
View 7579 Cases Against Electricity
View 222 Cases Against Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.
SHRI AVINASH RAMCHANDRA KUDALKAR filed a consumer case on 26 May 2015 against MAHARASHTRA STATE ELECTRICITY DISTRIBUTION CO. LTD. THROUGH ASSISTANT EXECUTIVE ENGINEER in the Sangli Consumer Court. The case no is CC/14/212 and the judgment uploaded on 18 Jun 2015.
नि.20
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या - सौ वर्षा नं. शिंदे
मा.सदस्या - सौ मनिषा कुलकर्णी
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 212/2014
तक्रार नोंद तारीख : 27/08/2014
तक्रार दाखल तारीख : 06/12/2014
निकाल तारीख : 26/05/2015
श्री अविनाश रामचंद्र कुडाळकर
रा.प्लॉट नं.1, राष्ट्रशक्ती ओंकार सदन,
कोल्हापूर रोड, सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.
समन्स मा.कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.कं.मर्या., दक्षिण उपविभाग (शहर सांगली)
खणभाग, सांगली ......... सामनेवाला
तक्रारदार तर्फे : अॅड श्री डी.ए.जाधव जाबदार तर्फे : अॅड श्री एस.ए.मोहिते
- नि का ल प त्र -
द्वारा : मा. सदस्या : सौ वर्षा नं. शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार, तक्रारदाराने त्याचे नावे असलेल्या सामूहिक वीज कनेक्शनच्या देयकाची थक रक्कम त्याचे व्यक्तिगत वीज कनेक्शनच्या देयकाकडे वर्ग करुन बेकायदेशीरपणे वीज पुरवठा खंडीत करुन सामनेवाला याने सेवात्रुटी केलेने दाखल केली आहे. प्रस्तुत तक्रार अर्ज स्वीकृत करुन सामनेवाला यांना नोटीस आदेश झाला. सामनेवालांना नोटीस लागू झालेनंतर सामनेवाला हे वकीलांमार्फत मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.14 वर लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदार व सामनेवाला यांच्या वकिलांचा अंतिम युक्तिवाद ऐकला.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी -
सांगली शहरातील सी.स.नं.11528 या मिळकतीवर राष्ट्रशक्ती ओंकार सदन या नावाने, ओंकार कन्स्ट्रक्शन प्रोपा.उत्तम आरगे यांनी अपार्टमेंट बांधली आहे. सदर अपार्टमेंटमध्ये सदर मिळकतधारक व दुकानदार धरुन 11 जण आहेत. तक्रारदाराने सदर इमारतीमधील फ्लॅट नमूद बांधकाम कंत्राटदार यांचेकडून विकत घेतलेला आहे व त्याचे स्वतःचे मालकीचे फलॅटसाठी त्याने वैयक्तिक वीज कनेक्शन स्वतंत्रपणे घेतले आहे. नमूद इमारतीमधील सदनिकाधारकांची सोसायटी स्थापन न झालेने इमारत बांधणार यांनी अर्ज देवून सदर इमारतीच्या समाईक सुविधांसाठी लागणारे वीज कनेक्शन बिल्डर यांनी तक्रारदार याचे नावे घेण्यात आले व सदर वीज कनेक्शन 2009 पासून चालू राहिले. वस्तुतः समाईक वीज कनेक्शन सोसायटीचे नावे वर्ग होणे आवश्यक होते व ते वर्ग न झालेने एकाच इमारतीमध्ये एकाच व्यक्तीचे नावाने दोन वीज कनेक्शन देता येत नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांचे एक कनेक्शन बंद करणे किंवा दुसरे वीज कनेकशन न देणे हे बंधनकारक सामनेवाला यांचेवर होते.
जानेवारी व फेब्रुवारी 2013 चे दरम्यान पाण्याचा अपुरा पुरवठा होवू लागल्याने तक्रारदाराने एप्रिल 2013 च्या पहिल्या आठवडयात स्वतंत्रपणे पाण्याचे कनेक्शन घेतले. त्यामुळे त्याने समाईकातील वीज वापर बंद केला. एप्रिल 2013 पासून इतर सर्व सदनिका धारकांनी समाईक वीज कनेक्शनची बिलाची रक्कम भरणे आवश्यक होती ती रक्कम भरली नाही. त्यामुळे समाईक वीज कनेक्शनचा विद्युत पुरवठा कायमचा बंद केला. मात्र प्रत्यक्ष कागदोपत्री त्याची नोंद केली नाही. त्यामुळे सदर बील रु.8000 पासून 18000 पर्यंत वाढत गेले. तक्रारदाराचे नावे असलेले समाईक वीज कनेक्शनची थकबाकी असलेमुळे सामनेवाला यांनी अर्जदार यांना थकीत बिल भरणेबाबत कळविले. त्यावेळी तक्रारदाराने सामनेवाला यांना पत्र देवून इमारतीमधील फलॅटधारक व दुकानदार यांच्या नावाने समाईक हिश्श्याने रक्कम वर्ग करणेबाबत दि.25/6/12 रोजी अर्ज देवून कळविले. तसेच बिल्डर उत्तम आरगे यांनीही तसे कळविले. मात्र सामनेवाला यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. उलटपक्षी दि.2/8/13 रोजी इतर फ्लॅटधारकांचा अर्ज आल्याचे सांगितले. त्यामुळे दि.28/8/13 रोजी नमूद फ्लॅटधारकांना वकीलांमार्फत नमूद नोटीस पाठविली. तसेच नमूद फ्लॅटधारकाने सामनेवालांना दि.4/8/13 रोजी लेखी पत्र देवून त्यांच्या नावाने थकीत बिल वर्ग करण्याचे सांगितले तरी कोणताही निर्णय न घेता सामनेवालाने वीज कनेक्शन बंद केले. तसेच तक्रारदार हे बिल भरण्यास तयार असतानाही तक्रारदाराचे कनेक्शन दि.28/1/14 रोजी बंद केले. अशा प्रकारे सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन दोषयुक्त सेवा दिली आहे.
तक्रारदाराचे नावाने थकीत वीज बिलापोटी रक्कम रु.14,160/- भरुन घेतले आणि दि.4/2/14 रोजी तक्रारदार याचे वैयक्तिक कनेक्शन पूर्ववत केले. मात्र समाईक कनेक्शनच्या वेळी भरलेली सुरक्षा ठेव परत दिलेली नाही. तसेच तक्रारदार याने स्वतः मीटर घेतले असल्याने मीटरची किंमत वजा केली नाही. सामनेवाला यांनी कायद्याप्रमाणे मागील तीन महिन्याची थकबाकी फक्त वसुल करता येते, अशी वस्तुस्थिती असतानाही आपल्या मक्तेदारीचा वापर करुन बेकायदेशीरपणे समाईक वीज कनेक्शनची थकबाकी तक्रारदार याचे वैयक्तिक कनेक्शनच्या खातेवर चढविली. त्यासाठी तक्रारदाराचा वैयक्तिक वीज पुरवठा बंद केला. तक्रारदाराने सामनेवालांकडे कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी सामनेवाला यांनी त्यांचा खोटेपणा जाहीर होईल म्हणून कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे माहिती अधिकाराखाली कागदपत्रांची मागणी केली परंतु संपूर्ण माहिती दिली नाही. तक्रारदाराची काहीही चूक नसताना तक्रारदाराचे वैयक्तिक वीज कनेक्शन बंद केलेने चार ते पाच दिवस अंधारात बसावे लागले. त्यामुळे कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागला. सबब, प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले.
सबब, तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन तक्रारदाराचे नावाने थकीत वीज बिलापोटी भरलेली रक्कम रु.14,160/- व्याजासह परत देणेबाबत आदेश व्हावा, अर्जदाराकडे एप्रिल 2013 मध्ये रु.8000 ची बाकी असताना सुध्दा रक्कम रु.14160/- भरुन घेतली ही मागणी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करणारी आहे असे ठरवून मिळावे, वैकल्पिकरित्या रु.14,160/- ही रक्कम परत देणे शक्य नाही अशा निर्णयाप्रत मंच आल्यास जादा वसुल केलेली रक्कम रु.6,000/- व्याजासह देणेबाबत आदेश व्हावा, समाईक वीज कनेक्शनपोटी डिपॉझिट म्हणून घेतलेली रक्कम रु.1,500/- व्याजासह देणेबाबत आदेश व्हावा, तक्रारदार यांचे समाईक वापराची वीज मीटरची किंमत व्याजासह परत देणेबाबत आदेश व्हावा, तक्रारदाराचे वैयक्तिक वीज कनेक्शन बंद केलेबद्दल नुकसानीची रक्कम रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केलेली आहे.
3. आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारदाराने नि.2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे. तसेच नि.4 चे फेरिस्त अन्वये तक्रारदाराने, बिल्डर उत्तम आरगे, विजय इंगळे व इतरांनी सामनेवालांना दिलेली पत्रे, तक्रारदाराने सदनिका धारकांना पाठविलेली नोटीस, पोलिस स्टेशनला केलेल्या तक्रारअर्जाची प्रत, इ. च्या सत्यप्रती, सामनेवाला यांनी तक्रारदारास वीज कनेक्शन तोडलेबाबत पाठविलेला अहवाल व सामनेवालांकडे बिल भरलेली पावती, रिकनेक्शनसाठी भरलेल्या चार्जेसची पावती, माहिती अधिकाराला दिलेले उत्तर यांच्या मूळ प्रती, नि.19 वर तक्रारअर्जासोबत दिलेले शपथपत्र हेच पुराव्याचे शपथपत्र म्हणून वाचणेत यावे अशी पुरसीस दाखल केलेली आहे.
4. सामनेवाला यांना नोटीस लागू झालेनंतर ते वकीलांमार्फत हजर झाले व नि. 14 ला दाखल केलेल्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, नमूद राष्ट्रशक्ती ओंकार सदन या अपार्टमेंटमधील सदनिकाधारक व दुकानगाळेधारक असे 14 जण आहेत. वास्तविकरित्या, नमूद अपार्टमेंटचे बिल्डर प्रोप्रा. उत्तम आरगे यांनी सदर अपार्टमेंटमधील फ्लॅट मिळकती व दुकान गाळयामध्ये वीज कनेक्शन मिळणेसाठी स्वतःचे नावे वीज कनेक्शनची कोटेशन भरलेली होती. दरम्यानच्या काळात फ्लॅट व दुकान गाळयाची विक्री झाल्याने सदर धारकांचे नावे वीज कनेक्शन वर्ग करणेबाबतचे संमतीपत्र त्याने कंपनीस दिले होते. त्यामुळे सदर अपार्टमेंटमधील वीज कनेक्शन्स सदर धारकांच्या नावाने देण्यात आलेली आहेत. तक्रारदार याचे नावे देण्यात आलेले वैयक्तिक वीज कनेक्शनचा वीज ग्राहक क्र.279940988670 असा असून तक्रारदाराचेच नावे, असणारे समाईक वीज कनेक्शनचा ग्राहक क्र. 2799409916035 असा आहे. अपार्टमेंटमधील समाईक वीज वापराचे कनेक्शन हे सर्व फ्लॅटधारकांनी मिळून स्थापन केलेल्या सोसायटीचे नावे देणेचे असते व त्याची बिलाची रक्कम सर्वांनी मिळून गोळा करुन देयकापोटी भरण्याची असते. मात्र सदर धारकाने सोसायटी स्थापन न केल्यामुळे त्यांचे मागणीनुसार व विनंतीनुसार व त्यांच्या सोयीकरिता सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या मागणीप्रमाणे समाईक वीज वापराचे कनेक्शन तक्रारदाराचे नावे दिले यात गैर काहीच नाही. सदर वीज बिलाची संपूर्ण रक्कम तक्रारदार हे कधीही पूर्णपणे भरणा करीत नव्हते, तर अर्धवट रक्कम ते भरणा करीत होते ही बाब सी.पी.एल. वरुन स्पष्ट दिसून येते. नमूद समाईक कनेक्शनचे मार्च 2013 चे वीज बिल हे 579 युनिटचे होते व मागील थकबाकी मिळून ते रु.10493.97 पैसे इतके होते. अशा प्रकारे मार्च, एप्रिल, मे मध्ये सदरचा थक वाढतच गेला. एप्रिल 2013 अखेर सदरचा थक रु.10501.20 पैसे तक्रारदारास देणेत आला. सामनेवाला याने तक्रारदारास वारंवार सूचित करुनही तक्रारदार वीज देयके भरत नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव तक्रारदाराचे नावे असलेल्या समाईक वीज कनेक्शनचा विद्युत पुरवठा दि.13/5/13 रोजी तात्पुरत्या स्वरुपात खंडीत करण्यात आला. त्यामुळे पुढील जून जुलैचे रिडींग घेता न आल्यामुळे सदर महिन्याची बिले मागील अॅव्हरेज युनिटप्रमाणे प्रत्येकी 517 युनिटची देण्यात आली. त्यामुळे जुलै 2013 अखेरची वीज बिल रक्कम रु.18321.41 पैसेचे देण्यात आले. सदर बिलाची रक्कम तक्रारदार भरणा करीत नसल्याने दि.8/8/13 रोजी सदर समाईक वीज कनेक्शनचा विद्युत पुरवठा कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला व सदरचे वीज मीटर काढून आणले. त्यावेळी मीटरचे रिडींग 23451 असे होते. सदर रिडींगवरुन तात्पुरता वीज पुरवठा खंडीत केलेवेळचे म्हणजेच मे 2013 चे रिडींग 23387 वजा केले असता 64 युनिट येते. त्यामुळे केवळ दरम्यानच्या काळात झालेला 64 युनिटचा वापर विचारात घेवून तदनंतर दिलेली प्रतिमाह 517 युनिटची सरासरी बिलाची एकूण युनिट 1034 मधून 64 युनिट वजा करुन उर्वरीत 970 युनिटच्या बिलाची होणारी रक्कम रु.7205.89 पैसे वजा करुन तक्रारदारास सदर रकमेची सूट दिली. त्यामुळे रु.18341.41 वजा रु.7205.89 पैसे करिता होणारी रक्कम रु.11115.52 पैसे असे जुलै 2013 अखेरचे वीज बिल राऊंड फिगर रु.11,120/- चे देण्यात आले हे सीपीएल वरुन स्पष्ट होते. सदर दिलेली वीज देयके नियमाप्रमाणे योग्य व बरोबर आहेत व ती तक्रारदाराने वापरलेल्या युनिटनुसार दिलेली आहेत.
समाईक वीज कनेक्शनची सदर थक रक्कम रु.11,120/- तक्रारदार हा भरत नसल्याने सदर रक्कम कंपनीच्या प्रचलित नियमाप्रमाणे (जी.आर.) प्रमाणे तक्रारदाराचे नावे असलेल्या वैयक्तिक वीज कनेक्शनवरती वर्ग करण्यात येईल अशा आशयाची नोटीस सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.19/11/13 रोजी दिलेली होती. तरीही तक्रारदारांनी सदर थक न भरल्याने ती रक्कम त्याचे वैयक्तिक वीज कनेक्शनवरती वर्ग करण्यात आले. तक्रारदाराचे नावे असलेल्या वैयक्तिक वीज कनेक्शनवरती देखील रु.3,040/- थकबाकी होती. अशा प्रकारे तक्रारदाराचे नावे असणा-या समाईक कनेक्शनची थकबाकी रु.11,120/- व वैयक्तिक थकबाकी रु.3,040/- अशी एकूण रु.14,160/- रुपयाची बिले तक्रारदारांनी भरलेली नाहीत. तक्रारदाराने दि.14/11/13 नंतर कोणतीही वीज बिले भरलेली नव्हती. सदर बिलांचा रकमा भरणा करणेबाबत तक्रारदारांना वारंवार सांगण्यात येते होते, तरीही तक्रारदाराने सदर थक रकमांचा भरणा न केलेने त्याच्या वैयक्तिक वीज कनेक्शनचा विद्युत पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात दि.3/2/14 रोजी खंडीत केला. तदनंतर तक्रारदाराने दुस-याच दिवशी म्हणजे दि.4/2/14 रोजी रु.14,160/- रकमेचा भरणा केल्याने त्याचे वैयक्तिक वीज कनेक्शनचा पुरवठा पूर्ववत करुन दिलेला आहे.
नमूद इमारतीमधील सर्व सदनिका धारकांकडून समाईक वीज कनेक्शनची थकबाकीची रक्कम गोळा करुन थकबाकी भरुन समाईक वीज कनेक्शन बंद करुन घेणेबाबत तक्रारदारास सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे तक्रारदारने तजवीज केली नाही तसेच नमूद इमारतीमधील फ्लॅट धारकांनी समाईक वीजेचे बिल आमचे वीजेचे कनेक्शनवरती वर्ग करु नका असे कळविले होते. यावरुन तक्रारदार व नमूद सदनिका धारकांमध्ये वादतंटे असल्यामुळे सदरचा प्रकार घडून आल्याचे दिसते. तक्रारदाराचा सदरचा अर्ज धांदात खोटा व लबाडीचा असून ते सामनेवाला यांना मान्य व कबूल नाही. सामनेवाला यांनी नियमाप्रमाणे दिलेली वीज देयके तक्रारदाराने भरली नाहीत. त्यामुळे त्याचे नावे असलेल्या वीज कनेक्शनचा विद्युत पुरवठा खंडीत करावा लागला यात सामनेवालांची कोणतीही सेवा त्रुटी नाही तसेच सामनेवाला यांनी कोणत्याही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. सबब, तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी विनंती केली आहे.
5. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेचे पुष्ठयर्थ नि.15 अन्वये कागदपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये तक्रारदाराच्या नावे असलेल्या वीज कनेक्शनची माहिती, तक्रारदारास पाठविलेली नोटीस, सामनेवालांच्या हेड ऑफिसकडून आलेला जी.आर., तक्रारदाराचे नावे असलेले वीज कनेक्शनचे खातेउतारे (सीपीएल) इ.च्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे म्हणणे, दाखल कागदपत्रे, उभय पक्षांचा पुरावा व उभय पक्षांचे वकीलांचा युक्तिवाद यांचा विचार करता सदर प्रकरणात खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देणेमध्ये त्रुटी
केली आहे काय ? नाही.
2. तक्रारदाराने केलेल्या मागण्या मंजूर होणेस पात्र आहेत काय ? नाही.
3. अंतिम आदेश शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
7. तक्रारदाराने सामनेवाला वीज कंपनीने त्यास दूषित सेवा दिलेचे तक्रारीत कथन केले आहे व सेवात्रुटी बाबत खालील मुद्दे उपस्थित केलेले आहेत.
एकाच व्यक्तीच्या नावाने दोन वीज कनेक्शन देता येत नाहीत.त्यामुळे तक्रारदाराचे एक कनेक्शन बंद करणे किंवा दुसरे कनेक्शन न देणे हे बंधनकारक सामनेवालांवर होते.
तक्रारदाराचे नावे असणारे समाईक वीज कनेक्शनच्या देयकाची रक्कम एप्रिल 2013 पासून सर्व सदनिका धारकांनी भरणे आवश्यक होते.मात्र सदर बिलाची रक्कम भरली नाही. त्यामुळे सदरचा वीज पुरवठा कायमचा बंद केला.मात्र कागदोपत्री वीज कनेक्शन बंद केल्याची नोंद नाही, त्यामुळे सदर बिल रु.8000 पासून 18000 पर्यंत वाढत गेले.
समाईक वीज कनेक्शन थकीत वीज बिलाची रक्कम सर्व धारकांच्या नावाने समाईक हिश्श्याने वर्ग करण्यात यावे असे दि.25/6/13 रोजी अर्जाद्वारे कळवूनही तसेच संबंधीत धारकाने दि.4/8/13 रोजी तसे पत्र देवूनही सामनेवाला यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. उलटपक्षी, तक्रारदार हे वीज बिल भरणेस तयार असतानाही वीज कनेक्शन बंद केले.
ड) थकीत वीज बिलाची रक्कम रु.14,160/- भरुन घेतलेनंतर दि.4/2/14 रोजी तक्रारदाराचे
वैयक्तिक कनेक्शन पूर्ववत केले. मात्र समाईक कनेक्शनच्या वेळी भरलेली सुरक्षा ठेव
सदर कनेक्श्न बंद करुनही परत दिली नाही. तसेच तक्रारदाराने स्वतः मीटर घेतले
असल्याने मीटरची किंमत वजा केली नाही.
इ) सामनेवाला याने त्यांच्या कडे असणा-या मक्तेदारी हक्कांचा वापर करुन बेकायदेशीरपणे
समाईक वीज कनेक्शनची बाकी तक्रारदाराच्रूा वैयक्तिक वीज कनेक्शनच्या खातेवर
चढविली आणि सदरचे बाकीसाठी तक्रारदाराचा वैयक्तिक वीज पुरवठा बंद केला. हे कृत्य
अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारे आहे.
फ) तक्रारदाराने सामनेवालांकडे सविस्तर कागदपत्रांची मागणी केली मात्र सामनेवाला यांनी
खोटेपणा जाहीर होईल म्हणून मागणी करुनही संपूर्ण कागदपत्रे दिली नाहीत.
8. मुद्दा अ च्या सेवात्रुटीबाबतच्या कथनांचा विचार करता तक्रारदाराने तक्रारअर्जात त्याचे नावे समाईक वीज कनेक्शन व वैयक्तिक वीज कनेक्शन अशी दोन कनेक्शन असल्याचे मान्य व कबुल केले आहे. मात्र तक्रारअर्जात कुठेही त्याने त्याच्या नावे असणा-या सदर दोन वीज कनेक्शनचे ग्राहक नंबर नमूद केलेले नाहीत. एकाच इमारतीत एकाच व्यक्तीच्या नावाने दोन वीज कनेक्शन देता येत नाहीत. या त्याच्या तक्रारी कथनास कोणताही कायदेशीर आधार व पुरावा नाही. याउलट सामनेवाला यांनी नि.15/1 अन्वये दाखल केलेल्या माहिती अधिकारातील माहितीनुसार तक्रारदाराचे नावे ग्राहक क्रमांक 279940991603/5 व 279940988670/5 अशी दोन कनेक्शन दिलेचे नमूद केले आहे. तसेच नि.15/3 अन्वये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. यांनी दि.6/7/13 रोजी पाठविलेल्या आदेशाची (जी.आर) प्रत दाखल केलेली आहे. यामध्ये वीज देयकांची थकरकमेची वसूली करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना (guidelines) दिलेल्या आहेत. त्यानुसार क्लॉज 5, 6 व 7 चे अवलोकन या मंचाने केले आहे. त्यानुसार If any PD consumer in arrears is having any live electrical connection in same or other sub-divisions, division, circle, or zone, then the entire PD arrears with interest and DPC should be diverted on said live connection of same PD consumer.
यावरुन तक्रारदाराचे नावे दोन कनेक्शन होती ही बाब सिध्द झालेली आहे व ही बाब त्यास मान्य व कबूल आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या नावे त्याच ठिकाणी अथवा उपविभाग विभाग मंडल, उपमंडल यामध्ये एकापेक्षा जास्त कनेक्शन देता येतात व त्याची रिकव्हरीही करता येते ही बाब सिध्द होते. त्यामुळे तक्रारदाराच्या सदर कथनामध्ये कोणतेही तथ्य नाही हे स्पष्टच होते. सन 2009 पासून तक्रारदाराचे नावे नमूद समाईक वापराचे वीज कनेक्शन आहे, व त्याचा वीज ग्राहक क्र. 279940991603/5 असा आहे. सन 2009 ते एप्रिल 2013 पर्यंत तक्रारदाराने सदर वीज कनेक्शन अथवा त्याबाबतची बिले व ती वर्ग करणेबाबत कधीही वाद उपस्थित केलेला नाही. ज्यावेळी तक्रारदारास पाण्याचा अपुरा पुरवठा होवू लागल्याने त्याने स्वतंत्र पाण्याचे कनेक्शन घेतले व समाईक वीज वापर बंद केला, तसेच बिलांचा रकमा भरणा करुनही बंद केले, त्यावेळेसच हा वाद उत्पन्न झालेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे एकाच व्यक्तीच्या नावाने दोन कनेक्शन देता येत नाहीत ही बाब तक्रारदाराने शाबीत केलेली नाही. याउलट एकाच व्यक्तीच्या नावाने एकापेक्षा जास्त कनेक्शन्स देता येतात व त्याची वसुली कशा पध्दतीने करावी हे वर नमूद आदेशानुसार स्पष्ट झालेले आहे व सदर बाबतच्या जे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी इलेक्ट्रीसीटी अॅक्ट 2003 कलम 56 तसेच रेग्युलेशन 2005 नियम 10.5 मा.इलेक्ट्रीसीटी ओम्बडसमन यांचे विविध प्रकारचे आदेश, commercial circular 53/97 & 160, T.O.L.No. PR-3/General/332 dated 4/1/13, Legal circular No. 32487 dated 7/10/09 याचा आधार घेतलेला आहे. त्यानुसार सामनेवाला यांनी याबाबत कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
9. मुद्दा ब च्या सेवात्रुटी कथनांचा विचार करता तक्रारदाराचे नावे दोन मेजर कनेक्शन होती पैकी समाईक वापराच्या वीज कनेक्शनचा ग्राहक क्र.279940991603/5 आणि वैयक्तिक वीज ग्राहक क्र.279940988670/5 असा आहे व त्यांचे खातेउतारे/सीपीएल अनुक्रमे नि.15/4 व 15/5 वर दाखल आहेत व सदर सीपीएल(Consumer personal ledger) वरुन दोन्ही खात्यांवर थकरकमा होत्या हे सिध्द झालेले आहे. समाईक वीज कनेक्शनची वीज देयके थकीत होती व ती भरलेली नव्हती हे तक्रारदाराने मान्य व कबूल केले आहे तसेच नमूद इमारतीमध्ये सदनिका धारकांची सोसायटी स्थापन झालेली नव्हती. त्यामुळे तक्रारदाराचे नावे समाईक वापरासाठी वीज कनेक्शन दिले व ते 2009 पासून सुरु राहिले. त्यास तक्रारदाराने मान्यता दिल्याचे स्पष्ट होते. सदर समाईक वीज कनेक्शनचा पुरवठा कायमचा बंद केला आहे. सदर वीज पुरवठा बंद करण्यापूर्वी सामनेवाला यांनी त्यास थकीत रक्कम भरणा करणेसाठी संधी दिलेली होती. तसेच नि.15/2 अन्वये दि.19/11/13 रोजी रक्कम भरणा करणेबाबत नोटीसही दिलेली होती. तरीही थकीत वीज देयकांचा भरणा करणेबाबत वायरमनमार्फत वारंवार सूचित करुनही रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे समाईक वीज कनेक्श्नचा पुरवठा दि.8/8/13 रोजी कायमस्वरुपी खंडीत केलेला आहे तर वैयक्ति वीज कनेक्श्नचा विद्युत पुरवठा दि.3/2/14 रोजी तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केलेला असून तो दि.4/2/14 रोजी पुन्हा चालू केल्याचे माहिती अधिकाराखाली नि.15/1 नुसार दिलेल्या माहिती वरुन सिध्द होते. थकीत वीज देयके सूचना देवूनही न भरल्याने वीज पुरवठा खंडीत करणे हे सामनेवालांचे कृत्य कायदेशीर आहे. सामनेवाला यांना प्राप्त अधिकारांनुसारच सदर थकबाकी ही सन 2013 पासून बिले थकीत गेली असल्याचे नमूद सीपीएलवरुन दिसून येते. तसेच सूचना देवूनही दि.8/8/13 अखेर नमूद समाईक वीज कनेक्शनचे बिल तक्रारदाराने भरले नसल्याने दि.13/5/13 रोजी प्रथमतः तात्पुरत्या स्वरुपात विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. हे स्पष्ट झालेले आहे. तसेच त्यामुळे जून व जुलैची देयके ही मागील बिलांचा विचार करुन सरासरी प्रतिमाह 571 युनिट अनवये देण्यात आली व जुलै 2013 अखेर बिलाची रक्कम रु.18321.41 पैसे होती. सदर बिलाची रक्कम भरणा न केलेने जवळजवळ तीन महिन्याच्या कालावधीनंतर दि.8/8/13 रोजी सदरचा विद्युत पुरवठा कायमस्वरुपी खंडीत केला आहे. यामध्ये सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही असे या मंचाचे ठाम मत आहे. कारण आलेल्या वीज देयकाचा भरणा वेळेत करणे हे ग्राहकाचे कायदेशीर कर्तव्य आहे व सदर कर्तव्यात ग्राहकाने कसूर केल्याने सामनेवाला कंपनीने वीज पुरवठा खंडीत करण्याचे उचललेले पाऊल ही सेवात्रुटी होवू शकत नाही.
तसेच सदर पुरवठा खंडीत केलेबाबतची कागदोपत्री नोंद केली नाही म्हणून सदर बिल रु.8000 वरुन 18000 पर्यंत वाढत गेले यास कोणताही आधार नाही. याउलट दाखल सीपीएल वरुन थकबाकीची स्पष्टता होते. मार्च 2013 चे वीज बिल हे 579 युनिट त्याचे बिल व मागील थकबाकी रु.5318.32 पैसे अधिक मागील थकबाकी मिळून एकूण बिल रु.10493.97 पैसे इतकी होती. पैकी दि.15/3/13 रोजी रु.5,320/- इतकी रक्कम शेवटची भरणा केली म्हणजे सदर महिन्यातील थक बिल हे रु.5120.98 अधिक व्याज 52.99 पैसे असे मिळून रु.5152.97 पैसे असे आहेत. एप्रिल 2013 चे वीज बिलही 341 युनिटचे असून बिलाची रक्कम रु.2375.45 पैसे अधिक मार्चची थकबाकीची रक्कम रु.5173.97 पैसे असे एकूण रु.7549.97 पैशाचे बिल तक्रारदारास दिले. मे 2013 चे वीज बिल 427 युनिट व मागील थकबाकीसह मिळूनचे एकूण बिल रु.10501.20 पैसे दिले. वारंवार सांगूनही सदर देयक भरले नसलेमुळे दि.13/5/13 ला वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केला आहे व त्यामुळे माहे जून व जुलैचे रिडींग घेता न आल्यामुळे सरासरी प्रतिमाह 517 युनिट प्रमाणे सरासरी बिले देण्यात आली. मात्र ज्यावेळी तात्पुरता विद्युत पुरवठा खंडीत केला त्यावेळी मे 2013 रोजीचे रिडींग रु.23,387/- होते व दि.8/8/13 रोजी ज्यावेळेला सदरचा विद्युत पुरवठा कायमस्वरुपी खंडीत केला, त्यावेळचे रिडींग 23451 असे होते. सदर रिडींगची नोंद माहिती अधिकाराखाली आलेली आहे. त्यामुळे मध्यंतराच्या काळामध्ये केवळ 64 युनिटचा वापर झालेला असल्याने नमूद तात्पुरत्या स्वरुपात विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यावेळचे व कायमस्वरुपी विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यावेळचे रिडींगमधील फरक विचारात घेतला असून सरासरी दिलेले प्रतिमाह सरासरी 517 युनिटचे जुन व जुलै महिन्याचे दिलेले एकूण युनिट 1034 मधून प्रत्यक्ष वापराचे 64 युनिट वजा करता उर्वरीत 970 युनिट वीज बिलाची रक्कम रु.7205.89 पैसे एकूण बिलातून वजा करुन सदर रकमेची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे जुलै 2013 अखेरचे समाईक वीज कनेक्शनचे बिल हे (18321.41–7205.89=11115.52) राऊंड फिगरसहीत रु.11,120/- चे देण्यात आले हे सीपीएल वरुन स्पष्ट होते. नि.15/5 वरील तक्रारदाराचे वैयक्तिक वीज कनेक्शनच्या खातेउता-यावरुन तक्रारदाराचे वैयक्तिक खातेउता-यावरती सप्टे.2013 पासून थक रकमा दिसून येतात. सदर वैयक्तिक खातेवरील एकूण थक रक्कमही रु.3,040/- असल्याचे दिसून येते. यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर,नोव्हेंबर,डिसेंबर,अखेरीस अनुक्रमे रु.760.8 पैसे,रु.1184.75 पैसे,रु.2214.56 पैसे, अशा थक रकमा दिसून येत आहेत. तसेच जानेवारी मध्येही थक रक्कम आहे. त्यामुळे तक्रारदाराचे नावे असलेले नमूद सामूहिक वीज कनेक्शनची थक रक्कम रु.11,120/- ही नियमाप्रमाणेच तक्रारदाराचे वैयक्तिक खातेवर वर्ग करण्यात आलेली आहे व ती वर्ग करण्यापूर्वी रक्कम भरणा करण्याबाबतची नोटीस नि.15/2 अन्वये दि.19/11/13 रोजीच तक्रारदारास देण्यात आलेली होती. तरीही थक भरला नाही त्यामुळे सदर दोन्ही खातेवरील रकमांचा थक मिळून रु.14,160/- झालेले आहेत. यामध्ये वापरलेल्या युनिट नुसार व नियमानुसार वीज देयकाची आकारणी केलेचे निदर्शनास येते. सामनेवाला यांनी कागदोपत्री कनेक्शनची नोंद केली नाही म्हणून सदर थक वाढलेला नसून रकमांचा भरणा केला नसल्यामुळे तो वाढलेला आहे ही बाब सिध्द झालेली आहे. तसेच सदर समाईक कनेक्शन हे तक्रारदाराचे नावे 2009 पासून होते याचा ऊहापोह वर केलेलाच आहे. त्यामुळे पुनश्च ते स्पष्टीकरण येथे नमूद करीत नाहीत. तक्रारदार 2009 पासून त्याचे नावे असणा-या सदर समाईक वीज वापराचे बील भरत आलेला आहे व तशी त्याने जबाबदारी स्वीकारलेली आहे. मात्र त्याने स्वतंत्रपणे पाण्याचे कनेक्शन घेतलेनंतर त्याचा समाईकातील वापर बंद केल्यानंतरच रकमांचा थक झालेला आहे. सदर बिले भरण्यात तक्रारदाराने दिरंगाई केल्याची बाब त्याच्या कथनावरुनच स्पष्ट होते. यात सामनेवालांना दोष देता येत नाही. त्यामुळे याबाबत सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
10. मुद्दा क मधील सेवात्रुटींचा विचार करता, तक्रारदाराचे नावे समाईक वीज कनेक्शन होते तसेच त्याचे स्वतंत्र वैयक्तिक वीज कनेक्शन होते तसेच सदर खात्यांवरती देयके थकीत असल्याचे स्पष्ट झालेले आहे व याचे सविस्तर विवेचन वर आलेलेच आहे. तक्रारदाराने त्याचे नावे असणाल्या समाईक वीज वापराचे बिल इतर धारकांच्या बिलांवरतील समहिश्शाने वर्ग करावे असे पत्र दि.25/6/13 रोजी सामनेवालांना दिल्याचे स्पष्ट होते. सदर पत्र नि.4/1 वर दाखल आहे. तसेच बिल्डरांचे सामनेवलांना दिलेले दि.25/6/13 चे पत्र नि.4/2 वर दाखल आहे. सदर पत्रामध्ये सदरचे बिल विभागून वीज कनेक्शन रद्द होणेबाबत कळविल्याचे दिसून येते. सदर पत्रात तक्रारदाराने त्याचे नावे असणारे दोन्ही कनेक्शनचे नंबर व अखेरचे बिलाची रक्कम नमूद केलेली आहे. त्याचप्रमाणे 11 धारक व त्यांचे नंबरही नमूद केलेले आहेत व काही धारकांची नावे नमूद आहेत. तसेच आलेल्या 14490 चे बिल हे वर नमूद ग्राहकांमध्ये विभागून वसुल करण्यात यावीत अशी विनंती केलेली आहे. याचा विचार करता तक्रारदार 2009 पासून बिनबोभाट सदर कनेक्शनच्या वापराची बिले भरत होता ती जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे व 2009 पासून ती जबाबदारी तो पार पाडत आला आहे. मात्र पाण्याचा अपुरा पुरवठा होवू लागल्याने त्याने एप्रिल 2013 मध्ये पाण्याचे स्वतंत्र कनेक्शन घेतले व समाईक वीज वापर थांबवला. त्यावेळेपासून बिल भरण्यास दिरंगाई केल्याची बाब तक्रारदाराचे कथनावरुनच स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराने नि.4/3 अन्वये दि.2/8/13 चे नमूद इमारतीमधील इतर धारकांनी व विजय इंगळे यांनी सामनेवाला यांना पाठविलेल पत्र दाखल केले आहे सदर पत्रानुसार -
‘‘ सदर अपार्टमेंटमध्ये नमूद धारक पाच वर्षे रहात असून फलॅटधारक कुडाळकर यांचे नावे कॉमन लाईट कनेक्शन व नमूद विजय इंगळे यांचे नावे कॉमन पाणी कनेक्शन आहे. थकीत लाईट बिल कुडाळकर यांचे नावे तर थकीत पाणी कनेकशनचे बिल माझे नावे आहे. आम्ही सर्व फलॅटधारक कुडाळकर यांना कॉमन लाईट बिलाची रक्कम वेळोवेळी देत आलेलो आहे परंतु कुडाळकर यांनी ती रक्कम आपल्या ऑफिसमध्ये भरलेली नाही व थकीत बिलेही भरत नाहीत. तसेच आपण जर कॉमन लाईट कनेक्शन विभक्त केलेस त्याचा थकीत बिलाचा फटका आम्हा सर्व फलॅट धारकांस बसणार आहे. आपले थकीत लाईट बिल रक्कम रु.14,400/- एवढी असून ती संपूर्ण् कुडाळकर यांचेकडून भरुन घ्यावी व त्यानंतर पुढील निर्णय घ्यावा. ’’ असे कळवलेचे दिसते.
तसेच दि.4/8/13 रोजी नि.4/4 अन्वये सामनेवाला यांना पत्र पाठवून विजय इंगळे व इतर धारकांनी थकीत रक्कम सर्व मीटरवर विभागून देण्यात यावे अशी विंनती अर्जाद्वारे केल्याचे दिसून येते. अशा प्रकारे सूचित केलेले असूनही सदर पत्राचा विचार करुन सामनेवाला यांनी सदर थकरकमा वर्ग केलेल्या नाहीत या तक्रारदाराच्या कथनांचा विचार करता, नमूद विजय इंगळे व इतर धारकांनी दि.2/8/13 रोजी प्रथम पत्र पाठविलेले असून तदनंतर नमूद धारकांना नोटीस पाठविलेली आहे व पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. ती कागदपत्रे अनुक्रमे नि.4/5 व 4/6 वर दाखल आहेत. सदर वकील नोटीस दि.28/8/13 रोजी पाठविलेली असून नमूद तक्रार पोलिस निरिक्षक, सांगली शहर पोलीस स्टेशन, सांगली यांचेकडे दि.30/1/14 रोजी दाखल केल्याचे दिसून येते. तथाकथित दि.4/8/13 चे पत्राचे अवलोकन करता नि.4/3 वर असणारी इंगळे यांची सही व सदर अर्जातील सही यामध्ये फरक आहे. तसेच अमोल साळोखे out of station, जया बिरुकरे यांच्या पुढे अंगठा आहे, मात्र तो बांधलेला आहे, रावसाहेब चिंचणे दुकानगाळा धारक - सही नाही, बाळकृष्ण सखाराम इनामदार यांची सही दिसते. त्यामुळे सदर अर्जाबाबत विश्वासाहर्ता दिसून येत नाही.
सदर थकीत बिल तथाकथित इतर धारकांचे समहिश्याने त्यांचे बिलांमध्ये वर्ग करावी हे सामनेवालांच्या अखत्यारीतील बाब नाही कारण जरी सदरचा वीज वापर समाईक असला तरी त्याचा खातेदार म्हणून तक्रारदाराचे नाव लागलेले होते त्यामुळे इतर धारक व सामनेवाला यांचेमध्ये कोणतेही privity of contract नाही. त्यामुळे तक्रारदाराचे नावे असेल्या नमूद खातेवरील थक रकमा इतर ग्राहकांच्या खात्यावर वर्ग करण्यास सामनेवाला यांनी नकार दिला हे बेकायदेशीर कृत्य नाही. सबब याबाबत सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
11. मुद्दा क्र.ड सेवात्रुटीबाबतच्या कथनांचा विचार करता, नि.15/4 व 15/5 वर दाखल केलेल्या सीपीएलवरुन थकरकमा कशा आल्या त्याचे स्पष्टीकरण व खुलासा वर नमूद केलेलाच आहे. तक्रारदाराच्या नावे असणारे ज्या समाईक वीज कनेक्शनचा विद्युत पुरवठा प्रथमतः तात्पुरत्या व नंतर कायमचा खंडीत केला, त्या मधल्या कालावधीत वापरलेले 64 युनिटचेच बिल घेतलेले असून उर्वरीत न वापरलेल्या युनिटची सूट देवून त्या बिलातून त्याची वजावट केलेली आहे ही बाब स्पष्ट व सिध्द झालेली आहे. तरीही सामनेवाला यांनी नि.15/2 अन्वये 19/11/13 रोजी नोटीस पाठवून त्याचे नावे असणा-या समाईक वीज कनेक्शनचा वीज पुरवठा कायमस्वरुपी बंद केलेला असून त्याची थक रक्कम रु.11,120/- भरणा करण्यासाठी 15 दिवसांची नोटीस देण्यात आली होती. मात्र सदर रकमा भरणा न केल्याने सदर नोटीस मिळताच 7 दिवसांचे आत सदर थकरक्कम भरणा करावी, न केल्यास सदर थकबाकी तक्रारदाराचे नावे असणा-या नवीन वीज जोडणी क्र.2794088670/5 या नावे थकबाकी पुढील वीज देयकात वर्ग करण्यात येईल याची नोंद घेणेबाबत सूचित कले आहे. सदर नोटीस सत्यजीत कुडाळकर यांनी दि.20/11/13 रोजी स्वीकारलेली आहे व सदर नोटीस मिळाल्याची बाब तक्रारदाराने त्याचे तक्रारअर्जात मान्य केली आहे. थक रकमा न भरल्याने सदर थकरक्कम तक्रारदाराचे वैयक्तिक खातेवर डिसेंबर 2013 मध्ये वर्ग केलेली आहे. तरीही थकरकमा भरलेल्या नाहीत. तसेच त्याचे वैयक्तिक कनेक्शन वरतीही सप्टेंबर 2013 पासूनचा थक आहे. त्यामुळे सरतेशेवटी सामनेवाला यांनी वैयक्तिक कनेक्शन दि.8/8/13 रोजी तक्रारदाराच्या नावचे समाईक कनेक्शन कायमस्वरुपी बंद केले व तक्रारदाराचे वैयक्तिक कनेक्शनचा विद्युत पुरवठा दि.3/2/14 रोजी तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केला. त्यावेळी तक्रारदाराने दि.4/2/14 रोजी संपूर्ण थक रक्कम रु.14,160/- नि.4/7 चे पावतीअन्वये भरल्यानंतर सदर विद्युत पुरवठा पूर्ववत केला. त्याचा अहवाल तक्रारदाराने नि.4/9 अन्वये दाखल केलेला आहे. तसेच सदर अहवालामध्ये मुख्य अभियंता, मुख्य कार्यालय मुंबई यांचे पत्र क्र. P.COM.Acctt/No.1902 dated 6/7/13 चे पत्रानुसार एकाच नावावर दोन वीज कनेक्शन एकाच ठिकाणी असलेमुळे थकबाकीदार वीज ग्राहकाची थकबाकी भरणा न केल्याने वसुली करता दुस-या ग्राहक क्रमांकावर वर्ग करण्यात आल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. याचे पूर्व व पूर्ण ज्ञान तक्रारदारास होते व आहे.
तक्रारदाराने नमूद समाईक कनेक्शन व भरलेली सुरक्षा ठेव परत दिलेली नाही तसेच त्याने मीटर स्वतः घेतलेले असून त्याची रक्कम वजा केलेली नाही असे तक्रारी कथन केले आहे याचा विचार करता युक्तिवादाचे वेळेस सामनेवालांच्या विधिज्ञांनी तक्रारदाराने स्वतंत्ररित्या सामनेवालांकडे तसा अर्ज दिल्यास व पुरावा दिल्यास तक्रारदार सुरक्षा ठेव व वीज मीटरची रक्कम अदा करण्यास तयार आहे असे स्पष्ट केले आहे. सदर रकमा मिळण्यासाठी त्यास स्वतंत्ररित्या मागणी करावी लागेल व तदनंतर त्याच्या मागणीचा विचार केला जाईल असेही युक्तिवादात प्रतिपादन केले आहे. याचा विचार करता तक्रारदाराने त्याचवेळी जर नमूद त्याचे नावे असलेल्या समाईक कनेक्शनच्या रकमंचा भरणा करतेवेळी सुरक्षा व मीटरची किंमत वजावट करुन घेवून उर्वरीत रक्कम भरणेबाबत लेखी पत्र दिले असते तर त्याचवेळी त्याचा विचार झाला असता. मात्र तसे तक्रारदाराने केलेले नाही. त्यामुळे वसुलीसाठी नियमानुसार सामनेवाला यांनी थक रक्कम त्याचे वैयक्तिक खात्यावर वर्ग केली. त्यामुळे सदर सुरक्षा ठेव अथवा वीज मीटरची रक्कम वजावट करुन घेण्याचा प्रश्न उदभवलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवालांकडे त्याची मागणी केली होती व दिली नाही असे निदर्शनास आलेले नाही. कारण नि.4/1 वरील दाखल अर्जामध्ये केवळ त्याने बिलाची रक्कम इतर ग्राहकांमध्ये विभागून वसुल करणेची विनंती केलेली आहे. त्यामुळे सदर बाबीबाबत सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
12. मुद्दा क्र.इ च्या सेवात्रुटीचा विचार करता मुद्दा क्र.अ ते ड च्या सविस्तर विवेचनावरुन जरी समाईक वीज वापराचे कनेक्शन असले तरी ते तक्रारदाराचे नावे होते व ते 2009 पासून होते व सदर बिलांचा भरणा त्यावेळेपासून तक्रारदार करीत होता या बाबीकडे दुर्लक्ष करता येत नाही. तसेच नि.15/3 वरील दाखल जी.आर. नुसार एकाच व्यक्तीच्या नावे एकापेक्षा जास्त विज कनेक्शन असल्यास थकीत देयकांची रक्कम अन्य देयकांमध्ये वर्ग करण्याच्या प्राप्त अधिकारानुसार सामनेवाला यांनी कृती केलेली असल्याने त्यामध्ये कोणताही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही तसेच नमूद वीज बिलाची थक रक्कम त्याचे वैयक्तिक खातेवर वर्ग केल्यानंतरही सदर थक रक्कम नोटीस पाठवूनही भरलेली नाही व वैयक्तिक थक रक्कमही भरलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या वैयक्तिक खातेचा वीज पुरवठा सामनेवाला यांनी वसुलीसाठी बंद केला ही अनुचित व्यापारी प्रथा नाही. त्यामुळे याबाबत सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
13. मुद्दा क्र. फ मधील सेवात्रुटीच्या कथनांचा विचार करता तक्रारदाराने सामनेवालांकडे कोणत्या कागदपत्रांची मागणी केली होती, याचा कोणताही पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. मात्र त्याने माहिती अधिकाराखाली जी माहिती मागविलेली होती, ती माहिती नि.15/1 अन्वये सामनेवाला यांनी दाखल केलेली आहे. तसेच तक्रारदाराने नि.4/9 वरती दाखल केली आहे. तसेच सदर माहितीतील कलम 3 मध्ये तक्रारदारास दिलेल्य कागदपत्रांचाही उल्लेख केलला आहे. त्यामुळे सामनेवालांकडे उपलब्ध असणारे व तक्रारदाराने मागणी केलेली कागदपत्रे तक्रारदारास मिळालेली आहेत. त्यामुळे तक्रारदाराच्या सदर कथनास कोणताही आधार नाही की, त्याने अर्जाद्वारे माहिती मागविलेली होती व ती न दिल्याने त्यास माहिती अधिकाराखाली माहिती मागवावी लागली. असे दाखविणारा कोणताही पुरावा नाही. सबब याबाबत सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
14. मुद्दा क्र. अ ते फ या विस्तृत विवेचनावरुन सामनेवाला यांनी कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे म्हणूनया मुद्यायाचे उत्तर नकारार्थी दिलेले आहे.
मुद्दा क्र.2 व 3
15. सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसल्याने तक्रारदाराच्या कोणत्याही मागण्या मंजूर होणेस पात्र नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे म्हणून या मुद्दयाचे उत्तर नकारार्थी दिलेले आहे.
16. मात्र तक्रारदाराकडून सामनेवाला यांनी समाईक वीज कनेक्शपोटीचा संपूर्ण थक रक्कम भरुन घेतलेली असलेने सदर वीज कनेक्शन पोटी काही तरी सुरक्षा ठेव भरुन घेतलेली असणार तसेच नमूद वीज मीटर सामनेवाला यांनी काढून नेलेले आहे. नमूद वीज मीटर हे तक्रारदाराचे स्वतःचे असून त्याच्या किंमतीची मागणी तो करतो याचा विचार करता सदर बाबीचा ऊहापोह मुद्दा क्र. ड मध्ये केलेला आहे. मात्र युक्तिवादाचे वेळेस सामनेवालांचे विधिज्ञांनी तक्रारदाराने सुरक्षा ठेव मागणीचा स्वतंत्र लेखी अर्ज सामनेवालांकडे दिल्यास सदर रक्कम देण्यास सामनेवाला तयार आहेत तसेच वीज मीटर तक्रारदाराने स्वतः खरेदी केले होते याचा पुरावा त्यांनी दिल्यास व तशी स्वतंत्र लेखी मागणी केल्यास ती रक्कमही देण्यास सामनेवाला तयार आहेत असे प्रतिपादन केले आहे. सबब, हे मंच तक्रारदार व सामनेवाला यांना असे निर्देश देते की, तक्रारदाराने योग्यत्या पुराव्यानिशी सामनेवालांकडे नमूद तक्रारदाराचे नावे असलेल्या समाईक वीज कनेक्शनच्यापोटी घेतलेली सुरक्षा ठेव व वीज मीटर रक्कमेची मागणी करावी व सामनेवाला यांनी पुराव्याची खात्री करुन सदर रकमा तक्रारदारास अदा कराव्यात. सबब, खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहेत.
2. प्रस्तुत तक्रारीचा खर्च उभय पक्षकारांनी ज्याचा त्याने सोसावयाचा आहे.
3. प्रस्तुत निकालपत्राची प्रत उभय पक्षकारांना विनाशुल्क देण्यात यावी.
सांगली
दि. 26/05/2015
( सौ मनिषा कुलकर्णी ) ( सौ वर्षा नं. शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या सदस्या अध्यक्ष
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.