणी केल्यानंतर गाडीच्या गीयर बॉक्समध्ये (Gear Box) बिघाड असल्याचे वि.प.क्र. 3 यांनी सांगितले आणि गीयर बॉक्स बदलविण्याची आवश्यकता आहे, ते बदलविण्यासाठी 10 दिवसांकरीता गाडी त्यांच्याकडे जमा ठेवावी लागेल असे सांगितले. तक्रारकर्ता एका पायाने अपंग असल्याने त्याला दुसरी कोणतीही कार चालवीणे शक्य नव्हते. वि.प.क्र. 3 ने सदर वाहन त्यांचेकडे असेल त्या काळासाठी प्रतीदिन रु.1,000/- प्रमाणे तक्रारकर्त्याला देण्यात येतील असे सांगून आश्वस्त केले. वि.प.क्र. 3 यांनी सदर गाडीचा गीयर बॉक्स बदलवून ती दि.08.05.2010 ला तक्रारकर्त्याच्या ताब्यात दिली आणि कबूल केल्याप्रमाणे 10 दिवसांसाठीचा मोबदला म्हणून रु.10,000/- चा चेक क्र.69900 दि.08.05.2010 दिला. सदर दुरुस्त गाडी ताब्यात घेतल्यानंतर अल्पावधीतच पुन्हा दि.31.05.2010 रोजी सदर गाडीत ऑटोमॅटीक ट्रांसमीशनसंबंधी बिघाड आढळल्याने तक्रारकर्त्याने सदर गाडी वि.प.क्र. 3 कडे तपासणीसाठी दाखविली आणि पूर्वीप्रमाणेच बिघाड असल्याचे वि.प.क्र. 3 ने सांगितले. सदर तांत्रिक बिघाड पहिल्यावेळी 588 कि.मी. व दुस-यावेळी 2787 कि.मी.वर निर्माण झाल्याने सदर बिघाड गंभीर स्वरुपाचा असल्याने नविन महिंद्रा स्कॉर्पिआहे बदलवून देण्याची तयार दर्शवीली व त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने त्याची गाडी 26.06.2010 रोजी वि.प.क्र. 3 च्या ताब्यात दिली. त्यावेळी सदर गाडीने 4956 कि.मी. प्रवास केला होता. त्यावेळी वि.प.ने सांगितले की, गाडीची बदली प्रक्रीया ही पूर्णतः त्या गाडीच्या उपलब्धतेवर अवलंबून असल्याने नविन गाडी बदलवून देण्याच्या सर्व प्रक्रीयेस 30 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तक्रारकर्त्याने एक आठवडयात गाडी द्यावी म्हणून विनंती केली. परंतू त्यास वि.प.क्र. 3 ने प्रतिसाद दिला नाही. त्याऐवजी गाडी बदलवून देण्यासाठी लागणा-या 30 दिवसांकरीता प्रतिदिन रु.1,000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे नविन गाडी मिळण्यासाठी तक्रारकर्त्याने आपली जुनी गाडी 27.06.2010 रोजी वि.प.क्र. 3 च्या ताब्यात दिली. तक्रारकर्त्याने त्याची पहिली गाडी विकत घेतल्यानंतर सजावटीसाठी व इतर साहित्यासाठी साधारणतः रु.25,000/- खर्च केले होते व त्यास सर्व सजावट व साहित्यासह वि.प.क्र.3 कडे सोपविली होती. त्याबाबत जॉबकार्डवर नोंद घेतली होती. शिवाय, सदर गाडीच्या काचेवर फिल्म लावण्यासाठी व इतर कामासाठी अनुक्रमे रु.6,700/- व रु.5,069/- खर्च झाल्याचे तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 3 ला सांगितले होते व त्याबाबतची नोंद जॉब कार्डवर करुन घेतली होती. याशिवाय, तक्रारकर्त्याने पहिल्या गाडीच्या नोंदणीसाठी केलेला खर्च रु.10,000/- परतफेड करण्याचे वि.प.ने मान्य केले होते. वि.प.ने तक्रारकर्त्यास नविन गाडी दि.29.07.2010 रोजी दिली. तिचा चेसिस क्र. MAITA2HCPA2G53089 व इंजिन क्र. HCA4G37054 असा आहे. परंतू सदर गाडी बदलवून देण्यासाठी जो 33 दिवसांचा कालावधी लागला, त्या कालावधीसाठी कबूल केल्याप्रमाणे दररोज रु.1,000/- प्रमाणे रु.33,000/- मोबदला अद्यापपर्यंत वि.प.ने तक्रारकर्त्यास दिला नाही. तसेच तक्रारकर्त्याने जुन्या गाडीच्या सजावटीसाठी केलेला खर्च, रजिस्ट्रेशन खर्च आणि एक्सेसरीज यासाठीचा खर्चदेखील वि.प.ने नविन गाडी तक्रारकर्त्याच्या ताब्यात देतांना देणे आवश्यक होते. कारण सदर खर्च वि.प.ने तक्रारकर्त्यास पूर्वीच्या सदोष कार विकल्यामुळे सोसावा लागला होता. सदर बाब ही वि.प.क्र. 1 ते 3 यांनी ग्राहकांप्रती आचरलेली सेवेतील न्यूनता, तसेच अनुचित व्यापार पध्दत आहे. त्यामुळे वरील रकमेच्या भरपाईबाबत तक्रारकर्त्याने दि.29.07.2010 रोजी वकिलांमार्फत नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. परंतू वि.प.कडून मागणीची पूर्तता झाली नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल केली असून त्यात खालीलप्रमाणे मागणी केली आहे. 1) नुकसान भरपाईची रक्कम रु.33,000/- ही 20 टक्के व्याजासह वि.प.ने द्यावी. 2) सदोष गाडीवर एक्सेसरीज, इतर सजावटीच्या साहित्यावर व आर.टी.ओ.रजिस्ट्रेशनवर केलेल्या खर्चाची रक्कम रु.25,000/- व रु.10,000/- अनुक्रमे 20 टक्के व्याजासह परत करावी. 3) वि.प.क्र. 1 ते 3 यांनी सदोष व तांत्रिक बिघाड असलेली गाडी विकल्याने, व्यवसायात झालेले नुकसान आणि मानसिक व शारिरीक त्रास, असुविधा इ. बाबींबाबत नुकसान भरपाई म्हणून रु.2,00,000/- ची मागणी केलेली आहे. 4) तक्रारीच्या खर्चाची मागणी. 2. वि.प.क्र. 1 व 2 यांनी दि. 29.08.2011 रोजी व वि.प.क्र. 3 यांनी दि.07.05.2011 रोजी लेखी बयान दाखल करुन तक्रारीस सक्त विरोध केला आहे. त्यांनी तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केलेली महिंद्रा स्कॉर्पीओ VLX Automotive Transmission कार खरेदी केली होती व त्यातील ऑटोमॅटिक ट्रांसमशिनमध्ये बिघाड झाल्याने तक्रारकर्त्यास तक्रारीत नमूद केलेली नविन स्कॉर्पीओ कार देण्यात आली ही बाब मान्य आहे. मात्र पहिली कार बदलवून नविन कार देण्यासाठी जो 33 दिवसांचा कालावधी लागला, त्या कालावधीसाठी प्रतीदिन रु.1,000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची वि.प.ने कबूल केले होते ही बाब नाकबूल केली आहे. याशिवाय, ही बाब पहिली कार विकत घेतल्यानंतर तिच्या सजावटीवर व फिल्मकरीता किती खर्च करावा ही बाब पूर्णतः तक्रारकर्त्याच्या स्वाधीन होती. दुसरी कार बदलवून दिल्यामुळे वरील सर्व सजावटीसह आणि फिल्मसह तक्रारकर्त्याने पहिली कार वि.प.च्या स्वाधीन केली. कारण केलेली सजावट, पेंटींग आणि फिल्म या वस्तू गाडीपासून वेगळया करुन वापरता येत नाही आणि त्यामुळे त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारकर्ता पात्र नाही. याशिवाय, त्याचे म्हणणे असे की, तक्रारकर्त्याच्या पूर्वीच्या गाडीमध्ये ऑटोमॅटीक ट्रासंमशिन असेंब्ली म्हणजे गीयर सीस्टीममध्ये बिघाड असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारकर्त्यास त्या गाडीचा गीयर बॉक्स बदलवून देण्याची कबूली वि.प.ने दर्शविली होती आणि सदर गीयर बॉक्स बदलवून देईपर्यंत जो कालावधी लागेल, त्यासाठी दररोज रु.1,000/- प्रमाणे मोबदला देण्याचे कबूल केले होते. परंतू तक्रारकर्त्याने गीयर बॉक्स बदलवून नको, मला नविन गाडी पाहिजे असा आग्रह केल्याने कंपनीची प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि तक्रारकर्त्यास संतुष्ट करण्यासाठी, त्यास वि.प.ने नविन गाडी देण्याचे कबूल केले व त्या बदल्यात जुनी गाडी आहे तशी घेण्याचे मान्य केले. मात्र यासाठी लागणा-या अवधीसाठी दररोजप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा कोणताही करार वि.प.ने केलेला नव्हता. एवढेच नव्हे तर, तक्रारकर्त्याला गाडी बदलवून दिली तेव्हा, एकमुस्त नुकसान भरपाईदाखल वि.प.ने रु.10,000/- चा चेक क्र. 075596 दि.13.09.2010 रोजी पूर्ण व अंतिम निपटा-यापोटी दिलेली आहे. त्यावेळी तक्रारकर्त्याने कोणताही उजर केला नाही. मात्र वि.प.च्या पत्राचा चुकीचा अर्थ काढून वि.प.कडून जास्तीत जास्त रक्कम उकळण्याच्या हेतूने दि.01.10.2010 रोजी खोटी नोटीस पाठविली आणि सदर खोटी तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. म्हणून ती खर्चासह खारीज करावी अशी विनंती केली. तक्रारकर्त्याने नोंदणीकरीता केलेला खर्च रु.10,000/- वि.प.ने सोसावा ही मागणी कायद्याला धरुन नाही. जुनी गाडी बदलवून नविन गाडी देण्यात आली, त्यावेळी अशी कोणतीही मागणी तक्रारकर्त्याने केलेली नव्हती. तक्रारकर्त्याला एकमुस्त व अंतिम निपटा-यापोठी वि.प.ने रु.10,000/- चेक क्र. 075596 दि.13.09.2010 रोजी दिल्याची बाब तक्रारकर्त्याने मंचापासून लपवून ठेवली. 3. सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे मंचाने अवलोकन केले असता मंचाचे विचारार्थ मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे. मुद्दे निष्कर्ष 1) तक्रारकर्त्याची तक्रार दाद मिळण्यास पात्र आहे काय होय. 2) आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. -कारणमिमांसा-
4. मुद्दा क्र. 1 बाबत - सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 व 2 महिंद्रा अँड महिंद्रा प्रा.लि. यांनी उत्पादित केलेली VLX Automotive Transmission ही गाडी जिचा इंजिन क्र. HCA4C16367 व चेसिस क्र. MA1TA2HCPA2C31364 होता, ती वि.प.क्र.3 कडून रु.10,38,102/- मध्ये विकत घेतली, याबाबत वाद नाही. त्याबाबत तक्रारकर्त्याने बिलाची प्रत दस्तऐवज क्र. 1 वर दाखल केली आहे. तसेच सदर वाहनात Automotive Transmission मध्ये बिघाड निर्माण झाल्याने सदर वाहन वि.प.क्र. 3 कडे दुरुस्तीकरीता नेले आणि त्याने त्या वाहनातील गियर बॉक्स बदलावा लागेल असे सांगितले आणि सदर वाहन गियर बॉक्स बदलविण्यासाठी वि.प.क्र. 3 कडे सोपविले याबाबतही उभय पक्षात वाद नाही. परंतू तक्रारकर्त्याने गीयर बॉक्स न बदलविता पूर्ण वाहनच बदलवून नविन वाहन द्यावे अशी विनंती केली व ती त्यांनी मान्य केली आणि त्याप्रमाणे दि.29.07.2010 ला नविन वाहन चेसिस क्र. MAITA2HCPA2G53089 व इंजिन क्र. HCA4G37054 असलेले वाहन दिले, याबाबतही उभय पक्षात वाद नाही. तक्रारकर्त्याचे म्हणणे असे की, त्याचे जुने वाहन स्विकारतांना वाहन देण्यासाठी जो कालावधी लागेल, त्या कालावधीसाठी दररोज रु.1,000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची वि.प.क्र. 3 ने कबूल केले होते, या म्हणण्याच्या पुष्टयर्थ तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 3 उन्नती मोटर्स यांचें दि.26.06.2010 चे पत्र दस्तऐवज क्र. 4 वर दाखल केले आहे. सदर पत्रातील मजकूर खालीलप्रमाणे-
“This is regarding your Scorpio VLX Automatic bearing VIN: MAITA2HCPA2C31364 which was sold by us on 20/04/2010. The vehicle occurred a technical problem of Automatic Transmission failure on 27/04/2010 at 588 kms, which was solved and redelivered to you on 12/05/2010. The vehicle again faced a technical problem related to Automatic Transmission on 31/05/2010 at 2787 kms. After looking towards repeated Automatic Transmission Failure, M & M has decided to replace your vehicle with a new Scorpio VLx Automatic. This process of replacement of your vehicle will depend upon the availability which will take atleast 30 days. Today on 26/06/2010 we are taking custody of vehicle at 4956 kms. M & M has also decided to compensate you Rs.1000/- per day, from the date of your second complaint till the arrival of new Automatic Transmission Assly for your Scorpio.” 5. वि.प.चे म्हणणे असे की, सदर पत्रात दररोज रु.1,000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची कबुली ही फक्त नादुरुस्त गीयर बॉक्स बदलवून देण्यासाठी लागणा-या कालावधीसाठी होती. परंतू प्रत्यक्षात तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे नविन वाहन बदलवून देण्यात आले असल्यामुळे वरील पत्रातील अट लागू होत नाही. 6. वरील पत्रातील मजकुराचे वाचन केले असता ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याला वि.प.ने विकलेले पहिले वाहन 588 कि.मी. चालल्यानंतर दि.27.04.2010 रोजी त्यात दोष आढळला. सदर दोष दुरुस्त करुन वाहन तक्रारकर्त्यास दि.12.05.2010 परत करण्यात आले. परंतू त्यानंतर वाहनात पुन्हा ऑटोमॅटीक ट्रांसमशिन संबंधित दोष दि.31.05.2010 रोजी जेव्हा वाहन 2787 कि.मि. चालले होते, तेव्हा उद्भवले. दि.26.06.2010 रोजी तक्रारकर्त्याने ते वि.प.क्र. 3 कडे नेले आणि त्यात पुन्हा सदर दोष निर्माण झाल्याचे सांगितले. यावरुन वि.प.क्र. 3 यांनी सदर वाहन ऑटोमॅटीक ट्रांसमशिन फेल्युअरमुळे सतत उद्भवणा-या दोषावर कायमचा उपाय म्हणून वि.प. महिंद्रा अँड महिंद्रा यांनी संपूर्ण वाहनच बदलवून देण्याचे ठरविले आहे असे तक्रारकर्त्यास सांगितले आणि नविन वाहन बदलवून देण्यासाठी (Replacement of your vehicle) वाहन उपलब्ध होईपर्यंत जवळपास 30 दिवसांचा कालावधी लागेल आणि सदर कालावधीत 26.06.2010 रोजी वाहन ताब्यात घेतल्यापासून नविन वाहन येईपर्यंतच्या कालावधीसाठी दररोज रु.1,000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल अशी कबूली दिली आहे. 7. वि.प.क्र. 3 यांच्या वरील पत्राप्रमाणे, त्यांना आपले वाहन बदलवून दुसरे वाहन देण्यासाठी ज्यादिवशी वाहन ताब्यात घेतले, त्या दिवसापासून म्हणजे दि.26.06.2010 पासून दुसरे वाहन तक्रारकर्त्यास ताब्यात दिले त्या दिवशीपर्यंत म्हणजे 29.07.2010 पर्यंत दररोज रु.1,000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले होते हे स्पष्ट होते. परंतू अशी नुकसान भरपाईची रक्कम दिली असल्याबाबत वि.प.चे म्हणणे नाही. त्यांचे म्हणणे असे की, तक्रारकर्त्यास पहिले वाहन बदलवून नव्याने वाहन दि.29.07.2010 रोजी ताब्यात दिल्यानंतर एकमुस्त व अंतिम सेटलमेंटचा चेक क्र. 075596 रु.10,000/- दि.13.09.2010 चा देण्यात आला व सदर रक्कम फुल अँड फायनल सेंटलमेंट म्हणून तक्रारकर्त्याने स्विकारली आहे. त्यामुळे आता त्याला वरीलप्रमाणे रु.33,000/- किंवा कोणतीही रक्कम वि.प.कडून मागण्याचा अधिकार राहिला नाही. 8. तक्रारकर्त्याचे पुढे म्हणणे असे की, त्याने पहिले वाहन खरेदी केल्यानंतर त्यास अतिरिक्त कामाकरीता आणि सजावटीकरीता रु.25,000/- खर्च केला. तसेच काचेवर फिल्म लावण्याकरीता व इतर कामाकरीता अनुक्रमे रु.6,700/- व रु.5,069/- आणि नोंदणीकरीता रु.10,000/- खर्च केला याचीही रक्कम वि.प.ने देण्याचे कबूल केले होते. परंतू तीदेखील दिलेली नाही. वि.प.ने वरील खर्चाची रक्कम देण्याचे कबूल केले होते, यासंबंधाने कोणताही दस्तऐवज तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. त्यांचे म्हणणे की, जेव्हा आपले वाहन वि.प.क्र. 3 च्या ताब्यात देण्यात आले, त्यावेळी सदर वाहनाच्या जॉब कार्डमध्ये एक्सेसरीज विशेषतः पेंटींग आणि काचेवर लावलेल्या फिल्मचा उल्लेख आहे. त्यामुळे वरील मागणी केलेली रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. याउलट, वि.प.चे म्हणणे असे की, त्याने वरीलप्रमाणे कोणतीही रक्कम देण्याचे कुठेही आश्वासन दिले नव्हते. याशिवाय, तक्रारकर्त्याने आपल्या गाडीला केलेले पेंटींग, एक्सेसरीज, तसेच काचेवर लावलेले फिल्म या गाडीपासून वेगळे करुन वापरता येत नाही. त्यामुळे त्याबाबत कोणतीही रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र नाही. याशिवाय, तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 5 ब, क प्रमाणे जे फिल्मचे बिल दाखल केले आहे, त्यावर कोठेही तक्रारकर्ता विनोद उसकेलवार यांचे नाव नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने त्याचे गाडीवर बिलातील नमूद रक्कम खर्च केली या म्हणण्यास कोणताही आधार नाही. 9. याउलट, वि.प.चे म्हणणे असे की, तक्रारकर्त्यास पहिल्या गाडीचे बदल्यात दुसरी नविन गाडी देण्यात आली असल्यामुळे पहिल्या गाडीच्या नोंदणीसाठी केलेला खर्च किंवा सजावटीसाठी केलेला खर्च देण्याची वि.प.क्र. 1 ते 3 यांची कोणतीही जबाबदारी नाही. त्यांचे म्हणणे असे की, तक्रारकर्त्याने एकमुस्त नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- स्विकारले. त्याबाबत तक्रारकर्त्यास दिलेला चेक क्र. 075596 दि.13.09.2010 ची झेरॉक्स प्रत दस्तऐवज क्र. 3 वर दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने आपल्या प्रतिउत्तरात सदर रु.10,000/- ची रक्कम ही वि.प.क्र. 3 यांनी आर.टी.ओ. रजिस्ट्रेशनबाबत तक्रारकर्त्याला बसलेल्या भुर्दंडाबाबत दिली असल्याचे म्हटले आहे. एकंदरीत वरील चेकप्रमाणे रु.10,000/- तक्रारकर्त्यास मिळाल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या कबूल केले आहे. मात्र सदर रक्कम फुल अँड फायनल सेंटलमेंटबद्दल मिळाल्याबाबत तक्रारकर्त्याकडून कोणतीही पावती वि.प.ने घेतलेली नाही व तसा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. यावरुन तक्रारकर्त्यास वि.प.ने वरीलप्रमाणे रु.10,000/- दिले, हे जरीही सिध्द होत असलेतरी दि.26.06.2010 रोजीच्या पत्रात कबूल केल्याप्रमाणे दररोज रु.1,000/- प्रमाणे दुसरी गाडी देईपर्यंतच्या 33 दिवसाच्या काळासाठी रु.33,000/- देण्याच्या जबाबदारीतून वि.प. मुक्त होऊ शकत नाही. तक्रारकर्त्याने मागणी करुनही वि.प.ने सदर रक्कम न देणे ही निश्चितच ग्राहकांप्रती अवलंबिलेली सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे असे मंचास वाटते. मात्र वरील रकमेशिवाय तक्रारकर्त्याने तक्रारीत मागणी केलेली अन्य रकमेबाबत कोणताही समर्थनीय पुरावा दाखल केला नाही, म्हणून इतर मागणी मंजूर करणे योग्य होणार नाही. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे. 10. मुद्दा क्र. 2 बाबत – सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने दि.26.06.2010 रोजी त्याचे वाहन वि.प.क्र. 3 च्या ताब्यात दिले नाही. सदर वाहनाची बदली नविन वाहन दि.29.07.2010 रोजी मिळेपर्यंत 33 दिवसासाठी दररोज रु.1,000/- प्रमाणे रु.33,000/- नुकसान भरपाई, पहिल्या गाडीवर एक्सेसरीज, सजावट व फिल्म लावण्यासाठी, तसेच रजिस्ट्रेशनकरीता केलेला खर्च मिळून रु.35,000/-, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत रु.2,00,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावे, तसेच वरीलप्रमाणे देय रकमेवर द.सा.द.शे. 20 टक्केप्रमाणे व्याज मिळावा अशी मागणी केली आहे. 11. दि.26.06.2010 रोजीचा वि.प.क्र. 3 उन्नती मोटर्स यांनी तक्रारकर्ता विनोद उसकेलवार यास दिलेले पत्र दस्तऐवज क्र. 4 मध्ये जुने वाहन देऊन नविन स्कॉर्पीओ VLX Automotive Transmission बदलवून देईपर्यंतच्या कालावधीसाठी दि.26.06.2010 पासून नविन वाहन येईपर्यंतच्या कालावधीकरीता दररोज रु.1,000/- प्रमाणे भरपाई देण्याचे कबूल केले होते. नविन वाहन दि.29.07.2010 रोजी देण्यात आले. त्यामुळे वरील पत्राप्रमाणे 33 दिवसांच्या कालावधीसाठी तक्रारकर्ता वि.प.कडून रु.33,000/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र होता. सदर रकमेबाबत वि.प.ने 13.09.2010 रोजी रु.10,000/- चा चेक दिला व त्याची रक्कम तक्रारकर्त्यास मिळाल्याचे तक्रारकर्त्याने कबूल केले आहे. मात्र तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे सदर रक्कम ही वि.प.ने त्यास पहिल्या गाडीवर करावे लागलेल्या नोंदणी खर्चापोटी दिलेले होते. त्यामुळे त्या रकमेचा आणि नुकसान भरपाईच्या रकमेचा संबंध नाही. याउलट, वि.प.चे म्हणणे असे की, तक्रारकर्त्याला दिलेली रक्कम रु.10,000/- ही देणे असलेल्या फुल अँड फायनल सेटलमेंटपोटी दिली होती व नविन गाडी मिळाल्यामुळे, त्या रकमेने तक्रारकर्ता पूर्ण समाधानी झाला होता, त्यामुळे आता तक्रारकर्त्यास वि.प.कडून कोणत्याही प्रकारची रक्कम देणे नाही. 12. वि.प.ने दिलेली वरील रक्कम रु.10,000/- ही फुल अँड फायनल सेटलमेंटपोटी होती याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे वि.प.ने त्यास पहिल्या गाडीचा नोंदणी खर्च रु.10,000/- आणि सजावट खर्च रु.25,000/- देण्याचे आश्वासन दिले होते हे दर्शविणारा कोणताही पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. 13. आपल्या गाडीवर केलेली सजावट, एक्सेसरीज व फिल्म लावण्याचा खर्च ती गाडी परत घेतल्यानंतर, तक्रारकर्त्यास देण्यात येईल असे वि.प.ने आश्वासन दिले होते याबाबत कोणताही पुरावा नाही. गाडीची सजावट, एक्सेसरीज व फिल्म या गाडीपासून वेगळया करुन वापरण्याच्या वस्तू नाही, त्यामुळे कोणत्याही विशेष कराराअभावी त्या वस्तूंची किंमत मिळण्यास तक्रारकर्ता पात्र नाही. वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारकर्ता पहिली गाडी वि.प.क्र. 3 चे स्वाधीन केल्यानंतर दुसरी गाडी मिळेपर्यंतच्या कालावधीसाठी रु.33,000/- नुकसान भरपाई रुपात मिळण्यास पात्र होतो व त्यापोटी वि.प.ने केवळ रु.10,000/- दिलेले असल्याने उर्वरित रक्कम रु.23,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने दि.04.10.2010 रोजी दस्तऐवज क्र. 10 वरील नोटीस पाठवून सदर रकमेची मागणी केली होती. परंतू वि.प.कडून सदर नोटीसची दखल घेण्यात आली नाही किंवा नोटीसला उत्तरदेखील देण्यात आले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यास मंचासमोर दाद मागावी लागली. त्यामुळे तक्रार दाखल तारखेपासून सदर रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के व्याजाप्रमाणे व्याज मिळण्यास देखील तक्रारकर्ता पात्र आहे असे मंचाचे मत आहे. वरील कारणांमुळे मुद्दा क्र. 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे. वरील निष्कर्षास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे. -आदेश-
1) तक्रारकर्त्याची ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. वि.प.क्र. 1 ते 3 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी संयुक्त किंवा वैयक्तीक रीत्या तक्रारकर्त्यास रु.23,000/- तक्रार दाखल दि.22.03.2011 पासून पूर्ण रकमेच्या अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह सदर रक्कम अदा करावी. 2) वि.प.क्र. 1 ते 3 संयुक्त किंवा वैयक्तीक रीत्या तक्रारकर्त्यास मानसिक व शारिरीक त्रासाबाबत नुकसान भरपाईदाखल रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.2,000/- द्यावे. 3) सदर आदेशाची पूर्तता वि.प.क्र. 1 ते 3 यांनी संयुक्तरीत्या किंवा वैयक्तीकरीत्या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आत करावी. |