| Final Order / Judgement | ::: नि का ल प त्र ::: (मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या) (पारीत दिनांक :- 29/07/2019) - तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे....
- तक्रारकर्ती हि शेतकरी असून तिचे स.क्र.83 चे शेतीकरिता विजपुरवठा मिळण्याकरिता नोव्हे. 2015 मध्ये वि.प यांचेकडे अर्ज केल्यानंतर त्यांनी दि.30/11/2015 रोजी सदर शेतामध्ये विजपुरवठा दिला. तक्रारकर्तीने वि.प. यांनी दिलेल्या विजदेयकांचा नियमितपणे भरणा केलेला आहे तक्रारकर्तीने दि.8/8/2016 रोजी वि.प. यांचेकडे कुक्कुटपालन या व्यवसायाकरिता वेगळे विज कनेक्शन मिळण्याकरिता अर्ज केला होता परंतु एका जागेवर दोन विज कनेक्शन देता येत नाही असे कारण सांगून तक्रारकर्तीस पोल्ट्रीकरीता वेगळे विज कनेक्शन दिले नाही तक्रारकर्तीने कुक्कुटपालनाचा शेतीपूरक व्यवसाय उपजीविकेचे साधन म्हणून सुरु केला आहे. सुरुवातीला वि.प. यांनी तक्रारकर्तीला तीन महिन्यानंतर विजदेयक पाठविले व सदर देयकांचा तिने नियमितपणे भारत सरकारच्या निर्देशाप्रमाणे ऑन लाईन भरणा केलेला आहे. वि.प.यांनी डिसेंबर 2017 नंतर तक्रारकर्तीस कोणतीही सूचना न देता मासिक देयक पाठवणे चालू केले व याबद्दलची कोणतीही सूचना वि.प. यांनी तक्रारकर्तीस दिली नाही. तक्रारकर्तीचे रु.2,030/-चे वि.प. यांचेकडे जमा असल्याने फेब्रु.2018 चे विजदेयक वि.प. यांनी तक्रारकर्तीस पाठविले नाही मात्र दि.22/3/2018 चे 6808 युनिटचे रु.30,460/-चे वादग्रस्त विज देयक पाठविले. तक्रारकर्तीने दि.7/4/2018 रोजी वि.प. यांचेकडे तक्रार करून सुधारित विजदेयक देण्याची व मिटर तपासून देण्याची विनंती केली व त्याकरिता त्याच दिवशी रु.590/-चा भरणा वि.प. यांचेकडे केला. त्यानंतर वि.प. यांनी तक्रारकर्तीस दि. 27/4/2018 रोजीचा टेस्टिंग रिपोर्ट देऊन मिटरचा डिसप्ले खराब झाल्यामुळे रिडिंग घेता येत नाही असे कळविले. त्यानंतर वि.प. यांनी दि. 20/4/2018 चे 7075 युनिटकरिता रु. 64,640/-चे देयक दिले व या देयकामध्ये नादुरुस्त मिटरकरिता आकारलेली रक्कम सुद्धा समाविष्ट आहे.तक्रारकर्तीचा कधीही इतका जास्त विजवापर नव्हता. त्यामुळे वि.प. यांनी दि.22/3/2018 व दि.20/4/2018 चे पाठविलेले विजदेयक नादुरुस्त मिटर संबधित असल्याने बेकायदेशीर आहे. वि.प.यांनी दि.19/4/2018 रोजी तक्रारकर्तीस नोटीस पाठवून विजपुरवठा खंडित करण्याची धमकी दिली त्यावेळी तक्रारकर्तीने वि.प.यांचेकडे दि.20/4/2018 रोजी अर्ज करुन सदर विजपूरवठा खंडित न करण्याची विनंती केली. परंतु तरीसुद्धा वि.प. यांनी दि.14/5/2018 रोजी सदर विजदेयकारिता तकारकर्तीकडील विजपूरवठा खंडित केल्याने तकारकर्तीच्या 210 कोंबड्या, 5 बदक,2 राजहंस पाण्याआभावी दोन दिवसात मरण पावले व तक्रारकर्तीचे पैशाच्या स्वरूपात भरून न निघणारे नुकसान झाले. वि. प. यांनी तक्रारर्तीकडील विजपूरवठा खंडित केल्याने तक्रारकर्तीने वि.प. विरुद्ध तक्रार दाखल करून त्यामध्ये अशी मागणी केली की, वि.प.यांनी तक्रारकर्तीस पाठवलेले दि.22/03/2018चे रु.30,460/-व दि.20/4/2018 चे रु.64,640/- चे देयक बेकायदेशीर ठरवून रद्द करण्यात यावे व खंडित केलेला विजपुरवठा पुर्नस्थापित करून द्यावा. तसेच तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रक्कम रू. 2,50,000/- व तक्रार खर्च रू.25,000/- वि.प यांनी तक्रारकर्तीला द्यावा असे आदेश पारीत करण्यांत यावे अशी विनंती केली.
- तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरुद्धपक्षा विरुध्द नोटीस काढण्यात आली. विरूध्द पक्ष हजर होवून त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यामध्ये तक्रारीतील विशेष कथनामध्ये नमूद केले की, तक्रारकर्तीकडे वि.प.यांनी शेती उपयोगासाठी पंपाकरिता विजपुरवठा दिला आहे. वि.प.कंपनीचे सहाय्यक अभियंता यांनी तक्रारकर्तीचे शेतावर विजजोडणी संदर्भात तपासणी करीता भेट दिली असता त्यांचे निदर्शनास आले की, तक्रारकर्ती हि शेतीच्या पम्पाकरिता दिलेले कृषक विद्युत जोडणी हि अनधिकृतपणे त्यांनी चालू केलेल्या कुक्कुटपालन व्यवसायाकरिता वापर करीत आहे. कुक्कुटपालनच्या परिसरात विद्युत जोडणी केली असून 40 बल्ब आणि पंख्याची सोय केली असल्याचे निदर्शनास आल्याने, निरिक्षण अहवाल तयार करून तसे कृषक जोडणीची वर्गवारी बदलण्याबाबत उपकार्यकारी अभियंता यांना सूचित केले व त्यानुसार कृषक जोडणी कुक्कुटपालनासाठी घेण्यात येणा-या जोडणीमध्ये वर्ग करण्यात आले कृषक जोडणी चे विज दर फार कमी असून त्याचे त्रैमासिक आकारणीचे विजदेयक दिल्या जाते परंतु उपरोक्त अहवालानुसार तक्रारकर्तीकडील विद्युत जोडणीचा वर्ग बदलला आणि त्यानूसार मासिक देयक देण्यास सुरुवात झाली वि.प.यांनी नियमाप्रमाणे मिटरवाचनानूसार कुक्कुटपालनच्या विद्युत वापराचा दर आकारून तक्रारकर्तीविरुध्द एकूण रु. 61,234/- हि रक्कम मार्च 2018 चे रु. 30,460/-व एप्रिल 2018 चे रु. महिन्याचे 30,774/- असे दोन बिलांमध्ये विभागून विज देयक काढण्यात आले व त्यानुसार सदर देयक प्राप्त झालेल्या चालू महिन्याच्या देयकामध्ये जमा करून नियमानुसार वीज देयक देण्यात आले. तक्रारकर्तीच्यावतीने तिच्या पतीने मिटर तपासणीकरिता अर्ज केला असता मिटर तपासणी करण्यात आली तपासणीमध्ये सदर मिटरचा डिसप्ले (आकडे दर्शवणारी पट्टी) काम करीत नसून बाकी मिटरची जोडणी निर्दोष असल्याने मिटर तपासणीचा अहवाल निर्दोष देण्यात आलेला आहे. परंतु त्यानंतरसुध्दा त्या मिटरची एम. आर. आय. केस केली असून मिटरमधील चालू नोंदी या चाचणीतून मिळालेल्या आहेत सदर नोंदणीप्रमाणे तक्रारकर्तीकडे असलेल्या मिटरचा वापर हा 500युनिट पेक्षा जास्त होता हे स्पष्ट होते. तक्रारकर्ती सदर विद्युत जोडणीचा वापर कुक्कुटपालन या व्यवसायाकरिता करित असल्याने तक्रारकर्ती हि वि.प.यांची ग्राहक नाही तक्रारकर्तीकडील सदर मिटर डिसप्ले काम करीत नसल्यामुळे वि.प. यांनी जुन्या मिटर ऐवजी नविन मिटर लावून दिले व नवीन मिटरनूसार तक्रारकर्तीकडील विज वापर हा 500 युनिट पेक्षा जास्त आहे हे स्पष्ट होते. सबब सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, तक्रारअर्ज, दस्तावेज व रिजॉईंडर यातील मजकुरास तक्रारकर्तीचा लेखीयुक्तीवाद समजण्यात यावे अशी नि.क्र.19 वर पुरसीस दाखल, विरूध्दपक्षाचे लेखीउत्तर, रिजॉईंडर, लेखीयुक्तीवाद आणि उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व विरूध्दपक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष - तक्रारकर्ती विरूध्द पक्षांची ग्राहक आहे काय ? : होय
- विरूध्दपक्षाने तक्रारकर्ती प्रति न्युनतापूर्ण सेवा
दिली आहे काय ? : नाही - तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र
आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे. कारण मिमांसा - मुद्दा क्रं.1 बाबतः- वि.प. यांनी तक्रारकर्तीचे सव्र्हे क्रं.83, मौजा-कसरगट्टा चे शेत जमिनीवर शेती उपयोगाकरिता दिनांक 30.11.2015 रोजी विज पूरवठा दिला होता व आता तक्रारकर्ती सदर विज पूरवठा कुक्कुटपालन या व्यवसायाकरिता वापरित असुन त्याचा ग्राहक क्रं. 451660003543 हा आहे. तक्रारकर्ती ही सदर कुक्कुटपालन शेतीपूरक व्यवसाय हा स्वतःचे उदरनिर्वाहाकरिता करीत असल्याने तक्रारकर्ती ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2(1)( डी) अन्वये वि.प. यांची ग्राहक आहे हि बाब सिद्ध होत असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
- मुद्दा क्रं.2 बाबत ः-तक्रारकर्तीकडे वि.प.यांनी शेतीचे उपरोक्त कामाकरिता विज पुरवठा दिला होता परंतु तक्रारकर्ती सदर विज पुरवठयाचा उपयोग कुक्कुटपालन या व्यवसायाकरिता करीत आहे. तसेच तक्रारकर्ती सदर विज पुरवठयाचा वापर कुक्कुटपालनकरिता करीत आहे तिने तक्रारीतसुद्धा तसे नमुद केले आहे. तक्रारकर्ती व वि.प. यांचेमधे वि.प यांनी दि.22.3.2018 व दिनांक 20.4.2018 रोजी पाठविलेल्या विज देयकांबाबत वाद आहेत. तक्रारकर्तीने नि. क्रं 4,13, व 17 वर तसेच वि.प. यांनी नि. क्रं.21 वर दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की वि.प. कंपनीचे सहाय्यक अभियंता यांनी दिनांक 13.12.2017 रोजी उपरोक्त शेतजमिनीवर विद्युतवापरस्थळ तपासणी संदर्भात भेट दिली असता त्यांचेअसे निदर्शनास आले की तक्रारकर्ती ही शेती करिता दिलेले कृषक विज जोडणी अनधिकृतपणे कुक्कुटपालन या व्यवसायाकरिता वापर करीत आहे त्यांनी तसे स्थळनिरिक्षण अहवालात नमूद करून कृषक जोडणीची वर्गवारी बदलविण्याबाबत उपकार्यकारी अभियंता यांना सुचित केले. सदर अहवालानुसार तक्रारकर्तीकडील कृषक
विज पुरवठा कुक्कुटपालन करिता देण्यात येणा-या विज जोडणी मधे वर्ग करण्यात आला व तक्रारकर्तीचा कृषक जोडणी वर असलेला कुक्कुटपालनचा विज वापर विचारात घेता नियमानुसार मिटर वाचनाप्रमाणे विद्युत दर आकारुन रुपये 61,234/- एवढी रक्कम मार्च -2018 चे रुपये 30,460/- व एप्रिल – 2018 चे रुपये 30,774/- असे दोन विज देयकांमधे विभागुन विज देयक देण्यात आले व वर्गवारी बदलविल्यानंतर त्रैमासिक विज देयक न देता मासिक विज देयक देण्यात आले.तक्रारकर्तीस सुरुवातीला दिलेल्या विज देयकांमधे विज जोडणी प्रकार एलटी असा असून नंतर दि.22.3.2018ला व त्यानंतर दिलेल्या विजदेयकांमधे पोल्ट्री मोटीव्ह नमुद आहे. सदर देयक तक्रारकर्तीने नि.क्र4 अनु.दस्त क्रं. अ-1 आणि अ-2 व मिटर टेस्टिंग रिपोर्ट अ-5 वर दाखल आहे.यावरून तक्रारकर्तीला विद्युत जोडणीचा वर्ग बदलविल्यानंतर विद्युत वापरानुसार उपरोक्त विज देयके दिल्याचे सिध्द होते. तसेच तक्रारकर्तीने सदर मिटरचे तपासणीकरिता अर्ज केल्यानंतर वि.प. यांनी सदर मिटरची तपासणी केली असता त्यामधे सदर मिटरची जोडणी निर्दोष असून फक्त सदर मिटरचा डिसप्ले (आकडे दर्शवणारी पट्टी) काम करीत नसून बाकी मिटरची जोडणी निर्दोष असल्याने मिटर .तपासणीचा अहवाल निर्दोष देण्यात आला. परंतु त्यानंतरसुध्दा वि.प.यांनी त्या मिटरची एम. आर. आय. केस केली व मिटरमधील चालू नोंदी या चाचणीतून मिळालेल्या आहेत सदर नोंदणीप्रमाणे तक्रारकर्तीकडे असलेल्या मिटरचा वापर हा 500 युनिट पेक्षा जास्त होता हे स्पष्ट होते व तसे तक्रारकर्तीस सुध्दा दिनांक 16.5.2018 चे पत्रान्वये विज मिटर बरोबर व दिलेले विज देयक योग्य असल्याने विज देयक भरणा करण्यास सांगण्यात आले होते. तसेच वि.प.यांनी तक्रारकर्तीकडे असलेल्या विद्युत मिटरचा फक्त डिसप्ले खराब असल्याचे निदर्शनास सदर आल्याने सदर मिटर बदलवून नवीन मिटर लावून दिले आहे. सदर पत्र, स्थळनिरिक्षण अहवाल नि.क्रं. 21 वरीलदस्त क्रं. ब-1 ते ब-3 वर विप.यांनी दाखल केला आहे. दाखल दस्तावेजांवरून वि. प. यांनी तक्रारकर्तीस विद्यत जोडणीची वर्गवारी बदलवून त्यानुसार विज देयक देऊन कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नाही हे सिध्द होते असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं.2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येते. - मुद्दा क्रं.3 बाबत ः-
मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र.83/2018 खारीज करण्यात येते
- उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च स्वतः सहन करावा.
- उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. | |