::: नि का ल प ञ :::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 29/05/2020 )
तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्त्याने नंदकिशोर बारापात्रे यांच्या मालकीची कच्च्या टिनाचे शेड असलेल्या छावणीच्या दुकानातील एक खोलीमध्ये आपल्या उदरनिर्वाहाकरीता छोटेसे हॉटेल चालविण्याकरीता दिनांक 3/11/2017 ते दिनांक 31/10/2022 असे एकुण 36 महिन्याकरिता दरमहा रु.6,000/- भाडयाने घेतले. भाडयाव्यतिरिक्त विदयुत बिल भरणा करण्याची जबाबदारी सुध्दा तक्रारकर्त्याची होती/आहे. तक्रारकर्ता यांच्याकडे असलेल्या खोलीमध्ये विरुद्ध पक्ष यांनी दिनांक 28/11/17 रोजी विज पुरवठा दिलेला असुन त्याचा जुना मिटर क्रमांक 7513617405 व नविन मिटर क्रमांक 05376207653 हा तसेच ग्राहक क्र. 450023038817 हा आहे व सदर विजपुरवठा मालक यांच्या नावाने दिलेला आहे. परंतु सदर विजेचा वापर नोव्हे.2017 पासून तक्रारकर्ता करीत असुन नियमितपणे विज देयकाचा भरणासुद्धा करीत आहे. तक्रारकर्ता याने दि.18/06/2018 रोजी रु. 4130/- या मे महिन्यापर्यंतच्या विज देयकाचा भरणा केलेला आहे. तक्रारकर्ता यांनी सदर खोली भाडयाने घेतली तेंव्हा त्या खोलीतील विज मिटर हे बंद होते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना सदर माहिती दिली व मिटर बदलविण्याकरिता रु. 2,825/- एवढी डिमांड रक्कम भरल्यानंतर विरुध्द पक्ष यांचेकडून दिनांक 28/11/17 रोजी विज पुरवठा चालू करण्यात आला. त्यावेळी विरुध्द पक्ष यांच्या कर्मचा-याने नविन विजमिटर उपलब्ध नसल्यामुळे जुने विजमिटर लावण्यात आले व आठ ते दहा दिवसाच्या आत नविन विजमिटर लावुन देण्यात येईल असे सांगितले. जुन्या विजमिटरमध्ये 365 युनिट आधीच वापरलेले युनिट होते. तक्रारकर्त्याला डिसेंबर 2017 ते जुलै 2018 पर्यंत एकुण सात देयके पाठविण्यात आले. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला डिसेंबर महिन्याच्या दिलेल्या विजदेयकानुसार मागील व चालू रिंडिग 365 युनिट 20 रुपयाप्रमाणे रु.220 विजदेयकाची रक्कम आणि रु. 2,500/- डिमांड सुरक्षा रक्कम म्हणुन जमा करण्यात आली. फेब्रुवारी, 2018 मध्ये जानेवारी व फेब्रुवारीचे एकत्रीत विज देयक रक्कम रु. 2,750/-, मार्च विजदेयक रक्कम रु. 1,380/-, एप्रिल विजदेयक रक्कम रु. 2,780/-, मे विजदेयक रक्कम रु. 4,130/- व जुन महिन्यात मागील थकबाकी जोडुन रु. 40,530/- चे विजदेयक पाठविण्यात आले. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याकडे उपरोक्त देयकाबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर मिटर तपासणी करण्यास सांगितले. तक्रारकर्त्याने दिनांक 22/6/18 रोजी विरुध्द पक्ष यांच्याकडे मिटर तपासणी करीता रु. 180/- भरणा केला. त्यांनतर विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही सुचना न देता त्यांच्याकडील जुने मिटर काढुन नविन मिटर लावले. त्यावेळी मिटर मधील युनिट, मागील व चालु रिडींग 00 होते. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास जुलै 2018 मध्ये मागील, चालू रिडींग 00, युनिट 350 आणि मागील थकबाकी 36,877.83/- असे एकुण रक्कम रु. 41,080/- चे विजदेयक दिले. सदर देयकाबाबत विचारणा केली असता विरुध्द पक्ष यांनी समाधानकारक उत्तर न देता उलट दिनांक 6/8/18 रोजी सदर विजदेयकाची रक्कम न भरल्यास विजपुरवठा कायमचा खंडित करण्यात येईल अशी नोटीस दिली. त्यावर तक्रारकर्त्याने दिनांक 20/8/18 रोजी लेखी तक्रार केली असता विरुध्द पक्ष यांनी सदर तक्रारीस उत्तर व त्यासोबत मिटर टेस्टींग रिपोर्ट पाठविला. विरुध्द पक्ष यांनी दिलेल्या पत्रानुसार उपरोक्त विजदेयक हे अचुक व नियमानुसार देण्यात आल्याचे सांगितले. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडील विजमिटर वेळेवर तपासणी न करणे व तसेच टेस्टींग रिपोर्ट अचुकरित्या न करताच मिटर रिपोर्ट पाठविले. तक्रारकर्त्याने उपरोक्त बिल कमी करण्याची विनंती केल्यावरही ते कमी न करता तक्रारकर्त्याच्या हॉटेलवर वारंवार येऊन विजपुरवठा बंद करण्याची धमकी दिली आणि मिटर बदलते वेळी विरुध्द पक्ष यांनी जुने व खराब मिटर लावुन मिटर टेस्टींग रिपोर्ट तक्रारकर्त्याला न देऊन तक्रारकर्त्याप्रति सेवेत न्युनता केली सबब तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचे विरुध्द मंचासमक्ष तक्रार दाखल करून त्यामध्ये अशी मागणी केली आहे की विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास दोषपुर्ण मिटरवरुन घेतलेल्या रिडींगप्रमाणे दिलेल्या देयकांऐवजी नवीन मिटरप्रमाणे विजदेयक देण्यात यावे. तसेच विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.50,000/- व तक्रारीचा खर्च रू.5,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांला द्यावा असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्षाविरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष हजर होवून त्यांनी प्राथमिक अक्षेपासह आपले लेखी कथन दाखल करून त्यामध्ये नमूद केले की वादग्रस्त विज कनेक्शन हे श्री. नंदकिशोर बारापात्रे यांच्या नावे असून त्यांनाच वीज कनेक्शन बाबत वाद उपस्थित करण्याचा अधिकार आहे. तक्रारकर्ता व विरुद्ध पक्ष यांच्यामध्ये कोणताही ग्राहक व सेवा पुरवणारा संबंध येत नसल्याने तक्रार करता हा विरुद्ध पक्ष यांचा ग्राहक नाही तसेच तक्रार करता हा हॉटेल या व्यवसायाकरिता सदर विजेचा वापर करीत असल्याने सदर वीज वापर हा वाणिज्य प्रवर्गात मोडत असल्याने सदर तक्रार विद्यमान मंचासमक्ष चालू शकत नाही या कारणास्तव तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
4. वादग्रस्त वीज कनेक्शन बाबत विरुद्ध पक्ष यांनी जुने वीज मीटर काढून त्याजागी सुस्थितीत असलेले मीटर लावून दिले . जुने मीटर तपासण्यात आले असून ते सुस्थितीत कार्य करीत असून त्याचा टेस्ट रिपोर्ट श्री बारापात्रे यांना देण्यात आला आहे. विरुद्ध पक्ष यांचे कर्मचारी जेव्हा वादग्रस्त बीज कनेक्शनचे मीटर वाचन घेण्याकरिता जायचे तेव्हा तक्रारकर्ता हे मीटर वाचन घेणाऱ्या कर्मचाऱ्यास मीटर वाचन घेण्यास मनाई करीत व हाकलून देत. त्यामुळे वादग्रस्त वीज कनेक्शन बाबत सरासरी वापराचे देयक देण्यात येत होते. तक्रारकर्ता हजर नसताना विरुद्ध पक्षी यांचे कर्मचाऱ्यांकडून मीटर वाचन घेण्यात आले व त्यावेळेस सदर वाचनाप्रमाणे वीज देयक देण्यात आले. सदर देयक सहा महिन्याचे दिले असून तक्रारकर्ता किंवा श्री बारापात्रे यांनी सदर देयकाचा भरणा विरुद्ध पक्ष यांचेकडे केला नाही. त्यामुळे विरुद्ध पक्ष यांनी श्री बारापात्रे यांना दिनांक- 6/8/2018 रोजी वीज कायदा 2003 अन्वये नोटीस सुद्धा दिला. तरीसुद्धा त्यांनी विरुद्ध पक्ष यांचेकडे सदर देयकाचा भरणा केला नाही. त्यामुळे विरुद्ध पक्ष यांना नाईलाजास्तव तक्रारकर्त्या कडील वीजपुरवठा खंडित करावा लागला. तक्रार करता यांनी विद्यमान मंचाने दिनांक-11/10/2018 रोजी पारित केलेल्या अंतरिम आदेशानुसार विरुद्ध पक्ष यांचेकडे वीज देयकापैकीची आदेशित रक्कमेचा भरणा केली नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
5. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच विरुद्ध पक्षाचे लेखी म्हणणे, रिजॉईंडर शपथपत्र, लेखी युक्तिवाद आणी उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व विरुद्ध पक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्ष यांचा ग्राहक आहे काय ? होय
2) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली
आहे काय ? : होय
3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्र.1 बाबत :-
6. तक्रारकर्त्याने नंदकिशोर बारापात्रे यांच्या मालकीची मौजा बल्लारशा येथे कच्च्या टिनाचे शेड असलेल्या छावणीच्या दुकानातील एका खोलीमध्ये आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरीता छोटेसे हॉटेल चालविण्याकरीता दिनांक 3/11/17 ते दिनांक 31/10/2022 असे एकुण 36 महिन्याकरिता दरमहा रु.6,000/- रूपयाने खोली भाडयाने घेतली. यासंदर्भात तक्रारकर्ता व नंदकिशोर बारापात्रे यांच्यामध्ये दि. 3/11/2017 रोजी भाडे चिठ्ठीचा करारनामा झाला असून त्यामध्ये अट क्र.5 नुसार भाडयाव्यतिरिक्त विदयुतदेयकाचा भरणा करण्याची जबाबदारी सुध्दा तक्रारकर्त्याची होती/आहे. तक्रारकर्ता यांच्याकडे असलेल्या खोलीमध्ये विरुद्ध पक्ष यांनी दिनांक 28/11/17 रोजी विज पुरवठा दिलेला असुन त्याचा जुना मिटर क्रमांक 7513617405 व नविन मिटर क्रमांक 05376207653 हा असुन ग्राहक क्र. 450023038817 हा आहे व सदर विजपुरवठा मालक यांच्या नावाने दिलेला आहे. परंतु सदर विजेचा वापर नोव्हे.2017 पासून तक्रारकर्ता करीत असुन विज देयकाचा भरणासुद्धा करीत आहे.याबाबत तक्रारकर्त्याने नि. क्र.5 वर दस्त क्र. 14 भाडे चिठ्ठीचा करारनामा व विजदेयके दाखल केलेले आहेत. यावरून तक्रारकर्ता सदर विज कनेक्शन वापरतात व विरुद्ध पक्ष यांनी दिलेल्या विजदेयकाचा भरणा करतात हे नि.क्र. 4 वरील दस्त क्र.1ते 5वर दाखल डिसेंबर, 2017 ते मे-2018 याविजदेयकांरून स्पष्ट होते. त्यामुळे वि.प. यांनी घेतलेला आक्षेप की तक्रारकर्ता व वि. प. यांचा सेवा देण्याचा संबंध नाही तसेच तक्रारकर्ता हे सदर विज कनेक्शन हॉटेल या व्यवसायाकरिता वापरत असल्याने तक्रारकर्ता हा वि.प. यांचा ग्राहक नाही, ही बाब ग्राह्य धरण्यायोग्य नाही. तक्रारकर्ता हे सदर विज कनेक्शन उदरनिर्वाहाकरिताचालवीत असलेल्या व्यवसायाकारीता वापरतात व दिलेल्या वीज देयकाचा भरणा करीत असल्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2(1)( डी) अन्वये तक्रारकर्ता हा वि.प. यांचा ग्राहक आहे हि बाब सिद्ध होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र.2 बाबत :-
7. तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्यामध्ये विजदेयकांबाबत वाद आहे. तक्रारकर्त्याने नि.क्र.4 वर दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे मालक नंदकिशोर बारापात्रे यांचे नावाने दिनांक 28/11/2017 रोजी विजपुरवठा दिला तेव्हा त्याचा मिटर क्रमांक 7513617405 हा होता. त्यानंतर तक्रारकर्त्यास माहे डिसें. 2017 च्या दिलेल्या विजदेयकामध्ये चालू रीडिंग तसेच मागील रीडिंग 365 व युनीट 20, रु.230 दर्शवलेले आहे. याचाच अर्थ विरुद्ध पक्षांने लावून दिलेल्या वीज मीटर मध्ये सुरुवातीचे मिटर रिडींग हे शून्य नव्हते. त्यानंतरसुद्धा वि.प.ने माहे डिसेंबर 2017ते माहे मे 2018 चे विज देयकांमध्येदेखील चालू रीडिंग व ,मागील रीडिंग 365 च दर्शवून विज देयक दिलेले आहेत हे दाखल विज देयकांवरुन स्पष्ट होते. मात्र त्यानंतर अर्जदारांस देण्यांत आलेल्या जून, 2018 च्या विजदेयकामध्ये मागील रिडींग 365 व चालू रिडींग 3883 दर्शवून रु. 40580/- चे वीज देयक दिले.
8. सदर अवाजवी देयक आल्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षांकडे विजमिटर दोषयुक्त असल्यामुळे ते तपासण्याकरीता अर्ज करून रू.180/- शुल्काचा भरणा केला. परंतु विरूध्द पक्ष यांनी जुने मिटर बदलवून 05376207653 या क्रमांकाचे नवीन मिटर बसवून दिले. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास जुलै 2018 मध्ये मागील व चालू रिडींग 00, युनिट 350 दर्शवून मागील थकबाकीसह एकुण रक्कम रु. 41,080/- चे विजदेयक दिले. यानंतर ऑगस्ट 2018 च्या विजदेयकामध्ये चालू रीडिंग 490 मागील रिडींग 0 दर्शवून रु. 45, 360/- चे विजदेयक दिले.
9. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे गाळ्यामध्ये दिनांक 28/11/2017 रोजी आधीपासून 365 युनीट रिडींगपर्यत चाललेले जुनेच विजमिटर क्रमांक 7513617405 लावून दिले. मात्र त्यानंतरसुद्धा वि.प.ने माहे डिसेंबर 2017ते मे 2018 चे विज देयकांमध्ये मिटर वाचन न घेताच चालू रीडिंग व ,मागील रीडिंग 365 च दर्शवून विरुद्ध पक्ष यांनी विज देयक दिलेले आहेत हे दाखल विज देयकांवरुन स्पष्ट होते. मात्र रिडींगची नोंद कां होऊ शकली नाही याचे कोणतेही संयुक्तीक स्पष्टीकरण विरूध्द पक्ष यांनी दिलेले नाही. विरुद्ध पक्ष यांनी आपल्या लेखी उत्तरात तक्रारकर्ता हा मीटर वाचन घेऊ देत नव्हता असा आक्षेप घेतलेला आहे. मात्र तसे त्यांनी कोणत्याही दस्तावेजांसह सिद्ध केले नाही. प्रकरणात तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या सदर देयकांवरून विरूध्द पक्षाने मिटर रिडींगची नोंदणी करण्यांत हयगय केल्याचे दिसून येते. परिणामतः मीटर वाचन न घेताच वि.प.हे तक्रारकर्त्याला सरासरी विजदेयके देत होते हे स्पष्ट होते. ही बाब विरूध्द पक्ष यांचे सेवेतील न्युनता दर्शविते.
10. अर्जदाराने मीटर तपासणीबाबत शुल्क भरून अर्ज सादर केल्यानंतर विरूध्द पक्ष यांनी जून, 2018 मध्ये जुने मीटर काढून नवीन विद्युत मिटर बसविले. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास जुलै 2018 मध्ये मागील व चालू रिडींग 00, युनिट 350 दर्शवून मागील थकबाकीसह एकुण रक्कम रु. 41,080/- चे विजदेयक दिले. यानंतर ऑगस्ट 2018 च्या विजदेयकामध्ये चालू रीडिंग 490 मागील रिडींग 0 दर्शवून रु. 45, 360/- चे विजदेयक दिले. मात्र सदर दोन्ही विजदेयकांमध्ये मागील विवादित देयकांचे थकबाकीची देखील मागणी केलेली असल्यामुळे तक्रारकर्त्याने त्यांचा भरणा केला नाही. मात्र याबाबत तक्रारकर्त्याने आक्षेप घेतला असूनही थकबाकीचे कारणास्तव विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा वीज पुरवठा खंडित केला ही बाब देखील विरुद्ध पक्ष यांचे सेवेतील न्यूनता दर्शविते. प्रकरण मंचासमक्ष प्रलंबित असताना विद्यमान मंचाने दिनांक- 11/10/2018 रोजी पारित केलेल्या अंतरिम आदेशानुसार तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष यांचेकडे वीज देयकापैकीची आदेशित रक्कम रुपये 20000/- भरणा केली असून तशी तक्रारकर्त्याने दिनांक 9/1/2019 रोजी पुरसीस दाखल केली असून सदर पुरसीस नि. क्र. 17 वर दाखल आहे. व विरुद्धपक्ष यांनी देखील तक्रारकर्त्याचा विज पुरवठा सुरू करून दिला आहे.
11. त्यामुळे मंचाचे मते तक्रारकर्ता माहे डिसेंबर, 2017 ते ऑगस्ट ,2018 चे विवादीत देयक रद्द करून त्याऐवजी नियमानुसार सुधारीत वीज देयक मिळण्यास तसेच त्याला झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी विरूध्द पक्षाकडून यथोचीत नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र आहे. सबब, मुद्दा क.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. 3 बाबत :-
12. मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.146/2018 अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरूध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास माहे डिसेंबर-2017 ते ऑगस्ट-2018 चे दिलेले विवादित विज
देयके रदद करून या संपूर्ण विवादीत कालावधीचे सुधारीत विज देयके तक्रारकर्त्यास द्यावीत
आणि तक्रारकर्त्याने सदर वीज देयकांचा भरणा करावा.
(3) विरुद्धपक्ष यांनी तक्रारकर्त्यास शारिरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम
रू.5,000/- व तक्रार खर्च रक्कम रू.5,000/ द्यावा.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. कीर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.